आठवणींच्या गावावरून... शेरताटी (ललित लेख) | Shertati (Lalit lekh)

आठवणींच्या गावावरून... शेरताटी (ललित लेख) | Shertati (Lalit lekh)

Author:
Price:

Read more

 *शेरताटी*     (ललित)


गावाच्या खालच्या बाजूला सिंदबन होते.त्याला लागूनच शेरताटी होती.तिच्यामध्ये राणूबाबाची खोपी एखाद्या बाईने डोक्यावरील केसांचा झाप पतारुन बसावं तशी बसलेली दिसायची.शेरताटीपासून थोड्याच म्हणजे कासराभर अंतरावर आमची दगडी शाळा होती.शाळा भरायच्या अगोदर आणि मधल्या सुट्टीत काही मुलं पुस्तकांची फाटलेली पानं शेराच्या चिकाने चिकटवतांना हमखास बसलेले दिसायचे.

शेरताटी जणू आम्हा मुलांची डिंकाने भरलेली बाटलीच होती.राणूबाबा खोपीच्या पुढे बसून काही काम करीत असला की पोरांच्या ओरडण्याने त्याचे लक्ष विचलीत होई.बसल्या जागेवरूनच तो पोरांना दरडावी. "ये पोरायहो,काय चाललंय तिकडं तुमचं.पळात्या का नही तिथून"तो असा ओरडला की पोरं धूम ठोकून शाळेकडे पळायची. त्याच्या ओरडण्यामागे पोरांविषयीची काळजी होती. शेराचा गळणारा चीक पोरांच्या डोळ्यात जाऊन आग व्हायला नको,त्यांना शेर उभारायला नको. हा त्यामागचा हेतू असल्याने तो पोरांना नेहमीच ओरडायचा.पण पोरं पुन्हा दुसऱ्या दिवशी दाराशी आलेल्या लापट कुत्र्यागत शेरताटी खाली बसलेले दिसायचे.

  

शाळेजवळच तेव्हढी शेराची झाडं होती का?तर नाही.गावात आणि शिवारात अनेक झाडं होती.गाईगुरांपासून खळ्याचे,शेतशिवाराचे संरक्षण व्हावे म्हणूनही खळेक-यांनी आपल्या खळ्याभवतीनं शेराची कुपाटी घालून घेतली होती.कावळ्या

वहाळाच्या लवनातील शेराची झाडं तर शाळेच्या मैदानात मुलांनी कवायतीसाठी रांगेत उभे रहावे तशी उभी होती. त्यांच्याखाली साचलेल्या चिखल पाण्याच्या डबक्यात काही डुकरं लोळतांना दिसायची.वहाळातून जाणाऱ्या येणाऱ्या माणसांकडे ती रागाने पहायची.विचित्र आवाज काढून गुरगुरायची देखील.गावात आमची पाच-सहा मित्रांची उनाडक्या करणारी टोळी होती.दुपारच्या वेळी आम्ही वहाळातल्या भुडकीत अंघोळीला गेलो की पोलीसांना पहाताच चोरांनी धूम ठोकावी तशी ती बेसावध अवस्थेत बसलेली डुकरं आम्हाला पहाताच गावाच्या दिशेने पळायची.पळतील नाही तर काय करतील.आम्ही त्यांना अद्यलच तशी घडविली होती.


आंबा,पेरू या झाडांविषयी मला नेहमीच ओढ वाटत आली आहे.

पण शेराच्या झाडांविषयी मला कधीही प्रेम वाटले नाही.नाही तरी प्रेम वाटावे असे काय आहे त्या झाडाकडे?ना त्याची पानफुलं,फळं उपयोगाची,ना त्याची सावली उपयोगाची.

उगा खायला काळ आणि भुईला भार.माझ्या मनात त्याच्या

विषयीचा तिरस्कार असा खच्चून भरलेला असला तरी मला वेळोवेळी त्याच्या जवळ जावे लागायचे.गेलो म्हणजे एखाद्या नावडत्या माणसाकडे तुच्छतेने पहावे तसा मी त्याच्याकडे पहायचो.


