Read more
दिशा...
माणसाची दिशा एकदा चुकली की अपेक्षित वळणावर येण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यासाठी वेळ, पैसा विनाकारण वाया जातो, त्याची भरपाई कशानेही करता येत नाही. तसेच झालेल्या मनस्तापाचीही भरपाई करता येत नाही. आपण योग्य रस्त्याने जात असलो, जरी आपण गुगल मॅपवरून चाललो असलो तरी अनावधानाने डावीकडे वळण्याऐवजी उजवीकडे वळलो तरी आपला वेळ मुख्य रस्त्यावर येण्यासाठी निष्कारण वाया जातो. अगदी असेच एका तरुणाबाबत अभिषेकबाबत घडले होते. त्याला प्रवेश घ्यायचा होता अॅग्रीकल्चरला त्याच्या गावाजवळील कृषी महाविद्यालयात, परंतु आई-वडिलांच्या आग्रहाखातर त्याला दूरच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. त्याचे कारण म्हणजे त्यांची भाची प्राजक्ता तिथे शिकत होती. त्याच्या आत्याची मुलगी. जी स्वभावाने हेकेखोर होती परंतु दोघांना एकमेकांची सोबत होईल, त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याला तिथे शिक्षणासाठी घातले होते. नातेवाईकांमध्ये अभिषेकचे सर्वत्र कौतुक होत. त्यामानाने प्राजक्ताचे होत नसत. अभिषेक उंच तर ती ठेंगू. तो रुबाबदार तर ती शामल. त्यामुळे तिच्यात आपणच सरस कसे हे दाखवण्यासाठी एकमेकांना पूरक ठरण्याऐवजी एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहू लागल्यामुळे त्याच्या प्रगतीला ते मारक ठरले. त्यामुळे अभिषेकच्या जीवनात जी परवड झाली, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आणि आर्थिक हानी झाली, त्यामुळे त्याला स्वतःला, त्याच्या कुटुंबाला प्रचंड मनस्ताप आणि मानहानीला सामोरे जावे लागले. माणूस विचार करतो एक आणि घडते दुसरेच तसेच काहीसे अभिषेकच्या बाबत घडले. त्याचे आई वडील सरकारी नोकरी करत होते. आपल्या मुलाने त्याच्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम बनावे हीच त्यांची प्रामाणिक इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांचा मुलगाही हरहुन्नरी, उत्साही, धाडसी होता. कुठले क्षेत्र त्याला वर्ज नव्हते एवढी त्याची धडाडी होती. तो उत्तम चित्र काढत, वक्तृत्व वाखाणण्यासारखे होते, हस्ताक्षर मोत्यासारखे होते, तो फेटा बांधायचा. दिसायला रुबाबदार आणि राजबिंडा होता. चालायला लागला की पाहत राहावे अशी त्याची चाल होती. अफलातून संघटन कौशल्य त्याच्याकडे होते. पण त्याने प्रवेश घेतलेल्या त्या कॉलेजमध्ये त्याला त्याच्या वर्ग मित्रांनी अफजल खान म्हणून हिणवले, त्याला सतत ट्रोल केले. त्यामुळे तो मानसिक दृष्ट्या खचून गेला. त्या परिस्थितीत खरे तर त्याच्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी त्याला सहकार्य करायला हवे होते. परंतु उलट त्यांनीही त्याची टर उडवली. कॉलेजमधील मुले येता जाता रँगिंग करत. त्यामुळे त्याला प्रचंड नैराश्य आले. त्याचे आई वडील त्याला फोन करत तेव्हा तो नीट बोलत नसत. त्या परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी त्याला त्या कॉलेजमधून काढून घरी आणले. शिक्षणापेक्षा आपल्याला आपला मुलगा अधिक महत्त्वाचा हा विचार त्यांच्या मनामध्ये त्यावेळी होता. त्याला शहरातील मानसोपचारतज्ञ डॉक्टरांना दाखवले. त्याचे डोके प्रचंड दुखत होते, रात्र-रात्र त्याला झोप लागत नव्हती. आत्महत्येचे विचार सारखे त्याच्या मनामध्ये तरळत. त्याने एक दोन वेळा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. परंतु त्याच्या आई-वडिलांचा विचार येऊन त्याने त्यापासून माघार घेतली होती. