Read more
#coronastopkarona
माणसांना बाहेर पडता येत नाहीहे कश्याच्याही
स्वतःच्या मर्जीने
ना घराच्या,ना दाराच्या अगदी शरीराच्याही
माणसांना तोडता येत नाही गळ्यात घातलेल्या अथवा पडलेल्या माळा
ज्या फास होत आलेल्या असतात एव्हाना.
माणसांना उतरवता येत नाही अंगावरचे रंगीबिरंगी कपडे
किंवा कातडे काळे, गोरे,निमगोरे
किती सुरक्षित समजत राहतात माणसं याला
आणि संस्कृतीचे हजार लफडे माणसाभोवती झिंगालाला करतात.
माणसं जातीसाठी माती खातात ,कधी शेण खातात
धर्मासाठी रक्त वाहतात
मोक्षासाठी तलवारीच्या धारेवर चालतात.
माणसं मरत मरत जगतात
क्षणाक्षणाला जळतात
माणसं मरणाने उजळतात कदाचित.
माणसं कळसूत्री बाहुले जेरीस आलेले
माणसं नाममात्र ,गलितगात्र.
आयुष्यभर माणसं विचार करतात स्वतःशीच खुश होत
हा चाबूक किती देखणा
पाठीने बेहद्द पसंत केलेला.
( काही सांगताच येत नाही :मधून साभार)
कवितासंग्रह :काही सांगताच येत नाही
कवी:प्रमोदकुमार अणेराव

0 coments