शिवारात आमच्या समाईकीच्या तीन आंबराया होत्या.रोहिणीचा पहिला पाऊस पडला की 'शाका' पिकायच्या.मग आजी शेरातल्या रामाला बोलावून आंबे उतरवून घ्यायची आणि त्याची अढी ऊसाच्या चिपटात पिकत घालायची.आंबे पिकले की त्यातले काही आंबे सडायचे, त्याच्याभोवती चिलटं,मच्छर गुणगुण आवाज करीत फिरायचे त्यांना घालविण्यासाठी आजी मला शेरताटीकडे शेराच्या फांद्या आणायला पाठवायची.आमच्या घरापासून शेरताटी लांब होती. मी विळा घेऊन निघायचो.पण एकटा काही जायचो नाही. माझ्या सोबतीला कोणी ना कोणी असायचेच.विळ्याने फांदी तोडली की गायीच्या आचळातून दूध निघावे तसा तोडलेल्या जागेतून दुधी रंगाचा चिक गळू लागायचा.कितीही सावधपणाने फांद्या धरल्या तरीही हाताला चिक माखायचाच.त्यांने हाताचे तळवे आणि बोटं चिकट व्हायची.कधी त्याचे डाग कपड्यांवरती पडायचे.हा सगळा त्रास मी का सहन करायचो? तर या कामाच्या बदल्यात आजी मला चार पिकले आंबे द्यायची. आणलेल्या त्या शेराच्या फांद्या आजी मला पाटईच्या हलकडीला बांधायला लावायची आणि काय आश्चर्य.तासाभरातच सडल्या आंब्यावर बसलेले चिलटं

(चाचणं) शेराच्या फांदीवर जाऊन बसायचे.मच्छरही त्या फांद्याभवती गुणगुणायचे.काही क्षणापूर्वी हिरव्या दिसणाऱ्या फांद्या काळ्या दिसू लागायच्या. पावसाळ्यातील सुरुवातीच्या दिवसात प्रत्येकाच्याच घरात, परिसरात चाचणं आणि डासांची संख्या वाढलेली असायची. हाताने वारूनही चाचणं आणि डास हटायचे नाही.सगळीच माणसं घायकुतीला आलेली.

वाढलेला उपद्रव थांबविण्यासाठी जो तो शेराच्या फांद्या आणण्यासाठी शेरताटीकडे निघायचा.गावातील तीन-चारशे घरात शेरांच्या फांद्यांचे असे हंडे झुंबर टांगलेले दिसायचे.एवढाच काय तो शेराच्या झाडाचा मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला मी पाहिलेला आहे.डोक्यावर केसांचा झाप वाढवून गावात उनाडक्या करीत फिरणाऱ्या पोरांनी कटींग करून सलून बाहेर उभे रहावे तशी ती फांद्या छाटलेली शेराची झाडं दिसायची.


आषाढाच्या महिन्यात पावसाला भलताच चेव आलेला असायचा.

ते एखाद्या चिभावल्या पोरागत धिंगाणा घालू लागले की शेत शिवारातील काम थांबायची.

आषाढात आमच्या गावात आठवड्यातील मंगळवारी मोढा पाळण्याची प्रथा आहे.

मोढ्याच्या दिवसी बैलांना कशालाही जुंपायचे नाही.असा अलिखित नियमच आहे.

माणसांना मात्र काम चुकायचे नाही.बाहेर अधून मधून पावसाचे जोरदार पहाळे सुरू असायचे. ओसरीतल्या भिंतीला पाठ लावून विडी ओढीत बसलेला चुलता माझ्याकडे पाहून

म्हणायचा.

"बाळूबा, घरात बसून काय करता? खळ्याभवतीनं शेराची कुपाटी तरी घालून घेऊ चला"खरं तर त्याच्या बोलण्याचा मला रागच आलेला असायचा.

पण माझा नाईलाज व्हायचा आणि मी त्याच्या मागे पोत्याचा घोंगटा पांघरूण खळ्याकडे निघायचो.दिवसभर शेराच्या फांद्या तोडताना आणि त्या वहाताना हातपाय चिकट होतील या विचारानेच मी चिडचिड करायचो.चुलता मात्र खाली घोण 

घालून हातातल्या कटावणीने शेराच्या फांद्या लावण्यासाठी खळ्याभवतीनं दर खोदायचा.


