Read more
*एक अनमोल दागिना : नम्रता !*
"ऐसी वाणी बोलिये। मन का आपा खोय।
औरन को शीतल करें ।आपहुं शीतल होय।।"
संत कबीरांनी आपल्या दोह्यातून सांगितले आहे की नेहमी अशीच मृदु भाषा बोलावी ज्यामुळे आपलं स्वतःचं मन तर प्रसन्न होतंच पण ऐकणाराही ते गोड बोलणं ऐकून प्रसन्न होतो आणि नेहमी आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतो..
अशी ही नम्रता एक असा गुण की जो माणसाला दैवत्व प्राप्त करून देतो माणसाच्या भवताली जणू एक अलौकिक आभा निर्माण करतो. त्याचा स्वभाव कोमल बनवतो. आचरण शुद्ध ठेवतो. ज्याच्या अंतरंगात प्रेम, स्नेह, आहे ती व्यक्ती विनम्र असतेच असते ती दुसऱ्यांचं चांगलंच चिंतते कोणाचंही वाईट होऊ नये याचा सदोदित विचार करते आणि सगळ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते.
असं म्हणतात की तलवारीचे घाव सुद्धा काळाचं मलम लावून भरले जातात. पण कटू वचनांचे घाव कधीच भरत नाहीत. म्हणून तर गोड मधुर बोलणं, प्रसंगानुरूप अयोग्य बोलणं किती महत्त्वाचं..!
इतरांना प्रसन्न करण्याने स्वतःलाही समाधान आणि सुखाची अनुभूती होते कारण मधुर बोलणं हे जर औषधासारखं आहे तर आणि कटू वाणी ही मात्र, तीरासारखी असते जी कानातून , मनात आणि साहजिकच मग संपूर्ण शरीरात प्रवेश करून, त्या शरीराला असह्य दाह आणि वेदना पोहोचवते.
नम्रतेने समाजामध्ये एक-दुसऱ्यांप्रती स्नेहभाव निर्माण होतो कटू बोलण्याने मात्र समाजात एक दुसऱ्यांचे विरोधकच निर्माण होतात.
..माणसाला शांती शक्ती आणि उर्जा प्रदान करणारी ही 'नम्रता',: जी एक अशी एक गोष्ट आहे..जणू संजीवनीच ती ! अनेक समस्यांना सहज संपवणारी. त्यासाठी केवळ आपल्याला करावा लागतो आपल्या वर्तणुकीत अगदी थोडासा बदल.
असं एक सुवचन आहे की
"गुरुजनांवरची श्रद्धा आपल्याला ज्ञान देते,
आपल्यातली योग्यता आपल्याला स्थान देते.
आणि एकमेकांप्रती असलेली नम्रता आपल्याला मान देते."
म्हणून आपण मोठ्या माणसांशी सन्मानपूर्वक, आणि आपल्यापेक्षा छोट्या किंवा समवयीन माणसांशी कोमलतेचे व्यवहार करावेत.
...खास करून तरुणवर्गाने किंवा युवकांनी हे कायम ध्यानात ठेवावं की आपल्याकडे सध्याचं असलेलं जेवढं ज्ञान आहे ते तोडकं आहे आणि आपलं हे वय केवळ आत्मसात करायचं आणि नवनवे अनुभव घेऊन अनुभवसंपन्न व्हायचं आहे. आपल्या ध्येयासाठी झटायचं आहे... पण हे सगळं साध्य करण्यासाठी आपल्याकडे सगळ्यांप्रती नम्रतेची भावना आवश्यक आहे. नम्रता म्हणजे इतरांच्या तोंडी लागणं तर मुळीच नाही, कारण त्यामुळे आपलेच संकल्प क्षीण होत जातात, आपला शारीरिक-मानसिक विकास थांबतो, आपली निर्णयक्षमता लोप होत जाते.. म्हणून तर माणसाने स्वतःच स्वतःचं भाग्यविधाता व्हावं.. त्यासाठी तर विनम्रता असणं ही खरोखरच एक संजीवनी आहे..!
आपल्याला आपल्यापेक्षा अनुभवी ज्येष्ठ किंवा मोठ्या व्यक्तींपासून त्यांच्या अनुभवाचा लाभ घ्यायचा असतो, त्यासाठी तर नतमस्तक होणं हा आपला स्वभाव हवा. त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असावेत, म्हणून तर आपले व्यवहार बोलणं हे कोमल असणंच गरजेचं आहे .
जी तरुण मुलं बोलण्यासाठी विचारांसाठी, स्वतःच्या मनाचा, बुद्धीचा वापर न करता, इतरांचा सहारा घेतात, सहाजिकच, त्यांची उन्नती, प्रगती कधीच होऊ शकत नाही..त्यासाठी स्वतः विचार करून नम्रतेने आपल्या निश्चयावर दृढ ही राहायला जमायला हवं.
