Read more
सोन्याचा दगड
दुष्काळानं चोहिकडे हाहाकार माजवला होता. त्यात ऐन उन्हाळ्याचे दिवस. भर दुपारची वेळ. जीव भाजून काढणारं रखरखीत ऊन. अशा उन्हाच्या खाईत कावळ्यांचा एक थवा तहानेनं व्याकूळ झाला होता. पाण्यासाठी कावळ्यांनी सारं जंगल पालथं घातलं. बरीच भटकंती झाली. तरी पाण्याचा एक टिपूसही मिळाला नाही. भटकंतीनं कावळे आणखीच व्याकूळ झाले. आता काय करायचं म्हणून सगळे कावळे चिंतेत पडले. तेवढ्यात त्यांना दूरवर एक झोपडी दिसली. झोपडीच्या दारात एक माठ होता. माठ बघताच कावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते कसे बसे झोपडीपर्यंत पोहोचले. आधाशीपणे माठाजवळ गेले. एका कावळ्यानं माठात वाकून बघितलं. तसा तो आनंदानं उड्या मारू लागला,
"अरे मित्रांनो, माठात पाणी आहे रे."
नंतर दुसऱ्या कावळ्यानं माठात वाकून बघितलं,
"पाणी आहे पण, माठाच्या तळात आहे. ते आपल्या चोचीत कसं यायचं?" त्याचं ऐकून सगळ्या कावळ्यांनी आळीपाळीनं माठातलं पाणी बघून घेतलं. सगळे विचार करू लागले. एका म्हाताऱ्या कावळ्याला त्यांच्या पूर्वजाची कथा आठवली. तो इतर कावळ्यांना खुशीत म्हणाला,
"अरे, आपण असं करूया, प्रत्येकानं माठात एक एक दगड टाकूया. म्हणजे पाणी वर येईल. आपल्या एका पूर्वजानं असंच केलं होतं." सर्वांना ती कथा आठवली. त्याचा विचार सर्वांना पटला. प्रत्येक कावळ्याने माठात एक एक दगड टाकायला सुरुवात केली. दिठी दिठी माठ भरत आला. थोड्याच वेळात माठ काठोकाठ भरला. बघतात तर, पाणी काही वर आलं नाही. सगळे कावळे हताश झाले. उपाय सुचवणाऱ्या त्या म्हाताऱ्या कावळ्याला दोष देऊ लागले. तरूण कावळ्यामध्ये चर्चेचं गुऱ्हाळ चालू झालं,
"अरे या म्हाताऱ्याचं ऐकण्यापेक्षा एखादी लांब चिंधी आणून माठात सोडली असती तर केषाकर्षणानं पाणी वर आलं असतं." एका कावळ्यानं विज्ञानवादी मेंदु चालवला.
"त्यापेक्षा एखादी लांब नळीच शोधून आणली असती तर चोचीनं भरभर पाणी ओढून पिता आलं असतं." दुसऱ्या कावळ्यानं सरळ धोपट विचार पाजळला.
"अजूनही वेळ गेलेली नाही. आपण दगड काढून हे उपाय करूयात का?" तिसऱ्याने त्याचं मत मांडलं.
"आता काही उपयोग नाही. या दगडांनीच माठातलं सारं पाणी पिऊन घेतलं असणार. या थेरड्याचं ऐकून आपण मुर्खपणा केला." एक कावळा रागात म्हणाला. प्रत्येकजण त्या कावळ्यावर तोंडसुख घेत होता. तो बिचारा कान कापल्यागत गप्प बसून राहिला.
"हे बघा मित्रांनो, झाल्या चुकीवर चोयट्या चघळण्यात अर्थ नाही. यातून काही तरी मार्ग काढूया…आपण असं करू, माठातले वरचे काही दगड काढून पाहू. त्याच्याखाली असेल कदाचित पाणी" एक शहाणा सुरता कावळा म्हणाला. त्याचे म्हणणे सर्वांना पटले. सगळ्यांनी माठातले एक एक दगड काढायला सुरुवात केली. वरचे काही दगड काढले. बघतात तर काय, पाणी तर नव्हतेच पण एक मोठ्ठा चमत्कार मात्र झाला होता. खाली राहिलेले सर्व दगड पिवळे जर्द होऊन चमचम चमचम चमकू लागले. ते दगड चक्क सोन्याचे झाले होते. प्रत्येकानं दगड पाहून घेतले. सगळे कावळे अत्यानंदानं नाचू गाऊ लागले. त्यांना तहानेचेही भान राहिले नाही. पण हा चमत्कार घडला कसा? याचं कोडं मात्र त्यांना पडलं. कोण म्हणू लागला,
"अरे ही तर देवाची कृपा झाली."