आमच्या खळ्याला लागून असलेल्या तराळशेताच्या बांधावर दहा-पंधरा फुट उंचीची शेराची दोन मोठी झाडं होती.अनेक वर्षांपासूनची असल्याने त्यांची बुडं आणि फांद्या चांगल्याच जाडजूड झाल्या होत्या.हाताच्या बोटांची वाटी करून उंच धरावी तशा

त्याच्या फांद्या आकाशाकडे उंच झेपावलेल्या होत्या.रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांच्या स्वागतासाठी जणू ते हिरवे गुच्छ घेऊन उभे होते.दर खोदून झाल्यावर चुलता मला म्हणाला "बाळुबा,आणा शेराच्या फांद्या तोडून"क्षणात फांदी तोडताना उडणारा चिक माझ्या डोळ्यासमोर दिसू लागताच मी म्हणालो "नाही,नाही तात्या ते काम तूच कर.मी फांद्या वाहून आणायचं काम करील"मी असं ठामपणाने बोलताच तात्याला राग आला आणि काही न बोलताच तो कु-हाड घेऊन शेराच्या झाडांकडे निघाला.मीही त्याच्या पाठापाठ गेलो.रागाच्या

भरात त्याने दहा-वीस फांद्या तोडल्या.तोडतांना त्याच्या कपड्यावर चिक पडून कपडे चिकट झाले पण त्याने त्याची पर्वा केली नाही.मेलेला उंदीर शेपटीला धरून दूर उकिरड्यावर नेऊन टाकावा तशा मी शेराच्या फांद्या दोन्ही हातात धरून खळ्यावर आणून टाकल्या. तात्यानं त्या खणलेल्या 'दरात' रोवून त्यावर माती लोटली. शेराच्या झाडाखाली उभे राहिले की शेर उभारतो,माणूस सुजतो. असं मी थोरामोठ्यांकडून 

ऐकलेलं.परंतु शेराच्या सहवासात दिवसभर आम्ही दोघेही राहिलो, तरीही सुजलो नाही की फुगलो नाही.याचं माझं मलाच कोडं पडलं.तसेही म्हणाल तर शेराच्या झाडाविषयी माझ्या मनात

अनेक प्रश्न तेव्हाही आणि आजही पडलेलेच आहेत.


शाळेत शिकत असताना गुरुजींनी 'शेरास सव्वाशेर'हा वाक्प्रचार उच्चारला की मला हमखास नजरेसमोर शिवारातील शेराची झाडं दिसू लागायची. आणि बालमनाला प्रश्नही पडायचा.शेर तर आपण पाहिलेला पण सव्वाशेर कसा दिसतो.ते मात्र काही पाहिलेले नसल्याने काहीच कळायचे नाही.


कावळ्या वहाळात तशीही छोटी मोठी अनेक झाडे होती.प्रत्येक झाडावर पक्षांनी एक दोन तरी घरटे,खोपे बांधलेले होते.एकाच आडनावाच्या माणसांनी एकाच कॉलनीमध्ये घरे बांधून राहावे.तशी कावळ्यांनी वहाळाच्या जागेत घरटी बांधून वसाहत केली होती.पण कोणत्याही पक्षाने शेराच्या झाडावर घरटे बांधलेले मी तरी पाहिलेले नाही.का बांधत नसावे हे पक्षी शेराच्या झाडावर घरटे? का तेही माणसांसारखेच शेराला घाबरत असावेत?


समोरून येणाऱ्या मारक्या जनावराला टाळून जावे

तशी माणसं वाटेवर उभ्या असलेल्या शेराच्या झाडा खालून जायला टाळाटाळ करायचे.

गावगुंडी करणा-या मुलाण्याच्या कासमने एक-दोनदा त्या झाडाखालून जाण्याचे धाडस केलेही पण ते त्याच्या अंगाशी आले.हातपाय सुजून तो घरात बसला.तेव्हापासून तो गावात अनेकांशी खेटला पण शेरासी खेटला नाही.गावात अजूनही  दोन-चारजण विचित्र स्वभावाचे होते.ते कोणाला ना कोणाला उभरायचे.नेमका त्यांनाच शेर कसा काय उभरायचा?हे ही एक मला पडलेले कोडेच होते.हे खोडशाळ लोक सोडले तर शेराच्या झाडांचे गावाशी चांगले संबंध होते.इतकेच काय रोजच शेराच्या सहवासात राहाणारा शेरातला रामा सोमा अख्या गावाशी माणूसकीने वागायचा.

अडल्या नडल्याच्या उपयोगी पडायचा.शेराचा विषारीपणा त्याच्या वागण्या बोलण्यात का बरं आला नसावा?


