Read more
काळ्या भुईचं लेकरु
सदा मातीत रमते
तिच्या लाडक्या बळीला
जग पोशिंदा म्हणते..!
सुर्य उगवण्याआधी
शेती कसण्यास जातो
घाम गाळुन देहाचा
ओल भुईला आणतो..!
तृण कापुन विळीनं
काया सुंदर करतो
धान्य पेरूनी सखोल
ओटी वसुची भरतो..!
मुकी बैलजोडी त्याची
नित्य सोबत असते
प्राणप्रिय सखे दोन्ही
साथ आयुष्याची होते..!
बळी खिल्लारी जोडीला
उन्ह येताच जपतो
चारा खाण्यास दोघांना
झाड बघुनी बांधतो..!
सारं कष्टाचं जीवन
बळी भुईत झिजतो
जीव थकता दुपारी
घास गोडीत गिळतो..!
आशा ठेवुनी हृदयी
बळी धान्य पिकवतो
भार कर्जाचा सोसून
जग अवघं पोसतो..!
खेळी शेतीचा जुगार
कुठे बापुडा जिंकतो
भाव भेटेना पिकाला
दरवर्षी तो हारतो..!
✍🏼कवी-देवदत्त बोरसे✍🏼
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
Kadva shivar
कादवा शिवार

0 coments