Read more




साहित्यकणा फाऊंडेशन, नाशिक आयोजित 

राज्यस्तरीय साहित्यकणा संमेलन २०२६


उद्घाटकांचे भाषण


डॉ. पृथ्वीराज तौर 

(प्राध्यापक व प्रमुख, मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ४३१६०६)


साहित्यकणा फाऊंडेशन नाशिक यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय साहित्यकणा संमेलनाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध साहित्यिक आदरणीय सुरेश पाचकवडेजी, स्वागताध्यक्ष महाराष्ट्रातील ख्यातकीर्त विचारवंत डॉ. प्रशांत आंबरेजी, साहित्यकणा फाउंडेशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक संजय गोराडेजी, सचिव माझे स्नेही व सहृदय साहित्यिक मित्र विलास पंचभाईजी, उपस्थित पूर्वाध्यक्ष विजयकुमारजी मिठे, विवेकजी उगलमुगले, माननीय संजय करंजकर, माननीय अविराज तायडे, डॉ. राजेश गायकवाड, माननीय अलकाताई दराडे, माननीय मंदा नांदुरकर, राकेशजी वानखेडे, हरिदासजी आखरे, अश्विनीताई बोरस्ते, भास्करराव शिरोडे, माननीय सुरेखाताई बोऱ्हाडे, रावसाहेबजी जाधव, सुरेशजी चौरे, पूजाताई बागुल, उमाकांतजी दहाड, काशिनाथजी गवळी, सुजाताताई येवले, सुनिताताई वाळुंज, राजेंद्र सोमवंशीजी, प्रवीणजी जोंधळे, नंदकिशोरजी ठोंबरे, माझे मित्र कवी सागर जाधव, सुरेशराव पवार, रविकांतजी शार्दुल, किरणजी सोनार, प्रतिभाताई जाधव, उमेशजी गायधनी, तुषार चांदवडकर सर, आज सायंकाळच्या सत्रात विविध पुरस्कारांनी ज्यांचा गौरव होणार आहे ते आदरणीय डॉ. दिलीप धोंडगे सर, माझे मित्र जितेंद्र कुंवर सर, सयाजी शिंदे, डॉ. पल्लवी बनसोडे, कादंबरीकार सचिन अवघडे, गझलकार सतीश मालवे, माननीय गोपाळराव पाटील, कृतिकाताई मराठे, गुरय्या स्वामी, वसंत शहाणे काका, रत्नाकरजी शेजवळ साहेब, कविवर्य उत्तम कोळगावकर, माझे गुरुजी आदरणीय प्रा. बाळासाहेब बोरसे सर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले साहित्यिक, लेखक, कवी, बंधू आणि भगिनींनो,


साहित्यकणा फाउंडेशनच्या या राज्यस्तरीय साहित्यकणा संमेलनाचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो. 


नाशिक ही एक पवित्र भूमी आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आहे. या भूमीवर इतिहासातील महान विभूतींची, महंतांची, राजे-रजवाड्यांची, शूरवीर योद्धांची पाऊले चिन्हांकित झालेली आहेत. ही भूमी त्यागाची, संयमाची, संघर्षाची आणि तेजाची भूमी आहे. आपल्या सर्वांसाठी तीर्थरूप असणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची, स्वातंत्र्यवीर सावरकरांची, सुंदर मि होणार असे म्हणणा-या कवी गोविंद यांची, वसंतराव कानेटकरांची, लोककवी वामनदादा कर्डक यांची आणि श्रेष्ठ कादंबरीकार बाबुराव बागुल यांची ही भूमी आहे. त्यांच्या लेखणीने केलेल्या वाङ्मयीन संस्कारामुळे माझी जडणघडण झाली, हे मी प्रारंभीच कृतज्ञतापूर्वक नोंदवतो व साहित्यकणा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याची संधी मला दिली यासाठी संयोजकांचे प्रारंभीच आभारही व्यक्त करतो.


