Read more
• जेष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री .विजयकुमार मिठे यांचे 'चांदणभूल 'हे पुस्तक नुकतंच वाचून पूर्ण केलं .त्यावर लिहावं हे पुस्तक वाचून पूर्ण झाल्या पासून ठरवलं होतं .मी लिहीण्याआधी मा. ऐश्वर्य पाटेकर सरांनी आणि अनेक लेखक वाचक यांनी त्याचं इतकं अप्रतिम आणि सखोल समीक्षण केलं आहे की, मी काय लिहीणार त्यापुढे. तरीदेखील पुस्तकाविषयी लिहीण्याचा हा प्रयत्न ...
• दिंडोरी (नाशिक ) सारख्या भागात मी माझ्या शिक्षणाचा श्री गणेश केला ..ज्या मातीने मला शब्द लिहायला आणि वाचायला शिकवला त्याच मातीतल्या श्री. विजयकुमार मिठे सरांचं 'चांदणभूल' हे पुस्तक .
विजयकुमार मिठे सरांनी नेहमी आपल्या लेखणीतून कादवा काठचा परिसर, तिथली संस्कृती ,तिथल्या माणसाचे प्रश्न आणि बदलता गावगाडा प्रामुख्याने मांडलाआहे. 'चांदणभुल ' ही याच प्रकारे ते ज्या गावात राहतात त्या गावचे अंतरंग उलगडून सांगते. यात मुख्य गाभा जरी त्यांच्या बालपणीच्या आठवणींचा असला तरी त्यासोबत बदलता गावगाडा आणि लोप पावत चाललेली ग्रामसंस्कृती, तिथले प्रश्न आणि ते सोडवण्याची लोकांची वृत्ती, त्यांच्या समजुती आणि एकमेकांचं प्रेम ,एकोपा
याकडे ही लक्ष वेधले आहे .पुस्तकाचं मुखपृष्ठ बोलकं आहे.ते रेखाटलं आहे अरविंद शेलार या चित्रकाराने.
• पुस्तकाची सुरुवात ' चांदणभूल 'या ललित लेखाने होते.
जन्मापासून लेखकाचं चंद्र आणि चांदण्या सोबत नातं जोडलं जातं ते वाढत्या वयासोबत मनोहारी आणि भावनिक होत जाणारं आहे .त्यात कुतूहल आहे, बालमनात आलेले प्रश्न आहेत, त्यांची आपल्या शब्दात
उकल करण्याचा प्रयत्न अतिशय प्रगल्भपणे केला आहे.
बोलीभाषेचा उत्तम वापर विजयकुमार सर या लेखात करतात.शेवटी माणसाच्या रोजच्या धावपळीच्या जीवनात तो या चांदणभरल्या आभाळाला कसा मुकला आहे, याची खंत व्यक्त करतात, तेंव्हा नक्की आपलं ही मन भरून येतं.
. रानातल्या सोनपिवळ्या बाभळीवर लिहितांना सरांनी त्यात इतका जिवंतपणा आणला आहे की, जणू बाभूळ आपल्याशी बोलते आहे .वेळोवेळी तिला उपमा आणि शब्दसौंदर्य देऊन तिची कथा आणि तीचं दुःख मांडलं आहे.यातून बदलत चाललेल्या पर्यावरणाचा वेध घेतला आहे.बाभळीचा इतका उपयोग होतो हे प्रथमच माहीत झालं .
"गोष्टी रंगल्या ओठी"हा या पुस्तकातील माझा आवडता लेख ..हा लेख वाचताना मी माझ्या अनेक बालपणीच्या आठवणी जागवत होतो. किती तरी वेळा मी माझ्या गावात फेरफटका मारून येत होतो .लेखकाची बालसखी सलमा वाचताना मला टिंग्या चित्रपटातली टिंग्या ची बालसखी फरीदा आठवली ..वयानुसार येणारा समंजसपणा आणि त्यातून सलमा आणि लेखकाची होणारी ताटातूट आणि शेवटचं सलमाचं जाणं जीवाला चटका लावणार आहे.
