Read more
इरदडीचा झिरा
गावाच्या उत्तरेला अर्धा किलोमीटरवर असणारा नाशिक सापूतारा महामार्ग ओलांडून की असोल्याच्या कुशीतून वाहणा-या इरदडीच्या ओहळाच्या पलिकडे एकटाच आपलं अस्तित्व राखणारा हा झिरा गावाचा जणू जलदूतच होता,दुरवर आपले एखादे जिव्हाळ्याचे नातेवाईक असावे आणि आपणाला त्यांना नेहमीच भेटण्याची ओढ लागावी अगदी तशीच ओढ झि-याला भेटण्याची सा-या गावाला लागायची त्याला कारणही तसेच होते. त्याकाळी गावात ना पाण्याची टाकी होती ना हातपंप होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी विहीरीचाच एकमेव आधार होता मात्र एखादी जवळची विहीर सोडली तर बाकीच्या विहीरी ह्या तिन-चार किलोमीटर अंतरावर होत्या. त्यामुळे सर्वात जवळचा इरदडीचा झिराच अर्ध्याअधिक गावाची तहान भागवायचा म्हणूनच की काय गावाची आणि त्याची नाळ घट्ट जुळलेली होती.
त्यावेळी आजच्यासारखा पावसाळा नव्हता,अगदी रोहिणी लागल्यापासून तर उत्तरा नक्षत्रापर्यंत धुवाॅधार पाऊस कोसळायचा. नद्यानाले तुडूंब भरून वाहायच्या.म्हणच आहे "धरण उशाशी अन तहान घशाशी" अगदी असचं व्हायचं. एवढा पाऊस पडूनही पिण्याच्या पाण्याची वणवण असायची ती कायमच.बायाबापड्या कपडे धुवायला इरदडीला गेल्या तरी हाताशी एखादा हंडा घेऊनच जायच्या आणि येतांना पाणी भरूनच आणायच्या. मला आठवतं,दुपारच्या वेळेला झि-यावर गर्दी तुरळक असायची. तेव्हा मी आई सोबत तर कधी मित्रां सोबत जात असू. जातांना इरदडीवर अगोदर मित्रांशी धिंगामस्ती करून झाली की अंघोळ करायचो.दुपारच्या वेळी दो-तीन बाळदी आपली गुरे पाण्यावर इरदडीला घेऊन यायचे. त्या मोठ्या गुरांच्या कळपा आड आम्ही शेजारीच्या वावरातील भुईमुंगाच्या शेंगा,टमाटे गुपचूप तोडून खायचो. मगच झि-यावर पोहचायचो.नारळाच्या पाण्यासारखाच गोडवा त्या झि-याच्या पाण्याला होता.
सायंकाळच्या वेळी मात्र झि-यावर ब-यापैकी गर्दी व्हायची.नव्या नवरदेवाला हळद लावतांना त्याच्याभोवती जशी गर्दी व्हावी अगदी तशीच.शेतावर रोजाराजी मोलमजूरीला गेलेल्या बायाबापड्यांची घराला जातांना गर्दी व्हायची,चैत्र वैशाखात तर साधारण रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत पाणी भरले जायचे कारण ह्या वेळेला फारशी गर्दी नसायची ह्या दोन-तीन महिन्यात झिरा रात्री फक्त तीन-चार तासच आराम करायचा. शेतक-याला जसं विजेवर अवलंबून राहावं लागतं. विज आली की पाणी भरायला उठायचं, गेली की थोडा डोळा लागतो न लागतो तोच पुन्हा विज आली की उठावं लागतं.अगदी जणू काही अशीच झोप झिरा घ्यायचा.