जात्या रे ईश्वरा jatyavarchya ovya (vijaykumar mihe)

जात्या रे ईश्वरा jatyavarchya ovya (vijaykumar mihe)

Author:
Price:

Read more



पहाटच्या निरव शांततेत आई जात्यापाळी पायलीचं दळण दळायला बसायची. दोन बायकांनाही ओढवत नसलेलं 'जातं' आई एकटी ओढायची. कधीतरी जोडीला आत्या असायची. जात्याच्या मुखात धान्याचं पहिलं 'इरण' घालताना म्हणायची,
'पहिली माझी ओवी गं, ओवीचा माझा नेम/
वाचतील पोथी, तुळशीखाली राम/
दुसरी माझी ओवी गं,ओवी जात्याच्या खुट्याला/
नाना माझी ताई, माझ्या जलम देत्याला/
एकामागोमाग एक आशा ओव्या तिच्या गोड आवाजात बाहेर पडायच्या.
तिच्या मनातला जिव्हाळा त्या ओव्यांमधून पाझरत राहायचा. आपला आनंद,सुख-दुःख ती जात्याला सांगायची.जात्याशी तिचं असं जिवाभावाचा अतूट नातं जडलं होतं.ती आपल्या माहेरच्या गणगोताचं कोडकौतुक ओव्यांमधून गायची तेव्हा 'जातं' ते ऐकून हरणागत पळायचं आणि सासरी आल्यावर भोगावं लागणारं दुःख ऐकून 'जातं' जड व्हायचं, घोगरा,रडका आवाज काढून तिचं सांत्वन करायचं.सुख दु:खाचं गाणं गाता गाता पायलीचं दळण कधी सरायचं आईलाही कळायचं नाही. एखाद्या पोरानं पांढऱ्याशुभ्र कापसाच्या ढिगावर बसावं तसं 'जातं' पायलीच्या दळलेल्या पिठात फथकल मारून बसल्यागत दिसायचं.
मातंगवाड्याच्या बाजूनं  दिस मोहरायचा.सिंदबनात पाखरांचा चिवचिवाट वाढायचा. माळवाड्यातल्या आडावर पाणी भरण्यासाठी आलेल्या बायकांचा गलका कानावर पडायचा, तेव्हा आई जात्याच्या मुखात शेवटचा घास घालतांना म्हणायची,
सरीलं दळण, निगळून उभं करा /
जात्या ईश्वराच्या, हात जोडून पाया पडा /
तो घास तसाच जात्याच्या मुखात ठेऊन, जात्याला मनोभावे हात जोडून पाया पडायची.'जातं' हे तिच्या नजरेत ईश्वराचं रूप होतं. 'जातं' ओढून आलेला घाम ती पदरानं  पुसायची.मग ती जात्यापाळी पसरलेलं पीठ डब्यात,टोकरीत भरायची आणि तेच पीठ काठवटीत घेऊन मळायची.
आईनं जात्यापाळी गायलेल्या अशा कितीतरी ओव्या मी गोधडीत पडल्या पडल्या ऐकल्या आहेत.मनात साठवून ठेवल्या आहेत.'जातं' आईला जसं ईश्वराचं रूप वाटायचं, तसं रोजच्या सहवासाने ते आपल्या माहेरच्या नात्यागोत्यातलं माणूसही वाटायचं.ती त्याची अधिक काळजी  घ्यायची. एखाद्या म्हाताऱ्यानं कोपरा धरून बसावं, तसं आमच्या घराच्या ओसरीत एका कोपऱ्याला 'जातं' ठाण मांडून बसलं होतं. चार आठ दिवसांनी आई ओसरी सारवायची.पण जात्याभोवतीनं मात्र रोज शेणानं सारवून घ्यायची. जात्याभोवतीचं शेणानं सारवलेलं ते रिंगण जाता-येता नजरेत भरायचं.एखाद्या माणसाला केलेली करणी उतरविण्यासाठी रिंगणात बसवावं  तसं 'जातं' शेणाच्या सारवलेल्या रिंगणात बसलेलं दिसायचं.
