वाटेवर काटे वेचीत चाललो... लेखक विजयकुमार मिठे vijaykumar mithe

वाटेवर काटे वेचीत चाललो... लेखक विजयकुमार मिठे vijaykumar mithe

Author:
Price:

Read more

 

*वाटेवर काटे वेचीत चाललो...* 

बालपणापासून मला रेडिओ ऐकण्याची आवड आहे आणि आजच्या दृश्य माध्यमातही मी ती टिकवून ठेवली आहे.

रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या श्रुतिका आणि गाणी  अधूनमधून मी ऐकत असतो.अर्थात ही आवड जोपासण्याचे कारण म्हणजे श्रुतिका लेखनाच्या निमित्ताने माझा रेडिओशी असलेला वर्षानुवर्षांचा संबंध.काल संध्याकाळी मी रेडिओवर कवी अनिल यांनी लिहिलेले आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेले 


*वाटेवर काटे वेचीत चाललो*/

*वाटले जसा फुला फुलांत चाललो/*


हे गाणे ऐकले आणि ते ऐकताना मला बहरलेल्या फुलांच्या शेतातून फिरतो आहे असा भास होऊ लागला.रसिकाला असे वाटणे म्हणजे ती त्या गीतकाराच्या शब्दांची ताकद आहे,किमया आहे.१९७५ सालात रेडिओवरुन प्रसारित झालेले हे गाणे मी अनेक वर्षांपासून ऐकतो आहे.ते ऐकत असताना प्रत्येक वेळी माझ्या चित्तवृत्ती उल्हसित झालेल्या आहेत पण आज मात्र या गाण्यातला अर्थ माझ्या मनाला अधिकच भावला.कवी अनिल यांनी हे गाणे लिहिले त्यावेळचे समाज जीवन आणि आजचे पन्नास वर्षांनंतरचे 

समाज जीवन याचा विचार केला तर यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. त्याकाळातील माणसांची परोपकाराची वृत्ती आजच्या माणसांमध्ये उरली आहे का?असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो आणि मनाच्या गाभाऱ्यातून याचे उत्तर 'नाही' असेच येते.


*वाटेवर काटे वेचीत चाललो/*

 गाण्याच्या या पहिल्याच ओळीत आपल्याला परोपकार दिसतो.काट्याचा गुणधर्म टोचणे हा आहे आणि तो येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला टोचायला नको.म्हणून कवी ते काटे वेचीत चालला आहे.हा कवीचा परोपकार आहे.असे हे नेक काम केल्याने त्याला फुला फुलांतून चालल्याचा आनंद मिळतो आहे.कोणावर उपकार करण्यासाठी कवी हे काम करीत नाही तर त्याला यापासून आनंद मिळतो आहे.हा भूतकाळ होता.आजचा वर्तमानकाळ काय आहे.हे आपण सगळे अनुभवत आहोतच.कवी अनिल यांची क्षमा मागून या गाण्यात असा बदल केला तर आजच्या समाज जीवनाचे चित्र आपल्या नजरेसमोर सहज उभे राहिल.


*वाटेवर काटे फेकीत चाललो/*

*टोचले कुणास पाहून हसलो/*

इतका बदल आजच्या समाज मनात झालेला आहे.हा बदल का झाला,कसा झाला.याला जबाबदार कोण? यासाठी हा लेखन प्रपंच नाही तर हे गाणे ऐकल्यावर मला माझ्या जुन्या गावातील अशा परोपकारी आणि संवेदनशील मनाच्या माणसांच्या आठवणी दाटून आल्या आहेत. त्यांच्या अंगा खांद्यावर माझे बालपण गेल्याने ही माणसं अंतर्बाह्य कशी निर्मळ होती हे मी जवळून अनुभवले आहे.


