भुरळ घालणारे चांदणभूल--माया देशपांडे  (chandanbhul) maya deshpamde

भुरळ घालणारे चांदणभूल--माया देशपांडे (chandanbhul) maya deshpamde

Author:
Price:

Read more

माया देशपांडे यांनी *चांदणभूल* ललितलेख संग्रहाला दिलेला हा अभिप्राय मला फार महत्वाचा वाटतो.देशपांडे मॅम आपले आभार. अगदी मनापासून 🙏

भुरळ घालणारे *चांदणभूल*

श्री. विजयकुमार मिठे
                           स.न.
             आपले "चांदणभूल " हे ललितलेखांचे पुस्तक संदीपने मला पाठवले. मी साहित्यिकही नाही अन् समिक्षकही नाही. एक वाचक आहे. वाचक या नात्याने जे आवडते ते वेचत जाते. आपल्या या पुस्तकाचं नाव आणि मुखपृष्ठ दोन्हीही भुरळ घालणारेच आहे. हातात पुस्तक घेतले की पूर्ण वाचूनच खाली ठेवावेसे वाटते. पण मी सलग वाचू शकले नाही. दोन बैठकीत पूर्ण केले.
               आपली भाषाशैली खूप आवडली. खूप अलंकारिक, अवजड शब्द ,पल्लेदार वाक्यं असं काहीही नाही. तरीही सुंदर आहे. मनाला भिडणारी आहे. काही वाक्य अप्रतिम वाटलीत. उदा.'चांदणभूल' मधील काही वाक्ये..." गांवापासून हाकेच्या अंतरावर दहावीस 'खळे' एकमेकांच्या गळ्यात गळा घालून बसलेले दिसायचे." किंवा "रात्रीनं चमचमणा-या  चांदण्यांची रत्नजडीत गोधडीच आपल्या अंगावर पांघरुण म्हणून घेतली आहे." चंद्राच्या बाजूची चांदणी ही आकाश नात्यानं आपली मामी लागते का? ही कल्पना खूप भन्नाट आहे. 'आकाश नातं' हा शब्द किती वेगळा आहे ना!
              सर, आपण या संपूर्ण पुस्तकात अशी नाती निर्माण केली आहेत. बाभळीचं वर्णन सुरेख.तिच्यात केस उन्हात वाळवणारी स्त्री  आपल्याला दिसते. 'हळदुल्या फुलांचा गुच्छ' वाचतांना डोळ्यासमोर दिसतो.बाभळीचे किती उपयोग सांगितले आहेत आपण."आईची माया आणि बाभळीची काया" सुंदर कल्पना. हे लिहून झाडही माणसासारखंच जिवंत केलत आपण.निसर्ग, प्राणी आणि निर्जिव सायकलही तुम्हाला जीव लावते.पावसाचा राग राग केल्यानेचं पाऊस रागानं आपलं गाव सोडून निघून गेला हे फक्त संवेदनशील मनालाच जाणवू शकते.शेतात कष्ट करणारा बैल विकण्याचा निर्णय मुले घेतात त्यावेळची तुमची तगमग आणि बैलाला बघायला जाणं, तिथून निघतांना होणारी घालमेल यातून तुमचे त्यांच्याशी असलेलं एक अतूट नातं सांगून जात.म्हणूनच तुम्ही लिहिता," माझे सखे सोबती, जिवाभावाचे मैतर यांना भेटण्यासाठी मी वरचेवर जात असतो. गेलो म्हणजे कान टवकारुन ते मला पाहत असतात.माझं रुप डोळ्यात साठवून घेतात."
       "जूनं ते सोनं" मधूनही सायकल या निर्जिव वस्तूशी बालपणी जमलेली गट्टी, पुढे मोटरसायकल आल्यावर त्या सायकलला सोडून देणे आणि पुन्हा शरीरस्वास्थ्यासाठी सायकलशी दोस्ती करणं यातूनही एक नातं उलगडत जाते. यातीलही काही वाक्य मस्तच.उदा." सायकल माझी सखी- मैत्रीण झाली. ऐन तारुण्यात प्रेम जडलेल्या प्रेयसीची काळजी घ्यावी, अशी मी सायकलची काळजी घेऊ लागलो." किंवा " तिच्या माझ्यात मोटारसायकलने दुरावा आणला.मेव्हणीशी सलगी वाढलेली पाहून बायकोनं रूसून बसावं ! तशी सायकल अडगळीत पडून राहिली."
           सलमा ही बालमैत्रीण वाचकाच्या मनातही घर करुन बसते आणि " सलमा अल्लाह को प्यारी हो गई..." हे वाचतांना वाचकाचेही डोळे भरुन येतात.
      माणसाच्या    जगण्यातील साधेपणा आणि तरीही त्यातून  मिळणारा आनंद या सगळ्या लेखातून दिसतो."बिनपैशाचा आनंद", "रानमेवा " हे लेख यातीलच. रिठ्यांनी कपडे धुऊन स्वच्छ करणे असो वा जत्रेत फिरुन खिशातील चार आण्यात रुमाल, शिट्टी, बासरी, फुगा, गोडशेवीचा पुडा खरेदी करणं असो, मन समाधानी अन् आनंदी व्हायचं असा काळ यात दिसतो.
