Read more
कल्पनांच्या चांदणभुलव्यातून वास्तविकतेचा गुंता सोडविणारे कथाकार, ललित लेखक, एकांकिका लेखक, कवी, संपादक "विजयकुमार मिठे"
वाचकांच्या मनाच्या आभाळावर शब्द चांदण्यांचे ठसठशीत शब्द गोंदण गोंदवून आपला ठसा कायमस्वरूपी उमटविणारे ग्रामीण कथाकार, ललित लेखक, कवी, एकांकिका, श्रुतिका लेखक, कादंबरीकार, व्यक्तीचित्रणकार, असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, कादवा शिवार मासिकाचे संपादक आणि कादवा प्रतिष्ठानचे संस्थापक अर्थात "विजयकुमार मिठे"!
विजयकुमार मिठे यांनी आपल्या नावासमोर "ग्रामीण लेखकाचे" केवळ बिरुद लावले नाही तर ते आजही ग्रामीण जीवन आनंदाने गावाकडच्या धरणग्रस्त भागातील शेतीमातीत जगत आहेत. अनेक गावांना पाणीपुरवठा करून हिरवाईचे दान देण्यासाठी त्यांच्या संपूर्ण गावाने जलसमाधी घेतली. गाव दुसरीकडे स्थलांतरीत होऊन स्थायिक झाले परंतु "मिठे" आजही धरणाजवळील आपल्या मळ्यात आपल्या कुटुंबासह राहतात. मळ्यातील ऊसाला पाणी देता देता ते आपले लेखनकार्य करतात. आपली अनुभवाधिष्ठीत ग्रामीण जीवनशैली ते साहित्यकृतीतून लालित्यपूर्ण भाषाशैलीत उत्तमरित्या रेखाटतात. ईश्वराने जणू त्यांच्या हातात शब्दकुंचला दिला आहे. आपल्या जिवंत चित्र उभे करणाऱ्या प्रासंगिक "शब्दचित्र लेखन कौशल्यातून" ग्रामीण बोलीची प्रगाढ "आभाळ ओल" त्यांनी वाचकांच्या मनात टिकवून ठेवली आहे. कादवा शिवारातील गंध त्यांच्या कथा, ललित आणि कवितेतून दरवळत असतो. आठवणीतील गावगाडा आणि बदलत्या ग्रामीण जीवनाची वास्तविकता त्यांनी आपल्या एकूण सतरा पुस्तकांतून अचूक टिपली आहे.
१ जून १९५७ रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील "पालखेड बंधारा" या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण मराठी वाड्मयात पदवी पर्यंत झाले. व्यवसायाने शेतकरी असलेल्या या लेखकाच्या लेखणीने समृद्ध साहित्य संपदा साहित्यविश्वाला अर्पण केली आहे. विजयकुमार मिठे यांचे वडील "बाबूराव रामजी मिठे" ग्रामसेवक होते. ते गावातील सार्वजनिक वाचनालयासाठी पुस्तकं आणत विजयकुमार अण्णाभाऊ साठे, व्यंकटेश माडगूळकर, आनंद यादव, द. मा. मिरासदार, द. ता. भोसले, शंकर पाटील यांच्या पुस्तकांचे एकाग्रतेने वाचन करीत असत. पुढे ते अण्णाभाऊ साठे सोडून या सर्व लेखकांना प्रत्यक्षात भेटले सुद्धा. विजयकुमार यांच्या घरी "गांवकरी" हे साप्ताहिक यायचे. त्यात त्यांचे मामा " भास्कर गवळी" यांच्या कथा प्रकाशित होत असत त्या वाचून त्यांची आई म्हणाली " तुझा मामा कथा लिहितो तर तू का लिहून पाहत नाही. तू लिही, तुला जमेल" आईचे प्रोत्साहन आणि मामांची प्रेरणा घेऊन विजयकुमार यांनी लिखानास सुरुवात केली. त्यांनी इयत्ता आठवीत असतांना १९७३ मध्ये "हिसाब" ही पहिली कथा लिहिली. त्यांनी ती कथा त्यांच्या मामांना दाखवली "कथा लिहिणे इतके सोप्पे नाही" असे म्हणून मामांनी