"नाही. देवाची कृपा नव्हे... ह्या माठात पाण्याखाली आधीच सोनं ठेवलेलं असेल."
"बरोबर. माणसांना सवयच आहे सोन्या नाण्याचे हंडे भरून पुरून ठेवायचे."
"अरे पण, हा माठ कुठं पुरून ठेवलाय? वरतीच आहे." कोण असा तर कोण तसा अटकळ बांधीत होता. परंतु यापैकी काहीच घडलं नव्हतं. घडलं होतं दुसरंच एक आश्चर्य. त्या झोपडीभोवती लोखंडमिश्रीत खडक होते. कावळ्यांनी तेच माठात टाकले होते. आणि माठाच्या तळात होतं एक मोठ्ठं आश्चर्य. माठात होता परीस. मग काय, परीसस्पर्शानं ते लोखंडमिश्रीत दगड सोन्याचे झाले होते. हे पाहताच सर्व कावळ्यांचा आनंद पुन्हा गगनातून ओसंडून वाहू लागला. आजपर्यंत शोधूनही न सापडणारा परीस आयताच सापडला. कावळ्यांना फार मोठ्या ऐवजाचं घबाड सापडलं. सोन्या-नाण्याने हौस भागते हे जरी खरं असलं तरी त्यानं तहान थोडीच भागणार होती? तहानेला पाण्याशिवाय पर्याय नव्हता. कावळे तहानेने कासावीस झालेले. त्यांना पुन्हा तहानेची तीव्र आठवण झाली. पाण्यावाचून त्यांची मती गुंग झाली होती. एक कावळा वैतागून म्हणाला,
"आपल्याला हे सोनं मिळालंय खरं, पण हे सोनं पिताही येत नाही ना खाताही येत नाही. याचा आपल्याला काय उपयोग? चला दुसरीकडे. आता राहवत नाही. प्राण कंठाशी आला आहे. पाणी शोधलंच पाहिजे." त्याचं ऐकून सारे कावळे तिथून निघाले तोच, दुसरा एक जाणता जुणता कावळा म्हणाला,
"हे पहा मित्रांनो, आपल्याला सहजासहजी मिळालेलं हे सोन्याचं घबाड असं सोडून जायचं नाही. हे सोनं खाता पिता येत नसलं तरी आपली तहान भागवायला याचा उपयोग होऊ शकतो. बघूया अजून विचार करू."
"अरे अजून कसला विचार करतोस. असल्या दुष्काळात सोन्याला कोण खातो...ए चला रे. इथे पाण्यावाचून जीव जायची पाळी आलीय. काय करता या सोन्याला?" सगळे कावळे उडायच्या तयारीत असतानाच आणखी एक हुशार कावळा म्हणाला,
"थांबा थांबा. हा म्हणतोय ते खरं आहे. आपण या सोन्याचा तहानेसाठी उपयोग करू शकतो. स्वार्थी माणसं सोन्याला अतिशय हावरट असतात. खास करून त्यांच्या बायका सोन्याच्या दागिन्याच्या फारच हौशी असतात. त्यांचं प्रेम नवऱ्यापेक्षा सोन्यावरच जास्त असतं. तेव्हा आपण असं करू, या माठातले सोन्याचे दगड प्रत्येकाच्या चोचीत घेता येतील तेवढे घेऊ. आणि माणसांच्या वस्तीत जाऊ. प्रत्येकानं घरोघरी जाऊन त्यांना सोन्याचे दगड देऊ. त्याबदल्यात ते आनंदाने हसत हसत नक्कीच आपल्याला पाणी देतील." हा विचार मात्र सर्व कावळ्यांना मनापासून पटला.
"अरे पण, वरचे दगड येतील चोचीत. खालचे तळातले कसे येणार? काय करायचं?" एक कावळा असं म्हणताच सगळे पुन्हा चिंतेत पडले.
