कथा - चक्रव्यूह - प्रा.बी.एन.चौधरी | Story - chakravyuh - B.N. Chowdary

कथा - चक्रव्यूह - प्रा.बी.एन.चौधरी | Story - chakravyuh - B.N. Chowdary

Author:
Price:

Read more

चक्रव्यूह

(कथा/प्रा.बी.एन.चौधरी /९४२३४९२५९३)


          सर्वज्ञ विद्यालयात आज सकाळपासून उत्साहाचं वातावरण होतं. त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक दिपकनाना आज सेवानिवृत्त होत होते. विद्यालयाची मुहूर्तमेढ तीस वर्षांपूर्वी ठेवली गेली. त्या दिवसापासून दिपकनाना या विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. त्यांनी तीस वर्षे शाळेची अथक सेवा केली होती. वयोमानानुसार ५८ वर्षे पुर्ण झाल्याने त्यांना निरोप देण्यासाठी शाळेने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. जसजसा वेळ पूढे सरकत होता तसतसे मान्यवर कार्यक्रम स्थळी दाखल होत होते. छोटेखानी असला तरी कार्यक्रम देखणा करण्याचा प्रयत्न संयोजकांनी केला होता.
                    व्यासपिठ उत्तम सजविण्यात आले होते. त्यावर ओळीने खूर्च्यांची मांडणी केली होती. मध्यभागी लग्नसमारंभात वापरतात तशी शोभेची मोठी खूर्ची नानांसाठी ठेवलेली होती. खरंतर नानांना हा ताकझाम, दिखावा बिलकूल आवडत नव्हता. मात्र, आपल्या सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर आणि त्यांचं मन राखण्यासाठी नानांनी कार्यक्रमाला संमती दिली होती. सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी तयारीत गुंतलेले होते. नाना त्यांच्या मुख्याध्यापक दालनात खूर्ची वर बसलेले होते. संचालक मंडळातील काही पदाधिकारी टेबलावर पडलेल्या दैनिकात नानांवर आलेल्या निवृत्ती लेखांचं वाचन करत होते.
                        नाना मात्र मनाशी गुज करत शुन्यात हरवले होते. जणू त्यांच्या डोळ्यासमोर आपल्या कारकिर्दीचा पट झरझर पुढे सरकत असवा. एव्हढ्यात बाहेर लगबग झाली. ते आले, दादा आले.... अशी चर्चा सुरु झाली. आणि संस्थेचे अध्यक्ष आमदार दादासाहेब भुजंगराव आपल्या लवाजम्यासह दाखल झाले. सर्वांनी उठून त्यांचं स्वागत केलं. नानांनी आपली खूर्ची सोडत त्यांना खूर्ची बसायचा आग्रह केला. कोणताही विलंब न लावता भुजंगराव खूर्चीवर ऐसपैस विसावले. गडगडाटी हास्य करत ते म्हणाले.....
"काय गुर्जी शेवटी झालात तर मग तुम्ही निवृत्त. लई झ्याक झालं बघा. जिते जी निवृत्त व्हायला भाग्य लागतंय.... काय.?"
त्यांच्या हास्यात सामिल होत त्यांचे चेलेचपाटे खरंय, खरंय..... म्हणत त्यांची री ओढू लागले.
नानांना मात्र, त्यांच्या या विनोदावर हसावं की रडावं.? असा प्रश्न पडला. त्यांनी साधलेल्या मौनातून त्यांची दशा स्पष्ट होत होती.
                    तोच लगबगीने बाहेरुन येत पाटील सरांनी कार्यक्रमाची तयारी झाल्याचे सांगितले. तसे सर्वजण उठले. भुजंगरावांसह सर्वजण कार्यक्रम स्थळाकडे निघाले.