‘साहित्यकणा’ हा शब्दप्रयोग मला इतर काही शब्दांची आठवण करून देतो. संदेशवहन, शरीराचा ताठपणा, हालचाल, संवेदना, संवाद, लवचिकता, सहनशक्ती, संरक्षण असे ते शब्द आहेत. हा शब्दप्रयोग मानवी उत्क्रांतीचा गेल्या चाळीस लक्ष वर्षांचा इतिहास डोळ्यापुढे घेऊन येतो. चतुष्पादापासून द्वीपादापर्यंत झालेला मानवाचा विकास, त्याला गवसलेली भाषा, त्याला भेटलेल्या स्मृती, त्याने शोधलेली लिपी, त्याने काळावर मिळवलेला विजय, अशा अनेक घटीतांची आठवण या शब्दप्रयोगामुळे होते. प्रत्येक मानवाच्या पाठीला मज्जारुज्जू आणि मणक्यांच्या हाडापासून तयार झालेला एक कणा असतो. मेंदू आणि शरीर यांच्यातील संवादाची प्रतिष्ठापना करण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जेव्हा त्याला दुखापत होते त्यावेळी संवेदना नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. एकूणच काय तर कणा हा मानवी शरीरातील सर्वात कळीचा भाग आहे. तो असतो म्हणून आपल्या दैनंदिन क्रिया सुलभ होतात. 


जवळ जवळ ३०-३२ वर्षांपूर्वी कणा हा शब्दप्रयोग सांस्कृतिक सामाजिक भूमिकेच्या संदर्भाने माझ्या वाचनात आला होता, अर्थात त्यावेळी मी कनीष्ठ महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी होतो. समकाळाचे भान माझ्यात हळूहळू निर्माण होत होते. समस्यांची गुंतागुंत लक्षात येत होती आणि अशावेळी कुठल्यातरी लेखात वाचलेले ते वाक्य माझ्या काळजात खोलवर कोरले गेले. 

'कणा नसलेले लोक संस्कृती बुडवतात आणि अर्ध्या कण्याची माणसं इच्छा असूनही ती वाचवू शकत नाहीत.' हे ते वाक्य गेली तीन दशके निरनिराळ्या निमित्ताने आठवत राहिले आहे. साहित्यकणाच्या या व्यासपीठावर उभे असताना ते मला प्रकर्षाने आठवते आहे.


लिहिण्या वाचण्यासाठी खरे तर प्रत्येक काळ कठीण असतो. सत्याचा शब्द उच्चारण्यासाठी जसे धैर्य लागते, तसेच सत्य ऐकण्यासाठी ही धैर्याची गरज असते. वर्तमान 'सत्य' आणि 'धैर्य' या दोन्ही शब्दांपासून कोसोमैल दूर आहे. याचा अर्थ भूतकाळातील लोकमानसाला हे शब्द फार प्रिय होते आणि ते या शब्दांचा आदर करत होते, असा नाही.


पण प्रत्येक युगात काही महात्मे होऊन गेले; प्रत्येक काळात काही माणसे अशी जन्माला आली की ज्यांनी या शब्दांचा अर्थ लोप पावू दिला नाही. महात्मा गौतम बुद्ध, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, महात्मा बसवेश्वर, जगद्गुरु संत तुकाराम, महात्मा फुले, महात्मा गांधी, प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपापल्या काळात ‘सत्य’ आणि ‘धैर्य’ या दोन्ही शब्दांना नवा अर्थ दिला. केवळ शब्दांनाच नव्हे, तर एकूणच मानवी युगाला त्यांनी उजेडाचा आशय प्रदान केला. या ज्ञानप्रकाशामध्ये आपल्यासारख्यांचे जगणे उजळून निघाले आहे. या प्रकाशामुळे आपल्याला आपल्या भोवतीचे जग नव्याने दिसू लागले आहे. हे डोळे लाभल्यामुळे समाजातील काही लोक कवी-लेखक झाले, कुणी चित्रकार तर कुणी गायक झाले. कलेची निर्मिती ही सत्याचा शोधच असते. गाण्याचा आलाप हा सत्य गवसल्याचा साक्षात्कारच असतो. आणि स्फुरलेली एखादी उत्तम कविता हा निर्मिकाच्या कृपेने झालेला सत्याचा स्पर्श असतो. 


