Read more
*आंब्याच्या दिवसात*
सकाळी नातवासोबत मळयात फिरायला गेलो.नातवाला आंब्याखाली करंडुक पडलेली दिसली, धावत जाऊन त्याने ती उचलली. खाणार तोच मी ओरडलो"टाकून दे ,खाऊ नकोस" त्याचा चेहरा प्रश्नार्थक "का खाऊ नको? "कसं सांगू याला पक्षांनी खाल्लेली फळं खाल्यानं *निपाह* हा आजार होतो.?मी रागावल्यानं हातातली करंडुक टाकून तो हिरमुसला होवून माझ्याजवळ येऊन बसला आणि मला माझ्या बालपणातले आंब्याचे दिवस आठवले...
खरं तर अनेक आंब्याच्या समुहाला आमराई म्हणतात पण आम्ही सगळेच लहान मोठे आंबराई म्हणायचो. का तर आंब्याची झाडं म्हणून आंबराई.
आमच्या तिन्ही आंबरायामधे भाऊबंदकीचे वाटे हिस्से होते आणि आंब्यादहाडं प्रत्येकला आपल्या वाट्याचे आंबे (फळं) घेण्यासाठी घाई झालेली असायची.वाटणाराने चार आंबे कमी दिले तरी घेणारे खालवर पाहायचे.एकमेकांच्या कानात कुजबुजायचे"चार आंब्याची काय मोठी गोष्ट?चोखलं की फेकलं.पण याची नियतच वाईट, स्वताःच्या पोटावर आहार वढीतो हा." आंबे पिकल्या दिवसात आमच्या वाट्याचे आंबे घेण्यासाठी मी पोतं घेऊन आंबराईत गेलो की असा आप आपसातला चावळ मला ऐकू येत असायचा.आंबे वाटणारा माणूस भलताच खोडशाळपणा करायचा.आपल्या वाट्याचे.
मोठे मोठे आंबे निवडून आपल्या पोत्यात टाकायचा आणि बारीक, फुटलेले, डागाळलेले आंबे इतरांना द्यायचा.
वहाळाची आंबराई,मधली आंबराई,भिकारमळयाची आंबराई अशा नावांच्या या तिन्ही आंबराया आमच्या मालकीच्या असल्या तरी वा-याने पडलेल्या शाका आणि आंबे गोळा करायला कोणालाही मनाई नव्हती, मनाई होती ती झाडावर चढून,आणि दगड फेकून आंबे पाडायला. पण अर्धा एक तास झाडाखाली बसलं तरी झाडालाच माणसांची किव वाटायची आणि वा-याच्या हलक्याशा झुळकी सरशी पाच दहा शाका पडायच्या. इतका वेळ दम धरून बसलेली माणसं धावाधाव करून शाका गोळा करायची.असं करताना कोणाच्या पायात काटे मोडायचे तर काही ठेचाळायचे पण प्रत्येकाला दोन तीन का होईना शाका,कच्चे आंबे मिळायचेच.त्यामुळे झाडावर चढायची कोणालाच गरज वाटत नव्हती. आमच्या इतकाच गावातील माणसांचा आंबराईवर हक्क होता. हिवाळ्या पावसाळ्यात लाकुड फाटा तोडण्यासाठी, उन्हाळ्यात शाका,करंडूका गोळा करण्याच्या,खाण्याच्या हेतूने मजुर बायका,माणसांचा आंबराईत वावर असायचा.
या तिन्ही आंबराईतली झाडं कोणीही लावलेली नव्हती. ती झाली तशी जगली होती. सगळी गावठी असल्याने त्यांचे आकारमान अवाढव्य तर होतेच पण त्यांच्या फळांच्या चवितही आंबट,गोड शेपट,मधाळ असा फरक होता.तिनही आंबराया घनदाट आणि लांबीने मोठया होत्या.कोणी त्याला आंब्याची ताटी असेही म्हणायचे.
