Read more
*अंगणातला गुलमोहर*
तसा मी त्याचा वर्षानुवर्ष तिरस्कारच करीत आलो आहे पण त्याने ते मनावर घेऊन कधीच मला आपली नाराजी दाखविली नाही.माझ्यासाठी आणि माझ्या घरात येणा-या, जाणा-यांसाठी त्याने आपल्या फुलांच्या पायघड्या घालूनच स्वागत केले आहे. इतके सगळे करूनही माझ्या मनातला त्याच्या विषयीचा द्वेष वाढतच गेला.
ग्रीष्मात सगळे घामाघुम झालेले असताना हा असंख्य फुलांनी फुलून येतो,कसला आनंद होतो याला भर उन्हात फुलतांना? उन्हात पायपोळ झालेल्या वाटसरूने जरा वेळ त्याच्या सावलीत येऊन बसावं अशी घनदाट सावली तरी आहे का याची? खळ्यावर गव्हाचे धान्य चाळणीने चाळावे तसा तो रणरणत्या दुपार वेळी आपल्या पानांच्या चाळणीने उन्ह चाळत उभा असतो.त्याने चाळलेल्या विरळ सावलीत कोणी विश्रांती घेत बसलेला अजून तरी मी पाहिलेला नाही.माणसांचे राहू द्या पण कुत्रं,मांजरही त्याच्या सावलीत लोळतांना कधी दिसत नाही. ना याची फळं खायला मिळतात, ना फुलं पुजेला उपयोगी पडतात. काय उपयोगाचा आहे हा? उगाच माझ्या अंगणात कधीचा जागा अडवून बसला आहे. इतर झाडांच्या तुलनेत मला याचा उपयोग नसल्यानेच की काय माझ्या मनात त्याच्या विषयीचा तिरस्कार खच्चून भरलेला आहे.
ग्रीष्मातल्या उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी आम्ही अंगण झाडून पाण्याचा सडा घालतो.तेव्हा हा मुद्दाम की काय आपली फुलं अंगणात उधळतो.त्याचं हे रोजचच झाल्याने मला वाटतं तो
आमच्याशी हटीवाद करतो आहे.त्याची फुलं झाडून लावताना
सगळेच त्याला टाकून बोलतात पण तो नुसताच (कान पाडून) फुलं पाडून ऐकत राहातो.रोजचे बोलणे ऐकून तो कोडगा झाला आहे. वर्षानुवर्षाचा त्याचा हा खंदेपणा मला मात्र असह्य होतो आहे.एकदा दोनदा तर मी त्याच्या जीवावर उठलेलो पण प्रत्येक वेळी मला कोणी ना कोणी अडविले म्हणून हा वाचलेला.
तुम्ही म्हणाल असा आततायीपणा तुमच्या स्वभावात बसत नाही. खरं आहे पण
त्याच्या त्रास देण्याला आणि माझ्या सहनशीलतेला काही सीमा आहे की नाही?मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेच्या भिंतीवर लिहिलेला सुविचार वाचूनही माझ्या मनात गुलमोहरा बद्दल असे उलट सुलट विचार का येतात.? लिहिणारा लिहून गेला"कोणी आपल्या वाटेत काटे टाकले तर आपण त्याच्या वाटेवर फुले पसरवावी" हे वाचायला,ऐकायला,बोलायला छान वाटते पण प्रत्यक्षात आचरणात आणायला एवढे सोपे आहे का? एखाद्याच्या अंगणात कचरा टाकला तरी तो भांडायला उठतो. गुलमोहर माझ्या अंगणात फुलांचा सडा टाकतो तरी तो मला नकोसा वाटतो.तुम्ही म्हणाला "काय माणूस आहे हा.फुलांच्या सहवासात राहूनही असा कसा नकारात्मक बोलतोय" पण या गुलमोहराच्या फुलांनी काय यातना होतात हे आमचं आम्हाला माहीत. कवयित्री शांता शेळके यांचे *काटा रूते कुणाला, आक्रंदतो कोणी/मज फुलही रूतावे,हा दैवयोग आहे/*
या ओळी मला तंतोतंत लागू पडतात.याचा त्रास तरी किती सहन करायचा?दोन वेळा कु-हाड घेऊन मी त्याची कत्तल करायला निघालो पण त्याचे नशीब बलवत्तर.म्हणून तो आजपर्यंत वाचलेला आहे.
माझ्या अंगणातला हा गुलमोहर कोणत्याच ॠतुत मला आकर्षित करून घेत नाही.पिंपळ,आंबा,
जांभुळ या झाडांची पानं दाट सावली तरी देतात.त्यांचे आकार मनाला मोहीत करतात.शुभ कार्यात त्यांना मानही मिळतो.
