भाषा सौंदर्याचा सुंदर अविष्कार-चांदणभूल (chandanbhul) rajendra ugale

भाषा सौंदर्याचा सुंदर अविष्कार-चांदणभूल (chandanbhul) rajendra ugale

Author:
Price:

Read more

     

 विजयकुमार मिठे शेतकरी आहेत.त्यांचं वास्तव्य पालखेड बंधारा या खेडे गावात असल्याने
गावातल्या माणसांशी, तिथल्या निसर्गाशी त्यांची नाळ जोडली गेल्याने इथल्या माणसांचे जगणे, भोगणे दुःखं, दारिद्र्य त्यांनी जवळून पाहिले आहे. गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षापासून ते  त्यांच्या गावात घडलेल्या वास्तव घटनांवर कथा, कादंबरी,ललित लेखन करतात.आज पर्यन्त त्यांची चौदा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.चांदणभूल हा ललित लेखसंग्रह त्यापैकीच एक.

        *चांदणभूल* या नावापासूनच हा संग्रह आपल्या मनात रुंजी घालायला लागतो आणि नंतर तो आपल्या मनावर अधिराज्य गाजवतो.एकूण तेरा लेख असलेला हा संग्रह आपल्याला अक्षरशः बांधून ठेवतो.मुखपृष्ठकार अरविंद शेलार यांचे अतिशय समर्पक मुखपृष्ठ प्रथम दर्शनीच वाचकाचे लक्ष वेधून घेते.या पुस्तकाची स्वतःची म्हणून अनेक वैशिष्ठे आहेत.पण मला सर्वात जास्त भावलं ते *भाषासौंदर्य* ! अतिशय ओघवती शैली लेवून,ग्रामीण शब्दालांकारांनी सालंकृत करुन मिठेंनी ही नवरी वाचकांच्या माहेरी धाडली आहे. चांदणभूलची भाषा वाचकाला आपली वाटते.तो पुन्हा पुन्हा तिला उचलून घेतो.चांदणभूलची भाषा प्रत्येक  लेखाला खुलवत जाते.शहरी नवरीच्या भरजरी शालूला खेड्यातल्या पोरीच्या परकर पोलक्याने लाजवावे तसे !

       ललित लेखनाबद्दल अनेक भाषा धुरीणांनी अनेक प्रकारच्या साहित्यिक मूल्य असणाऱ्या व्याख्या सांगितल्या आहेत.पण मला वाटतं, एखादा विषय अधिकाधिक लालित्य पूर्ण पद्धतीने मांडणे म्हणजे ललित..! ते मिठे यांनी प्रत्येक लेखात सहज साध्य केले आहे.त्यांच्या काही लेखातील उतारेच्या उतारे एखाद्या संगीत नाटकाच्या नायक नायिकेच्या तोंडी स्वगतं ठरावीत अशी झाली आहेत.तर काही वाक्य ही शाळेच्या भिंतीवरील सुंदर सुभाषिते ठरावीत इतकी ती परिणामकारकता साधतात.अस्सल ग्रामीण शब्दकळा, म्हणी,वाक्प्रचार यांचा तर खचा खच भरणा आहे.एखादं साधं वाक्य ही मिठे  इतक्या सहजतेनं लिहितात की आपल्या
 तोंडून वाह..! निघाल्या शिवाय राहत नाही.आता हेच पहा, चांदणभूल या शीर्षक लेखातील ही काही वानगीदाखल वाक्य...'पुनवेचा चंद्र आईने तव्यावर केलेल्या गोल गरगरीत भाकरीवानी दिसायचा.' चंद्रावर पडलेले काळे डाग पाहून मिठे लिहितात,'आई आपल्या गोंडस बाळाला दृष्टीबाधा होऊ नये म्हणून काळी तीट लावते तशी चंद्राला कोणाची नजर लागू नये म्हणून त्याच्या आईने ही काळ्या डागाची तीट तर लावली नसेल ना ?' किंवा त्यांच्या बालपणापासून तर आजच्या साठीपर्यंतचा चंद्र,जसाच्या तसा पाहून मिठे लिहितात,'एखाद्या पोरानं एकच सदरा रोज रोज वापरावा तसा चांदोमामा एकच अंगरखा घालून वर्षानुवर्षे फिरतो आहे.' रात्रीची खळ्यावरची उपणवट करतांना चंद्राचं वर्णन करताना ते लिहितात,'एखाद्या उंच माणसानं हातात कंदील घेऊन उजेड दाखवावा तसं आभाळ चंद्र घेऊन उभं असलेलं दिसायचं.' किती सुंदर विचार आहे हा.आपल्याला आकाशात रोज चंद्र दिसतो, चांदण्या दिसतात. त्यांच्याकडे बघून आपल्याला केवळ कुतूहल वाटते.कधी प्रश्न पडत नाही.पडले तरी आपण त्याची उत्तरे शोधण्याच्या भानगडीत पडत नाही.पण मिठे मात्र या चांदाण्यांना जोंधळा नि काजव्याच्या रुपात पाहताना म्हणतात,'कुणब्यानं वाफष्याला आलेल्या काळया भोर वावरात पेरणी करण्या ऐवजी जोंधळा फोकावा तसा आभाळाच्या काळया पटलावर कुणी चांदण्यांचा चांदणचुरा पसरवला आहे असा भास काळोख्या रात्री चांदण्यांनी भरलेल्या आभाळाकडे पाहताना व्हायचा आणि गावदरीच्या किर्र्र झाडीत काजवे लुकलुकताना पाहिले की वाटायचं आभाळतला काही चांदणचुरा गावदरीत सांडला आहे.' निसर्गातील घटकांना आपलंसं करण्याची त्यांना आपलेपण देऊन कवेत घेण्याची ही आगळी वेगळी कला विजयकुमार मिठे यांना साध्य झाली आहे.

