Read more
कोरोना
लेखक - विजयकुमार मिठे
------------------------------
चैत्रातली उन्हं कढंत पाण्यागत तापली होती.घामाघुम झालेला वारा झाडांच्या पालवीत धापा टाकीत बसला होता.म्हातारा गेल्याच्या मागं म्हातारीनं कपाळावर काळा बुक्का लावावा तसा निरभ्र आभाळानं मध्यावर काळ्या ढगाचा टिळा लावला होता.त्याने आभाळाचं रूप पंढरीला निघालेल्या वारक-यागत दिसत होतं.अशा रणरणत्या उन्हात लिंबाच्या सावलीला बसून चंदर द्राक्ष बागाची राखणी करीत होता.साखरेनं द्राक्ष मण्यात गोडी भरल्याने पाखरांच्या चोची गोडवा
चाखायला चटावल्या होत्या.
दुधाच्या पातेल्याभवती घुटमळणा-या मांजराला हुसकावुन लावावं तसा चंदर बागेवर आलेल्या पाखरांना उडवून लावीत होता.माणसांनी दंगल माजवल्यागत शिवारात पाखरांनी दंगा केला होता.पाखरं बेडर झाली होती.चंदरच्या गल्लोरीतले दगड बंदुकीतून सुटलेल्या गोळीगत सू ...सू आवाज करीत पाखरांच्या दिशेने
झेपावत होते.जरा कुठं पाखरांचा हाराहुरा झाला की चंदर हातातल्या मोबाईलवर खेळत होता.बायजाईनं सुपातल्या गव्हातून बोटाने खंडे निवडावे तसा तो मोबाईलच्या स्क्रीनवर बोट फिरवून व्हाटसप,फेसबुक वरचे मेसेज पाहात होता.कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानाच्या बातम्या वाचून, ऐकून त्याचं डोकं सुन्न झालं होतं.गुपीत बाबाच्या डोहाकडील बाजूनं बागावर पाखरांचा मोठा थवा बसला पण मोबाईल पाहण्यात गुंग
झालेल्या चंदरचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं.बागाच्या कोप-याकडून चंदरच्या दिशेने येणा-या रामराव मानमोडेनं टाळ्या वाजवून हा..हू करीत पाखरांना उडविलं तसा त्याच्या आवाजानं चंदर भानावर आला.हातातला मोबाईल खिशात ठेवून त्याने बाजूला पडलेली गल्लोर उचलली आणि पळणा-या
चोराच्या पाठी लागलेल्या पोलीसानं बंदुकीतून गोळी झाडावी तसे त्याने गल्लोर ताणून
पाखरांच्या दिशेने दगड भिरकावले. पोलीस मागे लागलेल्या टोळक्यानं जीव घेवून पळावं तसा पाचपन्नास रगेल पाखरांचा थवा जांभळीच्या दिशेनं झेपावला.काठीच्या आधरानं चालत आलेला रामराव चंदर जवळ बसून म्हणाला,
'पोरा,दिवसभर मोबाईल मधी डोकं घालून बसतोस.काये रे त्याच्यात एवढं पाहण्यासारखं?
खिशातला मोबाईल काढून हातात घेताना चंदर म्हणाला ' जाऊ दे ना
बाबा, तुझ्या डोक्याबाहेरचा विषय आहे तो,तुला नाही कळायचा"
"खरं आहे पोरा,आमच्या पिढीच्या हातात मोबाईल नव्हता म्हणूनच आमचे डोके तरी ठिकाणावरय.तुमच्या सारखं बावचळल्यागत नही व्हत
आम्हाला. तुम्ही बसता रातन दिस मोबाईल मधी डोकं घालून"
"बाबा,तुला एक बातमी ऐकवली तर तुझं डोकं ठिकाणावर राहणार नाही "चंदरच्या अशा बोलण्यानं रामरावची उत्सुकता अधिकच ताणल्या गेली.
"चंदर ऐकू दे रे मला काय बातमीये ती "
"नको, नको.बातमी ऐकली तर तुझं चित्त था-यावर राहणार नाही.तुला अन्न पाणी गोड लागणार नाही." चंदर टाळाटाळ करू लागल्याचं पाहून
रामराव स्वतःशीच हसला.चंदरकडे पाहत म्हणाला '
"करोना का फरोना नावाचा रोग आलाय तीच बातमी
ऐकवणारयना मला तू?.अरे येडया परवाच्या दिवशीचं मी ती बातमी आमच्या घरातल्या टि व्ही वर पाहिली. चीन देशात हा रोग आलाय ना."
"बातमी ऐकल्या शिवाय तुझं समाधान होणार नाही. हा घे मोबाईल ऐक ही बातमी " चंदरने दिलेला मोबाईल कानाशी धरून रामराव ऐकू लागला. बातमीतलं भयानक वास्तव ऐकताना त्याच्या
हातापायाचं कापरं झालं. चेहरा पांढराफटक पडला.हातातला मोबाईल चंदरकडे देवून
काठीच्या आधारानं तो उठून उभा राहीला आणि अवसान गळाल्या बैलागत पाय ओढीत घराकडं निघाला.सतत एकाच सूरात गुणगुणा-या भुंग्याच्या आवाजानं डोकं पिकावं तसं त्या बातमीनं त्याचं मन पोखरून काढलं.
दोन दिवस झाले रामरावची झोप उडाली होती.आताही त्याच्या डोळयाला डोळा लागत नव्हता.आयुष्यभर कमावलेली पुंजी डोळयादेखत चोरानं चोरून न्यावी तशी त्याची झोप त्या बातमीनं पळवून नेली होती.
