Chulha Petata Petena - Anant Chowdhari | ललितलेख - चूल्हा पेटता पेटेना - अनंत चौधरी

Chulha Petata Petena - Anant Chowdhari | ललितलेख - चूल्हा पेटता पेटेना - अनंत चौधरी

Author:
Price:

Read more

                                                                     चूल्हा पेटता पेटेना !



  बहिणाबाई चौधरींची 'चूल्हा पेटता पेटेना, नावाची कविता वाचत असतांना मन कितीतरी वर्ष भूतकाळात गेलं.गावांकडं धाव घेऊ लागलं.चूल आणि आई आठवू लागली.चूली जवळच आम्हा सर्वांचं आयुष्य वाढीला लागलं.चूलीच्या आणि आईच्या उबेतच आम्हा सर्व भावडांच बालपण गेलेलं.
  ‌‌.      प्रत्येक घरातल्या स्त्रीची रोज भेट ही प्रथम चूलीशीच होते.घरात नव्या नवरीचं आगमन झालं की ती प्रथम चूलीचाच ताबा घेते.काही घरात सासुरवाशिनीला सासुबाईची बोलणी नेहमीच खावी लागायची.स्वंयपाक लवकर झाला नाही म्हणजे तिला घरातल्या सर्वांचीच बोलणी ऐकून घ्यावी लागायची.त्यावेळी सासुरवाशीनीच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडायचे.
    *चुली ग शेजीबाई*
     *नको अशी हिरमुसू*
     *मायबाईच्या पाठीवं*
    *कोन पुसनार आसू*
अशा वेळी चूलही जणू सासूरवाशिनीचा शब्द ऐकायची आणि पटापट पेटायची.
    आपल्या संस्कृतीत चूल आणि स्री दोघीनाही लक्ष्मीचं रूप मानलं जातं.नविन चूल जेव्हा कुंभाराकडून विकत आणली जाते तेव्हा तिला घरात हळद कुंकू लावून तिची पुजा केली जाते.चूल भिंतीला अगदी खेटून नाही लावली जात. थोडी पुढे मांडली जाते.तिच्या उंचीच्या बरोबरीने मातीचा थर घालून सुंदर ओट्या सारखा तो भाग केला जातो. त्याला आमच्या कडे भानोशी म्हणतात.भानोशी जवळच भिंतीला एक खाता केलेला होता.त्या खात्यात मिठाचं बारिक मडकं असायचं.भानोशीवरच साखरेचा,चहा पावडरचा डबा,खारटी मिरचीची बरणी, स्वयंपाकासाठी जे जे लागेल त्या वस्तू भानोशीवरच असायच्या.
 त्या भानोशी शेजारीच आक्का भाकरी करायला बसायची.त्या बसण्याच्या जागेवर पाट किंवा लाकडी फळी लावलेली असायची.
   सणावाराला आक्का सकाळी लवकर उठायची. चूलीला पोचारायची.हळद कुंकू लावायची.तेव्हा काडेपेटी नसायची प्रत्येकाकडे.इस्तूच राखेत पूरुन ठेवला  जायचा.फुकून तो फुलवायचा.फुकून फुकून जिवंत व्हायचा इस्तू.खेड्यापाड्यात नसायच्या काड्यापेट्या सर्वांकडे.तेव्हा न लाजता एकमेकांकडे  मागीतला जायचा इस्तू. गवरी किंवा मिसरी भाजायच्या कौलाच्या तुकड्यावर इस्तू आणायचा आणि मग चूल पेटवायची.
   मी धरमबर्डाला मामाकडे शाळेत होतो तेव्हा शाळेतून घरी आल्यावर आजोबांचा स्वयंपाक मला करावा लागायचा.पावसाळ्याच्या दिवसांत कधीं कधीं फार फजिती व्हायची.काडेपेटी नसायची.असली तर मला सापडायची नाही.सापडली तर पावसाळ्याच्या दिवसात ती पार सादळून जायची.काडी पेटवता पेटवता पेटीचा गुल निघून जायचा.काड्या संपून जायच्या. अशा वेळी  इस्तवाचा आहार सकाळीच मामी चूलीतल्या राखेत पूरुन ठेवायची. चूल पेटविण्या आधी गवरीवर थोडं रॉकेल ओतायचं.पूरलेल्या इस्तवावर काडी पेटवायची.काडी इस्तूला लागली की फसकन आवाज होऊन ती पेटायची.पेटली कि लगेच राकेल टाकलेल्या गवरीवर ठेवायची.तेव्हा गवरी पेटायची. गवरी पेटली की चूल पेटायची.
   धरमबर्डाला चूल बनविण्यासाठी गढीवरून पांढरी माती आणायची.पांढरी माती टिकाऊ असायची.त्या मातीत चिकटपणा असायचा.पिंपळपाड्याला लाल मातीच्या चूली बनविल्या जायच्या.प्रत्येक गावात कुंभार नसायचे.कोणी जवळच्या बाजारातून चूली विकत आणायच्या.तर काही स्त्रीयां सुंदर चूली घरीच तयार करायच्या.
   
