सण आनंदाचा दिवाळीचा - ✍️भारती दिलीप सावंत

सण आनंदाचा दिवाळीचा - ✍️भारती दिलीप सावंत

Author:
Price:

Read more

 सण आनंदाचा दिवाळीचा 



          नाचू गाऊ आनंदाने 

          आला दिवाळीचा सण 

          करूया साजरे उत्सव

          सुंदर असे हे बालपण 

                 बालपणी साऱ्या सणांचे खूप नवल वाटते. नवीन कपडे, फटाक्यांची खरेदी तसेच घरात सुग्रास पक्वान्न आणि मिठायांची रेलचेल त्याचबरोबर शाळेला मिळणारी सुट्टी यामुळे सणाचा आनंद द्विगुणित न होईल तरच नवल! श्रावणापासून आपणांस सणांची पर्वणीच असते. हिंदू संस्कृतीमध्ये सणांचे आपले असे एक तत्त्व आणि महत्त्व असते. देवदेवतांची पूजाअर्चा, आराधना, त्यांना नैवेद्य दाखवणे यामुळे भक्ती, मुक्ती आणि सुखाचे क्षण झेलत मनुष्यप्राणी आपले जीवन आनंदाने जगत असतो. जीवनात आलेल्या सर्व संकटांवर हिमतीने मात करत असतो. गणपती गौरी विसर्जन झाले की दसरा हा मोठा सण साजरा होतो. विजयाची पताका बांधून एकजुटीचे महत्त्व विषद करणारा हा सण सुगीच्या काळात बळीराजाला आनंद मिळवून देतो. सुगी चांगली झाल्याने खिशात पैसा खुळखुळत असतो. गुलाबी थंडीची चाहूल लागलेली असते आणि सर्वांना दिवाळी साजरी करण्याचे वेध लागतात. मुलेबाळे, सानथोर, स्त्रीपुरूष सारेच दिवाळी सणाची आतुरतेने वाट पाहत असतात.

         ‌       दसरा सण साजरा केला की घरातील स्त्रियां घराची साफसफाई सुरु करतात. घराला रंगरंगोटी केली जाते. दिवाळी सुरू होण्यापूर्वी गृहिणींची  फराळाचे विविध पदार्थ बनविण्याची लगबग सुरू होते. मोठ्या निगुतीने त्या लाडू, चिवडा, कडबोळी, चकली, शेव, शंकरपाळ्या बनवतात. ‌धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशी पाच दिवसांत दिवाळी सणाची रंगत येते. नातेवाईक, मित्रमंडळी एकमेकांच्या भेटी घेतात. मुले, तरुण मंडळी नवीन कपडे घालून फटाके उडवत मजा लुटत असतात. फराळाच्या मेजवानीचा आस्वाद घेतात. धनत्रयोदशीला धनसंपत्तीची आणि लक्ष्मीपूजनाला पैसे, अलंकारांची पूजा होते. व्यापारी लोक आपली हिशोबाची वही पुजतात. रोज उटणे, सुवासिक तेले, सुगंधी साबण लावून अभ्यंग स्नान केले जाते. पाडव्याला सुवासिनी प्रेमाने आपल्या पतीला ओवाळतात व पती देखील तिला साडी, दागिने किंवा पैसे ओवाळणी म्हणून देतो. वर्षातून एकदा येणारा दिवाळीचा सण घरात सुख-समृद्धी आणि आनंदाचे लेणे घेऊन येतो.

            करूया साजरे सणसोहळे

            नका करू पर्यावरणाचा नाश 

            वाटतो निसर्ग भरभरून लेणं

            मानवासाठी वैभवाचं खास 

                 झाडूवाले, कामगार, वॉचमन आणि मजूरवर्गाला दिवाळीचे गिफ्ट देऊन गरीबांच्या घरात आनंद पेरला जातो. चैतन्याची ही पहाट साऱ्या जनसमूहात उल्हासाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण करते. आरोग्याची आणि 