आपण गर्वाचा मार्ग धरला तर आपण कधीच नम्र होवू शकत नाही पण संकटांना पार करून जायचं असेल तर, नम्रतेचा मार्गाशिवाय पर्यायच नाही.
अशी ही नम्रता मुळात आपल्या स्वभावात असतेच अगदी जसा घमेंड गर्व असतो ना तशीच पण घमेंड किंवा गर्व आपल्यामध्ये दैत्य भावना निर्माण करते आणि नम्रता गर्वाचा विनाश करणारी असते, आपल्यामध्ये देवत्व निर्माण करणारी असते, अशा विनम्रतेचा गाभा हा सन्मानच असतो...
तसं तर नम्रता हा एक मानसिक भाव आहे.
आपल्याकडे स्वभावात जी धैर्यशीलता असते, जी प्रसन्नता असते, त्याहीपेक्षा अधिक मौल्यवान गुण असतो तो म्हणजे नम्रता..!
आत्मविश्वास , सद्भावना ही सुद्धा नम्रतेची रूपं, ज्या गुणांमुळे आपल्यामध्ये अनंत शक्ती विचरण करत असतात अशावेळी आपल्याशी जर कोणी तुच्छप्रत वागत असतील तरीही त्यांच्या प्रती उदारता, आपल्याबरोबर असणाऱ्यां प्रती शिष्टता आणि सदाचार, आपल्याहून जेष्ठ श्रेष्ठ व्यक्ती प्रती नम्रता हा आपला स्वभाव असावा .
नम्रताच आपल्याला आपल्याच मूळ स्वभावाच्या स्वरूपाची स्थिती अवगत करून देते आपल्यातल्या दोषांना सुधारण्याची प्रेरणा देते
म्हणजे आपल्या सुधारणा करण्यासाठी, आपली उन्नती किंवा प्रगती करण्यासाठी असणारा मूळ आधार असते नम्रता ! जी एक प्रबळ पुरुषार्थ तत्व सुद्धा आहे, असं तत्त्व जे सगळ्यांच्याच हितासाठी आवश्यक असणार आहे आपल्यावरच्या अन्यायाला मिटवण्यासाठी नाही किंवा अत्याचाराला सहन करण्यासाठी नाही तर त्यात सुधारणा करण्याचं एक साधन. इतरांना कष्ट किंवा त्रास न देता, स्वतः कष्ट सहन करण्याची क्षमता म्हणजेच तर 'नम्रता' !
माणसातली त्रासदायक वागणूक किंवा हिंसात्मक वृत्ती जेव्हा त्याच्यावर अधिक्रमण करते तेव्हा ती माणसातली वाईट प्रवृत्ती काढत नाही पण नम्रता सौजन्यशीलता सगळ्यांप्रती एकात्मतेचा अनुभव देते ज्यामुळे आपल्या स्वभावातले मोठ-मोठे दोष, वाईट प्रवृत्ती सहज काढून टाकता येते.
योगक्षेमं वहाम्यहम्... अशी आत्मसमर्पणाची वृत्ती आपल्यात नम्रतेमुळे येते, कारण समोरच्याचं हृदय जिंकण्याचे सामर्थ्य नम्रतेमध्ये आहे. ह्या नम्रतेच्या आतच मोठेपण दडलेलं असतं, म्हणून तर आपल्याला यशाचे शिखर ही नम्रताच दाखवत असते.
'ह्या नम्रतेला उंची नसते पण प्रतिष्ठा मात्र असते!
नम्रतेची उंची मोजायला, पृथ्वीतलावर आजातागायत एखादंही सक्षम यंत्र नाहीच.. त्यासाठी लागते आत्मसन्मानाची भावना, जिच्यामुळेच आपल्याला, पत ,प्रेम, प्रतिष्ठा प्राप्त होते. केवळ नम्रतेमुळेच आपण सोबतच्या लोकांच्या सतत हृदयासमीप असतो ,जे आपल्याला जाणवत असतं त्यांच्या सहवासात राहून त्यांच्या आचार-विचारातून , बोलण्यातून आणि कृतीतून ही.
असंही म्हणतात की, 'नम्रता हा शरीरातला अंतरात्मा आहे' , महान तत्त्वांची ओळख, आणि कठोरतेहून अधिक शक्तिशाली असते नम्रता.. कारण जिथे नम्रतेने काम होत असेल तिथे कठोरता कदापीही उपयोगाची नाही.