त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी नाराज केले . त्याच मामांच्या घरी ते सुट्ट्यात जायचे. त्यांचे मामा "सिन्नर सार्वजनिक वाचनालया"चे कार्यवाह होते. सुट्ट्यामध्ये या वाचनालयातील पुस्तके विजयकुमार वाचत असत. "मामांची कथा साप्ताहिकात येऊ शकते तर माझी का नाही" या इर्षेने त्यांनी "साप्ताहिक गांवकरी" मध्ये "हिसाब" ही कथा पोस्टाने पाठवली. विशेष म्हणजे सातत्याने तीन वर्षे हीच कथा ते पाठवत राहिले परंतु तीन वर्षांत ती एकदाही प्रकाशित झाली नाही. एक दिवस त्यांना सुप्रसिद्ध जेष्ठ विनोदी साहित्यिक "चंद्रकांत महामिने" यांचे पत्र आले. त्यांनी विजयकुमार यांना गंगाघाट नाशिक येथील साप्ताहिक गांवकरीच्या कार्यालयात भेटण्यास बोलावले. विजयकुमार त्यांना भेटले. चंद्रकांत महामिने त्यांना म्हणाले, "गेली तीन वर्षे तू एकच कथा पाठवत आहेस परंतु ती प्रकाशित होत नाही कारण तिचे कथासूत्र चुकत आहे." मग चंद्रकांत महामिने यांनी "हिसाब" या कथेतील चुका दाखवून त्यांची दुरुस्ती सुचवली तसेच कथालेखनाचे योग्य मार्गदर्शन केले. तेव्हापासून विजयकुमार मिठे "चंद्रकांत महामिने" यांना आपले साहित्यिक गुरू मानतात. विजयकुमार यांनी कथेत दुरुस्ती करून पुन्हा कथा चंद्रकांत महामिने यांना दाखवली. दुरुस्तीनंतर त्यांची ही कथा "साप्ताहिक गांवकरी" मध्ये संपादक "गोपाळ बेळगावकर" यांनी १९७५ सालात प्रकाशित केली. या कथेसाठी त्यांना २१ रु. मानधन देखील मिळाले. त्याकाळी २१ रुपयांचे मूल्य एका शेतकरी कुटुंबात खूप मोठे होते. आजही त्यांना ते पहिले मानधन बाकी सर्व पुरस्कारांपेक्षा मोठे वाटते."हिसाब" या कथेपासून विजयकुमार यांचा कथालेखनाचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर त्यांनी अनेक लघुकथा, दीर्घकथा लिहिल्यात. त्यांच्या कथा साप्ताहिक गांवकरी सोबतच नाशिक जिल्ह्यातील देशदूत, दै. गांवकरी, भालचंद्र , कृषी साधना, सा. विडीकाडी इत्यादी लोकप्रिय मासिक आणि वृत्तपत्रांतून प्रकाशित होऊ लागल्या. त्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षी त्यांची "कादवेचा राणा" ही दीर्घकथा चार भागात सा. गांवकरी मध्ये प्रकाशित झाली. पुढे "घोंगट्याकोर" "कादवेचा राणा" हे कथासंग्रह प्रकाशित झाले. प्रसंगानुरूप योग्य म्हणी, वाक्प्रचार, कधी खुमासदार ग्रामीण बाज, कधी विनोदी शैली तर कधी काळजात वादळ पेरणार भावभावनांची उलथापालथ अशा नानाविध शब्दकळांतून त्यांनी
"घोंगट्याकोर", "बुजगावणं" , "लाऊक", "येसन", हेळसांड, "कादवेचा राणा" आणि "मातीमळण" असे एकूण सात कथासंग्रहाची निर्मिती केली. या कथालेखनासाठी त्यांना राज्यस्तरीय शंकर पाटील उत्कृष्ट कथानिर्मिती पुरस्कार, अण्णाभाऊ साठे कथा पुरस्कार, नारायण सुर्वे कथा पुरस्कार, अंकुर साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद सिन्नर शाखेचा पुरस्कार असे अनेक ख्यातनाम पुरस्कार प्राप्त झालेत.
