Read more
चणे फुटाणे*
जे लोक देश विकत नाहीत
ते शहरातल्या फुटपाथवर
चणे फुटाणे विकून जगतात
ते करीत नाहीत
संसदीय वल्गना
घामाने श्रम शक्तीला खरवडून
बापजाध्यांनी दाखवलेल्या
कष्टकरी मार्गाने जात
इज्जतीच्या कातडीला
ते ठिगळ जोडीत जातात
ते जगतात नेहेमी
भरडल्या जाणाऱ्या व्यवस्थेच्या
चौथ्या वर्णातून
सत्तेत बसलेल्या त्यांच्या शत्रूशी
करता येत नाही त्यांना
जगण्याच्या गाठी सोडवण्याचा
सरळसोट व्यवहार
इतिहासाच्या पुरातून
वाहून आलेल्या
स्वातंत्र्य नावाच्या भांड्यात
अंघोळ केल्यापासून
रखरखीत पडलीय त्यांची त्वचा
लोकशाहीचे सगळे रोग
अंगाला चिकटलेत
काखेतल्या गोचीड बनून
ते खाजवतात
सोशिकतेने बगला
आणि
मंदिर मशिदीत जाऊन
उघड्या डोळ्याने
सगळ काही पहात बसलेल्या
अल्लाकडे मागतात
पोटातल्या अजगरासाठी दुवा
ते करतात
पुन्हा पुन्हा मतदान
एक जुलमी शासन घालवून
दुसरे जुलमी शासन निवडतात
आपल्या बोडख्यावर
राज्य करण्यासाठी
जे पहिल्या पेक्षा जास्त
हिंस्र वागतात त्यांच्या भाकरीशी
निद्रानाश जडावा
अशा चिरीमिरीला
ते विकले जात नाही
आणि सश्याच्या काळजाने
अंगावरची गोचीड
नखाने काढू शकत नाही
ते अडवतात फक्त फुटपाथ
महामार्गावर उतरून
पोट भरू लागलो तर
.भरडले आणि चिरडले जाण्याची भीती
बाळगतात
घटनेच्या बेड्यांनी जखडलेल्या
जाणिवेतून
शहाणपणाच्या मार्गावरून
आपली भूक शमवित
दमण यंत्रणेच्या व्यवस्थेला
शरण जात
ते जगतात
फक्त चणे फुटाणे विकून
प्रा...साईनाथ पाचारणे
राजगुरूनगर
९६२३८६२६४६
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099

0 coments