   पावसाळ्याच्या दिवसात सरपण ओलं व्हायचं.चूलीतली लाकंड लवकर पेटायची नाही.सारा धूर व्हायचा घरभर.तेव्हा आक्का फुकनी शोधायची.ती लवकर सापडायची नाही.कधी खांबाजवळ असायची.कधी भाकरीच्या दुरड्या मागे.कधी घरंगळत बळदाजवळील दरवाजा मागे जणू लपून बसायची.फुकनी शोधता शोधता आक्काची अवस्था बहिणाबाईंच्या कवितेतल्या ओळीसारखी व्हायची.
      *तशी खांबाशी फुकनी*
      *सांपडली सापडली*
      *फुकी फुकीसनी आग*
      *पाखडली पाखडली !*
      *अरे फुकनी फूकता*
      *इस्तो वाजे तडतड*
      *तव्हा धगला धगला*
      *चुल्हा कसा धडधड !*
फुकनीने फुकून फुकून आक्काच्या डोळ्यातून
धारा लागायच्या.चूल जणू काही  परिक्षा पाहायची आक्काची.तशा लय परिक्षा दिल्यात आयुष्यात आक्कानं.आक्काच्या डोळ्यातलं पाणी पाहून चूलीला आक्काची दया यायची.मग ती फुलायची.पेटायची.फुलाबाईशी बोलायची.फुलाबाई तिच्याशी बोलायची.दोघी जिवाभावाच्या मैत्रिणीच.सकाळ संध्याकाळ एकमेकींना भेटायच्या. 
       चूल एकदा फुलली, पेटली की तिला लय घाई व्हायची.ती आवाज करून पेटायची.सारी लाकडं संपवायची.अशावेळी आक्काच काही लाकडं मागे ओढून त्यांना शांत करायची.चूलीलाही मध्ये मध्ये तलफ यायची.चूल आणि घरातल्या स्त्रीचा दिवस बरोबरीनेच सुरू व्हायचा.सकाळी सकाळी पेटली कि कौलाच्या तुकड्यावर इंगोळ ठेवून ती मिसरी भाजायची.घरातल्या माणसांबरोबर जणू काही दात घासून घ्यायची.दात घासून झाले कि तिलाही आमच्या सारखीच चहाची तलफ यायची.चहात दूध टाकलं की ती जोरात पेटायची.आक्काचं लक्ष नसलं की चहा सांडवून घ्यायची.नंतर आवाज काढायची चहा ऊतू गेल्याचा.
   भाकरीचे पापुद्रे चूलीत पाडून घ्यायची.दाळ,आमटी,कोरड्यास त्या मध्ये सांडायचं.चूल जसं काही आमच्या आधीच जेवण करून घ्यायची.
   माझा आजोबा राघो बाबा आणि चूलीच अगदी जवळचं नातं होतं.बाबा पहाटे तीन चार वाजताच उठायचा.अंघोळीला पाणी तोच तापवत ठेवायचा.आमच्या घरी तेव्हाही आणि आजही दोन दोन चूली आहेत.खाली एक ,माडीवरती एक.अंघोळीला पाणी खालच्या चूलीवरती तापवलं जायचं.स्वंयपाक माडीवरच्या चूलीवर केला जायचा. 
    माडीवरती माळ्यावर लाकडं ,गव-या, रचून ठेवल्या जायच्या.बाबा भल्या पहाटेच माडीवरती अंधारात चाचपडत लाकडं,गवरी घ्यायला यायचा.बाबाच्या खडबडीनं तेव्हा सर्वांनाच जाग यायची.आम्ही झोपायचो तिथूनच माळ्यावरती जायचा.तीन चार लाकडं, गवरी, घेऊन खाली यायचा.तेव्हा ते लाकडं आपल्या अंगावर पडू नये म्हणून आम्ही गोधडी तोंडावर ओढून घ्यायचो.भिती वाटायची.नंतर नंतर घरातील कोणीही खाली लाकडं,गवरी, काडेपेटी, चिमणी झोपण्या अगोदर नेऊन ठेवायचे.
   पावसाळ्यात नदीला पूर आला की बाबा भाळी घेऊन मासे पकडायला जायचा.एखाद्या सांज पुरते मासे घेऊन यायचा.आम्ही सर्व भावंडं बाबाजवळ मासे बघायला  गोळा व्हायचो.त्या वेळी बाबा आम्हाला दोन तीन मासे चूलीवरच्या आहारावर खरपूस भाजून द्यायचा. नागलीच्या भाकरी बरोबर खारटी मिरची लावून तो मासा खाण्याची मजा काही औरच.