त्यामुळे जगामध्ये आजूबाजूला जेव्हा अनेक धर्म आपल्याला दिसतात, लेखक कलावंत स्वतःला त्यापासून वेगळं काढून एका नव्या सत्यधर्माची वाट चोखाळतात, साहित्यिकाचा धर्म हाच तो सत्यधर्म आहे. हाच मानवता धर्म आहे. सकल मानवी समाज याच अधिष्ठानावर उभा आहे. 


कवी लेखक असणे ही एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण स्वतःहून स्वीकारलेली आहे आणि म्हणून आपले लेखकीय व व्यक्तिगत चरित्र हे शुभ्र धवल व पवित्र असणे गरजेचे आहे. राग, लोभ, मोह, माया, असुया, इर्षा, मत्सर हे विकार कोणाला सुटले आहेत? पण आपण, ‘ते’ असतो ‘जे’ या पाशातून जगाने स्वतःला सोडवून घेणे महत्त्वाचे आहे, असे मानतो, आणि यासाठीच आपण स्वतःला पुन्हा पुन्हा तपासले पाहिजे. जर, आपण इतरांना सल्ले देत असू, इतरांना शिकवत असू, इतरांना मार्गदर्शन करत असू तर आपण सल्लागार, मार्गदर्शक, प्रकाशदायात्री म्हणून अचूक असायला काय हरकत आहे? आपण उच्चारतो ती मूल्ये आपणही जोपासायला काय हरकत आहे? आपण इतरांना जो रस्ता दाखवला त्यावर स्वतःसुद्धा चालून पाहिले पाहिजे. लेखक कवीने प्रत्यक्ष जीवनातच काय तर स्वप्नात सुद्धा नैतिक असले पाहिजे. कवी-कलावंताची प्रत्येक कृती ही नैतिकच असली पाहिजे. ज्या सुंदर जगाचे स्वप्न आपण कथेतून किंवा कवितेतून रंगवतो, ते जग निर्माण करण्यासाठी, आपणच पुढे आले पाहिजे, त्यासाठी ‘कणा’ महत्त्वाचा आहे. 


मोडून पडला संसार तरी 

मोडला नाही कणा 

पाठीवरती हात ठेवून 

फक्त लढ म्हणा

हे जे कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेत म्हटलं आहे, ते विसरता कामा नये. 

आपल्या आजूबाजूला घनघोर काळोखातही प्रकाशाचे काही स्तंभ असतात, वाट चुकते तेव्हा धीर देऊन पाठराखण करणारे वाटाडे असतात, आपल्या प्रत्येकाच्याच दाराबाहेर आयाबहिणींनी काढलेल्या रांगोळ्या आहेत, आणि थकून गेलेल्या शरीरात, विझूविझू पाहणाऱ्या डोळ्यांत आपल्याला ‘औक्षवंत व्हा’ म्हणणारे जेष्ठ आणि त्यांचे आशीर्वाद आहेत. हे आशीर्वाद लढण्याची जिद्द देतात. या सदिच्छांमुळे जीवनाचा प्रवास सुखकर होतो; ही आपल्या आजूबाजूची ती सामान्य माणसे आहेत, ज्यांच्यामुळे आपला सभोवताल नितळ, निरागस आणि बाळाच्या हसण्यासारखा पवित्र होतो.


