ललितलेख - या चिमण्यांनो - विजयकुमार मिठे | lalitlekh - Ya Chimanyno - Vijaykumar Mithe

ललितलेख - या चिमण्यांनो - विजयकुमार मिठे | lalitlekh - Ya Chimanyno - Vijaykumar Mithe

Author:
Price:

Read more

                                                                      *या चिमण्यांनो..!*

माझ्या बालपणापासून मला चिमण्यांचा खूप लळा आहे.
सकाळी अंगणातल्या गुलमोहराच्या झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट ऐकला की माझी नजर आणि मन चिमण्यांची हलचाल पाहण्यात रमून जाते.चावळखोर बायकांनी आडावर पाणी भरताना गलका करावा तसा झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट चालू असतो.काय बरं बोलत असतील त्या?भांडत असतील का? पण रोजच का म्हणून भांडतील? काही का असेना पण त्यांचे असे चिवचिवणे वातावरणात चैतन्य निर्माण करते,मनाला आनंदीत करते.

बालपणात मित्रांसोबत अनेकदा बिल्ल्या पिटळण्याचे आणि चिमण्या पकडण्याचे रिकामे उद्योग मी केलेले आहे.
बाळद्यानं रानातून भलामोठा गवताचा भारा डोक्यावर घेऊन गोठ्याच्या दिशेने कण्हत कुथत चालत राहावं आणि गोठ्यात येताच दाणकन भारा आपटून दिल्यावर त्याला हायसं वाटावं अगदी तसंच सकाळची शाळा सुटल्यावर पाठीवरल्या दप्तराचं ओझं ओसरीतल्या कोप-यात भिरकवताना मला वाटायचं. लोखंडी बादली पालथी मारली की तिच्यावर उभं राहून मी अलगद शिक्यावरच भाकरीचं टोपलं काढून जेवायला बसायचो.तोपर्यंत सुतार
वाड्यातले आणि माळवाड्यातले माझ्याच वयाचे मित्र ओसरीवर येऊन बसायचे.रसाच्या दुकानात गि-हाईकांची गर्दी पाहून चरकानं गबागबा ऊस गिळावा तसा मी एकामागोमाग घास गिळायचो.
असं अचक वचक खावून झालं की टोपलं शिक्यावर ठेवून मी मित्रांमधे येऊन बसायचो.मग सुरू व्हायचं चिमण्याचं निरीक्षण. त्या खुंटीवर , खणाच्या हलकडीवर,धान्याच्या पोत्यांवर,
बैठकीत लावलेल्या फोटोवर बसलेल्या दिसायच्या.तशा त्या भलत्याच सावध असायच्या पण आमच्यातले दोघेजण त्यांचा डोळा चुकवून सरकत, खरकत ओसरीच्या दोन्ही दाराकडे जाऊन बसायचे.त्यांच्या हालचाली वरून चिमण्याना धोक्याची चाहूल 
लागायची. त्या उडण्याचा पवित्रा घेणार तेवढयात ओसरीचे दोन्ही दारं गपकन बंद होऊन अंधार व्हायचा.हातात जो कपडा येईल तो घेऊन प्रत्येकजण चिमण्यांमागे लागायचा.त्या जीवाच्या आकांताने धावत 
राहायच्या.फोटोमागे,पोत्याच्या
 थप्पीमागे सापट पाहून लपायच्या.आम्ही भलतेच लागट पोरं सापटीत हात घालून त्यांना धरू पाहायचो पण त्या हातात येण्या आधी भुरकन उडायच्या.पुन्हा आमची धावा धाव सुरू व्हायची. चार-सहा चिमण्या मधील एखादी दोन दम टाकीत बसायची.उडण्यासाठी तिच्या पंखात बळ नसायचे.अशा चिमण्या झडप घालून धरल्या की आम्हाला आनंद व्हायचा.
ओसरीचे दोन्ही दारं उघडले की बाकीच्या चिमण्या जीव एकवटून उडायच्या आणि समोरच्या रूंजा बाबाच्या वळचणीला जाऊन धापा टाकीत बसायच्या. तेव्हा मला त्या शर्यतीत धावून दमलेल्या पोरांनी दम छाटीत बसल्यागत दिसायच्या.
पकडलेल्या चिमण्यांची रंगरंगोटी केल्या जायची.त्यासाठी 
शाळेतल्या दौतीमधल्या शाईचा उपयोग केला जायचा."ही मी पकडलेली चिमणी आहे" हे ओळखू येण्यासाठी तिच्या पायात रंगीत दोरा किंवा छोटीशी
तारीची मुंदी करून घातली की, तिला विशिष्ठ नावे देवून बाहेर येऊन सोडताना भलताच आनंद व्हायचा.कधी असं ही घडायचं.
आम्ही चिमण्या पकडत असताना मध्येच कोणी तरी दाराची कडी वाजवायचे.मग मात्र आम्हाला दरवाजा उघडावा लागायचा.
चिमण्या संधी साधून भुरकन उडायच्या आणि आम्ही मोठ्या माणसांच्या रागाला बळी पडायचो.कधी माझ्या पाठीवर चार फटके बसायचे तेव्हा मदतीला आलेले चिमणधरे मित्र खाली मान घालून कोळपत आपल्या घराकडे निघायचे.
चिमण्या पकडण्यासाठी केलेल्या झटापटीत एखाद्या चिमणीचा जीव जायचा तेव्हा खूप वाईट वाटायचे. अशी मेलेली चिमणी घेऊन आम्ही तोल्याईच्या
