Read more
वाळ्या वाणी
गावाच्या मधल्या चौकात एकच किराणा मालाचं दुकान होतं.त्याला वाण्याचं दुकान असेच म्हणायचे.अख्ख्या गावाला किराणा पुरविण्याचे काम हे वाण्याचे दुकान करायचे.जणू ते गावाचे किराणा मालाचे कोठारच होते.वाळ्या वाणी दिवसभर आपल्या दुकानात बसून दुकानदारी करताना दिसायचा.त्याला घडीभराची उसंत अशी मिळायची नाही पण असे असले तरी तो दुपारची एक दीड तासाची वेळ स्वतःसाठी राखून ठेवायचा.त्या वेळेचा उपयोग तो नदीवर आंघोळीला जाण्यासाठी करायचा.उन्हाळा असो की पावसाळा त्याची नदीवरच्या आंघोळीची वेळ कधी टळली नाही.भर पावसात बंधा-याच्या
दगडी काठावर बसून पितळी तांब्याने आंघोळ करताना त्याला मी अनेकदा पाहिले आहे.
मीच काय त्याला अनेकांनी पाहिले आहे आणि आपापसात दबक्या आवाजात त्याची टिंगल टवाळी देखील केली आहे.
ज्याच्याकडे टिंगल केली तो ती ऐकायचा आणि तिथंच ऐकल्या जागेवर विसरुनही जायचा.
'कोणी अमुक एकजण तुझी टिंगल टवाळी करतो'अशी चुगली त्याच्याकडे कोणीही केली नाही. प्रत्येकाच्या मनात एक भिती होती.आपण टिंगल टवाळी करतो.हे वाळ्या वाण्याला माहित झाले आणि त्याने डूख धरून आपला किराणा बंद केला तर?पण असे कधी घडले नाही.
तसाही वाळ्या वाणी मनात राग धरून वागणारा माणूस नव्हता.
गि-हाईकाशी गोड बोलून धंदा कसा करावा.याची कला त्याला चांगलीच अवगत झाली होती.
अख्ख्या गावात तुकाराम वाघाचं घर इतर घरापेक्षा उंच होतं. मोठ्या भावाच्या भवती लहान भावंडांनी खाली घोण घालून बसावं,तशी गावातली घरं वाघाच्या घरापुढं बसलेली दिसायची.लहानलव भावानं मोठ्या भावाच्या मांडीवर लाडाने लगट करीत बसावं तसं वाळ्या वाण्याचं घर वाघाच्या घराशी लगट करताना बसलेलं दिसायचं. आपल्या घराच्या ऐसपैस असलेल्या वसरीतच त्याने किराणा मालाचं दुकान थाटलं होतं.त्याच्या दुकानात काय म्हणून नव्हतं?सगळंच काही होतं.खोबरेल तेलापासून तर घासलेट तेला पर्यंतची सगळी तेलं.सुया बिब्या पासून तर काथ्या सुतळी पर्यंतच्या सर्व वस्तू होत्या.वाण्याच्या दुकानात आलेलं गि-हाईक "शेठ,आमसूल तेल आहे का?" असं विचारीत नव्हतं तर "शेठ,दोन आण्याचे आमसूल तेल द्या बरं लवकर" असंच म्हणायचं.मागेल ती आणि लागेल ती वस्तू वाण्याच्या दुकानात मिळेलच.एवढा विश्वास त्याच्या दुकानाने माणसांच्या मनात निर्माण केला होता.ज्याला जे लागेल,जो जे मागेल ते त्याला मिळायचं.आण्या पैशाच्या त्या काळात पैशाने चालणारे व्यवहार तसे कमीच होते.प्रत्येकालाच पैशाची चणचण भासायची. घरोघर धान्य मात्र भरपूर असायचं.घरातले तेल मीठ संपले की कोणी पायलीभर धान्य घेऊन वाळ्या वाण्याच्या दुकानात जायचा आणि त्या बदल्यात तेला मिठाचा बाजार करून आणायचा.वाणी असे जमा झालेले धान्य तालुक्याच्या गावाला नेऊन विकायचा आणि आलेल्या पैशातून त्याचा किराणा भरून आणायचा.असे हे देवघेवीचे चक्र वर्षानुवर्षे चालत राहायचे.