‘साहित्यकणा’ हे लेखकांनी लेखकांसाठी आयोजित केलेले लेखकांचे संमेलन आहे. वर्तमानातील निरनिराळ्या पिढ्या एकत्र येऊन, यानिमित्ताने भूमिकेबद्दल बोलत आहेत. ही भूमिका ताठपणे जगण्याची; रंग, धर्म, वंश, प्रांत, भाषा, बोली, वर्ग,वर्ण, लिंग या भेदांच्या पलीकडे जाऊन परस्परांना आलिंगन देणारी आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम’ हा कानमंत्र आपल्या पूर्वजांनी अतिप्राचीन काळी आपल्याला दिला आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे आपण वारस आहोत. लोकांच्या समूहशक्तीवर विश्वास ठेवणारे आणि त्यांच्यासाठी आनंदोत्सवाची स्वप्ने पाहणारे आपण ‘लोक’ आहोत. 


लेखक म्हणून आपण धरित्रीच्या एका छोट्या भूभागावर वास्तव्य करतो, एका विशिष्ट भाषेत लिहितो; पण आपलं वास्तव्य हे एका ग्रहावर आहे, ज्या ग्रहाला आपण वसुंधरा म्हणतो, या वसुंधरेवरील प्रत्येक सजीव-निर्जीवाबद्दल आपल्याला काळजी वाटते. लेखक म्हणून आपण चराचर वैश्विक सृष्टीशी आपले जैविक नाते वेळोवेळी प्रस्थापित करू पाहिले आहे. आपण साहित्यिक म्हणून स्वतःशीच शपथ घेतली आहे; आपण गोदावरीच्या पाण्याला साक्षी ठेवून, आपण सह्याद्रीच्या डोंगररांगांना साक्षी ठेवून, आपण या भूमीवर स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांच्या रक्ताला साक्षी ठेवून, आपण चंद्र-तारे-सूर्य-जंगल-वारे आणि सद्सदविवेक यांना साक्षी ठेवून शपथ घेतली आहे. आपण लेखक होण्याची, लेखक असण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळेच आपण केवळ पाठीच्या कण्याबद्दलच बोलत नाही आहोत, आपण ‘साहित्यकणा’विषयीही बोलत आहोत. साहित्यकणा संमेलनाच्या निमित्ताने सुरू झालेला हा संवाद मला महत्त्वाचा वाटतो. 


गेल्या दीड वर्षांपूर्वी ब्रिक्स देशांतील कवींच्या महोत्सवाच्या निमित्ताने मला चीन सरकारने आमंत्रित केले होते. एक-दीड आठवडा यानिमित्ताने दक्षिण आणि उत्तर चीनमधील काही शहरांना, निरनिराळ्या ठिकाणांना आम्ही भेटी दिल्या. हांगझौ हे दक्षिण चीनच्या झेजियांग प्रांतातील एक अप्रतिम शहर आहे. असे सांगतात की या शहरातील वेस्ट लेकमध्ये स्नान करण्यासाठी चंद्र भूतलावर अवतरतो. या शहराजवळील हैनिंगमध्ये मागच्या शतकात जू झुमो (१८९७- १९३१) हे सुप्रसिद्ध कवी होऊन गेले. या कवीला लौकिक अर्थाने खूपच कमी फक्त चौतीस वर्षांचे आयुष्य लाभले. विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. पण या कवीने आधुनिक चिनी साहित्याचा चेहरा बदलून टाकला. विविध प्रयोग केले. नियतकालिके काढली. नवे रचनाबंध निर्माण केले. या कवीच्या घरी, जे आता स्मारकामध्ये बदलवण्यात आले आहे, निरनिराळ्या देशातील लेखकांसोबत मी भेट दिली. आणि त्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांची काही छायाचित्रे मला पाहायला मिळाली. शंभर वर्षांपूर्वी १९२४-२५ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी जू झुमो च्या निमंत्रणावरून चीनमधील या शहरास भेट दिली होती. कवीच्या लग्नाला ते उपस्थित होते. टागोरांनी या शहरात काही महिने वास्तव्य केले. त्यांच्या स्मृती हैनिंग शहराने जपल्या आहेत. मि गेलो तेव्हा रवींद्रनाथ टागोर यांच्या भेटीची १०० वर्षे हैनिंग शहर साजरे करत होतं. 

