समाज जीवनाचा आरसा म्हणजे आयुष्याच्या कॅनव्हासवरील अस्वस्थ रेघोट्या - डॉ.सदाशिव सुर्यवंशी | Samaj jivanacha aarsa mhanje aayushyachya canvasvaril reghotya - Do.sadashiv suryavanshi

समाज जीवनाचा आरसा म्हणजे आयुष्याच्या कॅनव्हासवरील अस्वस्थ रेघोट्या - डॉ.सदाशिव सुर्यवंशी | Samaj jivanacha aarsa mhanje aayushyachya canvasvaril reghotya - Do.sadashiv suryavanshi

Author:
Price:

Read more

समाज जीवनाचा आरसा म्हणजे आयुष्याच्या कॅनव्हासवरील अस्वस्थ रेघोट्या.. डॉ.सदाशिव सुर्यवंशी

मातीला पडलेल्या भेगांनी तीचं दाहकतेचं जगणं मांडलंय,फुलाची चिरफाडून गेलेली पाकळी काट्यांच्या सहवासाची वेदना ठेवते, अंगावरचा ओरखडा कधीकाळी त्वचेला ओरबाडलेल्या जखमांचं गाऱ्हानं खुणावतो, मातीत स्वत:ला गाडून घेतलेल्या अवशेषांनी पुरातन काळाच्या खाणाखुना येणाऱ्या पिढ्यांना आरसा म्हणून जपून ठेवल्यात, आभाळाची उंची गाठलेल्या ताडवृक्षांनी आपल्या अंगाखाद्यावर वलयांकित करून ठेवलंय भूतकाळाच्या आयुर्मानाला तशीच समाजचित्राची शब्दकुंचल्यांनी भावरंगाची काव्यमयी रेघोट्यांनी केलेली काव्यात्म मांडणी म्हणजे कवयित्रीचं अनुभवलेलं, भावलेलं, सोसलेलं, अभ्यासलेलं भावविश्व, बऱ्या-वाईट घटनांचं चित्र, समाजमनाचं प्रतिबिंब आपल्या काव्यात्मक शैलीतून अभिव्यक्त झालेलं प्रतिभेचं लेणं म्हणजे आयुष्याच्या कॅनव्हासवरील अस्वस्थ रेघोट्या.....

काळ बदलला पण काळाने कोरून ठेवलेल्या रेघोट्या आजही संवेदनशील मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत, पिढी बदलली मात्र मानवी स्वभावाची संस्कारीत बैठक दुर्मिळतेची जाणिव करून देते, सुखदु:खाच्या रंगछटांनी नटलेला डाव अर्ध्यावरती मोडण्याची सतत वाटणारी भिती काळावरही स्वार झालेली आहे. कवयित्री माधुरी चौधरी यांचा काव्यप्रवास सामंजस्याच्या वळचणीला येवून थांबतो आणि मनाच्या अस्वस्थ भावविश्वातील सुखदु:खाच्या रेघोट्यांना पाळून ठेवण्याचं किमान धाडस लिहितं करत जातं त्याच अविष्कारातून आयुष्याच्या कॅनव्हासवरील अस्वस्थ रेघोट्या शिर्षकाखाली काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. भूतकाळाच्या सकारात्मक घटना आणि नैतिक मुल्यांचे अधिष्ठान मोडित निघाले की काय याचा भास जागोजागी होताना निदर्शनास येऊ पाहतोय. मागील दोन दशकांची झालेली गाव खेड्यातील शहराच्या स्वप्नांमध्ये अडकून पडलेली वसाहत समकालीन अनुभूतीला चटके देणारी आहे. नुसताच बदल विकासाची गंगा कधीही वाहून आणू शकत नाही मात्र त्यातून संस्‍कृतीचे हरवलेले भिजके पान शोधून वास्तवाची दाहकता जवळून अनुभवताना कवयित्री स्वत:ला भूतकाळात घेवून जातात. दुसऱ्या बाजूला तरूण पिढीसमोरील आवाहनांनी घातलेला गराळा मन सुन्न करणारा आहे याची प्रचिती कवयित्री माधुरी चौधरींना लिहिण्यास भाग पाडते आहे. 