                          मंडप गावकऱ्यांनी भरलेला होता. सुरवातीला शाळेतील विद्यार्थी बसले होते. त्यांच्या आजूबाजूला शिक्षक खूर्च्या टाकून विद्यार्थ्यावर लक्ष ठेवत होते. कार्यक्रमाला सुरवात झाली. स्वागत गीत झालं. शाळेतील विद्यार्थी - शिक्षकांनी दिपक नानांच्या कार्याची, स्वभावाची त्यांनी घेतलेल्या कष्टांची आपल्या भाषणातून दखल घेतली. गौरव केला. निर्व्यसनी, निगर्वी आणि समर्पित शिक्षक म्हणून नाना सर्वांना परीचित होते. त्यांच्याच प्रयत्नांनी ही शाळा उभी राहिली आणि टिकली होती. वक्ते बोलत होते. तसे नाना आपल्या खूर्चीवर बसल्या जागी भूतकाळ रमले होते.
                         आजचे सत्कारमूर्ती दिपक पाटील म्हणजे सर्वज्ञ विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपकनाना, सर्वसामान्य कुटुंबातला माणूस. त्यांना आपलं बालपण आठवू लागलं. केरबा आणि सावित्रीबाई पाटील या अल्पभूधारक शेतकरी दांपत्याचा दिपक हा मोठा मुलगा. धाकटी बहिण सुमन. शेतात राबणं हा त्यांचा नित्यक्रम. काळ्या मातीत दिवस रात्र मेहनत करुन गुजराण करणाऱ्या या दांपत्याला पहिलाच मुलगा झाला. घरात कुलदिपक आला म्हणून त्यांनी मोठ्या हौसेने त्याचं नांव दिपक ठेवलं. किती अप्रुप आणि कौतुक वाटलं होतं केरबा आणि सावित्रीला आपल्या लेकाचं. त्याला कुशीत घेत सावित्री म्हणाली.
"आहो दिपकचे बाबा, ऐकताय कां.... मी काय म्हनते, आपन दिपकला खूप शिकवू. साहेब बनवू. त्याला आपल्यासारखे कष्ट करावे लागू नयेत बाई."
"सावित्री तू म्हनतेय ते पटतंय मला. मात्र, आपल्या घरात कुनी बी शिकलेलं नाही. शाळा, पाटी, दप्तर आपन पाहिलं नाही. ते कालेज की फालेज आपल्यातले माहित नाही. मंग कसं शिकाडणार आपन दिपकला.?"
केरबा बाळाचा गालगुच्चा घेत म्हटला.
" तुमचं बाई असंच असतं. सदा नमनाला नकार. आहो, त्या मथुराबाई हायती नां..... देसमुख मास्तरांची बाई.? त्या म्हनल्या व्हत्या मला...... पोटपानी पिकलं की ल्योक होवो, नाही तं लेक, त्यांना शिकाडजो असं म्हनत त्या. मी त्यानले करीन इचारपूस. तुम्ही नाई म्हनून नका."
"बरं बाई... तू म्हनशीन तसं. इचार इचार त्या मथुराबाईले...... आनी शिकाड तुज्या या बाळराजाले. मी जातो आता शेतात. माजी भाजी-भाकर दे भांदून."
                         हसत हसत केरबाने सावित्रीला होकार भरला. तिचं काळीज सुपा एव्हढं मोठं झालं. जणू तिच्या मांडीवर बिनघोर झोपलेला दिपक आजच साहेब बनला व्हता. त्याची झोप मोडू नये याची काळजी घेत सावित्रीने मांडीवरील पथोरली हळूवार खाली खेचत दिपकला जमिनीवर झोपवलं. आणि, ती केरबाची भाजी-भाकरी बांधायला उठली. घरातलं एक स्वच्छ फडकं काढून त्यात तिनं जेवणं बांधलं. ती शिदोरी केरबाच्या हातात देत तिनं त्याला मायेनं निरोप दिला. ढवळ्या-पवळ्याला गाडीला जुंपून केरबा शेताकडे निघाला. लेकराच्या उज्वल भविष्यासाठी त्याला आता जास्त मेहनत जी करायची होती.