याची चिल्लर पानं काहीच उपयोगात येत नाहीत. करवतीच्या दात-या सारखी
दिसणारी त्याची हिरवीगर्द पाने एका करवतीला दुसरी करवत पाठ लावून लोंबकळत ठेवावी तशी दिसतात. माझ्यापेक्षा वीस एक वर्षानी लहान असूनही ऐन चाळीशीत हा खूप थकल्याने जख्खं म्हातारा झाल्यासारखा दिसतो आहे. माझ्या अंगणाच्या सीमा रेषेवर उभा असूनही माझा त्याच्यावर जराही मालकी हक्क नाही. पालखेड धरणाचे काम सुरू करण्याआधी माझ्या घराच्या बाजूस नोकरदारसाठी शासकीय वसाहत झालेली.त्या वसाहतीमधे राहणा-या कर्मचा-यांनी वृक्षरोपण करताना माझ्या अंगणालगत या गुलमोहराला खड्डा खोदून मातीत उभे केलेले.तेव्हा हा असेल उंचीने एक फुटभर.पण याच्या संरक्षणासाठी लोखंडी जाळी उभी केली ती पाच फुट उंचीची.
भरपूर पाणी आणि शेणखत खाऊन पिऊन हा चांगलाच वाढी लागलेला.अंगीपिंडी भरलेल्या बाळसेदार पोराला काही महिन्यातच कपडे फिट्ट व्हावेत तशी गुलमोहराभवती संरक्षणासाठी लावलेली लोखंडी जाळी काही वर्षातच त्याला इतकी फिट्ट बसली की ती छन्नी हातोड्यानं तोडून काढावी लागली.त्याच्या बुडा,फांद्याचा विस्तार वर्षागणिक विस्तारत
गेल्याने त्याने माझे घर झाकोळून टाकले आहे. तांबड फुटीला गुलमोहरावर कावळ्यांची काव काव वाढली की घरातील सगळे जागे होऊन आपापल्या कामाला लागतात.सकाळी लवकर उठविण्यासाठी घड्याळाचा गजर लावून ठेवावा तसा हा गुलमोहराने
आमच्यासाठी जणू कावळ्यांचा गजर लावून ठेवलेला आहे.
चांगल्या पोराला वाईट पोरांची संगत लागावी तशी याला कावळ्यांची संगत सोबत लागलेली आहे.त्याच्या फांदी फांदीवर कावळे बसलेले पाहिले की वाटते याच्यावर कोणी तरी काळे वंगण शिंपडले आहे.या कावळ्यांचा खरा त्रास असतो तो सकाळी उठून अंगण झाडणा-या बायकांना.
कावळ्यांच्या विष्ठेनं सगळं अंगण रांगोळी काढल्यागत दिसतं.त्यात भरीस भर गुलमोहर आपल्या हिरव्या पानांनी तर कधी लालभडक फुलांनी रंग भरतो.अशी शोभिवंत रांगोळी पाहिली की अंगण झाडणारणीचे डोकेच उठते.कावळ्यांना शिव्यांची लाखोली वाहूनच ती अंगण झाडू लागते.
शिशिर ॠतुच्या शेवटच्या आठवड्यात अंगणातील गुलमोहराची पानं गळू लागतात.
महिनाभरात सगळी पानगळ झाल्याने आंघोळीसाठी माणसानं कपडे काढून उघडं,बोडकं बसावं तसा तो दिसतो.कृश माणसाची हाडंन हाडं उघडी पडावी तशा त्याच्या निष्पर्ण फांद्याचा सांगाडा उघडा बोडका दिसतो.काही दिवसातच फांद्याच्या बोटातून कळ्या डोकावताना दिसू लागल्या की आता हा फुलण्याच्या बेतात आहे याची चाहूल लागते.मे महिन्यात तर हा पूर्ण फुलून आल्याने कोणी त्याच्या गळा लाल फुलांची शाल घातली आहे की काय असे वाटते.जून-जुलै मध्ये त्याची फुलं झडू लागली की अंगण फुलांनी खच्चून भरते.पुन्हा फांद्याच्या बोटामधून कोवळी लुसलुशीत पाने छोट्या हिरव्या शेंगाची पाते घेऊन बाहेर डोकावून पाहातात.शेंगाची पाती वा-यासोबत हलतात,डोलतात.
दिवसागणिक वाढत राहातात.
त्यांचा आकार रूंदीला चपटा,
वाकडा आणि लांबीला दीड-दोन फुट एवढा होतो.त्या शेंगाकडे पाहिले की वाटते मळ्यात सोंगणीला आलेल्या दहा-वीस बायकांनी काही क्षणासाठी आपले विळे सांभाळण्यासाठी गुलमोहराकडे दिले आहेत. त्याचे हे शेंगाधारी रूप मला भलतेच हिंसक वाटते.