"काय करायचं म्हणजे! अरे पक्षात कावळा शहाणा आणि चतुर उगीच म्हणतात का? हा माठच फोडूया ना आपण. कसे?" चतुर कावळा असं म्हणाला.
"मग असं करूया, वरचे दगड काढत बसण्यापेक्षा आत्ताच फोडूया माठ." तिसरा कावळा म्हणाला. झालं, माठ फोडायचं ठरलं. पण माठ फोडायचा कसा? त्यांना पुन्हा प्रश्न पडला. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. जवळच एक मोठ्ठा दगड होता.
"असं करू, हा दगडच उचलून टाकूया माठावर." एक जण म्हणाला.
"एवढा मोठ्ठा अगडबंब दगड कसा उचलणार?"
"कसा उचलणार म्हणजे. अरे, ज्योतीने ज्योत पेटते आणि सारा अंधार मिटून जातो. तसे आपण सगळ्यांनी मिळून या दगडाला हात लावू. चला उचला." शहाणा कावळा असे म्हणताच सगळ्यांना बळ आलं. सर्वांनी मिळून तो दगड उचलला. उंचावर नेऊन बरोबर माठावर टाकला. तसा माठ खळ्ळकन फुटला. सोन्याचे सर्व दगड मोहरागत खळा खळा जमिनीवर सांडले. हे बघून सगळ्या कावळ्यांचे डोळे दिपून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या चोचीत मावेल तेवढे सोन्याचे दगड घेतले.
सोन्याचे दगड घेऊन कावळ्यांचा थवा गावात आला. एका झोपडीच्या दारात एक बाई लेकराला मांडीवर घेऊन बसली होती. लेकरू रडत होतं. लहान वाटीत पाणी घेऊन चमच्यानं त्याला थेंब थेंब पाजीत होती. तिथं एक कावळा आला. झोपडीजवळच्या एका दगडावर बसला. त्याच्या चोचीतला सोन्याचा दगड बघताच ती बाई आश्चर्याने ओरडली. आणि हावरटपणे म्हणाली,
"अर्रे व्वा कावळे दादा! तुझ्या चोचीत सोन्याचा दगड! मला देतोस का?"
"हो. देईन की. तुझ्यासाठीच तर आणलाय हा सोन्याचा दगड...पण, तुझं बाळ का रडतंय इतकं? काय झालंय त्याला? एवढं सुकलंय कशानं? अन् तूही किती रोडावली आहेस. तुम्हाला खायला अन्न नाही का?''
"अन्न तर नाहीच. पण, पाण्यावाचून आमचा जीव जायची पाळी आलीय... तुला तुझं अन्न हवं आहे ना? ते बघ..." त्या बाईनं गोठ्याकडे बोट केलं. कावळ्यानं पाहिलं, गोठ्यात गुरे मरून पडली होती. काही पाय खोडत होती. तीही मरणाच्या वाटेवर होती. कावळा हवालदिल झाला.
"ही वेळ आता आमच्यावरही येईल... तुला तुझं अन्न हवं असेल तर खुशाल खा ह्या गुरांना फाडून. मी हाकलणार नाही तुला...पण, तेवढा सोन्याचा दगड दे मला." एवढी दारूण अवस्था झालेली तरी त्या बाईनं आधाशीपणे सोन्याच्या दगडाची याचना केली. कावळा हा परभक्ष. त्याला आयतीच भली मोठ्ठी शिकार मिळाली. गुरांच्या मांसाचा त्याला मोह झाला. मात्र त्याला लगेच तहानेची तिव्र आठवण झाली. तो म्हणाला,
"मी हा सोन्याचा दगड तुला देईन पण, माझी एक अट आहे. ती तुला पुरी करावी लागेल." कावळा असं म्हणाल्यावर त्या बाईला वाटलं, कावळ्याची अट ती काय असणार? ती खुशीतच म्हणाली,
"असू दे. तुझी कसलीही अट असू दे. पण, मला तेवढा सोन्याचा दगड दिल्याशिवाय जाऊ नको...माग तुला काय हवं ते."