कारण पहाटे तीन वाजेपासून पुन्हा त्याच्याकडे गावं धावत जायचं. मला आठवतं वैशाखात लग्नांची धामधुम असायची आणि रात्रभर वरात चालायची. तेव्हा साधारण तीन ते चारच्या दरम्यान मोठमोठ्या खटल्याच्या घरच्या बैलगाड्या टिपाड घेऊन झि-याकडे जायच्या. कारण तेवढ्या चार-पाच तासात पाणीही भरपूर आलेलं असायचं. एरव्ही झि-यात उतरून लहान पातेले किंवा सतीलीने पाणी भरावे लागायचे. झिरा सा-या गावाचं ओझं सोसूनही सा-या गावाची तहान भागवायचा. एखाद्या वावरानं बी रूजवून पिकाचा सांभाळ करावा नंतर शेतक-यानं ते सोंगून न्यावं आणि त्याला उघडं बोडकं करावं. तरीही हसतहसत वावरान तृप्तीचा ढेकर देत त्याचा स्विकार करावा. तसंच वर्षानुवर्ष गावानं पाणी भरतांना कधी त्याची माती धसली तर कधी लहान मोठे दगड धसले. तरीही झि-यानं चूकूनही कधी तक्रार केली नाही की कधी रूसला नाही.भुमातेतून जेवढे पाणी मिळेल तेवढे तो गावाला आनंदाने देत राहीला, दिवसेंदिवस धसत चाललेल्या झि-याची डागडूजी करावं असं कुणाच्या मनात का आल नाही. याचं कोड मला शेवटपर्यंत उलगडल नाही.
जेव्हापासून माणूस स्वार्थासाठी निसर्गसंप्पत्तीवर हल्ला करायला लागला.झाडं तुटत गेले.हळूहळू त्याचे परिणाम पावसावर व्हायला लागले ऐन मौसमामध्ये मग तो दडी मारू लागला. अशावेळी गावातील पोरीबाळी भाद्रपदाच्या ऐन उन्हात कळशी - बादल्या घेऊन झिर्यावर जायच्या आणि गावातील मारूतीला श्रद्धेने हेल घालायच्या किमान प्रत्येकीच्या दोन-तीन तरी खेपा व्हायच्या.हेल घालण्यासाठी रस्त्याने जाताना "धोंडी -धोंडी पाणी दे........" असे आळवणीचे गीत गात चालायच्या. निसर्गाचा चमत्कार म्हणा की देवाची कृपा काही वेळातच धो-धो पाऊस पडायला सुरुवात व्हायची.हे मी पाहिलेले आहे.
आज गावाचं रूप पार पालटलयं.लग्नाच्या दिवशी जसा नवरदेव कोटासुटात आणि करकरीत बुटात नखशिखांत सजलेला असतो.त्याचप्रमाणे गाव नवनवीन बंगले,गावभर एलईडी लॅम्प,गल्लीबोळात काॅन्क्रिटचे रस्ते,विवीध प्रकारची दुकाने,कार्यालये यांनी गाव सजलयं.गल्ली गल्लीत आणि घरघरात नळ आले आहेत. त्यामुळे इरदडीचा झिरा गावाच्या केव्हाच विस्मरणात गेला आहे. म्हाता-या बायाबापड्यांच्या गप्पांच्या ओघात पाण्यावरून विषय निघाला की तेवढ्या पुरताच इरदडीच्या झि-याचा विषय निघतो आणि त्याच्या दुर्मिळ आठवणी प्रत्येकाच्या ओठावर येतात. आजमितीला त्याचं अस्तित्व केव्हाच संपलय.त्याच्या साध्या खाणाखुणाही दृष्टीस पडत नाहीत. कारण झिरा बुजवून त्यावर आज नवरीने हिरवा शालू नेसावा तशी द्राक्षाची बाग दिमाखाने उभी आहे ,मी जेव्हाकेव्हा गावी जातो तेव्हा आपसुकच माझी नजर इरदडीचा झिरा शोधण्यासाठी भिरभिरते आणि त्याच्या आठवणीत काही क्षण मी स्वतःलाच विसरतो.
*राजेंद्र गांगुर्डे*
* मधुरध्वनी - ९८८१४२७५४७*
---------------------------------------------------------------------------------------------------------------

0 coments