आपल्या लिखाणाचे समीक्षण करणारे कुणीतरी हवे म्हणून ते प्रत्येक संग्रहाचे लेखन सुप्रसिद्ध समीक्षक, शासकीय कर्मचाऱ्यारी वाचनालयाचे कार्यवाह विवेक उगलमुगले यांना दाखवत असतात. विवेक उगलमुगले अगदी काटेकोरपणे त्यांच्या साहित्याचे परिक्षण करतात.
विजयकुमार मिठे यांनी बालपणातील रमणीय आठवणी त्यांच्या जीवनातील प्रसंग, घटना यांचे शब्दचित्र त्यांच्या लालित्यपूर्ण शैलीतून कल्पनांच्या चांदणभुलव्यात गुंफलेले आहेत. ललित लेखनाचा सर्वोत्तम नमुना म्हणून विजयकुमार मिठे यांचे ललित संग्रह अभ्यासले जातात. त्यांच्या चांदणभूल ललितलेख संग्रहातील चांदणभूल या पाठाचा स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी ए, बी.काॅम, बी. एस्सी. इतर पदवी प्रथम वर्षाच्या अभ्यास क्रमात समावेश करण्यात आला आहे.
विजयकुमार यांचे ललित लेख म्हणजे "अस्सल बावन्नकशी लावण्याची शब्दखाण" स्वर्गीय अप्सरा शब्दसौंदर्याचा साज लेवून त्यांच्या ललित लेखनाच्या समृद्ध व्यासपीठावर नृत्य करत असल्याचा भास वाचकांना होतो. "चांदणभूल" या ललित लेखातील अप्रतिम भाषासौंदर्य शैलीतून त्यांनी रेखाटलेले आभाळातील लख्ख चांदण्यांचे विहंगम शब्दचित्र वाचून वाचकांना भुरळ पडते.
सर्वांनी अबोल ठरवलेला चाफा प्रत्येकाला बोलते करतो. कंठात दाटलेल्या, ओल्या ओठांवर अडखळलेल्या मूक भावनांना शब्दबद्ध करतो. रुसलेल्या मनाची प्रतिकात्म काव्यप्रभा फुलविण्याची किमयागिरी साकारणारा किमयागार "तिच्या अंगणातला पांढरा चाफा." हा ललित लेखनाचा उत्कृष्ट नमुनाच आहे.
"आभाळओल" ललित संग्रहातील विजयकुमार मिठे यांच्या मनमोहक ओळी वरील विवेचनास अगदी समर्पक आहेत
"तिच्या एका अबोल्यानं मुका व्हायचा चाफा
तिच्या नुसत्या हसण्यानेही फुलून यायचा चाफा"
ललित लेखनाचे सर्व मूल्ये आपल्याला विजयकुमार यांच्या ललित लेखनात आढळतात. ललित लेखातून त्यांनी व्यक्तिचित्रे कौशल्यपूर्ण रेखाटली तर कधी कथाबीज रुजवण्यापासून ते फुलवण्यापर्यंत ललित तलम रेशमी शब्दविणीतून गुंफत नेले आहेत.
कथाकार म्हणून ओळखले जाणारे विजयकुमार ललित लेखनाकडे अचानक वळलेत. त्यांच्या मित्रांचे ललित लेखनाचे सदर सुरू होते. ते विजयकुमार यांना विचारत, "तुम्हाला आम्ही लिहिलेले ललित कसे वाटले?" तेव्हा विजयकुमार त्यांना म्हणत "मला ललित म्हणजे नेमके काय आहे ते समजून सांगता येणार नाही.परंतु मी जे ललित वाचलेले आहे त्यात तुमचे हे ललित बसणारे नाही." त्याच दरम्यान गांवकरी मध्ये उपसंपादक असलेले "प्रशांत भरवीरकर" यांनी त्यांना तरुणांसाठी असलेल्या पुरवणीत ललित सदर लिहिण्याचा आग्रह केला. तेव्हा त्यांनी विचार केला की आपणच ललित लिहावे म्हणजे नेमके ललित लेखन कसे असते हे स्पष्ट करता येईल, मग त्यांनी "तिच्या अंगणातील पांढरा चाफा" हे पहिले ललित लिहिले. हे ललित तरुणाईमध्ये अतिशय लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांनी कादवा शिवार,महाराष्ट्र टाईम्स मध्ये सुद्धा ललित लेखन सुरू केले. "चांदणभूल" हा त्यांचा दुसरा ललित संग्रह.
