Read more
#CoronaStopKroNa
*दहशतीचा काळा घोडा*
दहशतीचा काळा घोडा उधाणलाय
आरस्पानी पिवळं नितळ ऊनही बेजार झालंय
काळ्याकुट्ट ढगांची पहाड गस्त घालतात रात्रंदिवस
काळाचा काळ आलाय जवळ
पक्षी परतातय घरट्याकड आक्रोशत
प्राणी सरपटताहेत केविलवाणे बिळाकडे
माणसे तडीपार रस्त्यावरून आईसोलेशनमध्ये आपापल्या घरात
क्वारंटीन करून घेतलंय जगान स्वतःला स्वयंघोषित कर्फ्यु लावून
प्रचंड धामधुमीचा अन चंगळवादाचा हा काळ
दिवसाच्या रात्रीत विलीन होऊ बघतोय जणू काळोखाची राजवट
गुडघे टेकलेली माणसे
मत्त, श्रीमंत, गरीब, फकीर, साधू, संन्यासी कुणीही कुणीही सुटत नाही
क्षीण विज्ञान, लाचार तंत्रज्ञान
एकच माप सर्वांसाठी समान
प्रगतीचे महामेरू बुटके झालेत
षंढत्व सिद्ध करताहेत
दृष्टीलाही न दिसणाऱ्या विषाणूपुढे.....
काळाचा हा अजब खेळ
खेळवतोय डोंबऱ्यागत, नाचावतोय डम डम डम डमरूच्या तालावर
अख्या व्यवस्थेला नाचवीत करतोय स्वतः नर्तन
'बरे नव्हे तुमचे वर्तन'चा संदेश देत.
*गिरीश ना.सपाटे*

0 coments