वहाळाच्या आंबराईची लांबी अर्धा किलोमीटरची तरी असेल.सगळी आंब्याची झाडं वहाळाच्या कडानं
एकमेकांच्या फांद्या हाती धरून उभी होती. प्रत्येक झाडाला त्याच्या चवीनुसार नाव होते .जसे की खायला आंबट लागायचा म्हणून आंबटया.एका आंब्याचं फळ आंबट असून काळ्या रंगाचे होते म्हणून काळा आंबटया.एक दसाळया होतो.त्याच्या कोयीला रस कमी आणि दशाच भरपूर होत्या. आमच्या मळईच्या वावरात झिप-या आंबा तर संपत पाटलाच्या मेरावर भोक-या आंबा चार सहा कास-याचे अंतर ठेवून एकमेकांना पाहत उभे होते.या तिन्ही आंबरायांशी त्यांना काही देणंघेणं नव्हतं.वहाळाच्या आंबराईत एक चिकाळ्या आंबा होता.तो खाताना चिक तोंडाला लागायचा त्याने तोंडाची पार चव जायची.पिठुळया तर काहीच उपयोगाचा नव्हता.असून नसल्यासारखा.तशात त्याचा आकारही छोटा,आताच्या अॅपल बोरा सारखा.लुतभ-या कुत्र्याला टाळून पुढं जावं तशी माणसं,पोरं
चिकाळ्याला आणि पिठुळयाला टाळून शेंद-या आंब्याकडं जायची.त्याचा शेंदरी रंग आणि
आकार डोळयात भरायचा.
विजेच्या खांबापेक्षा ही चारसहा फुटांनी उंच असलेला हा शेंद-या आंबा अंगापिंडानं सरळसोट
होता.शेजारच्या झाडा सारखा तो फांद्या फांद्यानी विस्तारलेला नव्हता.साठी अर्धी साठी आंबे निघतील एवढाच काय तो त्याचा विस्तार होता.तो पिकला म्हणजे शेंदूरी रंगामुळे येणा-या जाणा-याचे त्याच्याकडे हमखास लक्ष जायचे. त्याच्यावरती नेहमीच चारदोन पोपट किंवा कावळे मजेत बसून त्याचा रस चाखायचे. सर्वापेक्षा ज्यास्त करंडुका असायच्या त्या शेंद-या आंब्यावरच.तो खायला मधा सारखा गोड असूनही त्याची फळं क्वचितच खायला मिळायची.त्याच्या बहुतेक करंडुका ह्या वहाळाच्या
साचल्या पाण्यातच पडायच्या पण त्याच्या गोडव्यामुळे मी पाण्यात उतरून त्या गोळा करून पुसून लुसून खायचो.
शेंद-याची एखादी करंडुक मिळाली की पोरांना आभाळ ठेंगणं वाटायचं.त्याच्या करंडुकीसाठी पोरं तासनतास थांबूनही पदरी निराशाच पडायची.
पौष-माघात
मोहराने मोहरून आलेली आंबराई सोनं पांघरून बसल्यागत दिसायची.तिच्या त्या देखण्या रूपाला पाहून कोकीळा तिच्यासाठी गाणी गायची.तिच्या मंजुळ आवाजानं सगळ्यांनाच आंबराईतले दिसामाजी होणारे बदल दिसायचे.मोहरातून हिरवे आंबे डोकावून पाहायचे.वा-याशी झोंब्या खेळायचे.वाढत्या उन्हानं वाढी लागायचे.सुपारी एवढे झाले की भारानं फांद्या झुकायच्या.
आभाळ ढगांनी झाकाळून आले की फळांची गळ व्हायची.
