Read more
गुलाबी पहाट
गुलाबपाकळ्या गालावरून फिरवल्यागत गोड वा-याची झुळुक गालाला स्पर्शून गेली आणि कमलदल फुलावे त्याप्रमाणे निद्रादेवीच्या अधीन असलेले कमलनयन हळूवार उघडले गेले. अंगावरून तामसाचा किडा झटकून सरळ सूर्यदर्शन घडावे म्हणून.....खिडकी उघडली, महताश्वर्य
*पहाटेचा प्रहर....*
*धुक्याचा कहर,*
*जिकडे तिकडे धुसर,*
*काहीच येईना नजर....,*
आज जणू आभाळ धरतीला भेटावयास खाली उतरले असावे. आज पहाटे गुलाबी थंडीने धुक्याची चादर घेऊन धरतीला आलिंगन देत कवटाळले असावे अवकाशाने.
सर्व फुलेपाने झाडे,वेली जणू गच्च डोळे मिटून सुर्याची वाट बघत आहेत. सूर्य उगवताच ही धुक्याची मिठी सैल होईलच बहुदा. पानांवरिल दवबिंदुही गोठलेल्या मोत्यांप्रमाणे सर्वदूर विखुरलेले आहेत आज. आणि धुसर झालेल्या हवेत रस्त्यावरील माणसे, जनावरे, झाडावरील पक्षी,फांद्या लपंडाव खेळत झुंजुमुंजू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. अंगणातील थंडगार जमीनीवर पाय ठेवताच कश्मिर की वादीयाँ......., चा फील येतोय. आणि डोक्यावर बर्फ ठेवल्यागत मेंदु गोठलेला आहे. हात गारठले आणि दात मात्र थरथरत्या ओठांमध्ये सळसळले आहेत. थंड हवेतील गारवा खट्याळपणे
माझी छेड काढत होता आणि मी मात्र उगाच सुखावल्यागत डोळे बंद करून नटखट कान्हाला आठवत, माझी कामे उरकण्याच्या गडबडीत आहे. अंगणातील ओल्या दवात थिजलेली फुले ओंजळीत गोळा करताना ओंजळीला गुदगुल्या होत होत्या आणि केसात माळलेल्या सुंदर गज-याच्या कल्पनेने मी त्या फुलझाडांचे आभार मानले. ऊन,वारा, थंड़ी, पाऊस, धुके काहीही असो, सुगंध परसरविण्याचे काम अविरत ही फुलझाडे करित असतात.कधी देवाच्या पायी, कधी डोईवर, कधी गज-यात तर कधी गजरात ही फुलांची ओंजळ सुख पदरात टाकून जाते. हळव्या मनाशी हळूच नाते जोडत.
रंगिबेरंगी सुंदर फुलांच्या सान्निध्यात, पहाटेचा मंद गार 'वायु' आता थोडा 'युवा' होऊन वेगवान झाला आहे आणि हळूहळू सुर्याच्या किरणांनीही धरतीकडे कटाक्ष टाकला आहे. ही धुसर झालेली हवा आता मात्र आपला रस्ता सोडून, सुर्यकिरणासाठी रस्ता मोकळा करू लागली आहे.
धरतीची घट्ट मिठी सैल करून खाली आलेल्या या आभाळाने जड पाऊलांनी निरोप घेतला आहे,परंतु जाताना काही गार आठवणी तो सोडून गेला. सुर्यांने एव्हाना पहाटेच्या स्वागतासाठी तांबूस रंगाची रांगोळी पसरवून धरतीवर सोनवर्षाव सुरू केला आणि धरती ओशाळलीच,तिच्या अंगावर शहारे आले आणि पानाफुलांवर असलेले दवबिंदु झटकून ती भानावर आली. कळ्यांनी अलगद मिटलेल्या पाकळया उघडल्या. आता लपंडाव खेळणारे पक्षी घरट्यातून उडत उडत बाहेर आले.थंडीने थिजलेल्या पंखांनाना झटकत,मानही उडवत उडवत तुषारसिंचन करत झटकत होते.
कोंबड्याने बाग दिली तसेच माणसे
ही जागी झाली. सडा संमार्जन करून देवदर्शनाला निघालेल्या ललना जणू या सुंदर निसर्गानं दिलेल्या सौदर्याचेच मनोमन आभार मानत होत्या.
गुरे वासरेही हंबरून पहाट झाल्याची आठवण करून देत होते.
पहाटेच काढलेले गाई,म्हशीचे धारोष्ण दुध आणि त्याचाच फक्कड चहा अहाहा...........! गुलाबी पहाटेचा हा कडक चहा जणु अमृतच! त्यात साथीदाराच्या जोडीने घेतलेला हा चहा म्हणजे दिवसभराच्या रहाटगाडग्याच्या कामासाठी इंधन भरलयागत उर्जा देऊन जाते.
बस एक कप चहा, ताजे वर्तमानपत्र आणि अशीच गोड गुलाबी पहाट! जीवन कसे धन्य होईल आणि मग अख्खा दिवस छानच जाईल हा आत्मविश्वास सोबत घेऊन मी कामाला लागले.
*गोड गुलाबी पहाट झाली*
*धरती चैतन्याने न्हाली*
*अवकाश अवतरले खाली*
*शुभ्र धुक्याची शाल पांघरली.*
राधिका देशपांडे
शेगांव.
9923957696
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

0 coments