गावजत्रा gavjatra (vijaykumar mithe)

गावजत्रा gavjatra (vijaykumar mithe)

Author:
Price:

Read more


कळपातल्या मेंढ्यांनी एकमेकींवर  माना टाकून बसावंं  तसे गावाच्या खालच्या बाजूला दहा पाच खळे गळ्यात गळा घालून बसले होते,त्या भागाला मेंढवाडा म्हणायचे. का म्हणायचे ? माहीत नाही. पण कुठं चालला? तर मेंढवाड्यावर चाललो. असं गावातला प्रत्येकजण म्हणायचा. कधी काळी त्या जागेवर मेंढरांचा आखर बसत असावा. त्या अर्थाने बहुदा मेंढवाडा हे नाव पडले असावे. वेगळचार झालेल्या भावांनी  चौदाचाळ ऐसपैस वसरीत भिंत घालून आपला हिस्सा वाटा ताब्यात घ्यावा, तशी खळ्याच्या मधून आलेली मोहाड वाट सरळ पुढे बंधाऱ्याकडे जाणाऱ्या वाटेला मिळाली होती.आमचं खळं  तराळ शेताला लागून होतं तर माझा चुलता तुकाराम माळ्याचं खळं मऱ्याआईच्या देवळाच्या बाजूनं होतं.इतर खळ्यांच्या तुलनेत ते जरा जास्तच ऐसपैस होतं.त्या  खळ्यावर पाच वडाची झाड होती सवसांजेला दमून भागून आलेल्या पाच भावंडांनी गोळ्या मेळयानं  जेवायला बसावं तशी ती गोलाकार ठाण मांडून बसली होती.माकडांनी झाडाच्या फांद्यांना धरून झोके घ्यावे तसे आम्ही पोरं त्या वडाच्या पारुंब्यांना धरून झोके खेळायचो. खळ्यावर बाळूजी बाबाचं  दगडी चिऱ्याने बांधलेलं छोटं देऊळ होतं. देवळात बाळूजी बाबाची धोतर आणि बारबंडी घातलेली संगमरवरी मूर्ती खूपच सुंदर दिसायची. उन्हाळ्यात आखाजीला त्याची मोठी जत्रा भरायची.ही पालखेड गावची पहिली जत्रा.या जत्रेतच मी खेळणीची आणि मेवा मिठाईची दुकान पहिल्यांदा पाहिलेली. बाळूबाबा मिठे म्हणजे आमच्या मिठे घराण्याचा पूर्वज.अठराव्या शतकाच्या सुरुवातीला तो सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी गावाहून पालखेड गावी आला आणि कायमचा स्थायिक झाला. त्याच्याबद्दल गावात अनेक आख्यायिका आहेत.तो मांत्रिक म्हणून प्रसिध्द होता. मोठ्या जे. सी. बी. यंत्राला उचलणार नाही एवढा मोठा दगड त्याने पाठीवर उचलून रस्त्याच्या बाजूला खडक नंबरात टाकला आहे. काहीसा झिजलेला आणि चिंचोळ्या तोंडाचा तो दगड आजही बंधाऱ्याच्याखाली खडक नंबरात उभा आहे.  कोणाला उसवन भरली की त्याला पाठ घासल्यावर उसवन जाते असं म्हणतात.खरं खोटं जो पाठ घासून येईल त्यालाच माहीत. त्याचा मांत्रिक पणाचा वारसा त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत आला, पण त्या नंतरच्या पिढ्यांमध्ये तो काही आला नाही आई वडिलांनी माझं नाव बाळू ठेऊन पाहिले पण माझ्यातही तो आला नाही. (घरात मला बाळू म्हणतात)
गावात बाळूजी बाबाची पहिली जत्रा भरायची हे मात्र खरं आहे.  मी एक दोन वर्ष ती जत्रा पाहिलेली.पुढे ती  बंद झाली.