घुंगरागत लगडलेली झाडं वारा येता जाता गदागदा हलवायचा. त्यानं निम्मी अधिक फळगळ
झाल्यानं झाडं हिरमुसल्यागत उभी असलेली दिसायची.नेलं ते वा-यानं राहीलं ते आपलं अशी मनाची समजूत घालून झाडं आहे ती फळं सांभाळायचे.रोजच वा-याशी झोंबी खेळून तयार झालेली फळं देठाला पक्की झाल्यानं वा-याला हुलकावणी द्यायची.फालगून चैत्रातल्या उन्हानं कोयी बाझू लागायच्या.
आंब्याचा गोड आंबट वास शिवारभर पसरला की बाभुळ बनातली पाखरं आवातणं धाडल्यागत आंबराईत चकरा मारू लागयची.आंब्याची फळं निरखून,चांगली पाहून टोचालायची.आंबराईतून फिरणा-या कोणाला ना कोणाला करंडूक पडलेली दिसायची.
आपला आंबटया आंबा पाडी लागलाय तो घरात सांगायचा.
पुराव्यादाखल करंडुक दाखवायचा.कापून प्रत्येकजण चिरी चिरी खायचा.खाताना तोंड कसनुसं व्हायचं. घरातलं
जाणतं खोड बोलतं व्हायचं
"एवढ्या लवकर उतरवला तर आवपडया व्हईल.आढीत पिकणार नही, सडल,वाया जाईल.पावसाच्या पहिल्या धारेत फळ भिजलं तर त्याच्यात गोडी उतरती.पावसाची धार पडोस्तर तरी कळ काढायला लागल" यावर कोणीच काही न बोलता रोहीणीत येणा-या पावसाची वाट पाहत बसायचे. चैत्रात बसलेल्या *गौराईला* बायका पोरी सवसांजेला जोत्यावर बसून गाणी म्हणायच्या *ताडावरती ताड /गौराई येंगुजी लागली येंगुजी लागली*/
*माहेराची वाट गौराई /पाहूजी लागली,पाहूजी लागली*/
*सोडा.सोडा शंकर मला /माहेरी जाऊद्या,माहेरी जाऊद्या*/
*आईची हो नथनी मला/लेवूनी घेऊद्या,लेवूनी घेऊद्या*/
अशी एक ना अनेक गाणी ऐकायला मिळायची,प्रसाद म्हणून
आंब्याच्या कै-यापासून बनवलिलेलं *पन्हं* प्यायला
मिळायचं. *आंबा पिकतो रस गळतो/कोकणचा राजा झिम्मा खेळतो* अशी फेर धरून, नाचून गायलेली गाणी ऐकायला मिळायची ती आंब्यांच्या दिवसातच.
काही दिवसातच हिरव्या आंब्यांचा रंग पिवळसर दिसू लागायचा. ते पाहून जाणा-या येणा-याच्या तोंडाला पाणी सुटायचे.आसपास कोणी नाही असे पाहून तो झाडावर दगड फेकून शाक पाडायचा.आंबट गोड चवीने तृप्त व्हायचा.शेतात काम करणारे दुपारच्या जेवणावेळी मीठ लावून कै-या खायचे.पोपट, कावळे डहाळीवर बसून शाका खाताना त्यांच्या भारानं डहाळ्या हलायच्या, वाकायच्या. अर्धवट खालेल्या शाका करंडुका होवून वा-याच्या तालावर झुलायच्या.आंब्याच्या वासानं आंबराई सुगंधानं दरवळायची.तिचा वास वा-यावर पसरायचा.थळात आंबरई पिकल्याची दवंडी देत वारा गावभर फिरायचा.कधी न दिसणारी माणसं आंबराईत दिसू लागायची.एखादा मळेकरी खोचकपणे विचारायचा"आबा, आज लई दिसातून आंबराईत आले, कुणीकडं वाट चुकले म्हणायचे." त्याच्या बोलण्याचा भावार्थ कळूनही आबा साळसूदपणे बोलायचा"उन्हानं लई घामाघुम झालो म्हणून आलो जरा येळ आंबरईतल्या गारव्याला" आणि तो खांद्यावरचं उपारणं आंब्याच्या बुडाशी अंथरूण झोपायचा.