                    गावाची संस्कृती,सभ्यता,गावगाडा, त्यातील कामें , लोकांचे परस्परांशी असलेलं नातं हे सगळचं "चांदणभूल" मध्ये दिसून येतं. उदा."दिवाळी त्याच्या डोळ्यातली", "फोटोवाला",  "गुपितबाबाचा डोह", "पावसाचं काही देणं लागतोय " हे लेख. "दिवाळी त्याच्या डोळ्यातली " या लेखाची सुरुवातच गावगाडा कसा होता ते सांगते."भिंतीला भिंत लागून तिघा भावांनी राहावं, तसा सुतारवाडा, माळवाडा आणि मातंगवाडा एकमेकांना खेटून बसले होते.तिन्ही वाड्यातील माणसं गुण्यागोविंदाने नांदत होती.एकमेकांच्या सुख-दुःखात मदत करीत होती." गणप्याच्या कुटुंबाला गाव आधार द्यायचा.गावनात्यानं बांधलेल्या बहिणींनी भाऊबीजेला ओवाळणे हेही या गाव संस्कृतीत होतं. आज देण्याची वृत्ती राहिली नाही.
            आज खरचं "गावपण हरवलेलं गाव " राहिलं आहे. "मिणमिणत्या दिव्यांच्या उजेडात, गाईगुरांच्या हंबरण्यानं, मंदिरातील घंटानादानं गाव जवळ आल्याची जाणीव व्हायची."  हे आता संपत आलय. गावातील खेळही नाहिसे झालेत.सूरपारंब्या, लपाछपी,आट्यापाट्या, सागरगोट्या असे खेळही नाहीत.टीव्हीमुळे गावातील छोटे सांस्कृतिक कार्यक्रमही संपलेले दिसतात. " जुन्यामागं नवं येणारचं. पण माणसाचं वागणं बोलणं इतकं बदलाव? जिव्हाळा, आपुलकी, नम्रता, रितभात हे सगळे जुने संस्कार घेऊनच तर पुढच्यांनी चालायचं असतं. पण जुन्यांशी काही देणं- घेणं नसल्यागत रितभात सोडून वागणारं हे नविन गाव आपलं गावपण हरवून बसलं आहे. एखाद्या म्हातार्‍यानं आपला जन्मभराचा ऐवज हरवून बसावं तसं."
                  अगदी असचं झालय आता सर.मी लग्नानंतर प्रथमच सासरी आमच्या गावी गेले होते ते गाव आणि आजचे पंचेचाळीस वर्षानंतरचे गाव यात मला खूप बदल जाणवला.
         मी तशी शहरातच वाढली. पण बालपण तुम्ही वर्णन केल्याप्रमाणेच गेलेय माझे. समाधानी आणि आनंदी वृत्ती होती. वाड्यातील सगळी मुलं मुली एकत्र खेळायची, भांडायचीही पण मोठी माणसं कधीच मध्ये पडत नव्हती. शेजाराहून भाजी, लोणचं दिल्या घेतल्या जायचं. उन्हाळ्यात सगळ्या शेजारणी मिळून शेवया, पापड, कुरड्या, सांडगे करायच्या. दिवाळीत एकमेकांकडे फराळाला जाणेयेणे असायचे. संक्रांतीला तिळगुळ देणे घेणे व्हायचे. आता यातील काहीच राहिले नाही.
           आपले पुस्तक वाचतांना पुनःप्रत्ययाचा अनुभव आला. सगळं बालपण आठवलं. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चांदण्याही कमी झाल्यासारख्या वाटतात मलाही.
              एक खूप छान पुस्तक वाचकांना दिलेत याबद्दल धन्यवाद आणि पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा.
                                                              एक वाचक
                                                            माया देशपांडे.
-------------------------------------------------------------------
                            ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.

                                              संचालक - कादवा शिवार
                                              प्रतीक विजयकुमार मिठे
                                                 मो.9145099071
                                          #Team Kadva shivar 

0 coments