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊन अनेक चाचण्या केल्या तरीही त्याच्या परिस्थितीत सकारात्मक फरक पडला नाही. औषध संपले की परत निद्रानाश., "त्याच्या मामाने आपण दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ या" असे सुचवले. त्यानंतर त्यांनी त्याला धनंजय पाटील या प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टरांना दाखवले. त्यांनी पंधरा दिवस त्याला अॅडमीट करून त्याच्यावर योग्य ट्रीटमेंट केली, त्यामुळे त्याला हळूहळू गुण येऊ लागला, त्याची परिस्थिती सुधारु लागली. परंतु त्या डॉक्टरांकडे जर गेला नसता तर त्याला गमवायची वेळ त्याच्या आई-वडिलांवर आली असती असे ते डॉक्टर म्हणाले. त्यानंतर अभिषेकचा त्यांनी त्याच्या इच्छेनुसार बीएस्सीला प्रवेश घेतला. त्यासाठी त्याच्या मूळच्या अॅग्रीकल्चर कॉलेजमधील शैक्षणिक कागदपत्रे आवश्यक होती. ती द्यायला ते कॉलेज तयार नव्हते. तेव्हा त्याचे दवाखान्यातील सर्व गोष्टी रिपोर्ट्स दाखवले, तुमच्यामुळे त्याची ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे, तेव्हा आम्ही तुमच्यावर खटला दाखल करू. असे सांगितल्यानंतर त्यांनी कागदपत्रे दिली. त्याच्या आधारे तो पूर्वीप्रमाणे महाविद्यालयात जाऊ लागला. परंतु त्याचे मन आता अभ्यासात रमत नव्हते, माझी दोन वर्षे विनाकारण वाया गेलीत याची सल त्याच्या मनामध्ये राहून राहून बोचत होती. त्यामुळे त्याचा दोष तो त्याच्या आई आणि मोठ्या भावाला देत होता., "तुमच्यामुळे माझी वाट लागली" असे तो वारंवार त्यांना म्हणत.. तेव्हा कुटुंबात प्रचंड वादावादीचे प्रसंग निर्माण होत परंतु त्याची नाजूक परिस्थिती पाहून त्याचे ऐकून घेण्याशिवाय दुसरा मार्ग शिल्लक राहिलेला नव्हता. त्याला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याच्या कुटुंबातील सर्वांनी केला. हळूहळू त्याला यश येत गेले. दरम्यान वनरक्षक पदाची जाहिरात वर्तमानपत्रात आली. त्यासाठी त्याने तयारी सुरु केली. पाच किलोमीटर कमीत कमी वेळात धावणा-यास त्यामध्ये संधी मिळणार होती. अभिषेकने दोन महिने धावणे, जोर बैठक, पुलअप्स काढून शारीरिक तंदुरुस्ती मजबूत केली. परंतु चाचणी परीक्षेत अवघ्या अर्ध्या मिनिटात तो बाहेर पडला. सरळ मार्गावर येण्याचा प्रयत्न करत असलेल्या अभिषेकला याचा धक्का बसला. परंतु त्याने चिकाटी सोडली नाही तो बीएससी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला आता स्पर्धा परीक्षा द्यायची होती. त्या दृष्टीने त्याची तयारी चालू होती, परंतु डोकेदुखीचा त्रास अधून मधून डोकावत होता. त्यामुळे त्याला झोप लागत नव्हती. परंतु त्याच्या डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की, "आता तुला या आजारासोबतच जगावे लागेल, सहन करत परिस्थितीशी झगडत तुला तुझा मार्ग शोधावा लागेल." राज्यसेवा पूर्व परीक्षा सप्टेंबर महिन्यात होती. त्याचा अभ्यास पूर्ण होत आला होता. दरम्यान त्याने लाॅ ची प्रवेश परीक्षा दिली. त्या परीक्षेत त्याला उत्तम गुण मिळाले. त्याला शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. कुटुंबातील सर्वांनी सांगितले की," तुला नशिबाने चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे, तू तेच कर." एकीकडे स्पर्धा परीक्षा तोंडावर आणि दुसरीकडे लाॅ प्रवेश काय करावे? याचा विचार त्याच्या मनात सतत रुंजी घालू लागला. त्याच्यावर सर्वांच्या अपेक्षांचे प्रचंड दडपण आले. परत त्याची डोकेदुखी उफाळून आली. झोप पूर्णतः उडाली. तो दवाखान्यात मानसोपचारतज्ञांकडे गेला. त्यांनी तब्बेतीची विचारपूस करुन औषध दिले. वेळच्या वेळी औषध घ्यायचे, लवकर उठायचे आणि लवकर झोपायचे असा सल्ला दिला. परंतु डोकेदुखी कमी होण्याऐवजी वाढली. तो चार दिवसात दुसऱ्या वेळी दवाखान्यात गेला. डाॅक्टरांनी झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे त्याला दिवस रात्र सतत झोप येऊ लागली.