एकदा विवेक उगलमुगले यांनी विजयकुमार यांची भेट नाशिकचे कार्यकारी अभियंता संजय बेलसरे यांच्याशी करून दिली. त्या भेटीत संजय बेलसरे यांनी विजयकुमार मिठे यांना धरणग्रस्तांच्या व्यथा मांडण्यासाठी कादंबरी लिखाणाचा आग्रह केला. कारण विजयकुमार हे धरणग्रस्त असल्याने त्यांचे गाव उध्वस्त्त होतांना त्यांनी स्वतः पाहिलेले आहे. कादंबरी न लिहिता गाव हा विषय घेऊन "गाव कवेत घेतांना" हा ललित लेख संग्रह लिहिला. कादंबरीपेक्षा ललित मधून जास्त तळमळीने व्यक्त होता येईल हे त्यांना पक्के माहीत होते. "गाव कवेत घेतांना" या ललित संग्रहास सुप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक " डाॅ. द. ता. भोसले" यांनी अतिशय सुंदर प्रस्तावना दिलेली आहे. या संग्रहातील एकूण सव्वीस लेखात त्यांनी अनुभवलेले गाव ग्रामीण भाषाशैलीत आत्मीयतेने रेखाटले आहे.
विजयकुमार यांच्यात दडलेला सहहृदयी कवी एफ वाय बी. ए. ला (मराठी वाड्मय) असतांना महाविद्यालयीन जीवनात १९७६ मध्ये प्रकट झाला. त्यांनी तारुण्याच्या भरात लिहिलेली पहिली कविता ..
"प्राजक्ताची फुले ओंजळीत ल्याली
अन् तुला देण्याआधी निर्माल्य झाली"
वरील दोन ओळींतच सुरू होण्यापूर्वीच संपलेली एक अधुरी प्रेमकथा आहे. जीवनाच्या अनेक टप्प्यावर ते कविता लिहीत गेले. त्यांना जे एका दीर्घ कथेतून, ललित लेखनातून सांगता आले नाही ते सर्वकाही विजयकुमार कवितेतून मुक्तपणे व्यक्त करत असतात. जेवढी प्रसिद्धी त्यांना कथा, ललित, एकांकिकाने मिळाली नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त लोकप्रियता त्यांना कवितेने मिळवून दिली. त्यांच्या छंदोक्त किंवा मुक्तपणे लिहिलेल्या लयबद्ध कविता आणि त्यांच्या तेवढ्याच दमदार सादरीकरणाने रसिक देहभान विसरून मंत्रमुग्ध होऊन जातात. त्यांची "आई" ही कविता अतिशय लोकप्रिय आहे.
"जव्हा आठवते आई
तुझ्या जगण्याची कथा
तव्हा दूर व्हती साऱ्या
माझ्या मरणाच्या व्यथा
स्वतःला कथाकार मानणारे विजयकुमार यांनी स्वतःच कवितेला दुय्यम स्थान दिले. त्यामुळे त्यांनी कविता प्रकाशित करणे किंवा कविता संग्रह प्रकाशित करण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. भालचंद्र मासिकात त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली. नाशिक आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम अधिकारी विजय सपकाळे यांनी विजयकुमार यांना कथाकथन सादर करण्याची संधी दिली. या कथाकथनातून ते "रेडियो स्टार" झालेत. विजयकुमार यांनी गावातील बऱ्याच जणांना त्यांच्या कला सादर करण्याची आकाशवाणी वर संधी दिली आहे. विजय सपकाळे यांनी मिठे यांनी आकाशवाणी साठी काव्यवाचन करावे असे सुचवले परंतु काव्यवाचन हे सदर "लियाकत अली सय्यद" यांच्याकडे होते. ते साहित्याचे चांगले जाणकार होते. लियाकत अली विजयकुमार यांच्या कविता वाचून म्हणाले "ह्या कविता खरंच तुमच्या असतील तर म्हणून दाखवा, परंतु विजयकुमार म्हणाले "मला त्या पाठ नाहीत." तेव्हा लियाकत अली त्यांना म्हणाले की, "तुमच्याकडे पाहून ह्या कविता तुमच्या आहेत असे वाटत नाही", त्यामुळे ह्या कविता तुमच्या नाहीत असे कबूल करा आणि हे प्रकरण इथेच मिटवा. कारण अशा कविता केवळ बाबासाहेब सौदागर आणि ना. धो महानोरच लिहू शकतात. मला या कविता त्यांच्याच वाटतात."