त्यापूर्वी मी कैरो बुक फेअरच्या निमित्ताने इजिप्तला गेलो होतो. कैरोच्या रस्त्यांवर (या शीर्षकाची अबुल अशरफ याझीद दाली या मिस्र मधील कवीची अरबी कविता प्रसिद्ध आहे.) आणि गिझा येथील पिरॅमिडच्या पोटात जात असताना मला प्राचीन बनारसच्या घाटांची आठवण येत राहिली. बनारस हे महात्मा कबीराचं गाव आहे, तसंच ते महान लेखक प्रेमचंद यांचेही गाव आहे. 

  अगदी अलीकडे मी रशियाची राजधानी असणा-या मास्कोतील रेड स्क्वेअरला भेट दिली, रशियन कादंबरीकार अक्साना शुशरिनासोबत तेथील फॉरेन लँग्वेज लायब्ररीमध्ये उभारण्यात आलेला साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मुद्दाम जाऊन पाहिला. श्रमाला, कष्टाला प्रतिष्ठा देणारे अण्णाभाऊ साठे हे अत्यंत मोठे भारतीय लेखक आहेत. 

आपण जगात कुठेही भटकत असू आपल्याला पुन्हा पुन्हा भेटणारी व्यक्तिमत्वे ही साहित्याच्या दरबारातील आहेत हे प्रकर्षाने मला जाणवले. या नि:संशय महान विभूती आहेत. ज्या जगभर गेल्या आणि लोकांच्या अंतःकरणात त्यांनी घर केले.

जर्मन कवी गटे (१७४९-१८३२) यांचा एक किस्सा सांगितला जातो, असे सांगतात की गटे आपली कोणतीही रचना प्रसिद्धीस देण्याअगोदर घरातील नोकरचाकरांना आणि मोलकरणींना ऐकवत असे. त्यांना जर रचना आवडली, तर ती पुढे पाठवली जात असे. या कृतीमुळे एक कवी महाकवी झाला. त्यांचे फाउस्ट आपण वाचलेले असेलच. महान होण्याची पहिली अट ही सामान्य लोकांशी तुमचे किती आत्मीय नाते आहे? याच्याशी संबंधित आहे. सर्वसामान्य माणसाला, ज्याला साहित्य म्हणजे काय? हे ठाऊक नाही, त्याला, तुमचा लेख आवडतो, तो तुमच्या गोष्टीला खळखळून दाद देतो किंवा तुमची कविता ही त्याच्या सुखदुःखात त्याच्या ओठांवर येत असेल, तर तुम्हाला कुठल्याही अन्य पुरस्काराची वा प्रमाणपत्राची गरज नाही. विद्यापीठ समीक्षक तुमच्यावर लिहितात की नाही? पाठ्यक्रमात तुमचे ग्रंथ अभ्यासाला आहेत की नाही? शासनाचे पुरस्कार तुमच्या गाठीशी आहेत की नाहीत? तुमचा अनुयायी वर्ग आहे की नाही? तुम्ही एखाद्या कंपुचे किंवा टोळीचे सदस्य आहात की नाही? या सगळ्यांना काहीच अर्थ नाही. 

तुमच्या लेखनाला वाचक आहे की नाही? तुमच्या ग्रंथामुळे सामान्य जणांचा जीवनस्तर उंचावतो की नाही? हे प्रश्न स्वतःला विचारणे जास्त गरजेचे आहे. तुमचे लेखन हीच तुमची झिंग असली पाहिजे, निर्मितीचीच नशा तुमच्या दैनंदिन जगण्याला वेटोळा देऊन तुमच्यासोबत असायला पाहिजे. आपण जर लबाड्या करून जगत असू, लेखक धर्माशी प्रतारणा करत असू, सत्य धर्मावरून बाजूला जात असू तर मग झोप येत नाही. आणि मग कुठल्या कुठल्या नशेच्या आणि व्यसनांच्या अधीन जगणे कलावंताच्या वाट्याला येते. सच्या कलावंताला कोणत्याही बाह्य नशेची, झिंग आणणाऱ्या अन्य बाबींची आवश्यकता नसते. 