आमच्या घरापासून फर्लांगभर अंतरावर वाळ्या वाण्याचं दुकान होतं.खरंतर त्याच्या दुकानात जायला मला नेहमीच भीती वाटायची.पण गेल्याशिवाय गत्यंतरही नसायचं.भावंडांमध्ये मी मोठा असल्याने आई अशी कामं मलाच सांगायची.वाण्याच्या दुकानाकडे जाणारा रस्ता हा वाणीन काकीच्या चांद्या जवळून जात असल्याने ती जागा सुनाट आणि भितीदायक होती.त्या जागे बद्दलच्या बऱ्याच अफवा मी ऐकलेल्या असल्याने त्या रस्त्याने जाताना मला फार भीती वाटायची.रात्रीच्या वेळी तर चांद्या जवळून जाताना घामच फुटायचा.वाटायचं भूत आपल्या पाठी लागले आहे.मागे पुढे पाहत दोन्ही हातांच्या मोठी आवळून अशी धूम ठोकायचो की थेट वाण्याचं दुकानच गाठायचो.माझे पाय पळत रहायचे आणि तोंडाने आईने सांगितलेल्या वस्तूंची घोकंपट्टी चालायची.ती अशी "चार आण्याचे गोडेतेल,एक आण्याचे घासतेल.चार आण्याचे गोडेतेल,एक आण्याचे घासतेल..." हे वाक्य अनेकदा म्हणूनही वाण्याच्या दुकानात जाईपर्यंत ते नेमके उलटे म्हणायचो."चार आण्याचे घासतेल,एक आण्याचे गोडेतेल " असे म्हणत धापा टाकीत मी दुकानाच्या खिडकीजवळ उभा राहायचो.तेव्हा वाळ्या वाणी माझ्याकडे पाहून हसायचा.
त्याच्या हसण्याचाही मला राग यायचा.भुताच्या विचारात आणि वाण्याच्या हसण्यात आईने दुकानातून आणायला
सांगितलेल्या वस्तू मी विसरून जायचो किंवा त्या उलटपालट तरी करायचो.त्या आठविण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत असतानाच नेमका त्याच वेळी वाणी विचारायचा.
"ऐ पोरा,बोल पटकन.काय देऊ तुला?"मी नुसताच घुम्यासारखा उभा.काही केल्या आठवायचे नाही.पुन्हा आईला विचारायला जाणे म्हणजे महादिकीट.मध्येच चांद्या जवळील भुताने गाठले तर?या विचारानेच अंगावर सरसरून काटा यायचा.मनात येईल त्या वस्तूंची मी नावं सांगायचो आणि वाळ्या वाणी पुड्या बांधताना माझ्याकडे पाहून हसायचा.माझ्या घाबरगुंडीचा त्याला अंदाज आलेला असायचा.त्याने बांधून दिलेले पुडे घेऊन मी अंधारातच 'राम राम'म्हणत पळत सुटायचो. नको असलेल्या वस्तू पाहून आईचा संताप व्हायचा आणि मग ती सारा संताप माझ्या पाठीचा तडमताशा वाजवून काढायची.शाळेत शिकत असताना "विसराळू विनू"नावाचा धडा मला अभ्यासाला होता.तो तंतोतंत मला लागू होता.
मी सहा सात वर्षाचा असतानाच मला वाळ्या वाण्याचं दुकान माहित झालं.त्याच्या दुकानात शाळेच्या मित्रांसोबत पहिल्यांदा गेलो ते साखरेच्या गोळ्या घेण्यासाठी.दुकानाच्या छोट्याशा खिडकीतून आत डोकावून पाहिले तर एक गोरापान माणूस बसलेला दिसला.त्याच्या डोक्यावरच्या लाल पागोट्याने त्याचा चेहरा अधिकच सुंदर दिसत होता.मित्रानं त्याच्या हातावर पाच पैशाचे नाणे ठेवताच त्याने काचेच्या बरणीत असलेल्या साखरेच्या पांढऱ्या गोळ्या आमच्या हातावर ठेवल्या.त्या गुळमट गोळ्या तिथंच ओट्यावर बसून खाल्ल्या आणि त्यांची गोडीच लागली.शाळा सुटली की गोळ्या घेण्यासाठी रोजच त्याच्या दुकानावर आमचं जाणं येणं होऊ लागलं.मला वाळ्या वाण्याचं दुकान माहित आहे,हे आईला बरंच उशीरानं कळालं.त्याला कारणही तसंच घडलं.मी असेल तेव्हा दुसरी तिसरीला.सकाळची शाळा सुटल्यावर घरी आलो तर आई घरात नव्हती.ती रानात गेली असावी.घरात कोणी नसताना मला साखर चोरून खाण्याची सवय होती.साखर चमच्याने नाही तर नुसते बकने मारुन खायचो.साखरेचा डबा शोधताना नेमका चहा पावडरचा डबा माझ्याकडून उघडला गेला.
