Read more
खोड
ग्रीष्माची भर दुपार.नजर शोधते राहते ..कुठे एखादे झाड दिसते का? घटकाभर जीवाला विसावा तरी मिळेल.
गारवा तरी भेटेल.झाडाच्या थंडगार सावलीत अंग टाकले की डोळे आपसूकच मिटतात. झाडाखाली बसल्यावर रखरखीत उन्हाच्या झळानी झालेली जीवाची तलखली कमी होते .हिरव्यागार पानांच्या सानिध्यात मनास टवटवी येते. झाडाच्या गर्द शीतल सावलीत मन विसावते.घराजवळ असलेल्या शेताच्या तालीवर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली बसून त्याच्या थंडगार छायेत कित्येकदा मी माझा अभ्यास करत असे.. चित्तवृत्ती प्रसन्न होत असत.अभ्यास करून संध्याकाळी घरी परतताना सूर्यास्तही याच झाडा खालून पाहत असे..आभाळात शेंदरी रंग पश्चिमेला क्षितिजावर विखुरलेला दिसे.त्यात तो संथ गतीने मावळणारा सूर्य.आणि तो बुडाला तरी संध्यारंग आभाळी रेंगाळत असे.याच झाडाच्या बुंध्याला टेकून बसून मनसोक्त पुस्तके ,कादंबऱ्या वाचनातला आनंद घेतला आहे. मनातली गूज त्या झाडाच्या सहवासात सांगितली आहेत.वाचता वाचता एकदा सहज त्या आंब्याच्या झाडाच्या खोडाकडे लक्ष गेले.काळ्या सावळ्या रंगांचे खरखरीत ते खोड,त्याच्या मध्ये असलेल्या उभ्या भेगा,कुठे मधेच आलेला टेकडीसारखा उंचवटा,थोडं वर पाहिलं तर त्याला दोन फांद्या फुटल्यामुळे इंग्रजी वाय आकाराची तयार झालेली खोबणी
हे सारे नजरेत भरले. त्या खोडावर चढून त्या वाय आकाराच्या खोबणीत बसता येत असे. त्यावर चढूनही बसत असे .खाली खोडावर बारीक मुंग्या लगबगीने चाललेल्या दिसल्या.त्या खडबडीत खोडावरून मोठ्या शिताफीने त्या आपला रस्ता धुंडाळत वर जात होत्या.खोडाचा स्पर्श जरी खडबडीत असला तरी वरच्या विस्तीर्ण पसरलेल्या हिरव्या पर्णसंभाराला ,बाहुप्रमाणे पसरलेल्या फांद्यांना आपल्या ताकतीने त्या खोडाने अगदी सहजरित्या पेलले होते. म्हणजे त्या भक्कम खोडावर छत्रीसारखे झाड तोलून डौलात उभे होते. त्या आंब्याच्या झाडाशी असे नकळत मनाचे नाते जुळले.माझ्या अभ्यासाचा तो मूक साक्षीदार .झाडांचे ,फुलांचे मनाला लहानपणापासून वेड लागलेले .झाडाच्या खोडांचे बारकाईने निरीक्षण करण्यात एक वेगळाच आनंद वाटू लागला.
आंब्याच्या झाडाच्या खोडावर आयताकृती खरखरीत संरचना तशीच सीताफळाच्या झाडावरही दिसून आली.फक्त सीताफळाचे खोड मात्र छोटे. यानिमित्ताने आणखी झाडांच्या खोडाकडे निरखून पाहिले असता पेरुच्या झाडाची साल मऊ असल्याची व त्या सालीचे पोपडे निघत असल्याचे दिसले. त्याच्या वर कसलेही ओरखडे नाहीत.स्पर्श केला तर गुळगुळीत लागे.मुंग्यांची लगबग इथेही दिसली.पण खोड मऊ असल्याने त्यांचा धावण्याचा वेग जास्त होता.
