Read more
झाड (ललित)
कित्येक वर्षांपासून बिल्डिंगच्या मागे एक भले मोठे चिंचेचे झाड आहे, दर उन्हाळ्यात चिंचेने लगडून येणारे... कित्येकदा मी त्याच्याशी गॅलरीतून गप्पा मारल्या आहेत, जिथे हे झाड आहे तिथे आजूबाजूला छोटी छोटी झुडपे आहेत, पण एकही त्याच्यासारखे मोठे झाड नाही... मला ते झाड एखाद्या स्थितप्रज्ञ योग्यासारखे वाटते... काही तरी शोध घेत असल्यासारखे... डोळे मिटून ध्यान करणारे... पहाटे पहाटे करड्या धुक्याचा पदर उलगडताच भारद्वाज, बगळे, साळुंक्या, पोपट, चिमण्या, कोकिळा ह्यांचे थवे त्या झाडातून थवे फुटतात तेव्हा ते झाड अगम्य भाषेत त्यांना "संध्याकाळी लवकर परत या..." असेच सांगत असणार... मायेने ओथंबून...
पाखरे पिल्लासाठी चारा आणायला बाहेर पडल्यावर ते झाड त्यांच्या इवल्याश्या पिल्लाची राखण करत उभे असते... संध्याकाळ होई पर्यंत... हळूहळू हे पिल्ले मोठी होतील, त्यांना पंख फुटतील, ते ही उडून जातील, झाड एकाकी पुन्हा त्यांच्या पिल्लाची काळजी करत, डोळे मिटून उभे असेल, असेच निरंतर...
एखादी खारुताई लगबग करत झाडावर चढते, झाडाच्या ढोलीत तिचे घर आहे... ती पटकन चढते, उतरते... इकडे तिकडे पाहत काय शोधत असते कुणास ठाऊक..?
झाडाला चिंचा लगडल्या की आजूबाजूच्या वस्तीतील पोर दगड घेऊन चिंचा पाडायला येतात, काही उत्साही पोर झाडाच्या अंगाखांद्यावर चढून चिंचा काढतात तेंव्हा त्यांना झाड त्यांना म्हणत असणार.. "जरा जपून रे पोरानो... हळूहळू चिंचा तोडा, उगाच नासधूस करू नका, जपून फांदीवर पाय ठेवा, पडू नका खाली.." असेच काही तरी म्हणत त्यांची काळजी करत असणार, असेच मला वाटते... एरवी सुनासुना असणारा चिंचेचा पार त्या पोरांच्या हसण्याने गजबजून जातो.. मग कधी कधी तिथे गोट्यांचा डाव रंगतो.. गोल रिंगण करत " ए बाळ्या ती गोटी मारून दाखव..", अस म्हणत दुपार कलेपर्यंत डाव रंगतो, खेळून खेळून कंटाळा आला की कुणीतरी म्हणते,"चला रे , चिंचा तोडू" मग काय सारी वानरसेना पुन्हा झाडावर.. गोट्यांच्या डावात .. कधी लुटुपुटीची लढाई तर कधी खरी लढाई होते मग दोन गट तयार होतात... कधी कुणी चुकार मुले शाळेतील गमती जमती सांगत मनसोक्त हसत राहतात त्या हसण्याने तो परिसर खळाळून जातो आणि झाड ही तो आनंद सोहळा मनसोक्त अनुभवत असतो हे नक्की.
अशा किती तरी आठवणी असणार त्या झाडापाशी, एखाद्या टळटळीत दुपारी, एखादी सासुरवाशीण त्या झाडापाशी आपले सुखदुःख सांगून माहेरची आठवण काढत घटकाभर बसलेली असताना त्या झाडाने आपल्या हिरव्यागार फांद्या तिच्या तोंडावरून मायेने फिरवत धीर दिला असेल.... कधीकधी बकरी चारायला कुणी तरी घेऊन येतो, आपल्या छोट्या कुऱ्हाडीने चिंचेचा पाला हळुवार तोडून बकऱ्यांना देतो तेंव्हा ते झाड आपल्या तोडलेल्या फांद्यांना बघून हळहळत दुखऱ्या भागावर आपल्या फांद्यांनी वारा घालत फुंकर घालत बकऱ्यांना पाहत पाहत हळवा होत असणार...
ऋतू बदलतो... हळूहळू चिंचा कमी कमी होत जातात... अन पावसाळ्याच्या सुरवातीला एक सारस पक्षाचे जोडपे झाडाच्या उंच जागेवर आपले बिऱ्हाड थाटते... कडकडणाऱ्या विजा, पावसाची एक सारखी लय झेलत त्या सारस पक्षाच्या घरट्यात नवीन चाहूल लागते... अन झाड आनंदाने मोहरून जाते.. आपल्या लालसर हिरव्या फांद्या वाऱ्यावर पसरून तो आनंद व्यक्त करतो... जसेजसे पिल्लू मोठे होत जाते अन झाडाची पाने पिवळसर होऊ लागतात... अन एका नव्या ऋतूची नांदी लागते... जुने पाने गळू लागतात... शिशिर ऋतू चोरपावलांनी येत राहतो.... झाडाची जुनी पाने गळू लागतात... अन इवली इवली नवी पाने त्याची जागा घेतात... झाडाखाली पिवळ्या पानांचा खच पडतो... कधीतरी वारा येऊन ती सुटी झालेली पाने आपल्यासोबत दूरदूर घेऊन जातो तेंव्हा नवीन पाने हात हलवून निरोप देत असतील का...? काय वाटत असेल तेंव्हा झाडाला..? खरच निरोप घेणे किंवा देणे दोन्ही अवघडच... पण तो द्यावा लागतो अन घ्यावा लागतो, त्याला पर्याय नाही... जगाचा हा कठोर निर्णय निसर्गाला पण मान्य करावाच लागतो... हिवाळ्यात दिवस जरा लवकरच कलतो
तेंव्हा धुक्याची एक जाड चादर पांघरून आकाशात उमलेल्या चांदण्याशी हितगुज करते, कधी कधी मौन होऊन एकटक आकाशात पाहत राहते... तेव्हा वाटते, काय आठवत असेल त्याला..? आपले लहानपण, तरुणपण का आताच्या प्रौढ अवस्थेत होणाऱ्या बदलाची चाहूल लागून अस्वस्थ झाले असेल का...? का गतजन्मीचे काही..?