झोपायचा कसला उगा आपला वा-यानं शाका पडतात का याचा कानुसा घेत पडून राहयचा.तासा दोन तासानं उठून पडलेल्या दहा-वीस शाका गोळा करून ,उपारण्यात गाठूडं बांधून घराकडं निघायचा.
नांगरून उतान्या पडलेल्या ढेकळांना माणसा इतकीचं पावसाची ओढ लागायची.रोहिणी लागल्या की, आभाळात काळ्या पांढ-या ढगाची जत्रा भरायची.
ढगांचे ढोल ताशे वाजू लागायचे.
त्या तालावर वीज नाचू लागायची.
ते पाहून वारा अधिकच
चिभावल्यागत करायचा.
वरातीत नाचण्यासाठी माणसांना एखाद्यानं बळजबरी ओढावं तसा तो झाडांना ओढू पाहायचा.झाडं फांद्याचे हात आणि शेंड्याची मान हलवून त्याला नकार देऊ लागली की, तो त्यांना रागाने गदगदा हलवायचा. असं केल्याने आंबराईत आंब्याचा पटारा
व्हायचा.ही संधी साधून माणसं पोते ,गोण्या,पाट्या घेऊन तयारच असायचे.आंबे वेचण्यासाठी मोठी झुंबड उडायची.हीच वेळ साधून पाऊस टपो-या थेंबांनी कोसळू लागायचा.काही क्षणात आंबराई पावसात न्हाऊन निघायची.
तिच्या फांद्या पानावरच्या
धारांनी माणसं ओलीचिंब झाली तरी पाटी,अर्धी गोणी आंबे वेचून घराकडं निघायचे.पावसात भिजण्याचा आणि शाका वेचण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेह-यावर दिसायचा.
दिसा दोन दिसाआड पाऊस गरजायचा, वरजायचा.धारा धारांनी कोसळायचा.मृगातल्या पाऊसधारांनी मातीची आग शांत व्हायची.ओल्या मातीचा सुगंध चराचरात चैतन्य उत्साह भरायचा.चकराला म्हणून आजी सोबत मलाही आंबराईत जावं लागायचं.तेव्हा आजीचं आणि आंबराईचं रूप मला सारखचं वाटायचं. आजीची हिरवी इरकल आंबराई नेसली आहे की ,आजीच आंबराईची हिरवाई नेसली आहे.इतक्या बेमालूमपणे त्या एकमेंकीत मिसळलेल्या दिसायच्या.कुपाटीत पडलेली एखादी पिवळी शाक आजीचे लक्ष वेधून घ्यायची.
"बाळू,कूपाटीत शेक पडलीय ती पाहाय,तेवढी काढ बरं."मी कुपाटीत लोहकून पाहयचो.पिवळी शेक पाहून तोंडाला पाणी सुटायचं.शेक काढण्यासाठी काट्या कुट्याच्या फांद्या बाजूला वारून शेक काढायचो.ती आजीच्या हातात,देताना आपण फार मोठं काम केल्याचा भाव माझ्या चेह-यावर असायचा.आजी शेक सोलण्या आधी देठ चिमखून पिळायची.कातडं सोलून मला खायला द्यायची आणि ती कोय चोखायची. आंब्याच्या रसा इतकेच गोड भाव तिच्या चेह-यावर दिसायचे.आंबराई पिकली की तिची पोळी पिकायची
आंबे विकून आलेले सगळे पैसे तिच्या मालकीचे असायचे. आंबे पिकवण्यासाठी ऊसाचे चिपट लागायचे ते तिने ऊसाच्या
खोडव्यातून गडी माणसांच्या
मदतीने गोळा करून खळ्यावर भेले बांधून ठेवलेले असायचे.