त्या कवितेतीलओळी अशा होत्या
तुझ्या रुपाला पाहून
रान बाभुळ लाजली
तिची तुझी भेट होता
फुलं हळदी सांडली
विजयकुमार मिठे यांना आपल्या कवितेची तुलना एवढ्या दिग्दज कवी सोबत झाली या गोष्टीचा आनंद झाला. परंतु सय्यद यांना या कविता माझ्याच आहेत हे सांगतांना ते म्हणाले की "मी केवळ शेताच्या बांधावर बसून शेती करीत नाही तर मी प्रत्यक्ष शेतीमातीत राबतो आणि तेच कथा, कवितून लिहितो. निसर्ग वाचायला, जाणून घ्यायला मला लियाकत सय्यद यांच्यामुळे शिकायला मिळाले असे विजयकुमार अभिमानाने सांगतात. पुढे आकाशवाणीवर त्यांचे नियमितपणे काव्यवाचन सुरू झाले. त्यानंतर विजयकुमार मिठे यांचे "ओल तुटता तुटेना" आणि "हिर्वी बोली" हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. "हिर्वी बोली" काव्यसंग्रहासाठी त्यांना देशभक्त बळवंतराव मगर प्रतिष्ठान, सोलापूर तर्फे उत्कृष्ट काव्यनिर्मिती पुरस्कार द. ता. भोसले यांच्या हस्ते मिळाला.
मिठे हे शेतकरी असल्याने त्यांच्या कवितेत शेतीमातीचे दाहक अनुभव येतात.
मी पडतो, उठतो, लढतो
रोजच मातीत मरतो
या काळ्या मातीमधुनी
मी हिरवा होऊन जगतो
रसिक वाचक तसेच साहित्यिक यांनी विजयकुमार मिठे यांना कवी म्हणून लवकर स्वीकारले नाही. त्याच विजयकुमार मिठे यांना "जिल्हा साहित्यिक
मेळाव्याच्या" कविसंमेलनाचे अध्यक्षपद २०१८ मध्ये मोठ्या सन्मानाने दिले गेले.
नाशिक आकाशवाणीवर कथाकथन व काव्यवाचन करत असतानाच त्यांना आकाशवाणीसाठी "घरकुल" कार्यक्रमाची "श्रुतिका" लेखन करण्याची संधी मिळाली. घरकुल श्रुतिका त्यांना दर गुरुवारी द्यायची असे. त्यात पती-पत्नी व त्यांचा घरी येणारा एक त्यांचा अभ्यासू मित्र ह्यांचे संवाद असत. या संवादात कधी भांडण दाखवायचे असेल तर विजयकुमार प्रत्यक्षात आपल्या पत्नीशी मुद्दाम भांडत असत त्यावेळी त्यांच्यात जे संवाद होतील ते श्रुतिकेमध्ये लिहून काढत. त्यांच्या पत्नीने एक दिवस आकाशवाणी वरील हा कार्यक्रम ऐकला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे सर्व तर आपल्या घरात घडले आहे. त्याबाबत त्यांनी विजयकुमार यांच्याकडे विचारणा केल्यावर कळले की विजयकुमार त्यांच्याशी मुद्दाम भांडण उकरून काढून संवाद साधतात. मजेशीर असे की तेव्हापासून त्यांना आपले अर्धे मानधन आपल्या पत्नीला द्यावे लागले. मग पुढची श्रुतिका लिहितांना त्यांच्या पत्नी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करू लागल्या. पत्नीच्या सहकार्याने त्यांनी "घरकुल" श्रुतिकेचे तेरा वर्षे लिखाण केले. त्याचबरोबर जळगाव आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या "चौफेर" श्रुतिकेचे लेखन केले.