आमच्या घराच्या समोर पांडू पाटलाचे वीस माणसांचे कुटुंब एकत्र राहत होते.त्या काळात गावातील दोनच माणसं नोकरीला होते.बाकी  सगळ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून होता.पांडू बाबांने वयाची साठी पार केली होती.पण त्याची काम करण्याची उमेद मात्र संपली नव्हती.तो रानात गरक्याला

निघाला की त्याला रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या जनावरांनी टाकलेल्या शेणाच्या पोहट्या पडलेल्या दिसायच्या. आपल्याच नादात फरफट गाडा खेळत चालणाऱ्या पोराला फुफाट्यात सोन्याचे मनी चमकताना पाहून आनंद व्हावा तसा आनंद पांडू बाबाला त्या शेणाच्या पोहट्या पाहून व्हायचा.पुढे होऊन तो त्या शेणाच्या पोहट्या उचलायचा. जवळच कोणाचे वावर असेल तर त्या वावरात रस्त्यावरूनच भिरकावायचा.असे करताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसायचा. कधी कधी तर एखाद्याच्या ध्यानीमनी नसताना त्याला अचानक घबाड मिळावं तसं व्हायचं.वाटेवर शेणाच्या कितीतरी पोहट्या पडलेल्या दिसायच्या.अशा वेळी तो हावरटा सारखा सगळं शेण धोतराच्या ओटीत भरायचा. असे करताना त्याला धोतर खराब होण्याची भीती वाटत नसायची.गोळा केलेल्या शेणाची ओटी तो जवळच असलेल्या कोणाच्या ना कोणाच्या वावरात रिती करायचा.हे सगळं तो रानाच्या वाटानं चालताना करायचा तर गावातील रस्त्यावरून फिरताना ही त्याचा हा उद्योग सतत चालूच असायचा.गाव वाटेवरचे उचललेले शेण तो कोणाच्याही उकिरड्यावर टाकायचा.शेणाने भरलेले हात वाटावरल्या फुफाट मातीने पुसायचा.सकाळची शाळा सुटायच्या वेळेला त्याची माझी भेट सुताराच्या जोत्याजवळ हमखास व्हायचीच.पाठीवर दप्तराची पिशवी टाकून मी त्याला कितीतरी वेळ शेण उचलताना पाहत राहायचो पण त्याला त्याचा कधीही संकोच वाटाला नाही.हे काम त्याला कोणी सांगितले ही नव्हते आणि हे काम करून तुला काय मिळते? असे त्याला कोणी विचारल्याचे माझ्या ऐकिवातही नव्हते.


गावात असे परोपकाराचे काम करणारा पांडू बाबा हा एकमेव माणूस होता का? तर नाही. गावात अशी अनेक माणसं होती,बायकाही होत्या.पण पांडू बाबा ठळकपणे माझ्या आठवणीत राहीला इतकेच.


जोराचा वारा आला तर कापसाच्या म्हातारीगत उडून जाईल अशी देहयष्टी असलेली माझी आजी सिता माळीण. तिला गावातील तुंबलेल्या गटारी उकरण्याची सवय होती.ती गावातील रस्त्यांवरून फिरताना कधी गप्प म्हणून चालायची नाही.उमेदीच्या काळात गोरीपान,काठी सारखी उंच सरळ असलेल्या सिताईच्या पाठीचा कणा म्हातारपणात वाकला होता.आयुष्यभर पोटाला चिमटा देऊन रूक्याचा थुका करून जमविलेली पुंजी हरविल्यावर त्यानं

बावचळल्यागत खाली मान घालून घर,रस्ते धुंडाळीत फिरत रहावं तशी ती शेंबड्या माशीगत गावभर भणाभणा करीत फिरायची.गटार कोणत्या गल्लीतील आहे,कोणाच्या दारापुढची आहे.याच्याशी तिला काही देणेघेणे नसायचे.गटार तुंबलेली आहे ना मग ती हाताने उकरून पाणी काढून द्यायचे. एवढेच तिचे काम.कधीकधी गटारीत शेपाचे किडे वळवळत असायचे पण तिला त्यांची किळस वाटली नाही.जिच्या घरापुढची गटार सिताई उकरायची ती बाई ओट्यावर धुणं धुताना सिताईकडं पाहून हसायची.तेव्हा मात्र तिचा संताप अनावर व्हायचा आणि ती तिचा चांगलाच वरंबाडा भरायची."पोटभाजे, दारापुढं