                    दिवसामागून दिवस आणि वर्ष पुढे सरकत होते. केराबा-सावित्रीचे कष्ट कमी झाले नाहीत. ते अधिक वाढले. तसा दिपकही मोठा होवू लागला. त्याचा शाळेत जाण्याचा पहिला दिवस त्यांनी दसरा-दिवाळी सारखा साजरा केला. दिपकला स्वस्तातलाच परंतू सुंदर गणवेश घातला होता. दोघांनी त्याला देशमुख मास्तर आणि मथुराबाईकडे नेले. त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायला सांगितले. बाळ भांबावलं होतं. तरी दिपक सारं आज्ञाधारकपणे करत होता. दोघांनी त्याला आशीर्वाद दिले. आणि..... दिपकच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. पहिली, दुसरी, तिसरी...... दिपकने शाळेत पहिला नंबर कधी सोडला नाही. गुणी, हुषार, आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून तो सर्वांचा आवडता झाला. गरीबी असूनही नाव काढतोय म्हणून देशमुख मास्तरांचा तर तो आदर्श विद्यार्थी झाला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाने दिपक दहावीची परीक्षा ९३% नी उत्तीर्ण झाला. केरबा-सावित्रीला आनंदाचं घबाड गवसलं. त्यांनी उभ्या गल्लीत साखर वाटून आपला आनंद साजरा केला.
                         देशमुख मास्तरांच्या सल्ल्यानेच दिपकने पुढे बारावी आणि डी. एड. चं शिक्षण पूर्ण केलं. डि. एड. झाल्यावर आपला दिपक मास्तर होणार या कल्पनेनेच केरबा-सावित्रीच्या अंगावर मुठभर मांस चढायचं. आता आपली दैना जाणार. घरात सरस्वती आलीच आहे, आता लक्ष्मी आणि सुबत्ताही येणार ही आशा त्यांना जगायला बळ द्यायची. दिवसामागून दिवस जात होते. मात्र, दिपकला नौकरीची कुठेही शक्यता दिसत नव्हती. दहा पंधरा इंटरव्ह्यू देवून त्याचा  नोकरीचा भ्रमाचा भोपळा फुटला होता. गुणवत्ता असूनही वशिला, पैसा नसल्याने तो हिरमुसला होई. त्याचं अवसान गळून पडे. वेळ जावा म्हणून आता तो बाबांना शेतात मदत करु लागला.
                       एके दिवशी बैलगाडी वर बैलांसाठी चारा घेवून घराकडे परतत असतांना रस्त्यात त्याला त्याचा मित्र सदा भेटला. गाडी थांबवत तो दिपकच्या जवळ गाडीवर जावून बसला.
"दिपक, अरे आपल्या तालुक्यात एक नविन शाळा सुरु होतेय. आमदार भुजंगराव काढतायत. त्यांनी शिक्षक भरतीची जाहिरात दिलीय पेपरात. तू वाचलीस कां.?"
"नाही बा. मी नाही वाचली."
त्याच्या या माहितीने दिपक खुलला. त्याने जुजबी चौकशी केली. आणि घरी येवून त्याने त्यासाठी अर्ज पाठवला. काही दिवसांनी त्याला मुलाखतीचं बोलावणं आलं.
                         नव्यानेच शाळा सुरु होतेय. विना अनुदानित आहे. अनुदान सुरु होईपर्यंत विनापगारी काम करावं लागेल. ही माहिती त्याला मुलाखतीत मिळाली. भुजंगरावाने त्याला संधी देण्याचं कबुल केलं. दिपक त्या शाळेचा पहिला शिक्षक बनला. नंतर अनेक शिक्षक, विद्यार्थी जुळत गेले. शाळेचा विस्तार होवू लागला. दिपक सर्वात सिनियर म्हणून मुख्याध्यापकपद त्याच्याकडे चालून आलं.     