सामाजिक अस्थिरता, स्त्री मनाची चाललेली घालमेल, नात्यातील दुरावलेली मने, प्रेमाची धूसर होत चाललेली दिशा, दैनंदिन रहाटगाड्यातून होणारी घुटमळ व नव्या पिढीसमोर आ वासून उभी असलेली जगण्याची आवाहने वैचारीक मनाला स्वस्थ बसू देत नाहीत. गाव खेड्यापासून शहराच्या दिशेने निघालेली आकर्षण यात्रा अनुभवाची, भावभावनांची विलक्षण वळणे घेताना दिसून येते. स्त्रीमनाच्या हुंकाराला योग्य वाट देणारी ही काव्यानुभूती प्रकट झालेली आहे. चौथ्या काव्यसंग्रहातील कवयित्री माधुरी चौधरी यांची आशयावरील निष्ठा काव्यात्मकतेची प्रासादिकता व स्त्रीवादी भूमिका अधिकच आवाहन देणारी आहे. समाजव्यवस्थेच्या फाटक्या बुरख्यातील चेहरा उजळ करण्याचं काम कवयित्री करत आहेत. चूल माळरानावरची या कवितेत त्या म्हणतात की, 

ओबड धोबड माळरानावरच्या 

खुरट्या बाभळीच्या फांदीला

टांगलेल्या फाटक्या झोळीतील 

तिचं भविष्य..

भुकेचा हुंकार देऊन

भुकेल्या पोटी

तृप्ततेचा ढेकर देणारी 

जुनाट जर्मलची भांडी…

अवर्षणग्रस्त माळरानावर वेदनेच्या झळा सोसत, दारीद्रयाची साक्ष देणारे बाभळीचे झाड आपल्या फांदीला गरीबीतलं भविष्य टांगून ठेवतेय आणि घरातील भांड्यांनाही भूकेचे डोहाळे कधी फेडता आले नाहीत शेवटी खोटा खोटा समाधानाच्या तृप्ततेचा ढेकर देणारी, ग्रामीण जीवन दर्शन घडविणारी जुनाट जरमेलची भांडी ती च्या परंपरागत घुसमटीची साक्ष देताना कवयित्रीच्या निदर्शनास आली आहेत. ज्यावेळेस त्याच्या नजरेतून बाह्यविश्वाच्या गोटात शिरून पाहते तेव्हा वास्तवाची असंख्य भयावह चित्रे भावभावनांचा रचनाबंध मांडून जातात. तो आणि ती या दोन भिन्न नजरेतून समाजातील पात्रांकडे पाहताना डोळसपणाचाी जागृकता प्रकर्षाने जाणवते. 

तो लिहितो तिच्या चेहऱ्यावर

तिच्या सौंदर्यावर तिच्या हसण्यावर

तिच्या दिसण्यावर

एवढंच काय

तो लिहितो तिच्या रूसण्यावर

पण तो लिहित नाही

तिच्या कपाळावरील चिंतेच्या आठीवर

तिच्या अन् त्याच्या नात्यात पडलेल्या गाठीवर..

त्याला ती चं आकर्षण प्रकर्षाने तेव्हाच जाणवते जेव्हा तिचा चेहरा,सौंदर्य, हसणं, दिसणं, रूसणं आणि बहरलेलं तारूण्य मोहकतेचं गारुड भासतं मात्र जेव्हा तिच्या भाळावरचा कुंकू वैधव्याशी नातं जोडतो व कपाळ खाली पडतं तेव्हा त्यावरील झुकत्या वयाची निशाणी म्हणून लाचारीच्या आठ्या ठाण मांडून बसतात व इतर नाती नात्यातील काडीमोड करून घेतात तेव्हा त्याची लेखणीही लिहायला धजावत नाही. हा पुरूषी मिजास तिच्या वेदनांना लांब ठेवतो, जवळ करत नाही ही खंत कवयित्री जाणिवपूर्वक ठेवते आहे. 