आपल्या बालपणातील दिवाळीच्या आठवणी सांगताना आपल्या गावातल्या उपेक्षित लोकांचं आणि त्यांच्या दु:खाचं विवेचन करताना गणपा या आपल्या मित्राचं रूपक वापरलं आहे. त्याचबरोबर आपल्या संवेदनशील वडिलांचं चित्र ही तितक्याच प्रभावीपणे वाचका समोर उभं केलं आहे .अनेक आठवणी त्यात आहेत .
लेखक म्हणतो "दिवाळी आली की ,अप्पांच्या आठवणी डोळ्यात दाटून येतात .आपसुकच माझं बालपण आठवतं ,गणपाच्या डोळ्यातली नाचणारी दिवाळीही आठवते, धडाडधूम वाजणारी आणि गरिबीने गोठणारी!
या मला विशेष आवडलेल्या लेखांसोबत 'गुपित बाबाचा डोह' हा जरा रहस्यमय वाटणारा गावच्या श्रध्दा आणि अंधश्रद्धा यांना मांडणारा लेख.त्यासोबतच टेरलीनचा सदरा पहिल्यांदा घातल्यावर त्याच्या बालसुलभ आणि मनोहारी आठवणी जागवणारा 'टेरिलीनचा सदरा' हे चांदणभूल मधले लेख सरांच्या प्रतिभावंत आणि सकस लेखणीचा अविष्कार आहेत .
माणूस संवेदनशील असला की त्याला आठवणी किंवा विरह सहन होत नाही, मग प्रत्येक गोष्टीत तो शोधत असतो ..लेखकाच्या बाबतीत हेच झालं आहे. ज्यांनी आपलं शेत फुलवलं ते आपले जिवाहून प्रिय बैल विकतानाचा प्रसंग आपल्याला गहिवर आणतो . सायकलच्या आठवणी 'जूनं ते सोनं' मधून, तर बदलत्या पावसाच्या आणि वातावरण यांच्या चिंता त्यांनी ' पावसाचं काही देणं लागतो 'यातून मांडल्या आहेत .
सरांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अतिशय ओघवती ,साधी पण रसाळ आणि काळजाचा ठाव घेणारी शब्दरचना या मुळेच त्यांचं आजवरच्या सर्व लिखाणाला एक अनोख शब्दसौंदर्य लाभले आहे, मुळात
सर जे जीवन जगले ते त्यांनी अतिशय सुंदर शब्दात मांडले आहे. कुठंही त्याला बेगडी रंग नाही, रंग आहे तो अस्सल ग्रामजीवनाचा आणि खरे पणाचा .
सगळ्या लेखांचे सखोल विश्लेषण करणे इथे शक्य नाही पण असे नाही की ते लेख उत्तम नाहीत. "रानमेवा ,फोटोवाला ,आणि गावपण हरवलेलं गाव" हे अतिशय वाचनीय आणि चिंतनशील लेख आहेत.यातला "गावपण हरवलेलं गाव" हा लेख मला वाटतं सगळ्या पुस्तकाचा सार किंवा अर्थ आहे .लेखकाला नेमकं काय मांडायचं आहे, ते हा लेख वाचल्यावर लक्षात येतं आणि माणूस नवा विचार करू लागतो .
अभिप्रायाच्या शेवटाकडे जाताना मला श्री .ऐश्वर्य पाटेकर सरांनी 'चांदणभूल' च समीक्षण करताना लिहिलेलं एक वाक्य आठवतं की, 'चांदणभूल हा गावहृदयाच्या स्पंदनांचा साक्षात्कार आहे .'
ज्यांन गाव अनुभवलं आहे, त्याला ही स्पंदने नक्कीच जाणवतील. चांदणभूल वाचून झाल्यावर प्रत्येकाला हा अनुभव येईल .....
- संदीप भांबेरे (नाशिक)
*चांदणभूल* (ललितसंग्रह)
लेखक
विजयकुमार मिठे.
मो.9881670204
*अक्षर वाड्मय प्रकाशन पुणे*
प्रकाशक
बाळासाहेब घोंगडे
मो .9834032015
-------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
#Team Kadva shivar

0 coments