गावात आमच्याच घरी 'जातं' होतं असं नाही,तर घरोघरी मातीच्या चुली,तशी घरोघर जात्याची घरघर ऐकू येत असायची.जात्यावर दळताना होणारे श्रम विसरण्यासाठी आयाबाया ओव्या,गाणी म्हणायच्या त्यात माहेरचा गोडवा असल्याने प्रेम,जिव्हाळा भरलेला असायचा. यातूनच गाण्याचा त्यांना लळा लागला. बोली भाषेतलं ओवी सौंदर्य,गाणी एकीच्या मुखातून निघालेली ती दुसरीने ऐकली. अनेकजणींनी ती गायली.एका पिढीने ती दुसऱ्या पिढीकडे दिली. गावगाड्यात कष्टानं  राबणाऱ्या आणि नांदणाऱ्या आयाबायांना व्यक्त होण्यासाठी 'जातं' हे एक उत्तम व्यासपीठ होतं.परंपरेन चालत आलेली महाराष्ट्रातली लोकगीतं, लोकसंस्कृती वाढविण्याचं आणि जतन करण्याचं काम जात्यानं आणि जात्यापाळी बसून धान्य दळणाऱ्या मायमाऊलीने केले आहे.'जातं' हे गावसंस्कृतीचा अनमोल ठेवा होतं.
सांज सकाळचा स्वयंपाक करणं,धुणी भांडी करणं हे जसं आईला आणि बाईलाही चुकलं नाही, तसं जात्यापाळी धान्य दळणं गावगाड्यातल्या कोणत्याच मायमाऊलीला चुकलं नाही.याच्यासाठीच आपला जन्म आहे, असं समजून उभं आयुष्यच तिने जात्यात धान्य भरडावं तसं आपल्या कुटुंबासाठी भरडून काढलं.जात्याचं घरघरणं आणि बाईचं राबणं असं वर्षानुवर्ष गावगाड्यात चालत आलेलं.
  ध्यानी मनी नसताना इपरीत घडलं. गावात डिझेल इंजिनवर चालणारी पिठाची गिरणी आली आणि जात्याची घरघर थांबली.
एकेकाळी ईश्वराचं रूप असलेलं 'जातं' आता प्रत्येकालाच अडगळ वाटू लागलं.ओसरीचा कोपरा धरून बसलेलं 'जातं' मांजराच्या पिलांना कानाला धरून घराबाहेर सोडावं तसं घराबाहेर काढलं. काहींनी ते अंगणात ठेवलं. अनेकांनी अडगळीत टाकलं.घराघरातल्या जात्याची अशी प्रत्येकानेच परवड केली.
  आता आई,आत्या थकल्या आहेत, पण अजूनही त्यांच्या ओवीचे शब्द माझ्या कानात घुमतात. ज्या जात्यापाळी बसून आईनं खटल्याच्या घरासाठी पायलीचं दळण दळलं ,त्या जात्याच्या दळणाचं पीठ खाऊन माझा पिंड पोसला. त्यानेच माझ्या लग्नाची हळद दळली, तेच 'जातं' आज अंगणात बेवारश्या सारखे पडून आहे.त्याच्याकडे पाहताना मनात प्रश्न उभा राहतो, लग्नात नवरा नवरीची हळद दळण्यापूरतं उरलेलं 'जातं' भविष्यात माझ्या नातवाच्या लग्नात हळद दळण्यासाठी राहील की नाही ? या धास्तीपोटी अंगणातलं 'जातं' मी पुन्हा पुन्हा नजरेत साठवून घेतो, ते दृष्टीआड होण्याआधी...!

-विजयकुमार मिठे
9881670204

-------------------------------------------------------------------------
                            ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.

                                              संचालक - कादवा शिवार
                                              प्रतीक विजयकुमार मिठे
                                              मो.9145099071

0 coments