         माणसाला झाडं आवडतात पण ती फळं देणारी,फुलं देणारी,बिन काट्याची ! हल्ली तर शहरातही म्हणे 'टेरेस गार्डन' संकल्पना रुजतेय.तिथेही फुलझाडे लावली जातात.काहीजण उगाचच आम्ही किती वृक्षप्रेमी आहोत हे आवर्जून दाखवतात.बाभूळ हे एक काटेरी झाड ...त्याची ना कुणाला फळं आवडतात ना ते झाड शोभेचं म्हणून कोणी आपल्या गार्डन मध्ये लावतात.इतर फुलांसारखा त्याचा गजराही क्वचितच बघावयास मिळतो.या झाडावर नितांत प्रेम करणारी माणसं अभावानेच सापडतात.त्यात मिठे यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल.कारण मिठे यांना आजही त्यांच्या शेतातली मधली बाभूळ स्पष्ट आठवते.आजच्या फायद्या तोट्याच्या जमान्यात मुलांनी ती बाभूळ तोडून टाकल्यावर तर ती त्यांना अधिकच ठळक आठवते. त्यामुळेच कवितेच्या ओळी ठराव्यात आशा सुंदर शिर्षकाचा लेख ते लिहितात... सोन पिवळ्या फुलांची बाभूळ ! या लेखात वावराच्या मधोमध असणाऱ्या या बाभळीचं शेतातलं स्थान कुठे आहे हे सांगताना ते लिहितात "एखाद्या हिरवी चोळी पातळ नेसलेल्या पोक्त बाईनं काळ्याभोर वावराच्या मधोमध फतकल मारून बसावं तसं ते दिसायचं".लेखक लहान असताना लेखकाची आई याच झाडाला झोळी बांधून त्यात लेखकाला झोपवायची.आई झोका देऊन निघून गेल्यावर वाऱ्यामुळे फांद्या हलायच्या आणि आपसूकच झोळीही हालायची. याचं सुंदर वर्णन करताना मिठे लिहितात,"हलणाऱ्या फांद्या मला झोप लागेपर्यंत झोळी हलवून झोपी लावायच्या, मोठ्या बहिणीनं लहानग्या भावाला कडी खांदी तोलवून धरावं तशी मधली बाभूळ मला वरच्यावर आपल्या फांद्यांनी तोलवून धरायची."अशा एक ना अनेक शब्दकळा लेखक या लेखात प्रसवत जातो.झाडाला आलेला डिंक पाहून लेखकाला शेंबड्या पोराची आठवण होते.त्याला वाटतं या बाभळीला सर्दी पडसं झालं असावं.याच बाभळीच्या शेंगा खाऊन निघून गेलेल्या बकऱ्या पाहून लेखक अस्सल ग्रामीण बायकी शिवी बाभळीच्या तोंडी देऊन म्हणतो, "गेल्या एकदाच्या केरसुण्या..!" सोनपिवळ्या फुलांची बाभूळ यातली वर्णने वाचताना वाचकाला थक्क व्हायला होतं.पावसाळ्यात संपूर्ण सृष्टीच नटून थटून बसलेली असते.आशा या वातावरणात ही बाभूळ कशी दिसते ? तर लेखक म्हणतो, "उपवासाच्या दिवशी बाईनं न्हाऊन ओट्यावर उन्हात केस वाळवीत बसावं तशी ही बाभूळ पावसाच्या सरींनी ओलाचिंब झालेला आपला पानसांभार अधून मधून पडणाऱ्या उन्हात वाळवत बसली आहे".हे वाक्य वाचताना कोणत्याही रसिक वाचकाच्या तोंडून अहाहा...किती सुंदर ! हे वाक्य खात्रीनं निघणारच.किंवा याच बाभळीला आलेली पिवळी धम्म फुले पाहून लेखकाने लिहिलेल्या ओळी बघा, "लग्न मंडपात नवरीनं हळद लावून मिरवावं तसं ती आषाढात सोनपिवळ्या फुलांची चादर पांघरून नटूनथटून बसल्या सारखी दिसायची".लेखक बाभळीला नानाविध उपमा देतो.ती  त्याला कधी अंगापिंडांनं भरलेली म्हैस वाटते तर कधी अंगाखांद्यावर बसलेल्या पाखरांना पाहून ती लेकुरवाळी वाटते.
       "गोष्टी रंगल्या ओठी" हा लेख तसा लेखकाची बाल मैत्रीण सलमा आणि गुलतुरीच्या झाडाशी फिरताना दिसत असला तरी तो काळीज असणाऱ्या आणि निश्चिम प्रेमाचा अर्थ समजलेल्या वाचकाला भावना विवश केल्याशिवाय राहत नाही.ज्या वयात प्रेम,वासना,स्त्री,पुरुष,जातीयता अशा अमंगळ भेदाभेदाच्या गोष्टी माहीत नसतात त्या वयात शेजारच्या सलमा बरोबर लेखक खेळतो,शाळेत तिच्या सोबत