"मला तुझं अन्न नको आहे. एकवीस दिवस अन्न नसलं तरी चालतं. मात्र पाण्यावाचून एक दिवसही जगणे कठीण आहे. मी तहानेनं फार व्याकूळ झालोय. घशाला कोरड पडलीय. मला पाणी दे पाणी. तुझ्या बाळाच्या वाटीतलं तेवढं पुरेल मला. उष्टं असू दे चालेल. नाही तरी उष्ट्या माष्ट्याचेच धनी आहोत आम्ही... दे तेवढं पाणी मला." कावळ्यानं गयावया करून पाणी मागताच बाई चवताळली,
"पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही. चल ऊठ. चालता हो इथून...केव्हापासून कोरड पडलीय बाळाच्या नि माझ्या घशाला. एवढं वाटीभरच पाणी मी शेजाऱ्याकडून उसनं आणलंय...एवढ्यानं आम्हा दोघांचे घशे निदान ओले तरी होतील...ही गुरं कशानं मेली ठाऊकाय तुला?"
"कशानं मेली? यांना चारा नाही का?"
"चारा तर नाहीच. गुरं चाऱ्यावाचून जगली असती काही दिवस. झाडपाला खाऊन. पण, बिचारी तहानेनं तडफडून तडफडून मेली. गाई गुरं म्हणजे आम्हा शेतकऱ्याचं धन. ते असं डोळ्यादेखत मातीमोल होताना बघवत नाही रे बाबाss बघवत नाहीss…" बाईनं प्राण कंठाशी आणून दुष्काळाची जळजळीत कहाणी सांगितली. तिनं कावळ्याला पिटाळून लावलं. कावळा निराश होऊन उडून गेला.
दुसऱ्या कावळ्यालाही असाच भयानक अनुभव आला. तो एका घरी गेला. एक बाई सुपात थोडं जोंधळं पाखडीत होती. तेही किडकं मिडकं होतं. ती फार दुःखी कष्टी दिसत होती. तिनं बघावं म्हणून कावळ्यानं काव काव केलं. त्याच्याकड बघताच तीच्या तोंडावरचं दुःख पुसून गेलं. त्याच्या चोचीतला सोन्याचा दगड बघून ती हरखून गेली. कावळ्याला म्हणाली,
"कावळे दादा, तू सोन्याचा दगड कोठून आणलास? हे बघ, या सुपातले सगळे जोंधळे तुला देते. पण तो दगड मला दे ना. माझ्या पोरीच्या लग्नाला होईल सोनं."
"ताई, मला धान्य नको आहे. पाणी हवंय पाणी. चार घोट तरी पाणी दे मला." कावळ्यानं गहिवरून पाणी मागितलं. तशी ती बाई कुत्रं अंगावर धावल्यागत ओरडली,
"पाणी! छे छे! नाव सुध्दा काढू नको पाण्याचं. एक घोटभरही पाणी मिळणार नाही. पाण्यापाय तर खून झालाय बाबा माझ्या एकुलत्या लेकराचा. आठ दिवसातून एकदा पाण्याचा टँकर गावात आला होता. मुंग्यागत झुंबड उडाली. पाण्यापाय तुंबळ हाणामारी झाली. त्यात माझं सोन्यासारखं लेकरू गेलं रंss पाण्यापाय लेकरू गेलंss...जा बाबा तू जाss...चालता हो...तुझा सोन्याचा दगड नकोय मला." बाईनं रडत रडत तिचं दुःख सांगितलं. कावळ्याला वाटलं, 'बाप रे! पाण्याच्या थेंबासाठी लढाया होऊन माणसं एकमेकांना मारू लागली! मग आपली तर काय कथा?' बिचारा कावळा उडून गेला.
तिसऱ्या घरीही एका कावळ्याला याहीपेक्षा भयानक प्रसंग बघायला मिळाला. एक म्हातारा भुईवर झोपून होता. त्याच्या भोवती बरीच माणसं जमली होती. म्हातारा पाणी पाणी करून विव्हळत होता. त्याचं तोंड सुकलं होतं. जीभ वाळून गेली होती. माणसं काळजीनं एकमेकांना म्हणत होती,
"अरे बघ की तुझ्या घरी एक ग्लास पाणी असेल तर…"
"नाही बाबा. सकाळीच उसनं नेलंय शेजारच्या माऊलीनं. तिचं बाळ असंच पाणी पाणी करत होतं म्हणून दिलं."