पाहतो तर डब्यात चार आण्याचे नाणे.ते चार आणे घेऊन मित्रांसोबत मी वाळ्या वाण्याच्या दुकानात गेलो.त्याने चार आण्याच्या भरपूर गोळ्या दिल्या परंतु तो संशयाने माझ्याकडे कितीतरी वेळ पहातच राहीला. बहुदा "या पोराकडे चार आणे आले कसे?" या विचारात तो गुरफटलेला असावा पण त्याला काय धंद्याशी मतलब.म्हणून त्याने चार आण्याच्या भरपूर गोळ्या माझ्या हातावर ठेवल्या.
गोळ्या घेऊन आम्ही सगळे मित्र आमच्या घरासमोरील जोत्यावर बसून गोळ्या चघळू लागलो.
नेमकी त्याच वेळेला आई
नदीवरून घरी आली.बादली जोत्यावर ठेवून आईने रागाने माझ्याकडे पाहिले.
"बाळ्या,काय चघळीतो?
"गोळ्या "मी तोंडातली लाळ आवरून म्हणालो.
"कोणी दिल्या?" मी काहीच बोलेना.तसा माझ्या शेजारी बसलेला गण्या म्हणाला.
"काकू,बाळ्यानच आम्हाला वाळ्या वाण्याच्या दुकानातून चार
आण्याच्या गोळ्या घेतल्या"
"रांडकीच्या,तू चहाच्या डब्यातले पैसे चोरलेस ना? तुला वाळ्या वाण्याचं दुकान कसं काय माहित झालं?" बोलत असतानाच तिने मला मारायला सुरुवात केली.मी मोठ्यानं ओरडू लागलो.इतका वेळ माझ्या भोवती गोळ्यांसाठी गोंडा घोळणा-या मित्रांचा घोळका पळून गेला.आईचा दम होईपर्यंत तिने मला मारुन घेतले आणि ती घरात निघून गेली.तेव्हा पासून वाळ्या वाण्याचं दुकान माझ्या पाठी लागले.
सकाळची शाळा अकरा वाजता सुटायची.शाळा सुटली की मी मित्रांसोबत सुतारच्या वडाखाली खेळायचो.सूर पारुंब्या,विटी दांडू तर कधी गोट्या,भव-यांचा खेळ खेळायचो.खेळण्याचा नादात एक दीड तास कसा निघून जायचा कळायचे देखील नाही.
पोटात कावळे ओरडायला लागले की भुकेची जाणीव व्हायची.मग घराची आठवण होई.घरी गेलो की दाराला लावलेलं मोठं कुलूप पाहिलं की आई रानात गेल्याची खूण पटायची.पाठीवरचे दप्तर सावरीत मळ्याच्या दिशेने धूम ठोकायचो.चिमण्या वहाळाची चढण चढून म-याईच्या देवळा पर्यंत येईस्तोवर दम झालेला असे.देवळाच्या पायरीवर धापा टाकीत बसलेलो असतानाच वाळ्या वाणी वहाळाची चढण चढताना दिसे.दुपारच्या रणरणत्या उन्हात त्याचा गोरापान देह लालबुंद होई.वर उन्हाची काहीली आणि खाली तापलेला फुफाटा.अशा वातावरणात वारा घरकोंग्या माणसागत झाडात दडून बसायचा.वाळ्या वाणी कासरा भर अंतरावर असतानाच मी उठून चालू लागायचो.तसा तो मला हाक मारायचा,
"बाळू थांब,मलाही येऊ दे तुझ्याबरोबर"
त्याच्या आवाजाने मी थांबायचो.