                      केरबा-सावित्रीला स्वर्ग दोन बोट उरला. आपला दिपक मास्तर नाही तर हेडमास्तर झाला याचा त्यांना किती आनंद झाला. मिळेल कधी तरी पगार म्हणत त्यांनी बिनपगारी नोकरी आनंदाने स्विकारली. आज पगार येईल, उद्या पगार येईल या आशेवर एकेक दिवस काढतांना पुढे त्यांची आशा वांझ ठरु लागली. दिपकचा मुख्याध्यापक दिपकनाना झाला. हातात शाळेची सर्व सूत्र. मात्र, पगाराच्या नावाने ठनाना. अशी त्याची गत झाली. शाळेत सर्व गोष्टींना तोंड देत देत, घर ओढणं म्हणजे तारेवरची कसरत झाली. धाकट्या सुमनचं शिक्षण सुरु झालं.
                   नोकरी लागल्या लागल्या आई-वडिलांच्या आग्रहाखातर त्याने ज्योतीशी लग्न केलं. लग्नाची नवलाई ओसरली आणि ज्योतीला विनाअनुदानित शाळेचं रहस्य समजलं. मात्र, तिने नवऱ्याला धिर देत त्याला भक्कम साथ देण्याचं वचन दिलं. विनाअनुदानीतांचं अभावाचं जगणं जगत सारं घर एका दुष्टचक्रात अडकत गेलं. बघता बघता दहा वर्षे झाली. शाळेची पहिली दहावीची बॅच विनाअनुदानित म्हणूनच बाहेर पडली. निकाल बऱ्यापैकी लागला. गावातील एकमेव शाळा म्हणून विद्यार्थी संख्या बरी होती. परंतू शिक्षक आणि कर्मचाऱ्याच्या हातात पगार म्हणून कवडीही मिळत नव्हती. ही गोष्ट शंभर टक्के खरी होती. चरितार्थ चालवायला बहुसंख्य शिक्षक इतर कामं करु लागली. कुणी शेतात राबायचं. कुणी रोजंदारी करायचं. कुणी इलेक्ट्रिक मोटारी रिवाइंडींग करायचं तर कुणी चक्क कालिपिलीही चालवायचं. पोटाला भाकर लागते आणि तीपैश्याशिवाय मिळत नाही हे सर्व जाणून होते. वर्ष सरत होती तस तसे ते अधिक गुंतत होते.
                     एके दिवशी शाळा सुरु असतांना दिपकला संस्थाध्यक्षांचा फोन आला.
"भेटायला या. तात्काळ."
दिपक तडक त्यांच्या घरी गेला. उगाच प्रस्तावना न करता भुजंरावनं बोलणं सुरु केलं.
"या दिपकराव..... बसा. मी कालच शिक्षण मंत्र्यांना भेटलो. आपले मित्रच हायती ते. अनुदानाची गळ घातली. त्यांनी ही होकार दिलाय. मात्र.....???"
"मात्र ? मात्र... म्हणजे काय साहेब.....?"
"दिपकराव, तुम्ही तं जाणता. शाळेचं सर्व तुम्हीच पाहता. अनुदान असं सहज, फुकट मिळतं का.? अहो माझे मैत्रीचे संबंध, म्हणून साहेबांनी होकार दिलाय. लगेच अनुदान देतो म्हणाले. फक्त दिड कोटी पक्ष निधी द्यावा लागणार आहे. तुम्ही सर्व १३ शिक्षक आहात. प्रत्येकाने दहा दहा लाख दिलेत तरी पुरतं. एक कोटी तीस लाख होतील सर्व. मी स्वतः घरुन पदरचे २० लाख टाकतो. तुमच्यासाठी मी एव्हढं तर करुच शकतो नां. तुमचा पगार सुरु व्हावा हीच माझी इच्छा आहे. तुमची दहा वर्षे सेवा झालीय, म्हणून तुम्हाला ही संधी. नाही तर, वीस लाख देणारेही आहेत माझ्याकडे. रोज फेऱ्या मारतात. हातात थैली घेवून. पैश्यांची. पण, आपल्याला मोह सुटत नाही. तुमच्यासाठी जीव अडखडतो. बघा तुम्ही. सर्वाना विश्वासात घ्या. लवकर जमवा. नाही तर मला कटू निर्णय घ्यावा लागेल."