रोज रात्री शतपावली करताना अंधारातही नजरेत भरायचे ते निलगिरीचे खोड.कारण अंधाराच्या कॅनव्हासवर ते उठून दिसायचे.पांढऱ्या सोलीव खोडावर सतत नवीनता आल्याचे जाणवे. मूळ खोडावरचे साल वाळून पोपडे धरून सुटत असे.कात टाकल्यावर झळाळून येणाऱ्या नागिणी सारखे त्याचे खोड नवेपणाने चमकत असल्याचे दिसे.दुरुनही ते दृष्टीस सुखावे.इतर झाडांची खोडे रात्रअंधारात मिसळून जात.पण हे धुवट रंगाचे लेणे मिरवत वाऱ्यावर चवऱ्या ढाळत उभे असे.जोरदार वारे,वादळ याला सोसत नसे.फांद्या कडाड मोडून ते कधी कधी कोसळतेही. जांभळाचे खोड खरखरीत
असले तरी त्यावर चढून जांभळं खाण्याची मजा काही औरच असे.खोडांचे रंगरूप,पोत पाहता पाहता असे लक्षात आले की खोडाखोडात खूप विविधता आहे. पसरणीच्या घाटात फ़ुललेली काटेसावर आधी खोडा फांद्यांवर काट्याचा साज मिरवत असे. खोडावर काटे मिरवणारी जशी काटेसावर तशीच बिनकाट्याचीही पाहिली. अणकुचीदार काटे खोडावर घेऊन सदा हिरवळलेली बाभूळ ऐन बहरात पिवळ्या फुलांनी मोठी सुंदर दिसते. इतके काटे असूनही शेळी काटे वगळून तिचा पाला कसा खात असेल हा प्रश्न सतावत राहतो मनाला. दुष्काळी पट्ट्यात कमी पाण्यात येणारी ही बाभूळ कित्येक घरात चुलीला सरपण म्हणून वापरली जाते.तिच्या खोडावरील डिंकही औषधी असतो.असे बाभळीचे बहुपयोगी झाड दुरून पाहिले तर छत्रीसारखे दिसणारे.
दाट धुक्याची पखरण , कुडकुडणारी थंडी,अंगाला झोंबणारे गार वारे अशा काहीशा अंगावर शहारे आणणाऱ्या
वातावरणात ऑगस्ट मध्ये महाबळेश्वरला हजर झाले होते.तेव्हा नजरेत भरली होती ती हिरवाई अंगभर लपेटून धुक्याच्या जादुई सुरात सूर मिसळणारी झाडे .खोडावर, फांद्यांवर मऊ गुबगुबीत हिरव्या शेवाळाचा तो अद्भुत टवटवीत नजराणा पाहताना मन भारावून गेले होते. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने प्रत्येक झाड ,त्याचे खोड असा नवा साज घालून उभे असलेले दिसले. हात लावून पाहिले असता
मऊ वेलवेटच जणू .मूळ खोडाचा रंग काळा असेल तर हे ताजे पोपटी हिरवे नाजूक मलमलच्या कापडासारखे वस्त्र झाड लेवून दिमाखात उभे असे.पावसाच्या माऱ्याने कधी कधी झाडावर एकही पान दिसायचे नाही.पण म्हणून हे झाड कधी उदास दिसले नाही. निसर्गाने त्याला हिरव्या रंगात रंगवून ठेवलेले. शुभ्र दाट धुक्याच्या कॅनव्हासवर हे असे झाड पाहणे म्हणजे एक पर्वणीच. पुढे खूप दिवस हा साज घेऊन झाडे डोलताना दिसायची. वडाचे झाड सहसा कधी निष्पर्ण दिसले नाही .पण पावसाळ्यात ऑगस्ट मध्ये एकही पान झाडावर नसलेले ते वडाचे झाड आपल्या अंगाखांद्यावर पावसाला अगदी आनंदाने झेलत होते. फांद्या आणि पारंब्या,खोडावर अगदी बेचक्यातही हिरवाई वाढलेली. पर्णसांभार पूर्ण हरवलेलं ते झाड पाहताना थोडी उदासीन छटा जाणवली.बिनपानाचे हे असे त्याचे रूप काही केल्या नजरेला,मनाला पटेना. यथावकाश पालवी फुटेल आणि ते झाड गच्च पानांनी डवरून येईल या स्वप्नात ते झाड आणि पारंब्या मनभर पसरून राहिले. जिथे जिथे वड दिसला तिथे काही ठिकाणी सावित्रिंनी त्याला आपल्या प्रेमळ बंधनात लपेटून ठेवलेले दिसले. अर्थात थोडा वेळ का होईना त्या खोडाभोवती फेऱ्या घालून सुखावल्या असतील हा भाग अलाहिदा. एकात एक गुंफलेली खोडं आणि कधी कधी पारंब्या जमिनीत टेकून त्याचे झालेले खोडात रूपांतर हे दृश्य आणखीन वेगळे. जणू वडाने आपले हात थकून भागून खाली जमिनीत टेकले आहेत. ते आधार घेत भक्कम उभे राहिले आहेअसं वाटतं. पसरलेले या वडाचे झाडाचे खोड देखील पोक्त ,पण भक्कम. घरातले बुजूर्ग कितीही थकले तरी कुटुंबाला त्यांचा खूप मोठा आधार असतो. म्हणूनच त्याना घरातील खोड म्हणत असावेत. अशा वडाच्या झाडाच्या भक्कम खोडावर जेव्हा कुऱ्हाड चालते तेव्हा