"एक ग्लास नसू द्या चार घोट तरी पाणी आणा रे कोठून तरी. घसा ओला झाला तरी बरं वाटेल माझ्या बाबांना." त्या म्हाताऱ्याचा मुलगा थेंबभर पाण्यासाठी गयावया करीत होता. तरी थेंबभर पाणी कुणाकडेच नव्हतं. म्हातारा तर पाणी पाणी करून तरफडत होता. कावळ्यानं हे तृष्णतांडव बघितलं, ऐकलं. त्याच्या चोचीतला सोन्याचा दगड बघायला कुणालाही वेळ नव्हता. आणि बघायची इच्छाही नव्हती. पाणी मागायचं कावळ्याचं धाडस झालं नाही. तो गुपचूप उडून गेला. प्रत्येक कावळ्याला दुष्काळाची दारूण रूपे बघायला मिळाली. सगळे कावळे वटलेल्या एका झाडाखाली एकत्र जमा झाले. त्यांची गोलमेज मिटिंग सुरू झाली. एक एक जण आपले भयानक दुःखद अनुभव कथन करून मत मांडू लागला.
"पाणी पाणी करून तडफडणारे जीव पाहिले बाबा...आपल्याहून भयानक त्यांचे हाल हाल होत आहेत.." एक कावळा दुःखाने म्हणाला.
"मृगजळामागे धावणाऱ्या हरणासारखी पाण्यासाठी धावणारी ही माणसं...एकमेकांचा खून करतात रे…"
"अरे, दुष्काळात थेंब थेंब पाणासाठी तडफडणारी हीच माणसं मी सुकाळात माजताना पाहिली आहेत. पिण्याचं नळाचं पाणी भरून झालं की खुशाल गटारीत पाणी सोडून देतात. तोच नळ बंद केला तर ज्यांच्याकडे उंचावर पाणी चढत नाही त्यांना मिळेल की नाही...पण, ते नाही यांना कळत. त्यांचे कान आपणच आता उपटले पाहिजेत."
"सुकाळात शेतकरी तरी काय करतात, पिकांचे वाफे फुटस्तोर तुडुंब भरतात. पुढे जाणाऱ्या शेतकऱ्याचा रस्ताच बंद झाला पाहिजे चिखल होऊन. जणू अशीच असते त्यांची भावना."
"प्रत्येक शेतकऱ्यानं ठिबक सिंचन केलं तर काय बिघडेल? किती पाणी वाचेल."
"यांनी निरनिराळे शोध लावून स्वतःचं जीवन मात्र ऐषाराम करून घेतलंय. आणि आपलं जीवन हराम करून टाकलंय."
"नाही तर काय, एसीत बसून टिव्ही, मोबाईल यातच ते रात्रंदिवस डोकं खुपसून बसतात. आपल्याकडे कुणी ढुंकूनही बघेना झालंय...आता यापुढं त्यांचं कोण गचकलं तर आपणही त्यांच्या पिंडाला कधीच शिवायचं नाही."
"अरे, नाही शिवलो तरी त्यांचं कुठे अडतंय आता. पिंडाला कावळा शिवणे हे अंधश्रद्धा समजू लागलेत ते...आपणच उपाशी मरेन मग."
"पिंडाला शिवायला आल्यावर तरी आपले जातभाई भेटतात. पण छोटे छोटे आपले बांधव कुठेच दिसत नाहीत रे आता."
"कसे दिसतील. ही माणसं हवेचं, आवाजाचं प्रदूषण करतात. केवळ छंद म्हणून मोठ मोठे फटाके फोडतात. मिरवणुकीत डॉल्बी लावून सारे आसमान ढवळून टाकतात. बिचाऱ्या चिमुकल्या पाखरांचं काय होत असेल?"
"वाघ, सिंह, तरस, लांडगे, कोल्हे, हरणं यांचं तरी काय, ही हावरट माणसं त्यांच्याही राज्यात अतिक्रमण करून घुसखोरी करत आहेत. त्यांनी रहायचं कुठं?"
"बिचारे बेघर होऊन वाट दिसेल तिकडे सैरावैरा धावत सुटतात. आणि ही गुंड माणसं बिचाऱ्यांना पिसाळलेल्या कुत्र्यासारखं ताणून ताणून मारून टाकतात. ही माणसं निसर्गाचे खुनी आहेत खुनी."