                     भुजंगरावांच्या या धक्क्याने दिपकच्या पायाखालची जमिन हादरली. त्याच्या तोंडाला कोरड पडली. टेबलावरचा पाण्याचा ग्लास उचलत अघाश्यासारखा तो घटाघटा पाणी प्याला. त्याला दरदरुन घाम फुटला होता. खिश्यातली दस्ती काढत त्याने घाम टिपला.
" बघतो साहेब मी. करतो सहकाऱ्यांशी चर्चा." असं कसंबसं तो पुटपुटला.
"अहो बघता काय ? आणि कसली चर्चा करता.? निर्वाणीची घडी आहे ही. निर्णय घ्या. आणि..... पैसे आणा. नाहितर, मला दुसरा निर्णय घ्यावा लागेल. एकतर सरकार स्थिर नाही. केव्हा गडगडेल नेम नाही. त्यापूर्वी सारं बिनबोभाट व्हायला हवं. नाहीतर कधीच अनुदान मिळणार नाही. निघा आता."
                       वादळात भोवऱ्यात सापडलेल्या कचऱ्यासारखी दिपकची अवस्था झाली होती. तो  भांबावला होता. त्याला स्वतःचा निर्णय तर घ्यायचाच होता, शिवाय इतरांनाही राजी करायचं होतं. ही त्याची परीक्षेची घडी होती. तो घरी आला. आई-बाप-बायको यांना त्याने सविस्तर माहिती दिली. पैसे दिले नाही तर नौकरी सोडावी लागेल ही वस्तुस्थिती  त्याने सर्वांसमोर मांडली. केलेले काम मातीमोल होईल याची जाणिव दिली. "आडला नारायण गाढवाचे पाय धरी." या उक्ती प्रमाणे शेवटी सर्वानुमते शेताचा तुकडा विकायचं ठरलं. तसंच त्याने सहकाऱ्यांनाही जाणिव करुन दिली. प्रत्येकाला स्वतः निर्णय घेण्याचं स्वातंत्र दिलं. समोर मृत्यू दिसत असल्याने, प्रत्येकाने जगण्याचा निर्णय घेतला. चक्रव्यूहात शिरता येतं. त्यातून बाहेर पडता येत नाही. हे सत्य त्यांनी स्विकारलं. सर्वांनी मिळून भुजगरावांकडे एकूण रक्कम जमा केली. आणि अनुदानाची वाट पाहू लागले.
                           नियम, अटी शर्तींची पुर्तता करता करता पुढे वीस वर्षे निघून गेली. भुजगरांव विचारपूस केली तर ताकास तूर लागू द्यायचा नाही. होणार आहे काम. लवकर मिळेल अनुदान. म्हणत वेळ मारुन नेई. मात्र, अनुदान काही पदरात पडलंच नाही. शाळेचा रौप्य महोत्सवही विनाअनुदानीत अवस्थेतच साजरा झाला. चेहऱ्यावर उसनं अवसान आणि पोटात भुकेचा आगडोंब घेवून साऱ्यांनी दारी मांडलेला उत्सव आनंदे साजरा केला. कार्यक्रम पार पाडला. आतून कुणीच खुश नव्हतं. वरुन दुःख दाखवायला परवानगी नव्हती. हातचा एकरकमी पैसा. आयुष्यातील महत्वाची वर्षे भुजंगरावांच्या दावणीला बांधून दिपकसह सारे कर्मचारी जनावरागत राबराब राबत होते. त्याला मर्जीला येईल तसा भुजंगराव त्यांना सालदारासारखा वर्षातून एकदोनदा थोडीफार रक्कम देत असे. तेही खूप मोठे उपकार करतोय या भावनेतून. विनाअनुदानीत शाळा अनुदानित होईल या आशेवर सारेच राबत होते. कधीतरी आपल्या हातात कष्टाचा, घामाचा दाम मिळेल या अपेक्षेने. मात्र पदरी घोर निराशाच पडली होती. अनुदान मृगजळ ठरलं होतं.