या ठिकाणी हेही नमूद करावेसे वाटते की महान गोष्टी या फार क्लिष्ट नसतात. खूप साधे सोपे शब्द मानवी जीवन अर्थपूर्ण बनवत असतात. प्रेम, शांती, सौहार्द, संवाद, संवेदना, मैत्री, नाते, स्मीत हे फार सुंदर शब्द आहेत. हे शब्द आपल्या आयुष्यात आले की आपले जगणे बदलून जाते. 

तुम्हाला आठवत असेल, आपल्या पूर्वजांनी हेही सांगून ठेवलेले आहे की मनःशांतीचा रस्ता, आत्मोन्नतीचा रस्ता हा बाहेर नाही, तर आत आहे.

'माती उकरून मुळापर्यंत जाल 

तर 

हाती काहीच येणार नाही 

मुळापर्यंत जाण्याचा रस्ता 

फुलातून जातो' 

असे कविवर्य उत्तम कोळगावकर यांनी म्हटले आहे. हा दृष्टांत, लेखकांसाठी महत्त्वाचा सल्ला म्हणून विचारात घेण्यासारखा आहे. 

श्रेष्ठ कृती या आपल्याच जगण्यातून फुलू शकतात. आपण जेवढे स्वतःला, कुटुंबाला, समाजाला सूक्ष्मपणे न्याहाळू आपण अधिकाधिक वैश्विक होत जाऊ. जगभरची वैश्विक मूल्ये, एकच आहेत. ती देशकालपरत्वे बदलत नाहीत. रामायण महाभारताची आवाहन क्षमता आणि ओदिसी, इलियडची आवाहन क्षमता जगभर सारखीच आहे. जगातील प्रत्येकाला या महाकाव्यांमध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसते. आणि म्हणूनच युगानुयुगे या कथा जगभर एका पिढी दुसऱ्या पिढीला सांगत राहिली. 

या व्यासपीठावर उभे असताना, आपल्या पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून, मला हीच गोष्ट ध्यानात आणून द्यायची आहे. आजूबाजूच्या सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत लिहा, सामान्यांसाठी लिहा आणि जगण्याला धीटाईने सामोरे जा. परखड लिहा. क्रोध असू द्या, अंगार असू द्या, क्रांतीची भाषा असू द्या, पण त्याला मानवतेचा परिसर स्पर्श असावा, भावनेचा ओलावा असावा, मानवाविषयी त्यात आत्मीयतेचा धागा असावा याची काळजी घ्या. 

मृणालिनी गडकरी (१९४९-२०१८) या मराठीतील एक उत्तम भाषांतरकार होत्या, पदव्युत्तर शिक्षण घेत असताना मुलाखत घेण्याच्या निमित्ताने मी त्यांना भेटलो होतो. बंगाली भाषेतून अनेक पुस्तकांचे अनुवाद त्यांनी मराठीमध्ये केले आहेत.

बंकिमचंद्र चटर्जी, शरदचंद्र चटोपाध्याय, ताराशंकर बंधोपाध्याय यांच्यापासून अगदी अलीकडच्या आशापूर्णा देवी, महाश्वेता देवी, सुनील गंगोपाध्याय, तसलीमा नसरीन यांच्यापर्यंत बंगालीतील विविध लेखकांविषयी त्यांच्याशी मुलाखतीदरम्यान प्रश्नउत्तरे झाली. बंगालीमध्ये लेखकाला लेखक म्हणून तोपर्यंत मान्यता मिळत नाही, जोपर्यंत तो लहान मुलांसाठी लिहीत नाही असे एक निरीक्षण मृणालिनी गडकरी यांनी या मुलाखती दरम्यान नोंदवले होते. 

