Read more
सुधा बागेला पाणी घालत आपल्याच तंद्रित होती. संध्याकाळच्या कलत्या उन्हात सूर्यप्रकाश सुधाच्या कोमल चेहर्यापवर पडलाने तिचा गोरा चेहरा अधिकच कांतीने चमकत होता.
केसांच्या बटा वार्यायमुळे गालाशी खेळत होत्या. मालकिणीच्या मोहक दिसणार्यास आकृतीकडे वारंवार नजरेचा कटाक्ष टाकत रोपांना आळे करता-करता कमलाची नेहमीप्रमाणे तोंडाची टकळी चालू होती. तिच्या बोलण्याकडे सुधाचे लक्षच नाही. रोज-रोज आईंचे आतल्या-आत धुमसणे, दुःखी राहणे तिला आता सहन होत नव्हते. एवढे वैभवसंपन्न, नावाजलेलं कुटुंब, अगदी दृष्ट लागेल असं चौकोनी कुटुंब. पण कुणाची नजर लागली अन् एक कोनाच निखळला जणू! आपण अमितची पत्नी म्हणून घरात आलो. तरीही ह्या चौथ्या कोनाची उणीव भरून काढू शकलो नाही. सगळं असुनही एक रितेपणा भरून आहे घरात आणि सर्वांच्या मनातही. खरंच कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खरं. एवढ्यात गाडी थांबण्याच्या आवाजाने सुधा भानावर आली. ड्रायव्हर पुढे होऊन आईंना गाडीतून उतरण्यासाठी हात देत होता. आईंना बघताच सुधा हातातली पाण्याची नळी तशीच टाकून त्यांना हात देते, जड पावलांनी, स्वत:ला सांभाळत त्या थप्पकन बागेतल्या खुर्चीवरच विसावतात. भव्य, गोर्यापान वृद्ध चेहरर्यावर दु:खाच्या, चिंतेच्या काजळी रेघा अजूनच दाटल्या सारख्या वाटत होत्या. उंच शरीरयष्टीच्या, स्वत:चा वेगळाच दरारा असणार्या आई अगदीच खचल्यासारख्या दिसत होत्या. सुधा त्यांची ही स्थिती बघून हबकून गेली. तिने चुपचाप पाण्याचा ग्लास त्यांच्या पुढे धरला. तिकडे लक्ष न देता गंभीर आवाजात त्या म्हणाल्या, तू एकेल का सुधा?
सुधा आश्चार्याने म्हणाली, काय आई?
मागच्या महिनाभर अखिलेश खूप आजारी होता? जणू काही आता त्याच खूप आजारी आहेत अशा आवाजात आई म्हणाल्या.
काय? अखिलेश भैया आजारी होते, पण ह्यांनी कसे सांगितले नाही! सुधा
आई, तो काय सांगणार? तो का तिथं जातो?
सुधा काळजीने विचारते, पण त्यांच्या कानावर तर आले असेलच. तुम्हाला कुणी सांगितले?
देशमुखांच्या घरी आज काम होते. कोल्हे वहिनी-तात्याही आलेले होते. बोलता-बोलता कोल्हे वहिनी बोलल्या की, तुमचा मुलगा अखिलेश खूप आजारी होता. मरता-मरता वाचला. हे ऐकूण मी पानी-पानी झाले. माझाच मुलगा आजारी आणि मला ते बाहेरच्यांनी सांगाव. लोक तर बोलतच राहतात. पण मी स्वत:च डोळ्यावर, कानावर परंपरेचं कातडं ओढून बसलेय त्यामुळे माझ्या मुलांच्या जीवावरचं दु:खणही कळू नये. बोलता-बोलताच आईंचे डोळे अश्रुंनी भरून आले. त्या स्वत:शीच बोलाल्यासारख्या कातर स्वरात बोलतच राहिल्या. लहानपणी अगदी थोडा ताप-खोकला आला तरी मी त्याची किती काळजी घ्यायचे जपायचे. कितीतरी दिवस स्वत: न खाता पिता, रात्र-रात्र जागायचे. हे खूप समजवायाचे, नाराजही व्हायचे. पण माझ्या आईचं ह्रदयाला ते कुठं समजायचं आणि आता... असं म्हणत आई रडू लागतात. सुधा आईंच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना आपुलकीच्या स्वरात म्हणते, आई, अहो आई! रडू नका! यामध्ये तुमचा काय अपराध आहे?
अपराध कुणाचा नि काय हेच कळेनासे झालंय! सगळे मलाच दोष देतात मनातनं. कोल्हे वहिनी काळजीचा आवाज आणत सांगत होत्या, सून कशीही असू द्यात हो, पण पोरीने आपले प्राण पणाला लावून नवर्याहला वाचविले. एकटी आहे, पण कुणाच्या पुढे हाथ पसरायला गेली नाही. दहा-बारा दिवस तो अॅडमिटच होता. औषध-पाणी, घरातलं काम सांभाळून अखिलेशची काळजी घेतली. सुधा हिच लोक अखिलेशने परजातीय विवाह केला म्हणून निंदा करत होती. आज मानभावी पणाचा आव आणून काळजी दाखवतात.
पण आई, अखिलेश भैयांना काय झालं होतं? सुधा काळजीने विचारते.
आई, सिरियस स्वाईन फ्लू झाला होता.
काय स्वाईन फ्लू ! सुधाला धक्काच बसतो.
आई, मरता-मरता वाचला तो सुधा. महिना झाला तो अजून ऑफिसलाही जात नाही.
एवढं झालं, तरी ह्यांना काही माहीत झालं नसेल? सुधा आश्च र्याने म्हणते.