एवढी गटार तुंबली,काढायला तुझे हात झडलेय का? गटारीचा एवढा घणाडा सुटलाय तरी तुम्हाला अन्न पाणी कसं गोड लागतंय गं? काय दाताड काढीती.टाक  माझ्या हातावर पाणी" हात धुवून स्वतःशीच बडबडत ती रस्त्याने चालत रहायची.तिच्या अशा बोलण्याचा लोकांनी कधी राग धरला नाही आणि तिनेही तुंबलेल्या गटारी उकरण्याचे सोडले नाही.


सिताईचे हे काम जरी गावाला आवडत असले तरी घरातली माणसं अशा घाणेरड्या कामावरून तिचा राग राग करायचे.तिच्या सुनांना हे बिलकुल आवडायचे नाही."तुमची म्हतारी घरातला तांब्या इकडचा तिकडं करीत नही अन दिवसभर गाव गटारी उपसीत हिंडत रहाती.आपल्या घराण्याला अशी कामं शोभतात का हो? सांगा तुमच्या आईला दोन गोष्टी समजावून.बंद करा म्हणावं हे गचाळ कामं" सुनांनी आपल्या नवऱ्यांचे कान भरले. कान भरून पोट फुगविलेल्या

पोरांनी आपल्या आईला समजावून सांगितले.सिताईने पोरांच्या समाधानासाठी मान डोलावली.दुसऱ्याच दिवशी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिले आणि आपले पहिले पाढे पंचावन्न सुरूच ठेवले.तिचा नाईलाज होता.रोजच्या सवयीने हे काम तिच्या अंगवळणी पडले होते.ते केल्या शिवाय तिच्या मनाला समाधान लाभत नव्हते.


गोडतेल आणण्यासाठी बाटली घेऊन ती वाळ्या वाण्याच्या दुकानाकडे निघाली की 'आजी आपल्याला साखरेच्या गोळ्या घेऊन देईल' या आशेने मीही तिच्या सोबत जायचो.तेव्हा मी असेल सहा-सात वर्षाचा लहान लव.आम्ही वाणीन काकीचा चांद्या ओलांडून पुढे आलो की देवळाकडे जाणारी मुख्य गल्ली लागायची.त्या गल्लीत आजीला तुंबलेली गटार दिसली की हातातील बाटली ती माझ्याकडे द्यायची आणि तुंबलेली गटार उकरायची.मी हातातील बाटली हेलकावीत तिची गंमत पाहायचो.तुंबलेल्या पाण्याचा लोंढा शर्यतीत पळणाऱ्या पोरासारखा सुसाट पळू लागला की आजी घाणीने भरलेले हात ओट्यावर पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवायची,स्वच्छ धुवून  पदराला पुसायची.बाहेरील हालचालीचा आवाज ओट्या जवळील घरात ऐकू जायचा.तो ऐकून घरातली बाई ओट्यावर येऊन बादलीत डोकावून पाहायची.खराब झालेलं

पाणी भडाभडा ओतून 

आजीवर खेकसायची.आजीही तिला वाईट वकट्या शिव्या देत

दुकानाची वाट चालत रहायची.

आठ-पंधरा दिवसातून असे प्रसंग घडताना मी पहायचो.पण आजीला त्याचे काहीच वाटायचे नाही.कोणाच्या चांगल्या बोलण्याने ती सुखावली नाही आणि कोणी भांडले म्हणून दुखावली ही नाही.तिचे हे परोपकाराचे काम ती अंथरुणाला खिळेपर्यंत इमाने इतबारे करीतच राहिली.


गावात अशी अनेक माणसं होती की ज्यांना मी ओळखतही नव्हतो.ती माणसं रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या मधोमध पडलेला एखादा दगड रहदारीला अडथळा करीत असेल तर असा दगड लोटताना,कधी रस्त्यावर काट्याच्या फांदुऱ्या,फुटलेल्या काचा,चुका खिळे,बारीक सारीक दगडगोटे जाणाऱ्या येणाऱ्यांच्या पायांना जखमा होऊ नये म्हणून उचलताना मी अनेकांना पाहिले आहे.