तो जवळ आला की आम्ही दोघेही चालू लागायचो.माझ्या पायाकडे पाहून तो म्हणायचा, "काय रे बाळू,पायात वहाणा का नही घातल्या?पाय पोळत नही का तुझे? फुफाटा किती तापलय रे"त्याच्या बोलण्यात माझ्या विषयी कळवळा होता.परंतु माझ्या पायांना अनवाणी चालण्याची सवय झाली असल्याने माझ्या पायाला चटका लागत नव्हता.वहाणा,बूट वापरण्याची मलाही हौस होती पण बुटाचे दोन जोड घेतलेले हरविल्याने आई मला बुट,वहाणा घेण्याचं नावच घेत नव्हती. त्याच्या बोलण्यावर मी हसून म्हणायचो,
"काका,माझे पाय पोळत नही"यावर काही न बोलता तो नुसताच हसायचा.एवढं बोलेपर्यंत बंधारा आलेला असायचा.तो बंधाऱ्याच्या पायऱ्या उतरून काठावर बसून आंघोळ करायचा.तो आंघोळ करायला लागला की मी मळ्याच्या रस्त्याला लागायचो.
त्याची आंघोळ करण्याची वेळ आणि माझी मळ्याकडे जाण्याची वेळ ही एकच
असल्याने आमची रोजच उन्हाचे गाठ पडायची.
वाळ्या वाणी दिसायला गोरागोमटा आणि उंचपुरा होता.पण शरीराने भरलेला नसल्याने तो झेनकाठी सारखा उंचटांगळ दिसायचा.पांढरा सदरा,धोतर आणि डोक्यावर लाल पागोटे असा त्याचा रोजचा पोषाख असायचा.गि-हाईकाशी त्याने कधी हुज्जत घातल्याचे माझ्या तरी ऐकीवात नाही.एकदा मात्र त्याने माझ्याशी हुज्जत घातल्याचे माझ्या अजूनही आठवणीत आहे.त्याचे काय झाले.एकदा मला रस्त्यावर चार आणे सापडले.ते घेऊन दुपारच्या वेळी मी त्याच्या दुकानात गेलो आणि खिडकी समोर उभा राहून म्हणालो,"काका,मला चार आण्याच्या गोळ्या द्या"त्याने माझ्याकडं एकदा बारीक नजर लावून पाहून घेतलं आणि मी दिलेले चार आणे हातात घेतले.त्याची एक सवय होती.
त्याने खिडकीला एक नालेच्या आकाराचे लोहचुंबक लावलेले होते.गि-हाईकाने दिलेले नाणे तो त्या लोहचुंबकाला लावून
पहायचा.नाणे लटकले तर ते खोटे आणि नाही लटकले तर खरे.मी दिलेले चार आणे त्याने लोहचुंबकाला लावून पाहिले.ते खरे निघावे म्हणून मी मनातल्या मनात देवाचा धावाही केला.चार आणे लोहचुंबकाला चिटकले नाही.ते खरे निघाल्याचा मला आनंद झाला. तेव्हढ्यात एक गि-हाईक दुकानात आले.त्याला माल देण्याच्या नादात मी दिलेल्या चार आण्याचा त्याला विसर पडला.गि-हाईक गेल्यावर मी म्हणालो,"काका,मला गोळ्या द्या"माझ्याकडे प्रश्नार्थक चेहरा करून तो म्हणाला,"पैसे देशील तर देईल ना मी गोळ्या.पैसे दे आधी"
"चार आणे दिले ना काका मी तुम्हाला.तूम्ही ते लोहचुंबकाला लावून पाहिले" मी रडकुंडीला येऊन म्हणालो.तसा तो रागावून म्हणाला,
"खोटं नको बोलू.तू पैसे दिले नही" मी पैसे दिले हे खरे असले तरी ते पहाणारे आमच्या दोघांत तिसरे कोणी नसल्याने मी मोठ्याने भोकाड पसरले.मग मात्र त्याचा नाईलाज झाला.'भिक नको पण कुत्रं आवर' असं त्याला झालं.
"ये पोरा,रडू नको.ह्या घे दोन गोळ्या अन् पळ इथून"त्याने माझ्या हातावर दोन गोळ्या ठेवल्या.'दोन तर दोन,घेतो काय चोराची लंगोटी'अशी मनाची समजूत घालून मी घराकडे पळालो.तसा वाळ्या वाणी काही लबाड माणूस नव्हता.खरोखर त्याला मी चार आणे दिल्याचा विसर पडला असेल.