जीवनात अतिशय प्रतिकूल परिस्थिती जरी निर्माण झाली, कठोर प्रसंग, संकटे जरी आली तरी त्यात समायोजन साधण्याची क्षमता नम्रतेनेच येते. अशा या नम्रतेचं मूल्य मात्र काहीच नाही.. पण त्यामुळे सुखी जीवनाचा मूलमंत्र मात्र आपल्याला मिळतो.
आपले जीवनच घेण्यासाठी नाहीतर देण्यासाठी आहे ह्याची जाणीव देणारी विनयशीलता, नम्रता आपल्याला शिकवते नकळत आपल्यातल्या अहंकाराचा सर्वतोपरी क्षय करते... !
म्हणून कष्ट सहन करणारी , संकटातून त्रासातून तावून सुलाखून निघालेली व्यक्ती, नंतर मात्र विनम्र आणि ज्ञानी होते. ह्याची कितीतरी उदाहरणे आपण पाहतो ,अनुभवतो सुद्धा.
माणसामध्ये अनेक चांगले गुण असतात पण त्यातला नम्रता हा गुण सगळ्यात महत्वपूर्ण .
कारण त्यामुळेच मनुष्य चारित्र्यवान आणि आदर्श होतो, तो स्वतः बरोबर इतरांच्याही जीवनामध्ये सुगंध पसरवतो. सामान्यतः जी माणसं विनम्र असतात, ती स्वभावाने सुद्धा मृदुभाषी तसेच व्यवहार कुशल ही असतात.. असा हा गुण हृदयाशी ,मनाशी संबंधित आहे.
पुराणामध्ये एक कितीदाही ऐकलेली बोधकथा आहे की,
"एक तहानलेला माणूस नदीमध्ये उतरतो.
त्या नदीमध्ये त्याच्या गुडघ्यापर्यंतच पाणी असतं. तो व्यक्ती पाण्यात उतरूनही वाकून पाणी मात्र पित नाही. तो या आशेवर तसाच उभा राहतो की, जेव्हा नदीचं पाणी त्याच्या ओठांजवळ येईल, तेव्हा तो न वाकता पाणी पिणार, या वाट पाहण्यात तो तहानलेलाच राहतो. जर तो वाकून पाणी प्यायला असता तर नक्कीच त्याची तहान भागली असती."
सारांश काय तर.. ज्याच्या अंगी नम्रता आहे, जो विनयशीलतेचं अनुसरण करतो त्याला नक्कीच ही संजीवनी प्राप्त होते. म्हणून तर असंही म्हणतात की, 'जो विनम्र नाही तो विद्वान सुद्धा नाही..!' आणि जो नम्र असेल त्याला त्याचे प्रतीफळ मिळतेच मिळते.
हा अनमोल दागिना म्हणजे तर साधेपणातलं नितळ सौंदर्य. नातेसंबंध निभावण्यासाठी सुद्धा, नम्रताच तर लागते आपल्याला.
कपट कारस्थानांनी तर महाभारत घडते, हे आपण जाणतोच. आकाशात उंच उडायचं असेल तर पक्षांना, पंखाची गरज असते.पण माणूस मात्र जितका नम्रतेने वाकेल तितका तो उंच होत असतो.
'महापुरात झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती..'
ह्या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणेच तुम्ही किती मोठे आहात हे तुम्ही किती नम्रतेने वागता यावरूच ठरत असते.
महापुरात मोठ मोठी झाडे उन्मळून पडतात, पण लव्हाळी गवताची पाती मात्र वाचतात. पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वाकूनही निसर्गासमोर ते नतमस्तक असतात पण न वाकता ताठ उभी असणारी झाडे मात्र आपलं अस्तित्व गमावतात.
शिवाय असंही आहे की, आपले दात कठोर तीक्ष्ण धारदार असतात म्हणून अखेर पर्यंत एकही तोंडात शिल्लक राहत नाही, पण जीभ मात्र नरम असते, कोमल लवचिक असते, म्हणून ती अखेरपर्यंत तोंडात असते.
म्हणून आपण कोमल आणि नम्र शब्द वापरुयात, कठोर शब्दांनी माणसं दुरावतात, आपण लवचिक, विनम्र झालो तर आयुष्यात सुद्धा नेहमी यशस्वीच राहू .
ज्या नम्रतेमुळे आपल्या साधेपणातलं नितळ सौंदर्य अजूनच खुलून दिसेल आणि त्यावर जडवलेल्या आपलेपणाच्या हिरे जवाहिऱ्यातून आपल्यातले सद्गुण अजूनच लकाकतील त्यासाठी घालूयात हा नम्रतेचा अनमोल दागिना आणि नितळ कांतीमान, तेजस्वी , विनयशील, विनम्र होऊया सगळेच..!
🍁 *अलका कुलकर्णी* 🍁
---------------------------------------------------------------------------------------------------------------

0 coments