दुसऱ्या बाजूला आई-वडीलांची म्हातारपणाची जबाबदारी ओझे वाटू लागलेली पिढी जेव्हा जन्मास येते तेव्हा घराघरात जगताना मरणाची गोडी करणारी वृध्द जोडपी अंथरूणावरून छताची लाकडे सरणाची म्हणून समजू लागतात व मनोमन रोजच करत असतात असह्य झालेल्या आजारपणातील थकलेल्या देहाची होळी कुणाला बोझ वाटू नये म्हणून. हे दु:ख वाटणी या कवितेतून मांडताना कवयित्री म्हणतात की,

दोन जीव मात्र 

विझलेल्या डोळ्यांनी 

बघत होती स्वप्न

माझ्याआधी इचा श्वास थांबावा 

सर्वकाही माझ्या डोळ्यासमोर 

नीट व्हावं

मग मीही मोकळे 

डोळे मिटण्यासाठी…

घरातला वृध्द बाप आपल्या अर्धांगिणीचे सगळे लाड हयातभर पुरवताना कधीही कंटाळा करत नव्हता मात्र आता तिच्या आधी जाण्याची वाट पाहतोय कारण त्याला ठाऊक आहे, मी जोवर आहे तोवर तिची व्यवस्था चोख आहे मात्र मी गेल्यावर तिच्या जीवाचे हाल होण्यापेक्षा माझ्या आधी जर गेली तर मी ही या जगाचा निरोप घेण्यासाठी मोकळा. हा जगण्याप्रती निराशेचा सूर कवयित्रीने अचूक चिमटीत पकडलेला आहे. एकांगी झालेला समाज घरात माणसे राहू द्यायला तयार नाही ही विदारक स्थिती माणूसकीची अपरिहार्यता, खंडीत जीवनमुल्ये, नात्यातला दुरावा, सामाजिक दुभंगलेपण, अस्तित्वाचा अर्थशोध कवितेच्या केंद्रस्थानी पेरलेला आहे. माणूस आपल अस्तित्वादी भूमिकेच्या समर्थनार्थ तथा जगण्याचा प्रश्न सोडविण्याचा जीवापाड प्रयत्न करीत असतो त्यातूनच अस्वस्थतेची परिकल्पना अस्वस्थ डिग्र्या या कवितेत ठेवतात..

मग लाज वाटते मलाच

उच्चशिक्षित असल्याची

पदव्या त्रास देतात आजकाल

मग जाऊन बसतो

गावाबाहेर

खांद्यावरचे ओझं पेलवत नाही

म्हणून असहायपणे…

बेरोजगारीचा प्रश्न जेव्हा जगण्याचा प्रश्न म्हणून उभा राहतो तेव्हा आजवर मिळवलेल्या डिग्र्या नकोशा वाटू लागतात.पोटापाण्याचा प्रश्न मूळ असताना शिक्षणाची अवहेलना व्हायला सुरूवात होते.आत्मभान जागवत तरूण गावाबाहेर आपली पाऊले टाकत निघतो असह्यतेची भावना काळजावर ओझ्यासारखी ठेवून. बलात्कार कवितेत कवयित्री म्हणतात की,

तिच्या विवस्त्र देहाशी खेळून

फेकतात ते नराधम तिचं धड

भर रस्त्यात,

मग सुरू होतो खऱ्या अर्थाने

तिच्यावर बलात्कार

शारीरिक, मानसिक, सामाजिक व न्यायालयीनही…

स्त्री देहावर रस्तोरस्ती होणारे पुरूषी हल्ले बलात्काराच्या विकृत मानसिकतेतून स्त्री ही जणू काही एक वापराची वस्तू असल्याचे गृहितकच पुरूषी मानसिकतेतून रूजवण होत युज अँड थ्रो सारख्या अमानवीय कृतीचे संगोपण वाढीस लागल्याचे दुर्दैवी अवसान कवितेतून प्रकट झाले आहे. शारीरिक वेदना, मानसिक आघात, सामाजिक छळ व न्यायालयीन प्रश्नांची कळ संवेदनशिलतेची सीमाच संपवून भावभावनांचा लिलाव झाला की काय असा प्रश्न उपस्थित होतो. माणसाच्या आत आदिम वासना वास करत असल्याने ती ची शिकार होऊ नये याचाही शोध घेणे अगत्याचे आहे. लिंगभावनिर्मित संस्कृतीचा तिच्यातील गृहितकांचा अभ्यास होऊन प्रतिशोध होणे गरजेचे आहे. हीच स्थिती मंजिरी या कवितेतून स्त्री दास्याची बेडी घालून पुढे जाते आहे.