जीव आणखी कासावीस होतो. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या
ही झाडं म्हणे ब्रिटिशांनी लावली होती .वाठार मधून निघणारे रस्ते अशा झाडांनी व्यापलेले दिसतात.त्यापाठीमागील कारणमीमांसा शोधली असता त्यांच्या गोऱ्या बायकांना ऊन लागू नये यासाठी ही व्यवस्था केल्याचे कळले. रस्त्याच्या दुतर्फा वडाच्या झाडांच्या रांगा त्यांच्या लोंबकळणाऱ्या पारंब्या आणि सतत वाहतूक चालू असल्याने वाहनांना धडकून त्या पारंब्याना अर्धवर्तुळाकार छाटल्या गेलेसारख्या
दिसतात.दुरून पाहिले तर त्या झाडांच्या गुहेत शिरल्याचा भास व्हावा. दोन्ही हात पसरून जरी वडाचा बुंधा धरण्याचा प्रयत्न केला तर तो काही आपल्या हातात येत नाही इतका रुंद. रस्त्यावर मधेच वडाचे झाड येत आहे असे दिसताच
त्याला तोडून टाकले तेव्हा मनास वेदना झाल्या. दुसरे एक झाड त्याचा सर्व पान पसारा छाटल्याने खोडच फक्त शिल्लक राहिले होते. काही दिवसांनी त्या खोडावर कोवळी पालवी झुलताना दिसली. हळूहळू सगळे खोड पालवीने गजबजून आले.भल्या मोठ्या खोडावर इवली इवली पाने पाहताना मन भरुन आले.कुऱ्हाडीचे घाव सोसून पुन्हा ते
नव्या आशेने फुलत होते.माणसाने कितीही घाव घातले तरी
फुलण्याचे व्रत त्याने सोडले नाही.
असेच एकदा पावसाळ्यातील एक दिवस फेरफटका मारत असताना एका झाडाच्या बुंध्यावर सुंदर फुलांसारखी बुरशी आलेली दिसली.झाडाच्या बुंध्याला अशी बुरशीचे वलयाकृती पाकळ्यांचे फुलंच जणू तयार झाल्यासारखी दिसत होती. छोट्या,मोठ्या,मध्यम आकाराची ही बुरशीफुलें पायऱ्या प्रमाणे एकावर एक चढलेली पण सुट्टी दिसत होती.धुवट रंगाची ही फुले खूप सुंदर दिसत होती. झाडाच्या खोडावर फक्त ती पावसाळ्यात दिसायची.जसा जसा पाऊस कमी होईल तसतशी ती खोडालाच चिकटलेली व सुकलेली दिसायची.आंब्याच्या खोडावर,फांद्या वर आणखी परजीवी वनस्पतींचे वेल झुलताना दिसायचे. त्याला गोल हिरवी फळं आलेली दिसायची. आणखी पावसाळ्यात काही झाडांच्या फांदीवर छोटी छोटी गुलाबी फुले फुललेली दिसायची . छोटी पातीसारखी पानं आणि त्यात फुलणारी चिमुकल्या फुलांचे झुपके वाऱ्यावर झुलत असायचे. मोठ्या झाडांच्या खोड किंवा फांदीवर लदबदून आलेली हिरवाई, त्यातून डोकावणारी पाने ,फुले सृष्टीतील जादुई स्पर्शाने पाऊसकाळात फुलून अंतर्धान पावायची.हे चार महिने दृष्टीस
सुखद आश्चर्याचे धक्के मिळत.
मोठ्या झाडांच्या अंगाखांद्यावर नाजूक वेली मनसोक्त खेळत. त्यांचं इवलंस कोमल अंग झाडापेडांवर झुलत ,आधार घेत गुंफलेलं दिसायचं.पाना पानांनी गच्च वेली
कधी कधी मोठ्या झाडाला पांघरून घालून झाकून टाकायच्या.गारवेल तर कुठेही तारेवर,छपरावर,कुंपणावर सुखनैव नांदत असते.आपल्या जांभळ्या फुलांनी आणि पानाच्या दाट जाळीने गारवा देणारी म्हणूनच तिचं नाव गारवेल पडलं असावं.नाजूक शुभ्र जाई जुईची वेल अशीच
अंगणात आधाराने वाढते.त्याचं खोडही तितकंच नाजूक तरीही चिवट.शेंदरी रंगाच्या दळदार शुभ्र पाकळ्यांचा सुगंधी
पारिजातक हलक्या हाताने वेचावा इतका सुकोमल. त्याचं खोड मात्र खरखरीत ,जाडभरडं. गुलाब फुल सुंदर तितकंच विविधरंगी . त्याच्या खोडावर मात्र काट्यांचा खडा पहारा.
खोडावर काटे मिरवणारी निवडुंग तर त्याच खोडावर सुंदर रंगाचे कोमल फुल फुलवते.यथावकाश तीच फुले सुकल्यावर आपले कलेवर त्याच काट्यावर ठेवून विसर्जित होतात.