शासकीय वसाहतीत हा एकटाच काही नव्या नवसाचा नाही.
आंबा, बोर, बाभुळ, चिंचं, कडूलिंब अशी कितीतरी झाडं आहेत.प्रत्येकावर पक्षांनी आपली घरटी घातली,काहींनी विणली पण गुलमोहरावर एकही घरटे नाही.बोरी, बाभळीच्या काटेरी झाडावरं घरटे घालायला पाखरांना भीती वाटली नाही.मग याच्यात असा काय दोष आहे की याच्या फांद्यावर कोणीच कसे राहात नाही? समाजात वावरताना आपण पाहत असतो,काही माणसं सुंदर असतात, सज्जन असतात, बुद्धीमानही असतात पण त्यांचा समाजाला काहीच उपयोग नसतो.त्यांच्या घमेंडी,तिरसट स्वभावामुळे त्यांच्याशी कोणी मैत्री करीत नाही. समाजात अशी काही अपवादात्मक माणसं असतात तशी निसर्गातही काही झाडंझुडपं असतात.ते आपले मन तर आकर्षून घेतात पण आपल्यासाठी काहीच उपयोगाची नसतात.गुलमोहराचे हे झाड असेच निरर्थक असल्याचा माझा समज झाला होता आणि तो अनेक वर्ष तसाच राहिल्याने मला हे झाड अडगळ वाटत होते पण आता गुलमोहराविषयीचा माझा गैरसमज दूर झाला आहे. त्याला कारणीभूत ठरली आहे युवा कवी प्रशांत केंदळे यांची "गुलमोहराचं कुकू" ही कविता.
*आता पावसा मातीशी*
*कर लगीन साजरं*
*गुलमोहराचं कुकू*
*तिच्या भांगामध्ये भर*
या कवितेच्या दोनच ओळींनी गुलमोहराकडे पाहाण्याचा माझा नकारात्मक दृष्टीकोन सकारात्मक झाला आहे.उगाचच आपण याचा निरुपयोगी म्हणून इतके वर्ष तिरस्कार करीत आलो याची मला आता खंत वाटते आहे.या कवितेत कवी पावसाचे आणि मातीचे लग्न लावतो आहे आणि अशा मंगलमय पवित्र लग्न सोहळ्यात मातीच्या भांगामधे
सौभाग्य शिंदूर म्हणून
गुलमोहराचं कुंकू भरण्यासाठी पावसाला सांगतो आहे.
गुलमोहराकडे पाहाण्याचा माझा दृष्टीकोन बदलल्याने लाल फुलांनी फुलून आलेला गुलमोहर आता मला कुंकवाने शिगोशिग भरलेला कुंकवाचा करंडा वाटू लागला आहे.
पालखेड धरणाचे काम कधीचेच पूर्ण झाल्याने शासकीय वसाहतीत आता कोणीच राहात नाही.सगळी वसाहतच भकास झाली आहे.
माझ्या दारापुढील अंगणात असलेल्या या गुलमोहरावर माझा कायदेशीर मालकी हक्क नसला तरी दांडकशाहीने आज माझाच हक्क आहे. परिसरातील काही माणसांनी त्याच्या फांद्या तोडण्याचा एकदा-दोनदा प्रयत्न केला पण मी गुलमोहराची बाजू घेऊन त्याचे रक्षण केले. आमच्यात आता मैत्रीचे धागे जुळले आहेत. त्याच्या वाळलेल्या शेंगा आणि फांद्या चुलीत जाळण्यासाठी उपयोगत येत असल्याने त्याच्या विषयीची सगळ्यांची नाराजी दूर झाली आहे.घरात धान्याची थप्पी लावावी तसे त्याच्या वाळलेल्या शेंगाचे भरलेले आठ-दहा पोते अंगणात थप्पी लावून ठेवलेले आहे. रोज नित्य नेमाने सकाळच्या आंघोळीचे पाणी
त्याच्या शेंगावरच तापते.
अजूनही अंगणात होणारी फुलांची, पानांची पानगळ, कावळ्यांची विष्ठा याचा त्रास आहेच पण आता
त्याच्या शेंगाचा,लाकडांचा जळणासाठी उपयोग होत असल्याने घरातील सगळेच त्याची काळजी घेतात. आता तो आम्हाला घरातीलच एक सदस्य वाटतो आहे.आयुष्यभर एखाद्याचा तिटकारा करावा आणि अखेरच्या क्षणी त्यानेच कामाला यावं असं काहीसं झाल्यानेच गुलमोहर आता मला इतर झाडां इतकाच प्रिय वाटू लागला आहे.
-- *विजयकुमार मिठे*
मो.9881670204
---------------------------------------------------------------------------------------------------------------

0 coments