 पावसाळ्यात गाव शिवारातील रस्ते खराब व्हायचे, रस्त्याला खड्डे पडायचे. पावसाळा संपला की माणसं बैलगाडीने, डोक्यावरून माती वाहून रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने बुजवायचे.अख्खे गावचं श्रमदान करायचे. श्रमदानाचे हे धडे शाळेतूनच गिरविले जायचे.ते मनावर गारुड करायचे आणि जीवन जगताना उपयोगी पडायचे. गावात अशी अनेक कुटुंब होते की ज्यांना स्वतःची पांडभर जमीन नव्हती.त्यांचा उदरनिर्वाह मोलमजुरीवरच चालायचा.पावसाळ्याच्या दिवसात पावसानं दहा-पंधरा दिवस तोंड काळं केलं की भरपूर पाऊस पडावा म्हणून ग्रामस्थ 'धोंड्या धोंड्या पाणी दे,साळ माळ पिकू दे' अशी गाणी म्हणत मारूतीला 'हेल' घालायचे.तो घालण्यासाठी हीच भुमीहीन कुटुंब आघाडीवर असायचे.परोपकाराची वृत्ती गाव माणसाच्या अंगी ठासून भरली होती.'उपकार करावा अन् वाटावर ठिवावा,कोणी जाणो ना जाणो'आपण आपलं काम करीत राहावं.जग सुखी तर आपण सुखी.अशा धारणेनं माणसं वागायची,वर्तायची.हेच पूर्वीच्या माणसांचं जगणं होतं, हीच त्यांची संस्कृती आणि संस्कार होते.


वाटेवर काटे वेचीत चालण्याचे हे संस्कार आता कालबाह्य झाले आहेत.आजचे वर्तमान वेगळे आहे. घरासमोरील,गावातील रस्त्यांना खड्डे पडले आहेत. ग्रामपंचायत,महापालिकेचे लोक येतील रस्ता करतील किंवा शासन योजनेतून रस्त्याचे काम होईल या आशेवर महिनोन्महिने माणसं अशा धोकादायक रस्त्यांवरून प्रवास करतात पण कोणी श्रमदानाने तात्पुरती डागडुजी करायलाही तयार होत नाही‌.शहरापासून तर गावापर्यंत हीच उदासीनता पाहायला मिळते आहे.आज जर कोणाला वाटेवरचे शेण धोतराच्या ओटीत भरताना पाहिले तर याला नक्कीच वेड लागले आहे असेच आपण म्हणू आणि त्याने जमा केलेले शेण दुसऱ्याच्या शेतात टाकले तर हा ठार वेडा झाला आहे.असा शिक्कामोर्तब करून मोकळेही होऊ.


आजही मी रानाच्या वाटेने चालत राहतो तेव्हा मला शेणाच्या पोहट्या पडलेल्या दिसतात.गावातून फिरताना गटारी तुंबलेल्या दिसतात.चुका काटे,दगडगोटे पडलेले दिसतात.ते उचलून बाजूला सारावेत म्हणून माझे हात सरसावतातही.पण लोक लज्जेने मी गलीतगात्र होतो.

दगडगोटे,काट्यांना टाळून चालताना मला दिसू लागतो शेणाच्या पोहट्या उचलणारा पांडू बाबा आणि तुंबलेल्या गटारी उकरणारी माझी आजी सिता माळीण.त्यांचे संस्कार, त्यांच्यातला निर्भिडपणा माझ्यात कसा आला नाही? या जाणिवेने मी अधिकच शरमिंदा होतो आणि कानात घुमत राहतात, पुन्हा पुन्हा कवी अनिल यांच्या गाण्याच्या या ओळी,

*वाटेवर काटे वेचीत चाललो/* *वाटले जसा फुलाफुलांत चाललो*


*विजयकुमार मिठे*

मो.९८८१६७०२०४

0 coments