काट्यांत फुलायचं आणि एक दिवस आनंद देऊन पुन्हा काट्यांच्या सरणावर अलवार आपला देह ठेवताना आपल्या
सार्थकी जगण्याची लय शोधत निघून जायचं..हा असा सृष्टीचा अदभुतरम्य खेळ.कुणालाही न आवडणाराच की!
निवडुंगाच्या खोडावर विविधरंगी फुलांचा नजराणा डोळ्यांचे पारणे फेडतो. तसेच एक झाड ज्याचे खोडच पान असते ते म्हणजे ब्रम्हकमळ ! पानाला दुसरे पान फुटून दिसामासी वाढत जाऊन कळ्या फुलांनी बहरणारे! हाताच्या मुठीएव्हढ्या त्याच्या कळ्या आणि फुल तळहातावर मावेल एवढं.. रात्रीचं फुलणारं..! त्याचे मूळ झाड हिमालयात असले तरी त्याची एक जात दारात फुलून आनंद देणारी! आपल्या खोडावर पानांचा दाट पसारा घेऊन गंध आणि कळ्यांची मनमुराद लयलूट करतो तो मोगरा..आणखी कित्तीतरी वेली
अशाच फुलणाऱ्या..!
श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये सणांची रेलचेल असते.सुवासिनी वेगवेगळ्या झाडांची पाने गोळा करून पूजन करत असतात. त्यातच सत्यनारायणाची पूजा म्हटलं की केळीचे खुंट हवेच असतात. मऊसूत गाभ्याची केळ
आपल्या अंगची नजाकत लेवून उभी असते.इतर झाडांपेक्षा तिचे खोड पाणीदार आणि मुलायम असते. केळीचे घड लागले की खोडावर घाव घालून तिला तोडून टाकतात.
इतके फळ देणारे झाड क्षणार्धात भुईसपाट झालेले पाहताना डोळे आपोआप भरून येतात . बाळाराजाचे देखणे रूप पाहून एकदा शेजारच्या आजी लाडिक स्वरात म्हणाल्या होत्या ' बाळ म्हणजे केळीचा खुटच जणू ..!' इतकी सुंदर उपमा कशी बरं सुचली असेल ..? हा प्रश्न अनुत्तरित आहे अजूनही. कुठल्याही मंदिरात गेले तरी हमखास चंदनाचे खोड आणि त्याला उगाळण्यासाठी सहाण दिसतेच.गाभाऱ्यात प्रवेश करताच चंदनी दरवळ मनास भिडतो.त्याचे लेपन मूर्तीला किंवा पिंडीला गंध म्हणून लावले जाते. हे चंदन मिळविण्यासाठी चंदनाचे खोड तोडून खोडाच्या मध्ये गाभा असतो यांपासून काढतात. सुगंधी आणि शीतल या गुणधर्मामुळे ते महाग असते. असेच दुसरे एक झाड तमालपत्राचे .त्याच्या खोडावरील साल दालचिनी मसाल्याच्या पदार्थांत महत्वाचे स्थान पटकावून आहे.त्या झाडाची पानेसुद्धा मसाल्यात मिरवतात.
पेरापेरात साखर भरलेला ऊस म्हणजे गोड खोडच की..! वरून कठीण असला तरी आत गोड रस..
कडेवर बाळ घेतलेल्या बाईसारखी मका कणसांना खोडावर जोजवत असते ..काही झाडांच्या खोडावर बारीक लव असते. हात लागताच खाज सुटते. खूप वर्षांपूर्वीची जुनी खोडे त्याच्या आतील वलयांवरून समजतात. अज्ञातवासात जाण्यापूर्वी शमीच्या झाडाच्या ढोलीत अर्जुनाने शस्त्र कापडात गुंडाळून ठेवल्याचा संदर्भ आठवतो. झाडाच्या ढोलीत घुबड किंवा इतर प्राणी पशु राहतात. झाडाच्या खोडावर आपल्या अणकुचीदार चोचीने सुतारपक्षी घर बनवतो .खडबडीत, खरखरीत,मऊसूत,गुठळ्या असलेली,काटे मिरवणारी,रंगीत,लवचिक,कठीण सालीची,सुगंधी तर कधी पानच खोड झालेले तर कधी जमिनीत मातीत गुडूप झालेले,कोणत्याही परिस्थितीत ऊन,वारा,पाऊस झेलत आपल्या नैसर्गिक लयीत सृष्टीत सामावणाऱ्या खोडांचा हा कोलाज. कित्येक घरांसाठी
खोड आधार होते...जुन्या बुजुर्गासारखे थकले तरी अखंड
देते राहते..! तथास्तु म्हणत थरथरते हात वर करून तोंडभरून आशीर्वाद देते..!
योगिता राजकर,वाई
मो 9890845210
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
Kadva shivar
कादवा शिवार


0 coments