प्रदूषणाची काळजी घेऊन सण सोहळे साजरे करावेत असे आवाहन केले जाते. दिवाळी चार दिवसांचा सण आहे. यात वसूबारसदिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. दिवाळी विविध धार्मिक कार्यक्रम देवता आणि व्यक्तिमत्त्वांशी जोडली जाते, जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम त्याची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणासह अयोध्येत आपल्या राज्यात परतला. याच्या आनंदप्रीत्यर्थ घराघरात पणत्यांच्या ओळी लावल्या जातात, आकाश दिवे लटकवले जातात आणि फटाके वाजवले जातात. मिठाई करून एकमेकांना वाटली जाते. घरा मंदिरात सजावट केली जाते. एकमेकांच्याकडे जाऊन मिठाईचा आस्वाद घेतला जातो. नातेवाईकांना घरी बोलावले जाते. लक्ष्मी पूजन दिवशी संध्याकाळी लक्ष्मी मातेची पूजन केले जाते, त्यावेळी घराघरात भक्तीभावाचे वातावरण असते. दुसऱ्या दिवशी दिवाळीचा पाडवा असतो. त्या दिवशी सुवासिनी आपल्या पती राजांना ओवाळतात आणि घसघशीत गिफ्ट वसूल करतात. पाडव्यालाच बलिप्रतिपदा किंवा गोवर्धन पूजा म्हणून ओळखले जाते. गोवर्धन पर्वताला उचलल्याच्या घटनेचे स्मरण केले जाते. त्या दिवशी नवे वर्ष म्हणूनही ओळखले जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असा समजला जातो. विशेषत: शेतकरी या दिवशी शेतात पूजा करतात.

                   भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस! भाऊबहिणीच्या प्रेम जिव्हाळ्याचे प्रतिक असतो. दूरवरून बहिण भाऊ एकमेकाला भेटायला येतात. बहिणी भावाला ओवाळत त्याच्या सुखी आयुष्याचे दान परमेश्वराकडे मागतात. भाऊदेखील बहिणीचे रक्षण करण्याबरोबर तिला प्रेमाने ओवाळणी देऊन खूष करतो. प्रेमाची ही नाती चिरंतन राहावीत म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. दिवाळीच्या सणाला शाळा कॉलेजांना पंधरा दिवस सुट्टी असते तर कार्यालयीन देखील चार-पाच दिवस सुट्टी असते. त्यामुळे एकमेकांच्या सहवासात या सणाचा आनंद लुटायला मजा येते. यामुळे सर्वांचा आनंद द्विगुणित होतो. बरेच जण सहली,पर्यटनाचा आनंद लुटतात. शहरात राहणारे दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी जातात. आजी, आजोबा, काकाकाकू यांच्यासमवेत दिवाळी साजरी करतात. लहान मुलांना अभ्यासाचा ताण नसतो. शिवारे हिरवीगार फुललेली असतात. मळ्यात हिरव्या, ताज्या पालेभाज्या, फळे यांची रेलचेल असते. शरीराला पोषक असणारा हिवाळा सुरु होत असल्याची चाहूल लागलेली असते.

            लुटूया दोन्ही करांनी

            सृष्टीचं अनमोल लेणं

            रानमेवा फळे भाज्या

            हिरव्या रानातलं खाणं

                       शेतात जाऊन कोवळ्या धान्याचा हुरडा भाजून खाण्याची मजा काही निराळीच!  गावचा वारा पिऊन टवटवीत झालेले शहरवासी दिवाळीनंतर आपापल्या स्थानी परततात. दिवाळीत एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या जातात. नोकरदारांना कार्यालयातून बोनस मिळाल्याने परिवारासाठी सढळ हाताने खर्च करता येतो. सगळीकडे मंगलमय वातावरण असते. बळीराजाही सुगी चांगली मिळाल्याने जोशात असतो. परिवारासमवेत आनंद लुटत असतो. पर्यावरणाचा समतोल साधत सण सोहळे साजरे केल्याने पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते.त्यामुळे पुढच्या पिढीकडे चांगला आदर्श राखला जातो.

            नको विध्वंस निसर्गाचा 

            नसावी वृक्षांचीही तोड 

            करू आनंदे सण साजरे 

            साथीला मिठायांची जोड

    आपले ऋतू आणि आपले सण हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहेत. आपण सर्वांनी मिळून त्यांचा सन्मान करायला हवा. भांडण तडखा किंवा वैरभाव नष्ट होऊन एकमेकांशी सलोख्याने राहावे हेच या सणातून निर्देशित केले जाते.


सौ. भारती दिलीप सावंत 

खारघर, नवी मुंबई


9653445835

0 coments