अभिषेक सकाळी लवकर उठून नऊ वाजता कोल्हापूरला दवाखान्यात गेला. सोमवार असलेने मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरांकडे पेशंट्सची भरपूर गर्दी होती. अभिषेकचा नंबर यायला दीड वाजला. आठवडय़ात तीन वेळा दवाखान्यात आल्यामुळे डॉक्टर प्रचंड संतापले. ते म्हणाले, "तुझ्यावरील माझा उपचार संपला आहे. तू आता दुसरीकडे दाखवलेस तर चालेल. तुला तात्पुरत्या गोळ्या लिहून देतो त्या घे." अभिषेक प्रिस्क्रीप्शन घेऊन औषध दुकानात गेला. तिथेही गर्दी होती. दहा मिनिटांनी तिथे औषध दुकानात डॉक्टरांचा फोन आला की, "अभिषेक वाघमारे पेशंटला औषध घेतल्यावर मला भेटायला सांग. मला भेटल्याशिवाय जाऊ नको म्हणून सांग. "
अभिषेकने औषधे घेतली आणि तडक डॉक्टरांकडे गेला.
" बस, तुझ्याशी बोलायचं आहे." अभिषेक निमूटपणे त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसला. डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली.
"आज सोमवार, दवाखान्यात खूप गर्दी असते. मला जेवणही गडबडीत घ्यावे लागते आणि आजच तू आठवड्यातून तिसऱ्या वेळी आला आहेस. तीन वर्षांपूर्वी, पहिल्या वेळेस डोके दुखते म्हणून आला होतास. तेव्हापासून तुझ्यावर उपचार सुरु आहेत. न चुकता तू वेळच्यावेळी औषध घेतल्यामुळे चांगला कव्हर झाला आहेस. परंतु आता तुझ्या विचारात गोंधळ झाल्याने तुझी डोकेदुखी पुन्हा सुरु झाली आहे. मला सांग तुझ्या डोक्यात लाॅ चे कुणी घातलेय? "
" कुणी नाही प्लॅन बी असावा म्हणून माझा मीच निर्णय घेतला आहे. "
" प्लॅन बी वगैरे काही नसते. प्लॅन ए च बी असतो. तुला एकावेळेस एमपीएससी आणि लाॅ होणार नाही. दोन्हीही अर्धवट होईल. तेव्हा एक तर एकच कर. तू फार विचार करतोयस त्यामुळे तुझा गोंधळ उडाला आहे. तू शांतपणे विचार करून ठरव पण जे करायचे ते शंभर टक्के करायचे. "
एवढया व्यस्त शेड्युलमधून डॉक्टरांनी आपल्याला परत बोलावले आणि अर्धा पाऊण तास वेळ देऊन समजावणीच्या सुरात आपुलकी आणि आस्थेनं समजावल्याने अभिषेकचे डोळे पाणावले. त्याच्या मनातील मळभ दूर होऊन मनाचा गाभारा स्वच्छ झाला होता. घटस्थापनेपूर्वी आपण जी स्वच्छता करतो आणि विचारांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करतो तशीच दिशा निश्चित झाली होती. लहानपणापासून आपण जे स्वप्न उराशी बाळगून आहे त्यासाठी जीव तोडून मेहनत घेण्याचा चंग बांधून तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. घरी आल्यावर त्याला त्याच्या भावाने विचारले, "डॉक्टरांनी काय सांगीतले?"
तेव्हा घडलेला वृत्तांत त्याने कथन केला.
"ठीक आहे तुझा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. परंतु आता गोंधळ करु नकोस." त्याच्या मम्मी पप्पांनी एका सूरात सांगितले.
✍️अनिल शिणगारे, कोडोली
7020353347

0 coments