वेशीला टिळा,जेवायला चला veshila tila jevayla chala (vijaykuamar mithe)

वेशीला टिळा,जेवायला चला veshila tila jevayla chala (vijaykuamar mithe)

Author:
Price:

Read more



सकाळची कोवळी उन्हं नदीच्या पाण्यात आंघोळीला उतरली अन वेशीला लागून असलेल्या काभू नानाच्या हॉटेलात स्टोव्हची फुरफुर वाढली.चावडी पुढच्या पारावर झोपलेल्या माणसांची झोपमोड झाली आणि याच वेळेला  वेशीकडं पुजेचं ताट घेऊन येणा-या बाबू माळयाकडं सगळयांच्या नजरा लागल्या.
त्याने वेशीला टिळा दिला(लावला) पारावर कुजबुज वाढली. "येशीला टिळा म्हणजी गावजेवण?चुलबंद आवातणं? दोन अडीच-शे रूपये पगाराचा माणूस,हा काय गावजेवण देणार?. आवातणं दिलं सा-या, गावा अन वारं सुटलं घरी जेवा.अशी गत व्हईल बघा" पारावर चर्चा रंगली.
  दहाच्या तोंडी ते गावभर झालं. "बाबू माळयानं वेशीला टिळा दिला" या आधी संपत पाटील,तुकाराम पाटील यांनी आपल्या बहिणीच्या,मुलीच्या लग्नात वेशीला टिळा देऊन गावजेवण दिलेलं.बाबू माळी आपल्या मुलीच्या लग्नाचं गावजेवण देतो याचं सगळ्यांनाच नवल वाटलेलं.त्याच्या मुलीचं लग्न दोन दिवसावर येऊन ठेपलं आणि न्हाव्यानं घरोघर फिरून गावजेवणाचं आमंत्रण दिलं.
दगडी शाळेच्या आवारात  घातलेल्या रंगीत कापडाच्या मांडवात आणि टयुब नळ्यांच्या उजेडात बसून अख्खं गाव नुकती, (बुंदी) वरण भाताचं जेवण जेवलं.
      तो काळच गरीबीचा होता.
पालखेड गावात मुलीच्या लग्नाचा मांडव हा दारापुढेच असायचा. तोही आंब्याच्या डगळयांचा किंवा रंगीत कापडाचा. तीन-चार दिवस लग्नाची नुस्ती धामधूम चालायची. मांडवात 'जातं' रोवून भाऊबंदकीतल्या बायका गाणी गावून हळद दळायच्या. लापशीसाठी गव्हाचा भरडा जात्यावर,गिरणीत दळायचे.
भरडयात गुळ घालून लापशी बनवायचे.लग्न हे गोरज मुहूर्तावर   असायचे. टेंभ्याच्या उजेडात गल्लीवरल्या माती फुफाट्यावर बसून माणसं पत्रावळीवर वाढलेलं लापशी,कढी भाताचं जेवण  जेवायचे.आधी व-हाडी मंडळीचं जेवण झाल्यावर गावातील माणसं जेवायला बसायचे. पंगतीत कोणी टेंभा धरुन बसायचा.गाडग्यातल्या घासतेलात टेंभा बुडवून उजेड करायचा. मला टेंभा धरणाराचं नवल वाटायचं. सगळे जेवायचे आणि तो उजेड धरायचा. एकदा मी त्याच्याजवळ उभा होतो. तो म्हणाला."ऐ पोरा,टेंभा धर मी इराकतीला जाऊन येतो."तो जो गेला तिकडचं विडी फुसकालीत बसला. टेंभ्याचा उजेड कमी झाला तशी माणसं ओरडली."ऐ पोरा, टेंभा गाडग्यात बुडव " मी गोंधळलो. टेंभा बुडवायच्या गडबडीत गाडगं लवंडलं.टेंभा विझला. अंधार झाला. टेंभा टाकून मी जे पळालो ते आजतागायत टेंभा पुन्हा हातात धरला नाही.
      गावकारभा-यांना आपल्या  लेकीच्या लग्ना इतकीच गावातल्या लेकीबाळींच्या लग्नाची काळजी असायची.1965-66 सालात तुकाराम पाटलाने आपल्या मुलीच्या लग्नातच गावांतील तीन मुलींचे लग्न सामुदायिक पध्दतीने करून गावाला पहिल्यांदाच नुकतीचे गावजेवण दिले.त्या आधी संपत पाटलाने बहिणीच्या लगनात साखरेच्या शि-याचं गावजेवण दिलेलं.
  काळाच्या ओघात सगळंच बदललं. टेंभा गेला,बत्ती आली,जनरेटरवर चालणाऱ्या ट्यूब नळ्या आल्या.आंब्याच्या डगळ्यांचे मांडव जाऊन रंगीबेरंगी कापडाचे मांडव आले.लापशी, शिरा, कढी भाता  ऐवजी नुकती वरण भाताचे जेवण आले.हे बदल लोकांनी आपल्या ऐपती नुसार स्वीकारले पण तरीही गावमाणसां मधील जिव्हाळा,एकजूट,एकोपा टिकून होता.गावातील कुणाच्याही मुलीचे लग्न असले तरी आपल्याच  मुलीचं लग्न आहे असं समजून जो तो मिरवायचा,राबायचा,पंगतीतून पाहुण्यांना आग्रहाने वाढायचा,सगळ्यात शेवटी जेवायचा.लग्नात आठाणे,रुपया रोकड आहेर करून कार्यावाल्याला हातभार लावायचा. बस्त्याला  बोलावलं तर खिशात पैसे घालून जायचा.अडीनडीच्या वेळी उपयोगी पडायचा. कार्यावाल्याची आणि गावाची इज्जत जपायचा.
    आता सगळंच बदललं आहे. दारापुढं कोणी मांडव घालत नाही,गल्ली वर पंगती बसत नाही, टेंभा धरणाराही दिसत नाही,  गावातील सगळीच लग्न, वर्षश्राद्ध असे छोटे मोठे कार्यक्रम शहरातील लॉन्सवर,कार्यालयात होतात. ताटावर जेवण असतं. लग्न लागण्याआधी, नंतर, वाटेल तेव्हा माणसं जेऊन घेतात. पंगतीतून "पोटभर जेवा" असा   आग्रह करीत कोणी फिरत नाही.लॉन्स मधील पाच पक्वानाचं जेवण असूनही मला जेवावं असं वाटत नाही. मला आठवतात गावातील लग्न, गल्लीवरल्या पंगती, वेशीला
टिळा देऊन गावजेवण देणारा संपत पाटील,तुकाराम पाटील आणि माझा बाप बाबू माळी...

                  -विजयकुमार मिठे.
-------------------------------------------------------------------------
                            ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.

                                              संचालक - कादवा शिवार
                                              प्रतीक विजयकुमार मिठे
                                              मो.9145099071

0 coments