आंब्याला आलेला भरपूर बहर पाहून आजीची कळी खुलायची. कधी अचानक आलेलं वारा वावधान तिच्या आनंदात विरजण घालायचं. तेव्हा तर ती भलतीच कावलेली असायची."काय करावं ग ह्या रांडकीच्याला.
काळतोंडयानं आंब्याखाली सारा पटारा करून ठिवलाय.तुलानं माला अन घाल कुत्र्याला अशी गत दर सालाच्या सालाला करतोय.कोण्या जल्माचा दुसमन दावा साधतोय रांडकीच्चा ऽऽ बोडकीच्चा ऽऽ"
आजी अशी दातओठ खाऊन बोलू लागली की मला तिची भीती वाटायची.पण एरव्ही तापट,
चिडखोर असलेला तिचा स्वभाव आंब्याच्या दिवसात मात्र मधाळ आंब्याच्या रसा इतकाच गोड व्हायचा.बहुदा आंब्याच्या अधिक सहवासात राहिल्यानेच तिच्यात आंब्याचा गोडवा उतरत असावा.
सवसांजेला आजी मी मागितलेले नसतानाही माझ्या हातावर गुळखोबरे ठेवायची.तेव्हा आजी आपल्याला काही तरी काम सांगणार आहे याची जाणीव
व्हायची.अर्धेअधिक गुळखोबरे खात असतानाच आजी म्हणायची "बाळू, माझं एक काम करतो का?"मी गोड घास
गिळताना नुस्ताचं होकारार्थी मान हलवायचो.
"शेरातल्या रामाला म्हणावं आंबटया आंबा पाडी लागलाय उद्या उतरावायला ये." आंबा उतरावायचा म्हणल्यावर माझ्या अंगात भलताच उत्साह संचारायचा.कारण रामा मला भरपूर शेका खायला द्यायचा.रामाला निरोप सांगण्यासाठी कधी मित्राला सोबत घेऊन तर कधी एकटाच जायचो.रामा आपल्या खोपीच्या दाराशी मासे पकडण्यासाठीचं जाळं विणीत बसलेला दिसायचा तर कधी निवांत चिलीम ओढीत असायचा.मला पाहून त्याच्या चेह-यावर हसू दिसायचे.
गावनात्यानं तो माझा भाऊ लागायचा.रामा जसा आंब्यावर चढण्यात पटाईत होता तसा तो मासे पकडण्यातही तरबेज होता.त्याचा हातगुण की काय पण त्याने पकडलेला मासा चवदार लागायचा. आजीला मासा खावा वाटला की मला रामाकडे मासे आणायला जावं लागायचं."रामादादा,तुला उद्या आंबटया आंबा उतरावायला आजीनं बोलावलय." मी एका दमात आजीचा निरोप सांगून मोकळा व्हायचो.
"आजीला सांग,दोन माणसं सारण उतरवायला पाहून ठिव. मी येतो चहाच्या वखता पोहतर."
रामादादाचा असा होकार मिळाला की मी आनंदाने उड्या मारत घराकडे पळायचो.
आंबटया आंब्यात आमचा निम्मा वाटा आणि उरवरीत निम्या वाट्यात दोन चुलतभावांचे वाटे होते. रामा सकाळी उंच काठीचं झेलं आणि सुताच्या दोरीने विणलेली जाळीदार सारण घेऊन आला की मी, माझे दोन चुलत भाऊ रामाच्या मदतीला तयार असायचो.रामा आधी चिलीम ओढायचा मग झाडावर चढून फांदीच्या बेचक्यात बसून झेल्यानं आंबे तोडायचा.पाच-सहा आंबे तोडून झाले की,झेलं जवळ घेऊन एक एक आंबा टांगलेल्या सारणीत टाकायचा.असं करताना एखादा आंबा खाली पडून फुटायचा.त्याच्या हाताला नरम शाक लागली की स्व:ता जवळ असलेल्या पिशवीत टाकायचा.
