कथा - आऊट हाऊस ✍️लेखिका निशा डांगे | Out house By Nisha Dange

कथा - आऊट हाऊस ✍️लेखिका निशा डांगे | Out house By Nisha Dange

Author:
Price:

Read more

 आऊट हाऊस



        मुंबईतील नामवंत उद्योगपती महेश कपूरचा आलिशन बंगला एखाद्या नववधू प्रमाणे सजला होता. रंगीबेरंगी लाईटिंगच्या झगमगाटात आजूबाजूचा परिसर उजळून निघाला होता. बंगल्याच्या समोरील विस्तीर्ण आणि अतिशय सुंदर अशा बगिच्यात महेश कपूरचा एकुलता एक मुलगा वेदांतच्या अकराव्या वाढदिवसाची जंगी पार्टी आयोजित केलेली होती. महेश कपूर आणि सुधा कपूर आलेल्या पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करीत होते. सुधाने आपल्या हातातील घड्याळाकडे पाहत म्हटले,


"महेश सात वाजत आलेत, आता केक कापायला हवा! भरपूर पाहुणे आलेले आहेत. जे अजून आले नाहीत ते येतीलच!"


"सुधा फक्त दहा मिनिटे थांबूयात माझे काही मित्र यायचे राहिलेत."


"बरं! तू थांब इथे मी तोपर्यंत तिकडे सर्व तयारी झालीय का ते बघते"


     सुधाने जाता जाता बाजूलाच पाहुणे मंडळींच्या मुलांशी खेळत असलेल्या वेदांतला आवाज दिला. 


"वेदांत कम टू स्टेज"

 सुधाचे वाक्य कानावर पडतातच वेदांत स्टेजच्या दिशेने धावत निघाला. एव्हाना महेशचेही मित्र आले होते. तो त्यांना घेऊन सरळ स्टेजकडे गेला. भव्यदिव्य स्टेजच्या मधोमध गोलाकार टेबलवर तीन थराचा चॉकलेट केक सजवलेला होता. सुधाने वेदांतच्या हातात प्लॅस्टिकची सूरी देत म्हटले,


"माय डियर वेदांत, कम हियर अँड कट द केक!"


    वेदांतने ती सूरी हातात घेतली परंतु तो अजूनही कुणाची तरी वाट पाहत होता. त्याची नजर सारखी बंगल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या आऊट हाऊसकडे जात होती. तिकडे फक्त काळाकुट्ट अंधार पसरलेला होता. बंगल्यात सगळीकडे रोषणाई होती फक्त आऊट हाऊस सोडून. तिकडे पाहून वेदांतला खूप भीती वाटली. वेदांतच्या चेहऱ्याकडे पाहून सुधा काय समजायचे ते समजून गेली. तिने वेदांतच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले,


"वेदांत कट द केक!"


  वाढदिवसाच्या दिवशी वेदांतच्या चेहऱ्यावर उदासी परसलेली होती. तरीही त्याने हसरा चेहरा केला. वेदांतने फुंकर मारून मेणबत्ती विझवली त्याचबरोबर सर्वांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


"हॅप्पी बर्थडे टू यु, हॅप्पी बर्थडे टू यु, हॅप्पी बर्थडे तू डियर वेदांत" 


    आलेल्या पाहुणे मंडळींनी वेदांतला खूप महागड्या भेटवस्तू दिल्यात. वेदांतला त्यात कुठलाच रस वाटत नव्हता. तो यांत्रिकपणे एकेक वस्तू हातात घेत होता आणि बाजूला ठेवत होता. सुधा आणि महेश पाहुण्यांशी गप्पा मारण्यात मग्न झाले. सर्वांची जेवणं आटोपलीत. हळूहळू सर्व पाहुणे निघून गेले. सुधाने बगिच्यात, बंगल्यात सगळीकडे वेदांतला शोधले परंतु वेदांत कुठेच सापडला नाही. ती महेशकडे येत म्हणाली,


"महेश वेदांत कुठे आहे?"


"कुठे आहे म्हणजे? असेल ना इथेच कुठेतरी."


"अरे मी त्याला सगळीकडे शोधले पण….. तो कुठेच भेटला नाही."


"त्याच्या रूममध्ये थकून झोपी गेला असेल कदाचित!" महेश वेदांतच्या रूमकडे वळत म्हणाला.


"नाही महेश, वेदांत त्याच्या रूममध्ये नाहीये! मी आत्ताच बघून आलेय. कदाचित तो ….. आऊट हाऊस….."