मी अंगावर घेत असते

ते रखरखतं ऊन

भटक्या जनावरासारखं

त्या उन्हातही कुडकुडत असते

प्रेमाच्या चिमूटभर उबेसाठी

तू मात्र चेहऱ्यावर चेहरे चढवून 

भटकत असतो बांध

फुटलेल्या पाण्यासारखा……

साऱ्या संकटांना अंगाखांद्यावर झेलत जनावरासारखे वार मनावर,देहावर आपल्याच परिवारातून होताना निमूटपणे सहन करत प्रेमाची ऊब शोधता शेाधता निस्वार्थी प्रेमाची व प्रेमाच्या दोन शब्दासाठी सारं काही सोसते. मात्र पुरूषी चेहरे घराबाहेर मोकाट, सुसाट, सारी बंधने तोडून स्वैर धाव घेत असतात. पुरूष प्रधान संस्कृतीच्या उंबरठ्यावर स्त्रीत्वाच्या बंधनांचे पाश झोपडीत व महालात मात्र सारखेच. स्त्रीमनाची असंख्य मूकस्पंदने चार भिंतींच्या आत चिरडली जात असल्याचे चित्रण कवयित्री माधुरी चौधरी यांनी बिनदिक्कतपणे एक स्त्री असून देखील मांडलेले आहेत. या सर्व चक्रव्यूहातून स्त्री वेदनाना मोकळी वाट व्हावी म्हणून हे सूर्या या कवितेत निसर्गातील प्रत्युषालाही खुले आवाहन कवयित्री देते आहे.

हे सूर्या मी नाकारते तुझे अस्तित्व

सकाळच्या सूर्यकिरणांबरोबर जर

कुस्करली जात असेल एखादी कळी तर

का अर्घ्य द्यावं मी त्या किरणांना….

जर तरच्या खुल्या संवादाची मांडणी कवयित्री करतात कारण शक्तिचं रूप जेव्हा जागृत होतं तेव्हा आवाहनात्मक पराक्रमाची परिभाषा प्राचीन काळापासून स्त्रीत्वाच्या मनगटात अवतरलेली दिसून आलेली कवयित्री प्रभावीपणे सांगू इच्छितात. एवढच नव्हे तर स्त्रीवादी भूमिकेचा पुरस्कार करताना माधुरी चौधरी पुरूषी वर्तनावर बोट ठेवत प्रतिप्रश्न या समाजव्यवस्थेला विनयभंग या कवितेतून करू पाहत आहेत.

कमरेखाली रूमाल गुंडाळून

उघड्याबंब देहाने

चाळभर, गल्लीगल्लीत, गावभर

अभिमानाने फिरणाऱ्या देहाचा

झाला नाही कधी विनयभंग…….

पुरूषी देहाला सैरभैर फिरण्याची व अर्धनग्न मिरवण्याची पध्दत पूर्वापार चालत असतानाही त्याच्या वाटेला का येत नाहीत हे बलात्कारी प्रसंग ते फक्त आणि फक्त स्त्रीच्याच वाट्याला का असा प्रतिसंवाद कवयित्री काव्यात्मकतेतून करते आहे. 