 जातो,शेतात मौजमस्ती करतो हे वाचून प्रत्येकजण आपापल्या बालपणात सहज फेरफटका मारून येतो. हा लेख वाचताना जणू काही आपणच त्या सलमाबरोबर तांबूलपान करतोय असा भास होतो.लेखकाने आपल्या खास शैलीत या लेखाची मांडणी केली आहे.
       चांदणभूल मधील टेरलीनचा सदरा न कळतपणे आपल्याही गरिबीवर आठवण करून देतो,गुपित बाबाचा डोह आपल्या मनावर भुताटकीचं बालपणी मानगुटीवर बसलेलं भूत हळुवार उतरवतो.जुनं ते सोनं मधून डॉक्टरांच्या सल्ल्याने जेव्हा सायकलचा विषय निघतो आणि आपली मैत्रीण म्हणून त्यावेळी लेखकाने खूप समर्पक वाक्य वापरलं आहे.तो असं म्हणतो,"तारुण्यातल्या आठवणी उतारवयात आठवायच्या  आणि त्यातच रमायचं असतं..." हे वाक्य खरं तर लेखकाच्या समृद्ध बालपणाची साक्ष आहे, जे आजच्या पिढीला अभावानेच अनुभवायला मिळतं.
       "बैल विकतानाचा गहिवर" आपल्या कंठाशी येतो,"पावसाचं आपण काही देणं लागतो "हे वाचताना आपणही 'धोंड्या धोंड्या पाणी दे,साळ माळ पिकू दे' म्हणत गावभर उंडारून येतो,त्या पावसाचे मोरपीस आपणही आपल्या अंगावर अलगद फिरवून घेतो.या लेखातील पाऊस आता समजदार झालाय हे सांगताना लेखक म्हणतो,"मी वयाने वाढत गेलो.शेतात काम करू लागलो.तसा पाऊसही समजदार झाला. समंजस माणसासारखा वागू लागला.शेतात काम करताना माझी सोबत करू लागला.माझ्या बरोबरीनं सणावाराचा आनंद लुटू लागला.माझ्या प्रमाणेच त्याला पिकपाण्याची,फळाफुलांची काळजी वाटू लागली.त्यांची तो ममतेने निगराणी करू लागला.पण हाच पाऊस जेव्हा घरातून बाहेर पडणं मुश्किल करायचा तेव्हा थोरामोठ्यांच्या सांगण्यावरून तो पोळवलाही जायचा,तेव्हा लेखक म्हणतो "ते पाहून मला फार वाईट वाटायचं. आपल्याच अंगाला कोणी चटके देतंय असं वाटायचं,वेदना व्हायच्या.पण पावसाचा कैवार घेऊन मला कोणाशी भांडता येत नव्हतं."हे कोण लिहू शकतो तर ज्याची निसर्गावर नितांत श्रद्धा आहे तोच.
      "रानमेवा,"बिनपैशाचा आनंद,"फोटोवाला" हे लेखही अप्रतिमच झाले आहेत,पण "गावपण हरवलेलं गाव" रेखाटताना लेखक आपल्याला त्यांच्या बालपणीच्या गावातील गल्लीबोळातून फिरवून आणतो.आपलं जुनं गाव कसं होतं हे सांगताना लेखक लिहितो",एखाद्या माणसानं हात पाय ताणून सपलांग झोपावं तसं पालखेड गाव एक टेकडीवर झोपल्यागत दिसायचं.त्याच्या डोक्याच्या बाजूला मातंगवाडा आणि माळीवाडा बसला होता.तर उजव्या हाताला मधली आळी आणि गाढवलोळी नदीच्या पात्रात पाय सोडून बसलेल्या पोरागत दिसत होती.डाव्या हाताला खळवाडी, शेरातला कोळवाडा गाव राखणीला जागल्यागत उभे होते.तर पायथ्याला दिंडोरीकडे जाणारी वाट गावाचे पाय चेपीत बसल्यागत दिसत होती आणि पोराला पोटाशी धरून बसावं तशी गावाच्या पोटात कुणब्याची वस्ती, देवळं, ग्रामपंचायत,गावाच्या मध्यात ठाण मांडून बसले होते.माणसाचा आकार धारण केलेल्या गावाला मन होतं." हे गावाला मन असणं वाचकाच्या काळजाला भावना विवश करणारं वाक्य आहे असं मला वाटतं. गावाचं हे समृद्ध असणं आज या शहरीकरणाच्या नादात कुठंतरी खोलवर हरवल्याची जाणीव होते. पोटापाण्यासाठी शहराची उंबरठे झिजवणाऱ्या प्रत्येक वाचकाला हा लेख वाचताना आपलं गाव आठवत राहतं आणि तो गावाच्या आठवणीने ओलाचिंब होतो इतका हा लेख खोलवर ओल घेऊन आलेला आहे.