मराठीमध्ये अगदी उलट स्थिती आहे. ज्यांना आपण थोर किंवा श्रेष्ठ लेखक म्हणून नावाजतो त्यांनी मुलांसाठी फारसे लिहिले आहे, असे दिसत नाही. बालसाहित्याकडे गांभीर्याने पाहण्याची वृत्ती मराठी साहित्यक्षेत्रात नाही. त्यामुळे आपण खूप महत्त्वाच्या गोष्टींना मुकलो. या संमेलनास उपस्थित असणाऱ्या लेखकांना नम्र आवाहन करतो, की ज्या ताकदिने आपण मोठ्यांसाठी लिहीत आहात, थोडासा वेळ काढून छोट्या वाचकांसाठीही लिहा. आपल्या आजूबाजूच्या बालकांचे विश्व समजून घ्या. मराठीमध्ये ना.धों. ताम्हणकर, साने गुरुजी, भा.रा. भागवत, सुधाकर प्रभू, अनंत भावे, माधुरी पुरंदरे, राजीव तांबे, ल.म. कडू, माधुरी माटे अशी बालसाहित्यिकांची समृद्ध परंपरा आहे. असे असले तरीही, मराठीत अजूनही वयात आलेल्या, पौगंडावस्थेतील मुलांसाठी पुस्तके नाहीत; रिमांड होममध्ये वाढणाऱ्या मुलांला आपली वाटतील आणि वाचनाची गोडी लावतील अशी पुस्तके नाहीत; भटक्या विमुक्त समाजातील लेकरांसाठी त्यांचे भावविश्व जपतील अशी पुस्तके नाहीत, जंगलातल्या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या मुलांमुलीना आपली वाटतील अशी पुस्तके नाहीत, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अशा हजारो बालकांसाठी कोण लिहिणार आहे? त्यासाठी आपण पुढे यावे असे आवाहन मी करतो. 


भाषा ही काल-परवापर्यंत एक मोठा अडथळा होती, म्हणून मी जाणीवपूर्वक अनुवादाकडे वळलो. जगभरातील हजारो कथा मागच्या वीस-पंचवीस वर्षात लहान मुलांसाठी मी मराठीत आणल्या. प्रा. स्वाती काटे यांच्यासमवेत वाडी तांड्यावरच्या शाळांना भेटी देऊन ज्यांची मातृभाषा मराठी नाही, अशा विविध लोकसमूहातील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या मुलांना लिहिले केले. भाषा व बोली यांच्यातील आंतरसंवाद सुकर व्हावा या दृष्टीने पावले उचलली. 

आज या व्यासपीठावरून मी आपल्याला ही जाणीव करून देत आहे की, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ते)च्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे नजीकच्या दोन-तीन वर्षांमध्ये मानवी भाषांतरकाराचे अस्तित्व संपुन जाणार आहे. भाषांचा अडसर दूर होऊन, एका क्लिकवर जगभरातील लेखन स्वभाषेत सहजपणे वाचता येणार आहे. अर्थात त्याची सुरुवात झालेली आहेच. म्हणजे यापुढे मानवी भाषांतरकाराची गरज राहिलेली नसणार. बघता बघता तुमच्या डोळ्यांपुढून दुभाषक व अनुवादक हे अस्तंगत होऊन जातील. 