त्या शाका त्याच्या मालकीच्या असायच्या. मग त्या दिवसभरात किती का असेना.कधी त्या पाटी दोन पाट्या भरायच्या.अशावेळी त्याची त्यालाच लाज वाटायची.
मग तो पिशवीभरून घ्यायचा आणि बाकीच्या आम्हाला खायला द्यायचा.पाण्यानं पखाल तटट फुगावी तशी *सारण* आंब्यानी भरलेली दिसायची.
सारणीला बांधलेला दोर सैल करून तो सारण खाली सोडायचा.ती घेण्यासाठी आम्ही तयारच असायचो.सारणीतले आंबे खाली केले की रामा सारणीच्या च-हाटाची गाठ फांदीला बांधून झेल्यानं पुन्हा आंबे उतरवू लागायचा.
अधूनमधून खाली उतरला की आम्हाला *शाका* खायला द्यायचा.सूर्य मावळतीला जाई पर्यंत साठीभर आंबे उतरवून झाले की रामा झाडावरून खाली उतरायचा.शाकांची भरलेली पिशवी ,सारणी आणि झेलं
खांद्यावर टाकून घराकडं निघायचा.आंब्यांची वाटणी करायला कोणी बसावं या विचारात असतानाच माझा मोठा चुलता येताना दिसायचा.त्याला पाहताच मी आणि एक चुलत भाऊ नाराज व्हायचो पण सकाळ पासून आमच्या सोबत असलेल्या त्याच्या मुलाला बापाला पाहून आनंद व्हायचा. गळ्यातलं उपारणं डोक्याला बांधून तो आंबे वाटायला बसायचा.सहा आंब्यांची एक फाडी असं माप असायचं दोन्ही हातात सहा आंबे घेऊन लाभं म्हणून एक फाडीचे आंबे त्याच्या मुलाने धरलेल्या पोत्यात
टाकायचा.पुन्हा सहा आंबे आपल्याच पोत्यात टाकून एकंहऽऽ पासून मोजायचा.
आमच्या पोत्यात सहा आंबे तर त्याच्या पोत्यात बारा आंबे
असायचे तेही निवडक.आमच्या वाट्याला मात्र डागाळलेले,
आकाराने लहान,एक अर्धा फुटका,पिचका.तो आंबे वाटायचा म्हणजे आमच्यावर जणू उपकाराच करायचा.त्याचं रूप आणि बोलणं भलतच सोज्वळ,लाघवी. "मापात पाप नको." असं साळसूदपणे बोलायचा. कधी आजी वाटे करायला असली की तेव्हा मात्र त्याची गोगलगाय व्हायची.
खळयावरून आणलेले चिपटाचे भारे आजी नऊ खणाच्या माडीत पसरावून ठेवायची. वाट्याला
आलेले आंबे गरम पाण्यात धुवून चिपटात पिकत घालायची.त्याला *आढी लावली* असे म्हणायचे.आठ-दहा दिवसात आंबे पिकले की बैलगाडीची साठी भरून सायखेडयाच्या बाजारात नेऊन विकायची.
आलेल्या पैशानं तिची कंबरेची पिशवी फुगायची.त्या आनंदात घरात आंबेरस करायला सांगायची.
आंब्याच्या दिवसात आमची खाण्याची तर आजीची पैशांची चंगळ असायची.शाका खायला मिळायच्या म्हणून मी रामाच्या मदतीला असायचो तेव्हा एका गोष्टीचं मोठं नवल वाटायचं.