विजयकुमार यांनी आपल्या ओळखीने त्यांच्या मित्रांना संधी देत आकाशवाणीसाठी कविसंमेलनही आयोजित केले.
विजयकुमार यांनी एकांकिका लेखन सुद्धा केले आहे. १९७७ साली त्यांनी "कुणी कुणाचं नसतं" हे चार अंकी नाटक लिहिलं. चार महिने ह्या नाटकाचे प्रयोग गावोगावी केलेत. त्यांनी या नाटकात स्वतः एक विनोदी भूमिका सुद्धा केली. शिक्षण विभागाच्या जिल्हा परिषदेने प्रौढ साक्षरता करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांना एकांकिका लिहिण्याची संधी दिली. "मास्तर मला बी लिवायला शिकवा" ही साक्षरता जनजागृतीपर एकांकिका लिहिली. "असंगाची संग" एड्सवर आधारित एकांकिका लिहिली. एकांकिका लेखनासाठी त्यांना शिक्षण विभाग व आकाशवाणी यांनी मानधन दिले. कीर्ती प्रकाशन औरंगाबाद यांनी "आम्ही साक्षर श्रीमंत" या एकांकिकेचे पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर "लेखणी उडाली आकाशी" हा दुसरा श्रुतिकासंग्रह प्रकाशित झाला.
एका बाजूने हा साहित्याचा प्रवास सुरु असताना ग्रामीण भागातील नवोदित लेखक, कवी यांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये "कादवा शिवार" या मासिकाची सुरुवात केली. त्याचबरोबर दिवाळी अंक सुद्धा सुरू केला. गेली तेरा वर्षे सातत्याने कादवा शिवार मासिकाचे अंक प्रकाशित होत आहेत. अनेक नवोदितांची पुस्तकं कादवा प्रकाशनने प्रकाशित करून त्यांना साहित्याच्या प्रवाहात सामील केले आहे. विजयकुमार यांनी कादवा प्रतिष्ठानची स्थापना केली. दरवर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख रकमेसह एकूण सात पुरस्कार दिले जातात. साहित्यातील समग्र योगदानाबदल एका साहित्यिकास साहित्य साधना हा एकवीस हजार रूपये रक्कमेचा पुरस्कार दिला जातो.
दीर्घकथा लेखनातून विजयकुमार कादंबरी लेखनाकडे सुद्धा वळलेत. आपल्या प्रत्येक कथेचे तीन वेळा ते लेखन करतात. विचारांचे मंथन सतत त्यांच्या डोक्यात आणि कल्पनांचे वादळ त्यांच्या काळजात सतत घोंगावत असते. "गोष्ट पाटीवरल्या बाईची"
ही दीर्घ कथा "व्यासपीठ" या दिवाळी अंकात कार्यकारी संपादक विवेक उगलमुगले यांनी २८ पाने देत प्रकाशित केली. चंद्रकांत महामिने यांच्या आग्रहामुळे "गोष्ट पाटीवरल्या बाईची" या कथेचे कादंबरीत रूपांतर झाले. या कादंबरीत त्यांनी साठ वर्षांपूर्वीच्या काळातील निस्सीम व निरपेक्ष, भावभावनांच्या नाजूक रेशीम बंधांत गुंफलेली हळवी प्रेमकथा रंगवली आहे. "गोष्ट पाटीवरल्या बाईची" ही हृदयद्रावक व वाचकांना अस्वस्थ करून चिंतन, मनन करण्यास भाग पाडणारी कादंबरी आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्याचबरोबर "वांझोळ" ही सरोगेट मदर या विषयावर आधारित आणि "पोटपाणी" ही ग्रामीण जीवनाशी निगडित ह्या त्यांच्या आगामी कादंबरी आहेत.
"विजयकुमार मिठे" यांना त्यांच्या पुढील यशस्वी साहित्यिक वाटचालीस अनेक शुभेच्छा!
लेखिका/ मुलाखतकार
निशा डांगे
पुसद
टिप:- सदर लेख सुप्रसिद्ध साहित्यिक "विजयकुमार मिठे" यांची मुलाखत घेऊन लिहिलेला आहे. लेख पूर्वप्रकाशीत असल्याने .....
लेख आवडल्यास माझ्या नावासह शेयर करावा

0 coments