       चांदणभूल हा केवळ ललित लेख संग्रह नसून तो प्रत्येकाच्या आयुष्याच्या बालपणाचा दस्तऐवज आहे असं मला हा संग्रह वाचताना पदोपदी जाणवलं.याच ऐवजातून कोणाला बालपण सापडेल,कोणाला आपले हरवलेलं मैत्र सापडेल,कोणाला आपला गाव आणि गावात असणारी जिवाभावाची माणसं पुन्हा भेटून जातील.कोणाला आपल्यावर बालपणी हसलेली गरिबी आठवेल तर कोणाला माणसं वृद्धाश्रमात जात असतानाही गरिबीतही बापानं सांभाळलेली मुकी जित्राबं आठवतील.भाषा सौंदर्याने नटलेला चांदणभूल वाचकाने संग्रही ठेवून पुन्हा पुन्हा
वाचावा असा झाला आहे.

*परिक्षण* -राजेंद्र उगले (नाशिक) मो.9922994243



*चांदणभूल* ललित लेखसंग्रह
   लेखक-विजयकुमार मिठे

 *मुखपृष्ठ* अरविंद शेलार

*प्रकाशक*- बाळासाहेब घोंगडे.
  अक्षर वाड्मय  प्रकाशन  पुणे
                  किंमत-१२० रूपये
मो. 9834032015
-------------------------------------------------------------------
                            ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.

                                              संचालक - कादवा शिवार
                                              प्रतीक विजयकुमार मिठे
                                              मो.9145099071
                                          #Team Kadva shivar 

0 coments