त्याचं मन सैरभैर झालं होतं. विचारांच्या वावटळीत गिरक्या घेत होतं.' जीवाभावाची बायको गेली त्यालाही आठ वर्ष झाली.ती गेली सौभाग्याचं लेणं घेवून,भरल्या कपाळानं गेली.तिचं सोनं झालं.तिच्याविना जगण्याची रयाच गेली.बायको गेली अन वसरीचा पाहुणा म्हणून जगणं नशीबी आलं.जगायचं तरी कशासाठी अन कुणासाठी?चार पोरं, ते ही चार त-हाचे.सारेच हेंगाडेंगीनं वागणारे. बाप जेवला काय,मेला काय काहीच देणं घेणं नसल्यागत बावनबीर झालेले.सुनामुलांचं राज्य आलं आणि आपलं अस्तित्वच संपलं. दुखणं बहाणं आलं तर चार
दिडक्यासाठी पोरापुढं हात पसराचे.त्यांचं देणही उपकार केल्या सारखं.देताना पाहीलचं एखाद्या सुनेनं तर "आम्हीच काही तुमचा ठेका घेतला
नाही.सगळ्यांना दिलं सोडून अन बसले आमच्याच मुळावर येऊन. आम्ही आमच्या लेकराबाळांचं पाहू का तुमचं?."
सुनेचं असं टचा टचा टोचून बोलणं ऐकलं की वाटतं 'नको हे जगणं. त्या पेक्षा मेलेलं बरं.' पण जीव जात नाही. जीव काय चिडीमुंगीय का चिरडून टाकायला.?सारा सातबारा पोरांच्या नावावर करून दिला अन आपण बसलो हातावर हात धरून. आता विचार करण्यात काय अर्थ आहे. मोरा गेले तूझे पाय आता रडून उपयोग काय.
देवा आता एकच इच्छा मरण तरी सुखाचं येऊ दे. या करोनाच्या महामारीचं मरण नको रे बाबा.'
*भाग दुसरा*
तांबडं फुटायच्या बेताला घरामागील लिंबाच्या झाडावर कावळ्यांची काव वाढली तसा रामराव अंथरूणात उठून बसला.आळयापिळया देऊन त्यानं आळस झटकला.झोपेचं पार खोबरं झाल्यानं त्याच्या डोळ्यात लाली उतरली.
कपडयाची वळकटी बाजूला सारून तो बंगल्याच्या बाजूला असलेल्या बाथरूममध्ये आंघोळीला गेला.सौर उर्जेवर तापलेल्या कोमट पाण्यानं त्यानं मनसोक्त आंघोळ केली.आंघोळ करतांना त्याला बायकोने चुलीवर तापवलेल्या पाण्याची आठवण झाली." चुल फुकण्यातच बिचारीचं आयुष्य गेलं आणि सुनांना आता ऐषोआरामाचं राज्य आलं.असतं एक एखाद्याचं नसीब.श्रीहरी श्रीहरी "असं स्वतःशी पुटपुटतानाही त्याचे डोळे भरून आले. उरलंसुरलं बादलीतलं पाणी अंगावर घेवून धोतरानं अंग पुशीत तो
बाथरूमच्या बाहेर आला.
कपडे बदलत असतानाच त्याने पुर्व दिशेला पाहीलं.सुर्याचा तांबूस गोळा वर आला होता.पुजा-यानं कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावून देवपूजेला निघावं तसं आभाळ तो तांबूस टिळा लावून उभं होतं.आपोआप नमस्कारासाठी त्याचे हात जोडले गेले.सुर्य दर्शनाने मन प्रसन्न झाले. तो बैठकीत येऊन बसला.घरात शांतता होती.रात्री उशीरापर्यंत टिव्ही वरच्या मालीका पाहात बसलेलं घरदार अजून अंथरुणातच लोळत पडलं होतं. मोठी सूनबाई तेव्हढी उठलेली दिसत होती.तिला बैठकीत बसलेल्या सास-याची चाहूल लागली. काही न बोलता तिने त्याच्या पुढे चहा आणून ठेवला आणि ती बाथरूमच्या दिशेने आंघोळीला निघून गेली.सास-याच्या वागण्यातला बदल तिच्याही लक्षात आला होता. दोन दिवसापासून सासरा देवपूजा करीत नाही याचं तिला आश्चर्य वाटत होतं पण तिनं त्या बद्दल शब्दानही विचारलं नाही. चहा पिऊन होताच कोप-यातली काठी हाती धरून तो मारूतीच्या देवळाकडे निघाला.हातातल्या काठी सारखचं त्याचं अस्तित्व आता उरलं होतं. गरज लागेल तेव्हा हाती धरायचं,एरव्ही अडगळीत पडून राहायचं.
अर्ध्या रस्त्यातच त्याला माळयाचा मधू भेटला.त्याच्याकडं पाहून तो हसला तसा मधू म्हणाला,
" रामूतात्या, काय चाललंय तुझं."
"माझं काय चालायचं आता ह्या वयात.माझ्या गव-या गेल्याय पार म्हसणात.तुझं काय चाललंय ते सांग मला"रामराव डोळयावरचा चष्मा सावरीत म्हणाला.
"तात्या, तू विचारू नाही अन मी सांगू नाही असे दिवस आलेत आता" मधू कसनूसं तोंड करून म्हणाला.
"अरे,लेकरा काय झालं ते तरी सांग."असं बोलत असतांनाच त्यानं आपला हात सांत्वनसाठी त्याच्या पाठीकडे नेला तसा मधू मागं सरकत ओरडलाच.
"तात्या,लांब हो.माझ्याजवळ येऊ नको."
"का रे ? काय झालय तुला? त्यानं चबगारल्यागत विचारलं.
(क्रमशा)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
Kadva shivar
कादवा शिवार


0 coments