"छे s…छे...s….! कस्सं शक्य आहे. इतक्या अंधारात तो तिकडे जाणं शक्यच नाही!"  


"पण बघायला काय हरकत आहे"


"ठीक आहे! चल आधी तिकडे बघू." 


     सुधा आणि महेश दोघेही आऊट हाऊसच्या दिशेने निघाले. आऊट हाऊस रिपेयरिंगला आले होते. बऱ्याच वर्षांपासून त्याचा काहीही उपयोग नव्हता. बंगल्यातच पाहुण्यांसाठी गेस्ट रूम होत्या. नोकरांसाठी वेगळे निवासस्थान होते. त्यामुळे आऊट हाऊसकडे महेशने लक्षच दिले नव्हते. आऊट हाऊस मधील वीज व्यवस्थाही खंडली होती. इतक्या अंधारात वेदांत इकडे कसा आला असेल? हा प्रश्न सुधा व महेश दोघांच्याही मनात विजेसारखा लख्खून गेला. 


"फार अंधार आहे मी मोबाईलचा टॉर्च लावतो." महेश हातातील मोबाईलकडे पाहत म्हणाला.


"नको महेश, टॉर्च नकोस लावू मला बघायचे आहे तिथे नेमके काय सुरू आहे ते"


    महेशने हातातील मोबाईल खिशात कोंबला. दोघेही अंधारातून वाट काढत सांभाळून हळूच पाऊले टाकत पुढे गेले. 


       आऊट हाऊसच्या मोडक्या दाराच्या फटीतून अंधाराच्या साम्राज्याला छेद देत एक छोटीशी ज्योत तिचे तेज बाहेर फेकत होती. महेशने हळूच दार ढकलले. महेश आणि सुधा दाराच्या फटीतून आत काय सुरू आहे ते पाहू लागले. पुढचे दृश्य पाहून विजेचा करंट लागावा तशी महेशच्या काळजातून एक वेदना मेंदूपर्यंत आरपार गेली. तो पुतळ्यासारखा जागीच स्तब्ध झाला. त्याच्या तोंडून शब्दही फुटेनात! तेच दृश्य पाहून सुधाचे डोळे मात्र आग ओकत होते. 


      वेदांतच्या हातात एक डिश होती. त्यातील जेवण तो समोर बसलेल्या वृद्ध जोडप्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करीत होता. 


"घ्या ना आज्जी, आजोबा फक्त एकच पोळी उरली आहे. मी लपून घेऊन आलो. पटकन खाऊन घ्या.." 


      तो आळीपाळीने हातातील घास दोघांच्याही तोंडासमोर धरत होता. परंतु दोघांचीही खाण्याची बिल्कूलच इच्छा नव्हती. शेवटी आजी आजोबांना म्हणाली,


"अहो! लेकरू इतक्या प्रेमाने घास भरवतंय तर घ्या ना दोन घास! तुम्हाला शुगरच्या गोळ्याही घ्यायच्या आहेत. खाऊन घ्या ही पोळी भाजी."


"नको, नको तूच खाऊन घे तुला कालचा देखील उपवास होता. तुलाही बी. पी. च्या गोळ्या घ्यायच्या आहेत ना! तूच खाऊन घे ही पोळी भाजी. तुला नेहमी अशक्तपणामुळे चक्कर येतात. फक्त एका छोट्याशा पोळीत दोघांचेही पोट कसे भरेन?त्यापेक्षा तू खाऊन घे."


"नको हो! तुम्ही खाऊन घ्या." आज्जी आजोबांना विनवणीच्या सुरात म्हणाली.


"नाही तूच खा" आजोबा जरा दरडावून बोलले.


"अरे थांबा, थांबा! कित्ती भांडताय दोघही ते ही अगदी लहान मुलांसारखे." वेदांत स्वतःच मोठेपणा घेऊन बोलला.