"यांना पाऊस पाहिजे. पाऊस पडत नाही म्हणून ओरडतात."
"हे फार नाटकी आहेत. प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा असा तोंडानं नुसता जप करतात. अन् हातानं मात्र प्रदूषण वाढवायचं पाप करतात. कसा पाऊस पडेल?"
"ओढे, नाले, नद्यात हे केरकचरा टाकतात. गटारीचं घाण पाणी सोडतात."
"अरे, फुकट मिळणारं पाणी या महाभागांनी बाटलीबंद करून दुधापेक्षा महाग करून टाकलंय."
"यांनी आता पाण्याचंही एटीएम चालू केलंय म्हणे. पैसे टाकले की पाणी बाहेर येतं."
"डोंबल्याचं एटीएम काढतात...पाऊसच नाही पडला तर त्या एटीएममध्ये काय माती ठेवतील का?"
"हे परग्रहावर जाऊन पाण्याचा शोध लावत आहेत. तिथं पाणी असलं की राहायला जाणार आहेत म्हणे तिथे."
"हो जातील की. पृथ्वी नासवली, आता परग्रह नासवायला निघालेत."
"परग्रहावर जाऊन बूड आपटण्यापेक्षा इथंच निसर्ग वाचवून पाऊस पडण्यासाठी काहीतरी करावं की नाही?"
"करतात की. पाण्यासाठी बोअर घेऊन घेऊन काळ्या आईच्या अंगाची चाळण करून टाकलीय यांनी."
"ओढे, नाले, नद्या, टेकड्या, डोंगर फोडून झाडे तोडून त्या जागी सिमेंटची जंगले उभी करतात. पावसासाठी आणखी काय काय करावं त्यांनी?" एक कावळा उपहासाने म्हणाला.
"अरे ओढे, नाले, नद्या, टेकड्या, डोंगर, झाडे हे तर निसर्ग मंदिराचे भक्कम खांब आहेत. तेच उध्वस्त केल्यामुळे निसर्ग त्यांच्या बोकांडी ढासळतोय. ढासळला की त्या माणसांसाठी जगभरातून दयेचा पाझर फुटतो."
"पण निसर्गाची कत्तल होताना असाच दयेचा पाझर का फुटू नये? माणसांची येते तशी आपल्याबद्दल का कीव येत नाही त्यांना?"
"यांना निसर्गाचं महत्व कळतं पण ते वळत नाही. सुकाळ असला की पाण्याचा कचरा करून टाकतात. म्हणूनच निसर्गही आता यांचा निचरा करू लागलाय."
"आता आपणच यांचे कान धरून उपटू. ओढे, नाले, नद्या, टेकड्या, डोंगर, झाडे वाचवून झाडे लावण्याचे बाळकडू चांगलं कडक उकळून त्यांच्या कानात ओतुया."
कावळ्यांची अशी खूप सकर नकर चर्चा झाली. प्रबोधनाचा काढा कढवून माणसांच्या कानात ओतण्याचा ठराव एकमतानं मंजूर झाला. सारे कावळे उठले. त्यांच्यात एक कावळा कवी होता. त्याने उपदेशात्मक कविता लिहिली. सारे कावळे उठले. दाही दिशांना उडाले. कवितेतून संदेश देत सुटले,
अरे माणसा रे माणसा
स्वार्थासाठी पैसा पैसा
नको करू हाव हाव
काव काव काव काव
संकल्पाच्या नुसत्या बढाया
पाण्यासाठी नको लढाया
पाण्याविना दीन झाले रंक आणि राव
काव काव काव काव काव
जंगल झाडे तोडू नको
टेकड्या डोंगर फोडू नको
निसर्गावर घालू नको घाव
काव काव काव काव
पावसासाठी नको जप तप
आधी झाडे लाव झाडे जप
घालू नको झाडावर घाव
काव काव काव काव
लाव लाव लाव लाव
एक तरी झाड लाव
पाऊस पडेल वावss वावss
काव काव काव काव
काव काव काव काव
० ० ०
हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी
भ्र. ध्व.९८६०८८३६१०
---------------------------------------------------------------------------------------------------------------

0 coments