काव्यात्कतेची मढवणूक अर्धीउर्धी, उंबरठा, आठी, गाठी, भळभळ, वांझेाटे, वाटणी, पापणकाठ, कवाडाआड, चिता, बेढब, बिलगून, सरण, गाभारा, आक्रांदीत, मळक्या, उसळी, जळमटं, शिवार, वासरे, ओसाड, लेकरे, वाडा, सुईन, ओटीपोट, बाळंत, चड्ड्या, लाडीगोडी, लफडी, डबकं, फड, दवापाणी, मोकाट, पाझर, खमकी, ठिगाळ, झुला, पदर, चांदणचुरा, रातकिडा, भाकर, चूल, भाऊबंदकी, दावणी, घाम, लेप, वाढे, आंधण, सावतर, पातळ, घुंगरू, पैंजन, चपलेसोबत, विनयभंग, बिलगत, बरगड्या, गोधडी, मंतर, खुरपणी, तिफण, ढेकळ, उपरणं, ठसठस, समिधा यांसारख्या ग्रामीण व नाविन्यपूर्ण शब्दांनी भाषिक सौंदर्यात भर टाकलेली आहे. गुरू ठाकूर यांच्या कवितेत प्रथमत: चांदणचुरा वाचनात आला होता तोच चांदणचुरा समर्पकपणे दोनदा वापरण्यात आलेला आहे. तसेच डायरी, परफेक्ट, सरोगेटेट, मदर, ब्ल्यू फिल्म, ॲयबॉर्ट, कॅनव्हास, लिपस्टिक, रेशनकार्ड, सर्टिफिकेट, मॅरेज,डिग्री, इंडीया, कॅमेरा, रेड लाईट एरीया, पार्टी, ग्लास, टू बी ऑर नॉट टू बी, यांसारखी इंग्रजी भाषेतील शब्दांचा देखील चपखलपणे वापर करण्यात आलेला आहे. कुंती, द्रोपदी, बाबासाहेब, अश्वत्थामा, कर्ण, एकलव्य, कौरव, पांडव, गंगापुत्र, भिष्म, लक्ष्मी, दुर्गा यांसारख्या पात्रांचा वापर करण्यात कवयित्री यशश्वी ठरल्या आहेत.

कवयित्री माधुरी चौधरी यांच्या संवेदनशीलतेचे विविध पैलू याठिकाणी पहावयास मिळतात. भावसत्य व विचारनिष्ठ सत्याचं सूक्ष्म निरीक्षण तथा सामाजिक भान त्यांच्या संवेदनशीलतेत आहे. व्यवस्थेला निषेधाच्या धारदार शब्दपात्यातून नियंत्रणात ठेवणारी संवेदनशीलता, वर्तमानाच्या संदर्भातील मिथकावर प्रभावी ठरणारी संवेदनशीलता प्रकर्षाने जानवते आहे. स्त्रीदेहाच्या सोशिकतेच्या भडभडणाऱ्या जखमातून ओघळणारा क्रांतीकारक स्त्राव काव्यात्मकतेची पूर्तता करणारा ठरतो आहे ज्याला नव्या बदलाकडे कवयित्री घेवून जातात. स्त्रीकडे, संस्कृतीकडे तथा स्त्री-पुरूष नात्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन चिकित्सक आहे.  विविध प्रतिमा तथा प्रतिकांचा वापर करून नाविन्यपूर्ण शब्दांच्या मांडणीने भाषिक सौंदर्याची आखणी स्तुत्य आहे. प्रेमभावनेच्या अधूनमधून उमटणाऱ्या रेघोट्या सहजतेची तथा सरलतेची साक्ष देतात. स्री भेवती फिरणारा काव्यमय धागा सामाजिक, राष्ट्रभक्ती तथा कृषी जीवनाशी संबंधित व प्रेम कवितांचीी अधून मधून गुंफण तयार करताना दिसून येतो. अपवादात्मक बाबी वगळता माधुरी चौधरी यांचा आयुष्याच्या कॅनव्हासवरील अस्वस्थ रेघोट्या हा काव्यसंग्रह वाचकांनी एकदा वाचून काव्यानंदाचा अनुभव घ्यावा आपल्या पसंतीस नक्कीच उतरल्याशिवय राहणार नाही. कवयित्री माधुरी चौधरी यांची प्रगल्भ लेखनी यापुढे अधिकाधिक साहित्य निर्मिती करेल ह्याच सदीच्छा….

   -प्रा.डॉ.सदाशिव सुर्यवंशी केंद्रिय अध्यक्ष-खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य,धु्ळे

             9405371313

---------------------------------------------------------------------------------------------------------------

  ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.

                                              संचालक - कादवा शिवार
                                              प्रतीक विजयकुमार मिठे
                                              मो.9145099071
---------------------------------------------------------------------------------------------------------------


0 coments