   चूली मध्ये मासे, बोंबील,सुकट,खेकडं भाजली तरी चूल काही तक्रार करायची नाही.माणसं खाऊन घ्यायची.चूल अमंगळचिंमगळ  झाली म्हणून माणसंच तक्रार करायची.जेवणं झालं ,भांडे घासून झाले की आक्का शेणा मातीनं चूल पोचारुन घ्यायची.सगळ्यांनाच मग चूल शुद्ध झाली असं वाटायचं. 
    बाबा चूलीजवळच खांबाला टेकून जेवायला बसायचा.त्याची ती जागा पक्की ठरलेली असायची.कधी कधी आम्हा भावंडांनाही तिथं खांबाला टेकून चूली जवळ जेवायला बसावं वाटायचं. पण ती जागा बाबाची.त्यामुळे आक्का आम्हाला तिथं बसू द्यायची नाही.बाबा जेवताना पहिला घास चूलीलाच द्यायचा मगच तो जेवायचा.
      घरातली मांजरं चूलीजवळच राखेत गरमाटीला बसायची. भानोशीवरच खेळायची,लोळायची.नेहमीच चूलीतली राख वकरुन त्यामध्येच घाण करायची. राखेने ती परत बूजवून द्यायची.
  प्रा.व.बा.बोधे सर आपल्या 'लोकसंस्कृतीचे अंतरंग' ह्या ग्रंथात म्हणतात तसं " पाळीव मांजराला उबदार चूल म्हणजे बसण्याची हूकूमी जागाच वाटायची.गारठ्यात मांजरे चूलीवरच उबदार जागेत बसतात.सकाळी मोगरा फुलल्या सारख्या  टवटवीत दिसतात.आता गॅसच्या शेगड्या आल्या नि सगळेच संपले.मांजराना बसण्याची हुकूमी जागाच उरली नाही."
      पूर्वी घरोघरी मातीच्या चुली अशी म्हण प्रचलित होती.ग्रामीण जिवनात, खेड्यापाड्यात चूलीला फार महत्त्व आहे.शासनांन जंगल वाचावं, जंगलतोड थांबावी म्हणून घरोघरी गॅसच्या शेगड्या दिल्यात.पण वाढत्या महागाईने गावांकडं अजूनही चूली आपलं ठाण मांडून आहेत.
   घरात गॅस आला .त्या बरोबर शेगडी,लायटर आला.भानोशी गेली किचन ओटा आला पण भानोशीची सर किचन ओट्याला नाही आली.
  चूलीनं काय दिलं असेल तर चव दिली आयुष्याला.चूलीच्या मातीचा,राखेचा गंध स्वयंपाकात ,भाजी भाकरीत उतरायचा.
  आजही गावी गेलो कि चूलीवरची भाजी भाकरी खावी वाटते.काही न बोलता आक्काला
माझ्या मनातलं समजतं आणि ती 
भाकरी थापायला बसते.
चुलीतल्या आहारावर भाकरी भाजल्याचा खरपूस वास घरभर दरवळत राहातो.
       -- *अनंत चौधरी*
       मो.९८२२५३३७६६

---------------------------------------------------------------------------------------------------------------

  ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.

                                              संचालक - कादवा शिवार
                                              प्रतीक विजयकुमार मिठे
                                              मो.9145099071
---------------------------------------------------------------------------------------------------------------


0 coments