Read more
मेंदी
मेंदी....! नाव उच्चारताच मन सैरभैर होते. मनाची दशा, त्याची अवस्था काही केल्या कळत नाही. वार्याच्या वेगाने मन दूर दूर पळत सुटते. निसर्गाच्या सानिध्यात निवांत स्थळी जाऊन विसावते आणि शोधू लागते आयुष्यातील मोरपंखी , मनाला अलवार गुदगुल्या करणारे कोमल क्षण... ! नजर पडते त्या हिरव्या कंच मेंदीच्या पानांवर...!
कधीतरी बालपणी आईने सांगितलेल्या मेंदीच्या गोष्टी आठवतात. आई सांगायची, की ही मेंदीची इवली इवली पानं आम्ही तोडायचो , पाट्यावर वाटतांना मेंदी लावायच्या आधीच रंगणारा तळहात बघून जाम खुश व्हायचो . रात्रभर मेंदीभरल्या हाताला किती जपायचो . पहाटे उठल्याबरोबर कुणाची मेंदी सर्वात जास्त रंगली हे बघण्याची कित्ती उत्सुकता...! कारण त्या रंगलेल्या मेंदीवरून ठरायचं भविष्यात कुणाचा पती किती प्रेम करणार ते.. .!
या क्षणी आईचे शब्द न् शब्द कानात रूंजी घालतात. मनाला आवर घालणे अशक्यच...! मेंदीची हिरवीजर्द पाने मला खुणावतात. मी अलगत मेंदीची छोटी छोटी पाने खुडायला लागते नि जागेपणी स्वप्नांच्या हिंदोळ्यावर मन झुलायला लागतं . मीही पाट्यावर मेंदी वाटणार.. हातावर नक्षी काढताना माझ्या प्रियाचे नाव गोंदवणार.. हा....! तेच नाव... जे माझ्या सभोवती फुलपाखराप्रमाणे पिंगा घालत आहे. त्या नावाचं वलय माझं सुरक्षा कवच आहे. ती मेंदी दिमाखाने माझ्या तळहातावर मिरवणार आहे . ती इतकी लाल चुटुक रंगणार की माझ्या सार्या सख्या तोंडात बोटं घालतील. नि त्या मेंदीच्या गर्द लाल रंगाचे प्रतिबिंब माझ्या गालांवर , माझ्या ओठांवर स्पष्टपणे उमटलेले दिसेल.
माझ्या प्रियाच्या निस्सीम प्रेमाचं प्रतीक तळहातावरील गहिऱ्या लाल रंगात उमटेल. ती रंगलेली मेंदी माझं सर्वस्व असेल. तळहातावरच्या फोडाप्रमाणे मी त्या मेंदीच्या रंगाला जपेन. तो रंग कधीही उतरू नये यासाठी सतत प्रयत्नरत असेल. माझं रूप इंद्रधनूप्रमाणे आकर्षक दिसेल.आसमंती स्वच्छंदीपणे विहरायला मी मुक्त असेल.
त्या मेंदीच्या रंगात विरघळून जायला मी अधीर, अगतिक, आतुर....! कारण आता ती लालजर्द मेंदीच माझा विश्वास असेल. माझं अस्तित्व असेल.
काव्या शिरभाते
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

0 coments