   त्यानंतर आखाडाच्या महिन्यात गटार अमावशेला मऱ्याईची जत्रा भरायला लागली. मऱ्याईचा भगत  घरोघर जाऊन मदन आणि पैसे मागायचा त्यातून ही जत्रा भरायची.मऱ्याईला बोकडाचा बळी देऊन नैवेद्य दाखवायचे आणि तोच प्रसाद म्हणून ग्रामस्थ खायचे.कितीतरी वर्ष ही जत्रा आखाडाच्या महिन्यात भरायची. आज मऱ्याईची जत्रा भरत नसली तरी मदन आणि पैसे मागून बोकडाचा नैवेद्य दाखविला जातो.          गाव धार्मिक वृत्तीचे असल्याने कदाचित गावातल्या लोकांना बोकड बळीची प्रथा मान्य नसावी म्हणून त्यांनी ग्रामदैवत मारूतीची जत्रा सुरू केली. देवळापुढच्या पटांगणात आणि रोकड
मल्लाच्या  रस्त्याला खेळणीचे, गोडीशेव रेवड्याची दुकाने थाटलेली असायची. संध्याकाळी वाजत गाजत रथातून मारुतीच्या प्रतिमेची मिरवणूक निघायची. दुसऱ्या दिवशी पुना हलवायाच्या वाडग्यात कुस्त्यांचं 'कडं' पडायचं. कुस्त्यांसाठी गावोगावचे पहिलवान हजेरी लावायचे. नाशिकहून लुंगी नेसलेला, भल्या भक्कम देहाचा आणि भरदार मिश्यांचा मोहन प्यारे पहिलवान आला की सगळे त्याच्याकडेच पहायचे. तुकाराम पाटील त्याच्या हाताला धरून त्याला कड्यातून फिरवायचा. मोहन प्यारेला पाहून त्याच्याशी कुस्ती खेळायला कोणीही पहिलवान तयार होत नव्हता. कुस्ती न खेळता लंगोटावर कड्याला सलामी देऊन तो बिदागी घेऊन जायचा. आम्ही जुन्या गावात होतो तोपर्यंत मारुतीची जत्रा भरायची. पण गावाचं स्थलांतर झालं.  आम्ही नवीन गावात आलो. त्यानंतर दोनचार वर्ष मारुतीची जत्रा अशी तशी भरत राहिली.नवीन गावात खंडोबाचे गाणे म्हणणाऱ्या दोन तीन पार्ट्या झाल्या आणि वाळू तात्या गायकवाड यांच्या पुढाकाराने गावात खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून देऊळ बांधले. तेव्हा पासून आजतागायत खंडेराव महाराजांची जत्रा भरते. ही जत्रा आधी तीन दिवस भरायची,आता दोन दिवसाची भरते.
  गावची जत्रा आली की,आई मला चार आणे खर्ची द्यायची. त्या खर्चीचा आनंद मोठा असायचा. जत्रेत आलेल्या दुकानातील बासरी, रुमाल, शिट्टी मला खुणवायची. चार आण्याच्या खर्चीत या सगळ्या वस्तू घेतल्या तरी एक आणा उरायचा. त्याची मी गोडीशेव आणि रेवड्या घ्यायचो. आताही मी नातवांना घेऊन गावच्या जत्रेतून फिरतो. खेळणीच्या दुकानातील मोटार गाडी  घेण्यासाठी ते हट्ट करतात.  तीनशे रुपयांची मोटरगाडी घेऊनही त्यांचं समाधान होत नाही, तेव्हा मला माझ्या बालपणातील गावची जत्रा आठवते. आईने दिलेली चारआणे खर्चीही आठवते आणि आता  गावजत्रेतील तो आनंद हरवल्यानं मन हळहळतं...

                                         लेखक - विजयकुमार मिठे
                                            मो - ९८८१६७०२०४
------------------------------------------------------------------
                            ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.

                                              संचालक - कादवा शिवार
                                              प्रतीक विजयकुमार मिठे
                                                 मो.9145099071
                                          #Team Kadva shivar 

0 coments