       वेदांतने समयसूचकता साधून डिशमधील पोळीचे दोन समान भाग केले आणि दोन्ही हातात दोन घास घेऊन दोघांच्या तोंडासमोर धरले. आज्जी आजोबांच्या किणकिणत्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून सुरकूतलेल्या गालावर अश्रूंचे ओघळ वाहू लागले. आजीला हुंदका आवरणे कठीण झाले. ह्याच मायाळू लेकराला आशीर्वाद देण्यासाठी ते दोघेही गावाकडून काल तीन वर्षानंतर आले होते. ते जेव्हाही येत त्यांची रवानगी थेट आऊट हाऊस मध्ये व्हायची. मुख्य बंगला त्यांनी आजवर पाहिलेला नव्हता. मागच्या वेळी तर सुधाने त्यांना कायमस्वरूपी इथे येण्यास मज्जाव केला होता आणि आऊट हाऊसला कुलूप लावले होते. महेशचे आई वडील गरीब, अडाणी ग्रामस्थ होते त्यामुळे सुधाच्या हाय प्रोफाइल लाईफमध्ये त्यांना कुठलेही स्थान नव्हते. महेशलाही ती खेडपट म्हणून बरेचदा टोमणे मारायची. महेशचे आई-वडील फक्त महेशला व वेदांतला भेटण्यासाठी दोन दिवस यायचे. यावेळी वेदांतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आले होते परंतु सुधाने बंद पडलेल्या नादुरुस्त, अंधाऱ्या आऊट हाऊसमध्येच त्यांना राहण्यास सांगितले आणि आऊट हाऊसमधून बाहेर पडायचे नाही अशी सक्त ताकीद दिली होती. आजी आजोबा वेदांतच्या निरागस चेहऱ्याकडे अजूनही प्रेमाने पाहत होते. 


वेदांतने पुन्हा त्यांना अग्रह केला, "खा ना आजी-आजोबा, मॉम इकडे आली तर मला आणि तुम्हालाही रागवेल!"


वेदांतच्या बोलण्याने दोघेही भूतकाळाच्या भयानक स्मृतीतून बाहेर आले. दोघांनीही वेदांतच्या चिमुकल्या हातातील घास खाल्ले. आजीला एकदम ठसका लागला. त्या खोकू लागल्यात. 


"सॉररी आजी...s….s सॉररी आज्जी…. मी पाणी आणायला विसरलोच! आत्ता घेऊन येतो!" वेदांत आज्जीच्या काळजीने कळवळून म्हणाला. तो उठून उभा राहिला इतक्यात दार धाडकन लोटून सुधा आत आली. 


"वेदांत…..s…..वेदांत….. काय करतोयस तू इथे? आणि तुम्हाला जराही धीर निघत नाही का? नोकरांनी आणून दिले असते ना तुम्हाला जेवण नेहमीसारखे."


"मॉम फक्त एकच पोळी शिल्लक राहिली होती, आणि सर्व नोकर झोपायला गेलेत. आज्जी आजोबांना खूप भूक लागली असेल म्हणून मी घेऊन आलो."


"चूप बस लहान आहेस तू अजून पण यांना नको का कळायला?"


      महेश हे सर्व फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत होता. महेशच्या आई वडीलांनी त्याला मोलमजूरी करून इंजिनिअर बनवले होते. महेश लहानपणापासूनच खूप महत्वाकांक्षी होता. स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्याने कंपनीच्या मालकाच्या मुलीशी लग्न केले होते. सुधाने लग्नापूर्वीच त्याला स्पष्टपणे सांगितले होते, "तुझे कुठलेही नातेवाईक मला चालणार नाहीत!" त्यामुळे त्याने आई वडिलांची सोय गावाकडेच केली होती. तो त्यांना नियमितपणे पैसे पाठवायचा बाकी ते कसे आहेत ह्याची त्याने कधीच चौकशीही केली नाही. आज सकाळीच ते वेदांतच्या वाढदिवसासाठी इथे आले होते. परंतु सुधाने त्यांना घरातही येऊ दिले नाही आणि वाढदिवसाच्या पार्टीतही सहभागी होऊ दिले नाही. सुधासमोर महेश पूर्णपणे हतबल होता.


"महेश….. महेश! अरे लक्ष कुठेय तुझं" सुधाच्या ओरडण्याने महेश भानावर आला. 


"महेश उद्या सकाळी हे आऊट हाऊस पाडून टाक आणि तुझ्या…….." सुधाने वेदांतची उपस्थिती लक्षात घेऊन जाणीवपूर्वक आपले वाक्य अर्धवट सोडले. 


तेवढ्यात वेदांत सुधाकडे पहात निरागसपणे म्हणाला,"आऊट हाऊस पाडले तर म्हातारे झाल्यावर तुम्ही दोघे कुठे राहणार?" 


वेदांतच्याने प्रश्नाने दोघांच्याही काळजात धस्स झाले, मेंदूला झिणझिण्या आल्यात. दोघेही अवाक होऊन वेदांतकडे पाहू लागले. भविष्याची पदचिन्हं त्यांच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उमटू लागलीत. दोघांनाही आपल्या वागणुकीची लाज वाटू लागली. शेवटी निरुत्तर होऊन त्यांनी खजिलपणे माना खाली घातल्यात.



निशा डांगे नायगांवकर

पुसद

0 coments