चैत्री पौर्णिमेला गावात खंडोबाच्या जत्रेत माणसांनी गर्दी करावी तशी तिळसंक्रांतीला पोरं पतंग चिकटविण्यासाठी शाळे जवळच्या शेरताटी खाली गर्दी करायचे.इतरवेळी पोरांवर  खेकसणारा राणूबाबा या दिवशी मात्र कोणावरही रागवायचा नाही.पाहिलं न पाहिलं करून तो आपलं काम करीत राहायचा.

हाती लागलेल्या दरोडेखोराला जमावाने मिळेल त्या वस्तूने बदाडून काढावे तशी पोरं दगडाने शेराच्या झाडांना ठेसून चिक काढायचे.काही विळ्यानं घाव घालायचे.त्याच्यातून उडणाऱ्या चिकाने पतंगाचे कागद

चिकटवायचे.जखमांनी घायाळ झालेल्या माणसागत शेरताटी दिसू लागायची.पोरांच्या दिवसभराच्या आनंदासाठी शेरताटी पुढे कित्येक दिवस जखमांचे घाव अंगावर झेलायची.


बालपणी शेराच्या झाडा विषयी असेच काहीबाही ऐकलेले.कोण म्हणाले?आताशा नीटसे आठवत नाही पण शेराला आलेले बांडगुळ घरात आणून त्याची विधिवत पूजा करून घरात ठेवले तर घरात धन‌वृद्धी होते म्हणे. खरे खोटे देव जाणे परंतु शेराचे बांडगुळ मिळविण्यासाठी मित्रांसोबत शेतशिवारात  अनेकदा भटकंती करूनही मला शेरावरचे बांडगुळ मिळाले नाही. त्यामुळे घर धनवृध्दीने भरले तर नाहीच परंतु मन मात्र निराशाने भरून गेले.माझं बालपण सरलं. वय वाढत गेलं तसतशी बालपणी पाहिलेली शेराची झाडं नाहिसी होत गेली.कोणी त्यांचे जाणीवपूर्वक रक्षण आणि भरण पोषणही केले नाही.दुर्लक्षित केलेली शेराची झाडं दिवसेंदिवस दुर्मिळ होत गेली.कितीही नावडती असली तरी ही झाडं माझ्या बालपणाशी निगडित होती.काही क्षणापुरता का होईना वर्षानुवर्ष त्यांचा सहवास मला लाभला होता.


शेरताटी विषयीच्या आठवणी माझ्या मनात उचंबळून येण्यासाठी कारणही तसेच घडले आहे.काल परवा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात गेलो होतो.कार्यक्रमाच्या ठिकाणी माझा कॉलेज जीवनातील मित्र भेटला.त्याने आग्रह केला म्हणून त्याच्या घरी गेलो.त्याचा तो प्रशस्त बंगला पाहून डोळे दिपून गेले.त्याच्या दिवाण खान्यातील कुंडीकडे मी पाहतच राहिलो.'अरे ,हे इथे कसे? बालपणीचा अजागळ मित्र सुटा बुटात आपल्या समोर नटून थटून 

उभा रहावा तसे ते शेराचे झाड कुंडीत उभे होते.मी त्याच्याकडे नवलाईने पहात असतानाच मित्र म्हणाला,'अरे काय बघतोस त्या कुंडीला एवढे निरखून? 'पेन्सिल ट्री' आहे ती.घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी अमेझॉन वरून मागविली आहे''मी काही न बोलता पुढे आलेला चहा पीत राहिलो.'कसे सांगावे याला?अरे हे शेराचे झाड आहे म्हणून' मित्राचा निरोप घेताना पुन्हा एकदा त्याच्या पेन्सिल ट्री कडे पाहिले आणि स्वतःशीच पुटपुटलो 'उकीरड्याची दैना एकना एक दिवस फिटतेच'

कितीतरी वेळ शहरातल्या मित्राची ती 'पेन्सिल ट्री'माझ्या मनाच्या कागदावर गावातील 

शेरताटीचे चित्र रेखाटीत राहिली.


 आजमितीस राणू बाबाला जाऊन अनेक वर्ष उलटून गेली आहेत.ती दगडी शाळा नाही आणि शेरताटीही  नाही.आता उरला आहे फक्त आठवणींचा पालापाचोळा तो उडत राहतो मनाच्या अंगणात अधून मधून!


*विजयकुमार मिठे*

मो.९८८१६७०२०४


0 coments