माझ्या चुलत्याची आणि त्याची खास मैत्री होती.गावात कोणाला ही आठ दिवसांपेक्षा उधार न देणारा वाणी माझ्या चुलत्याला मात्र चार-सहा महिने उधार माल पुरवायचा आणि शेतातील पिक निघाले की चुलता त्याची उधारी
इमाने इतबारे चुकती करायचा.
इतकेच काय पेरणीच्या हंगामात चुलता घरातील धान्याचे चार-पाच पोते वाण्याच्या दुकानात नेऊन ठेवायचा आणि त्या बदल्यात उसनवार पैसे घेऊन वावरात पिकपाणी उभे करायचा.चार महिन्यांनी आलेल्या पिकाच्या पैशातून वाण्याकडून जेवढे उसनवार पैसे घेतले तेवढेच परत करायचा आणि गहाण म्हणून ठेवलेले धान्याचे पोते घरी घेऊन यायचा. वाळ्या वाणी चुलत्याकडून एक पैसा देखील व्याज घेत नसल्याने अनेकांच्या डोक्या बाहेरची ही गुतारुत होती.दोघांचे असे काय गुळपीठ आहे? याचे गावाला नेहमीच कोडे पडायचे.
गावात अनेक सण उत्सव होत असायचे.कधी बोहडा असायचा तर कधी खळवाडीवर तमाशा असायचा.कोणाच्या लग्नाची वरात निघायची.गोकुळ अष्टमीला घुमारे घुमायचे.कधी चौकात भांडण,मारामाऱ्या व्हायच्या.
इतकेच काय चुलत्याच्या घरी लग्नकार्य असले तरी देखील वाळ्या वाणी आपले दुकान सोडून कधीही बाहेर आला नाही आणि कोणत्याही कार्यक्रमाचा आनंदही घेतला नाही.तो भला आणि त्याचं काम भलं.अशा वृत्तीने तो आयुष्यभर जगला.तो वयाच्या साठीत असताना मी त्याला पाहिलेले.अनेक वर्ष मी त्याच्या दुकानात किरकोळ किराणा माल घेण्यासाठी जात राहिलो.
त्याकाळी शालेय पुस्तकां व्यतिरिक्त अवांतर वाचनासाठी गावात पुस्तकं उपलब्ध नव्हती.
वाळ्या वाण्याच्या दुकानात गेलं की तो वर्तमानपत्राच्या रद्दीत शेंगदाणे,साबुदाणे,गुळ अशा काहीबाही वस्तू बांधून द्यायचा.
त्या वस्तू आईने डब्यात भरून ठेवल्या की रिकामे कागद ती टाकून द्यायची.ते कागद उचलून एकेक अक्षर जुळवीत मी वाचायचो.मला वाचनाची गोडी लागली ती वाळ्या वाण्याच्या दुकानातील रद्दीमुळेच.
पालखेड धरणाचे काम सुरू झाले आणि गावावर दुःखाचे सावट पसरले.माणसं चिनभिन झाले.जमीन जागा,घरंदारं सगळं सोडून माळरानावरल्या जागेत स्थलांतरित झाले.इतरांच्या घरा सोबतच वाळ्या वाण्याने आपलेही दुमजली माडीचे घर पाडले.हे सगळं उध्वस्त होताना मी पाहिलेलं.त्यावेळी असेल मी पंधरा एक वर्षाचा.पण आजही मला सगळे जसेच्या तसे आठवते.आठवत नाही एकच गाव स्थलांतरित झाल्यानंतर वाळ्या वाणी कोठे गेला?त्याचे पुढे काय झाले?.
अजूनही सुनाट दुपारच्या वेळी ऊन्ह रणरणायला लागली की वाटेवरचा फुफाटा तापतो आणि मला भर ऊन्हात हातात लोटा घेऊन बंधा-याकडे आंघोळीला निघालेला वाळ्या वाणी दिसू लागतो.घुमू लागतात कानात त्याचे शब्द "बाळू,तुझे पाय पोळत नही का रे?"आणि मी त्याच्या आठवणीनीं अस्वस्थ होतो.आपल्याच घरातला कोणी परागंदा झाल्याच्या भावनेने मन अधिकच व्याकुळ होत रहाते
*विजयकुमार मिठे*
मो.९८८१६७०२०४


0 coments