Read more
इतके सोपे नसते.....
सुटते गाडी, उडतो धुराळा
भन्नाट निघून जाते,
थोपवलेल्या अश्रूंची वाट क्षणात मोकळी होते,
फुटतो बांध, ओघळती अश्रू
अश्रूंना त्या आवर घालणे
केवळ अशक्य असते
रक्ताच्या नात्यांना निरोप देणे इतके सोपे नसते......
येता पाखरे, घरभर फिरता
दंगा-मस्ती होते ,
जाता परतूनी गावी त्यांच्या
किलबिल संपून जाते ,
अन् फडफड पंखांची उगाच आपूल्या मनात घोळत राहते
रक्ताच्या नात्यांना निरोप देणे इतके सोपे नसते.....
जातात मुलीही सासरी अन्
तिथेच एकरूप होती ,
सोडून जाती आठवणी ज्या
सदैव मनास छळती ,
छुम छुम पैंजण, किण किण कंगन कानी गुंजत असते
रक्ताच्या नात्यांना निरोप देणे इतके सोपे नसते.....
पिकली पानं अधनं-मधनं
वाऱ्यासारखी येता ,
आठवणींची भरली गाठोडी
रिती करूनी जाता ,
घेण्या आशीष लवता पायी
थरथर सुरकुतल्या हातांची
काळीज चिरून जाते
रक्ताच्या नात्यांना निरोप देणे इतके सोपे नसते......
येतात फोन, होतात गप्पा
हसणे खिदळणे होते,
वाटेल तेव्हा व्हिडिओ कॉलने मुखदर्शनही होते
हव्याहव्या स्पर्शाची बोच
मनात सलत असते
रक्ताच्या नात्यांना निरोप देणे इतके सोपे नसते......
श्रीम. संगिता मधुकर महाजन
येवला
९८६००३९६०५

0 coments