वहाळाची निम्मी अधिक आंबराई तुकाराम बाबाच्या शेताच्या मेराला लागून त्याच्या
हद्दीत होती पण त्या आंबराईत त्याचा वाटा नव्हता. वर्षभर आंब्याच्या *सायवडानं* त्याची पिकं चांगली येत नव्हती, शिवाय त्याला आंब्यात वाटा नाही. हे माझ्या बालपणाला अन्याय केल्यासारखं वाटायचं.पण नंतर मला समज आल्यावर समजलं त्याच्या आज्यानं अडचणीच्या काळात आपला आंब्याचा हिस्सा शेजारच्या कुणब्याला विकला होता.त्याची कुठे *लिखापळी* नव्हती पण दिलेल्या शब्दाला जागणारी माणसं पिढ्यानं पिढ्यांचा शब्द पाळून इमाने इतबारे हिस्सा वाटा देत होती. ज्याच्या मेरावर आंबे नाही,ज्याला शेतीवाडी नाही अशा माणसांच्या घरी आंब्याचा *वानोळा* देत होते हेतू हा की त्याच्याही
बालबच्चांच्या मुखात चार गोड घास पडावेत.
तीस वर्ष तरी झाली असतील, आमच्या ह्या तिन्ही आंबराया तोडण्यासाठी आमच्याच नऊखणाच्या माडीला लागून असलेल्या जोत्यावर भाऊबंदकीची बैठक बसली. "आरे,नका रे तोडू आंबराई.चार आंब्याच्या निमतानं का व्हईना माणसं एकमेकांच्या मेरावर जाता येतात, वर्षभरातली भांडण तंटे विसरून भाऊबंद वाट्या
हिश्यासाठी एकमेकांशी बोलतात.एवढं तरी निमित राहू द्या रे बोलायला"जुनी जाणती खोडं पोटतिडकीने समजावून सांगायचे पण प्रगत विचारांची *कास* धरलेल्या तरूण पिढीला
हे पटलं नाही त्यांनी नाशिकच्या ठेकेदाराला आंबराया विकून
हिश्या वाट्या प्रमाणे आलेले पैशे वाटून घेतले आणि पिढ्यानपिढ्या एकमेकांना धरून असलेले भाऊबंद दूर झाले.'कोणाला पायही लावायचा नाही आणि पायाही पडायचं नाही' या विचाराने, वृतीने जो तो वागू ,वरतू लागला.
आंब्याच्या दिवसात मीआंबरईत बसून किती तरी शाका गोळा करून खालल्या,पोपट कावळयांनी आपल्या चोचींनी करंडलेल्या करंडूका गोड लागतात म्हणून आवडीने चाखल्या.तिथेच बसून वहाळाचं पाणी त्यावर आलेली घाण बाजूला सारून प्यायलो.पिकाला पाणी भरताना पाटातलं गडूळ पाणी पालथ पडून बुट्टी लावून प्यायलो.उन्हं भरल्या दिवसात अनवाणी पायांनी तापल्या फुफाट्यातून चाललो.दगड गोटयावर मिर्ची वाटून खाल्ली.नाकातोंडात पाणी गेलं तरी नदीच्या पाण्यात डुबक्या
मारल्या. हातापायाला जखम झाली तर वाटेवरची माती लावली. असं करताना, काही खाताना हे करू नको, असं केलं, खाल्लं तर तुला रोग होईल,आजार होईल असं कोणी बोलत नव्हतं आणि मीही आजारी पडत नव्हतो.आत्ताच लहान मुलांना ही बंधन का? आपण मुलांचा बालपणातला आनंद हिरावून घेत आहोत का? नातू नाराज होवून माझ्या जवळ बसला आहे. देऊ का त्याला करंडुक खायला.? नको,नको हा कशानेही आजारी पडला तर सून मुलगा आपल्यालाच दोष देतील.
"बाबा,चला ना घरी" नातवाच्या बोलण्यानं माझ्या आठवणींची साखळी तुटली.उठून झाडाचा हाताजोगता आंबा तोडून नातवाच्या हातात दिला आणि करंडूक मागे टाकून आम्ही
दोघंही एकमेकांच्या आधाराने
घराच्या दिशेने चालू लागलो.
---विजयकुमार मिठे
9881670204

0 coments