हीच वस्तुस्थिती मी निराळ्या पद्धतीने पाहतो, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जेव्हा जगभरचे लेखन स्वभाषेत सहजपणे उपलब्ध झालेले असेल, त्यावेळी नवा आशय हेच बलस्थान असणार आहे. जगभरातील वाचक नवा आशय असणा-या कृतीला वाचण्यासाठी उत्सुक असेल, अशी कलाकृती जी जीवनाचा नवा अन्वयार्थ सांगेल, जी जगण्याच्या अस्पर्शीत बाबींना स्पर्श करेल, असे अनुभव जे आजवर मांडले गेले नाहीत ते वाचण्याची उत्सुकता प्रत्येक वाचकाकडे असेल. पुढील काळात भाषेच्या देशाच्या काळाच्या सीमा ओलांडून असे लेखन जगभर वाचले जाणार आहे. यापुढील काळात एका लेखकाची स्पर्धा त्याच्याच गावातील अथवा त्याच्या भाषेतील लेखक कवीशीच असणार नाही तर जगभरच्या साहित्यिकांशी असणार आहे.  


संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असा एक सल्ला आपल्या अभंगातून सतराव्या शतकात दिला आहे. हा सल्ला वर्तमानात खूप महत्त्वाचा आहे, आपल्याबद्दल कुणी काही भलेबुरे लिहिले की आपण दुखावतो, आपले चित्त ढळते. या साऱ्यामुळे आपण वाटेवरून आडवाटेला लागतो. जो रस्ता आपला नाही, त्यावर चालू लागतो. आपला रस्ता प्रेमाचा आहे द्वेषाचा नाही. आपला रस्ता मैत्रीचा आहे मत्सराचा नाही. आपला रस्ता करुणेचा आहे हिंसेचा नाही. आपल्याला शांततेसाठी हाक द्यायची आहे. त्यामुळे आपल्यावर व्यर्थ टीका टिप्पणी करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. आपण आपल्याच मस्तीत आपलं गाणं गात पुढे जात रहा. समविचारी लोक आपल्या पाठीशी येतील, न येतील; त्याची काळजी करू नका. आपला आनंद आपल्या ओठांवर ऊमलणाऱ्या गाण्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा. 


माझे सगळे विवेचन हे उपदेश देणारे झाले आहे असे एखाद्यास वाटू शकेल, तथापि तसे नाही. लेखन वाचन करताना मला जे जाणवले, ती निरीक्षणे अत्यंत नम्रपणे आपल्यापुढे ठेवली आहेत. मी आताच म्हणालो की आपली स्पर्धा जगभरातील लेखक कवींशी आहे; तथापि लेखकाची स्पर्धा ही अन्य लेखकांशी कधीच नसते, ती स्वतःशी असते. 

आपल्या पहिल्या पुस्तकापेक्षा दुसरे पुस्तक अधिक उन्नत समृद्ध असले पाहिजे. एक पुस्तक वाचल्यामुळे वाचक ज्या पायरीवर आहे त्या पायरीवरून वरच्या पायरीवर गेला पाहिजे. आणि जर केवळ वाचनामुळे वाचक त्याची पातळी उंचावू शकत असेल, तर ते पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाची उंची खरोखरच खूप जास्त असायला हवी. नाही का? 

माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, चराचरसृष्टीचा घटक म्हणून, या वसुंधरेचे अपत्य म्हणून आपली उंची काय आहे? मी मानवी मूल्यांचे प्रत्यक्ष जीवनात पालन करतो का? हा प्रश्न आपण आज स्वतःला विचारूया. जेव्हा उत्तर हाती येईल, तेव्हा कळून येईल की आपला कणा ताठ आहे का?

 माणूस म्हणून आपला कणा ताठ असेल तर लेखक म्हणूनही आपला साहित्यकणा नक्कीच ताठ असणार, हा माझा विश्वास आहे. 

या ठिकाणी उपस्थित सर्व लेखकांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी, आरोग्यदायी जीवनासाठी, सुखी, संपन्न व निरोगी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. डॉ. सुरेश पाचकवडे सर यांना या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान देऊन गौरवान्वित केले यासाठी सरांचे मनापासून अभिनंदन करतो. 

धन्यवाद. 

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!


पृथ्वीराज तौर 

संपर्क – ९८९०५१५८१५

drprithvirajtaur@gmail.com