 वाडग्याजवळ असलेल्या सिंदबनात जायचो. खड्डा खोदून चिमणीला मुठमाती दिली की घराकडे परत येतांना कोणीच कोणाशी बोलायचे नाही.
दोन दिवस झाले की उत्सुकता लागायची. पुरलेल्या चिमणीचं काय झालं असेल? उत्सुकतेपोटी पाय आपोआपच सिंदबनाकडे वळायचे.चिमणी पुरलेला खड्डा उकरलेला दिसायचा.तिथं चिमणीचे काही पिसं पडलेले दिसायचे.कुत्र्या,मांजराने तिचा फडशा पाडलेला असायचा.
एखादा सिंदबनात झाड्याला आलेला माणूस मोठयानं ओरडायचा." काय रे पोराहो,इथं हागणदारीत काय करत्याय?
चला पळा " मग मात्र आमची पळापळ सुरू व्हायची.
पकडलेल्या चिमण्यांनी आमचा एवढा धसका घेतलेला असायचा की त्या चार आठ दिवस आमच्या नजरेस पडत नसायच्या.कुठं लपून बसायच्या कोण जाणे!
सुतार निहयावरच्या वडाखाली आमचा गोट्या किंवा भव-याचा डाव रंगात आलेला असतानाच एखादा मधूनच वडाच्या पालवाकडे पाहात ओरडायचा.
" ती पाहा माझी सगुणा,तो पाहा तिच्या पायात लाल दोराहे." सगळेच पालवाकडे टक लावून पाहायचे.आमचं असं पाहणं लक्षात आलं की चिमणी भुरकन उडून दिसेनशी व्हायची.मोठी माणसं आम्हाला सांगायची.
"चिमणीला, तिच्या पिल्लाला हात लावताना चिमणीने पाहिले तर माणसाने स्पर्श केलेल्या चिमणीला ते पुन्हा आपल्यात सामावून घेत नाहीत. चार-सहा चिमण्या जमून स्पर्श झालेल्या चिमणीला चोचींनी घायाळ करून मारून टाकतात".खरं खोटं माहीत नाही पण आम्ही पकडून रंगवलेली चिमणी आठ-दहा दिवसांनी आम्हाला जीवंत दिसायची. ते कसं काय? असा प्रश्न आमच्या बालमनाला पडायचा. आता वाटतय आम्ही चिमण्या पुन्हा पकडायला नकोत म्हणून ही भीती आम्हाला दाखविली जात असावी.
हे सगळं मला आजच का आठवते आहे? आहे, हे 
आठवण्यामागे एक कारण आहे.गेल्या दीड-दोन वर्षापासून माझ्या घरातल्या आडगईवर येऊन बसणारी चिमणा चिमणीची जोडी आठ दिवसापासून माझ्या घरात आलेली नाहीये. त्यामुळे मी अस्वस्थ आहे,उदास आहे. दिवसभर बाहेर कामाला गेलेल्या मुलांची सवसांजेला बापाने वाट पाहत बसावं तसा मी रोजच त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे.पण त्यांची येण्याची कोणतीही चिन्ह मला दिसत नाहीत.गेल्या आठ दिवसांत चिमणी चार दिवस एकटीच आडगईवर येऊन बसायची,तिही काहीशी हिरमुसलेली.पंखाची फडफड नाही की चिवचिव नाही. सकाळ झाली की उडून जायची.ती तिच्या जोडीदार चिमण्याला शोधायला जात असेल का? काय झालं असेल त्याचं.? काय करीत असेल तो?
असेल तर तो का येत नाही तिच्या सोबत? त्याचा काही घातपात? नाही नाही,असं कसं होईल?मग त्याला माणसाच्या घराचा वीट आलाय का? का त्यालाही भीती वाटू लागलीय माणसावर आलेल्या कोरोनाची?मासकं बांधलेले आमचे चेहरे पाहून तो
घाबरला तर नसेल ना? तो शोधीत असेल का माणसापासून दूर निसर्गाच्या कुशीत निवारा?
यापैकी काहीही असेल पण चार दिवसा पासून एकटीच येणारी चिमणी देखील येईनाशी झाल्याने माझी चिंता अधिकच वाढली आहे.लता मंगेशकर यांच्या आर्त स्वरातील गाणं "या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपल्या... . " हे गाणं मी अनेकदा रेडीओवर ऐकले आहे पण त्याततली व्याकुळता मला आज जाणवते आहे. मला आशा आहे, एक ना एक दिवस या चिमण्यांची जोडी फिरून पुन्हा माझ्या घरातल्या आडगईवर येऊन बसेल.त्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहतो आहे. 

--- *विजयकुमार मिठे* 
   मो.9881670204

---------------------------------------------------------------------------------------------------------------

  ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.

                                              संचालक - कादवा शिवार
                                              प्रतीक विजयकुमार मिठे
                                              मो.9145099071
---------------------------------------------------------------------------------------------------------------

0 coments