हळूहळू हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते... पुन्हा झाड चिंचेने लगडून जाते, दुपारच्या वेळी झाड पुन्हा गजबजून जाते, दरवेळी नवीन मुले येत राहतात, कुणी एखादी दुसरी जुनी मूल पण येतात... मग ते नवीन मुलाला सांगतात, "अबे इथून नको चढू, तिकडून चढ, तिथून सोप्प हाय चढायला" आपल्या मोठे असण्याचा अधिकार नकळत तो गाजवत असतो तेंव्हा झाड मनातल्या मनात खुदकन हसत असते
गेल्या वर्षी पारावर येऊन बसणारा म्हातारा आजकाल येत नाही, त्याचा थोडा मोठा झालेला नातू बकऱ्या चारायला घेऊन येत असतो... झाडाने एकदा दोनदा दूर कानोसा घेऊन त्या म्हाताऱ्याची वाट बघितली, पण तो म्हातारा आला नाही, बहुतेक कारभारीनीला भेटायला गेला वाटते.. अस झाडाने एक सुस्कारा सोडत मला सांगितले... त्या सुस्कारयात बरच काही होत... कळेल नकळेल अस...
आता अस वाटतंय झाड थकत चालले आहे... हळूहळू ते आणखीन स्थितप्रज्ञ होत जातं आहे... शंभरीच्या घरात असलेले हे झाड कित्येक उन्हाळे पावसाळे त्याने झेलले असणार... आजकाल झाड आतल्या आत व्याकुळ होत पिल्लांना गोंजरत राहते... त्याच्या भरवश्यावर सोडून चाललेल्या आई वडिलांना सांगते...
" लवकर वापस या रे.. पिल्लं आजकाल खूपच धिंगाणा घालतात... ऐकत नाहीत माझे.."
त्याच्या पारापाशी येऊन बसलेल्या सासुरवाशिणीला सांगते, "बाई ग थोडी कणखर हो..."
आजकाल एक वृद्ध बाबा तिथे येऊन बसतो.. कदाचित झाडाच्याच वयाचा.. काय गप्पा मारत असतील ते दोघे.. तो येतो, दिवसभर झाडाच्या सावलीत झोपतो, आणलेला भाकर तुकडा खातो व तिथेच पुन्हा झोपतो, कधी कधी त्याच्यासोबत बकऱ्या व एखादे दुसरे मूल असते, कदाचित सुनेने सांभाळायला दिले असणार...
कधी अजून एखादा कोणी येतो... मग गप्पाचा फड रंगतो... आठवणीतल्या पत्त्याचे घर गप्पातून पुन्हा उभे राहते... आणि नकळतपणे झाडाच्या डोळ्याची कडा ओलावते.. घरातील भांडण, बायकोच अकाली निघून जाणे... ह्यांनी ते वृद्ध जीव झाडाच्या सावलीत विझू जाणाऱ्या जीवाला उभारी देत... एकेक दिवस पार करत असताना झाड ही मायाळू हळवे होत जुने दिवस आठवते...
पूर्वीचे सळसळणारे दिवस आठवून पुन्हा शाहरते... इवलास रोपटे असताना वाऱ्यासोबत केलेली मस्ती... मोठं झाल्यावर पहिला वहिला चिंचेचा बहर येताना त्या गर्भार हळुवार सुखदायी वेदना... चिंचा आल्यावर आपल्या पहिल्या बहराचे साऱ्यांनी केलेले कोडकौतुक... आणि अस बरच काही..
पूर्वीच्या अगतिक करणाऱ्या आठवणी आज आठवून नकळत पाणावलेले झाडाचे डोळे मला
स्पष्ट दिसतात...
मी देखील किती तरी मूक क्षण त्याच्यासोबत घालवलेले ते देखील त्याला आठवत असणार...
सार काही अगम्य... त्याच्या थोड्या झुकून गलरी पर्यंत आलेल्या फांद्या मी कुरवाळते.. स्पर्शात विश्वास असतो... झाडाला देखील माझी मूक भाषा कळते... मग दोघेही कितीतरी वेळ हातात हात घालून येणाऱ्या ऋतुची चाहूल घेत चांदणे निरखत राहतो... कितीतरी वेळ... कधी कधी वाटते एवढं चिरपरिचित असूनही आपण अजूनही झाड पुरते ओळखलेच नाही... त्याच्या अंतरंगात काय दडले असणार ह्याचा थांग कधीच लागणार नाही... पण त्याच्यासोबत घालवलेले क्षण म्हणजे पूर्वदिशा उजळून येत असताना फिकट होत चाललेल्या चांदण्याचा पसारा गुलाबी रंगात नाहून आकाशाची उजळत चाललेली गुलाबी छटा व पश्चिमेच्या कातरवेळेची एक सुरेख कडी मिळून झालेला सुरेख मिलाफ म्हणजे माझे व झाडाचे चमचमते क्षण असे मला वाटते....
माधवी देवळाणकर
---------------------------------------------------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
---------------------------------------------------------------------------------------------------------------

0 coments