                        दिपकची अवस्था वाईट झाली होती. माणसांचं पोट भरायला घास देणारी काळी आई विकली होती. निसर्ग नियमाने घरात खाणारी तोंडं वाढली होती. कर्ज काढून सण साजरा करावा तसं दिपकने पाटलांकडून कर्ज घेवून धाकट्या बहिणीचे हात पिवळे केले होते. म्हातारे आई-बाप सुखाने डोळे मिटता यावेत म्हणून दिपकला पगार सुरु झाला का.? असं नेमाने विचारत. त्याची पत्नी ज्योती आपल्या दोन लेकरांना कुशीत घेवून दिपकला धिर देई. आणि..... दिपक, तो झुलत होता अनुदान-विनाअनुदानाच्या दोन टोकातल्या दरीत. ज्यातून खाली बघतांना त्याला दिसत होता फक्त अंधार, अंधार आणि अंधार. जिवघेणा अंधार.
                          "मुख्याध्यापक, दिपकनानांनी  परीसरात शाळा चालवून आपल्या नावाप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश पाडला आहे. त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या आहेत. त्यांचं हे योगदान समाज कधीही विसरणार नाही. म्हणून आज त्यांच्या निवृत्तीला आपण त्यांना संस्थेकडून ११ हजार रु. भेट देवून, त्यांचा सत्कार करत आहोत."
असं भुजरांव भाषणाचा समारोप करतांना म्हणाले. आणि, टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. या आवाजाने खूर्चीत बसलेले दिपकनाना भानावर आले. त्यांच्या गळ्यात पडलेला सत्काराचा हार, त्यांना मणामणाच्या साखळ दंडागत जड वाटू लागला. त्या ओझ्याने आपण येथेच दबून पडू, असं त्यांना वाटत होतं. हातातल्या अकरा हजार रुपयाच्या चेककडे पाहतांना त्यांच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती. हीच, त्यांनी आयुष्यभर शिक्षक म्हणून केलेल्या कामाची कमाई होती. हाच त्यांचा पहिला आणि शेवटचा पगार होता. कारण, आज मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होतांनाही त्यांची शाळा विनाअनुदानीतच होती. बॅकेत जावून आपला हक्काचा पगार काढायचं त्यांचं स्वप्नं, स्वप्नंच राहिलं होतं.
                           व्यासपिठासमोरील सर्व ग्रामस्थ आनंदात होते. कार्यक्रमानंतर भोजनावळीचा बेत होता. ते पंगतीत आपली जागा आरक्षित करण्यासाठी धावले. इकडे दिपकनानांच्या डोळ्यांना अंधारी जाणवत होती. निवृत्ती नंतर काय ? घाम गाळता येईल अशी शेती हातातून गेली होती. मायबापांचं स्वप्न हवेत विरलं होतं. बायकोची हौसमौज गर्भगळीत झाली होती. लेकरांच्या भविष्याचा चुराळा झाला होता. पगारच नाही तर निवृत्ती वेतन मिळण्याची सुतारकाम शक्यता नव्हती. त्याचे पाय लटपटत होते. तो स्वतः स्वतःच्या पावलांनी चक्रव्यूहात ओढला जात होता. खोल, खोल. अजून खोल. विनाअनुदानीत शाळांचं चक्रव्यूह त्याच्याच गतीनं फिरत होतं. त्यात दिपकनानांसारखे कित्येक अभिमन्यू गडप झाले होते. ज्यांना या चक्रव्यूहात शिरता तर येत होतं. मात्र बाहेर पडण्याच्या मार्ग, त्यांना कुणालाच माहीत नव्हता !..... गवसला नव्हता !!

© प्रा.बी.एन.चौधरी.
    देवरुप, नेताजी रोड.
    धरणगाव जि. जळगाव.
     ४२५१०५.
      (९४२३४९२५९३ /९८३४६१४००४)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

  ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.

                                              संचालक - कादवा शिवार
                                              प्रतीक विजयकुमार मिठे
                                              मो.9145099071

0 coments