आई जराश्या रागानेच म्हणते, माहिती असेल तरी तो काही सांगणार आहे, मोठ्या भावाबद्दल.
सुधा चपापते. नवर्या ची बाजू घेत म्हणते, पण आई, हे तर...
थोड्यावेळ शांतता पसरते. आईच विषण्ण स्वरात सुरवात करतात, मला माहीत आहे. दोन्ही माझीच तर मुलं आहेत. माया-ममता त्यांना स्पर्शही करत नाही. प्रत्येक गोष्टीत कठोरता. धर्म आणि कर्तव्य याच गोष्टी त्यांनी शिकल्या आहेत. शेवटी त्यांचे वडीलही तर तसेच होते कठोर. मला आठवतं आमित लहान होता. त्याने शाळेत चूक केली तर किती निर्दयपणे त्यांनी त्याला चार दिवस उपाशी ठेवले. लोकांनी तर तोंडात बोटच घातले. असा कसा निर्दयी बाप आहे. पोटच्या पोराला शुल्लक चुकीसाठी इतकी भयानक शिक्षा देतो. त्याच बापाची ही मुलं आहेत. माया-ममतेत फसलेली म्हणून माझी कायमच त्यांनी चेष्टा केली. निंदा केली.
हे सर्व ऐकून सुधा कासावीस होते. हळूहळू तिचे भाव बदलतात. करुणेने भरलेल्या तिच्या मनात हळूहळू राग धुमसू लागतो. चिडून ती म्हणते, पण आई, या सर्वात सगळा दोष सुहानी वहिनींचा आहे. त्यांच्यामुळेच ह्या सर्व गोष्टी होत आहेत.
हताश होत आई म्हणतात, ते तर खरंच आहे. पण सुधा...
सुधा उत्तेजित होत म्हणते, मला सर्व समजते, सुहानी वहिनी वरून भोळ्या-भाबड्या दिसतात. पण...
‘ भोळी दिसते. आई आश्च.र्याने म्हणतात.
हो तर, खूपच भोळ्या दिसतात, त्यात खूप सुंदर! जो एकदा त्यांना बघेल तो त्यांचं रूपच विसरू शकणार नाही. पुन्हा-पुन्हा त्यांच्याकडे बघण्यांचा मोह होतो. गोरा रंग, उंच बांधा, लांब काळ्याभोर केसांची जाड वेणी. आणि हो मोठे-मोठे भुरे-गहिरे डोळे असे आहेत की त्यात अवखळ, बालीश हास्य कायमच विलसलेले दिसते. सुंदरता आणि निरागस भोळेपणाचा अगम्य मिलाप म्हणजे सुहानी वहिनी.
म्हणजे सुधा तू अखीलेशच्या बायकोला पाहिले आहे? मला बोलली नाही, कधी भेटली , आई आश्चनर्याने विचारतात.
सुधा चाचरत म्हणते, त्याचं काय झालं. त्या दिवशी ह्यांची आणि तुमची अखिलेश भैयावरून वादावाद झाली. तुम्ही ह्यांच्यावर रागावून खूप दु:खी झाल्या. त्यावेळी मी रागाने सुहानी वहिनींकडे गेले होते. दुपार होती. तुम्ही झोपल्या होत्या. खरं सांगते आई, त्यांच रूप-सौंदर्य बघून मी चकीतच झाले. पंजाबी मुलगी इतकी सुंदर असू शकते! मला बघून त्या हसल्या. नमस्कार केला. जेव्हा मी माझा परिचय दिला तेव्हा तर त्यांना भरून आले. माझी गळाभेट घेतली...
आणि तू मला हे सांगितलंही नाही! विस्मयाने आई म्हणाल्या,
मी, हे तुम्हाला सांगणारच नव्हते. मी काही त्यांना भेटायला गेले नव्हते, मी त्यांच्याशी भांडायला गेले होते, कारण तुमच्या सगळ्या दु:खाचं कारण त्याच आहे. त्या नसत्या तर मोठे भैया तुमच्या पासून दूर गेलेच नसते.
त्यांच्या मुळेच आपली प्रतिष्ठा, नाव मातीत मिळाले. शिवाय तुम्ही कायम किती चिंतेत, दु:खी असतात. हीच गोष्ट मी त्यांना स्पष्ट बोलले.
काय तू तिला स्पष्ट सुनावलं? आई उत्सुकतेने विचारतात.
हो तर , माझं बोलणं एकूण, त्या प्रथम हसल्या नंतर म्हणाल्या, ‘ यात माझा काय दोष आहे? ही गोष्ट तर...’ असं म्हटल्यावर मला खूप संताप आला. त्याचं बोलणं मध्येच थांबवून म्हणाले, तुमचा दोष नाही तर कुणाचा आहे? तुम्ही मोठ्या भैयांना आपल्या जाळ्यात न अडकवता तर ते घरा-दाराला, आईला कशाला परके झाले असते.
तुम्ही आताही ठरवलं तर सगळ ठीक होईल. तुम्ही अखिलेश भैयाना सोडून जा...म्हणजे...
आई चकित होऊन म्हणाल्या, सुधा, सुधा! तू हे म्हणाली...?
सुधा भावनेच्या आवेगात बोलतच राहते, हो तर, मी स्पष्ट म्हणाले. एका मुलाला आई पासून वेगळं करणं पाप आहे, आईचं हृदय तोडणं हा तर तिच्यावर अत्याचार आहे. आईचं हे दु:ख दूर करण्यासाठी खरं तर प्राण दिले तरी कमीच आहे.
आत्सुकतेने आई, मग, काय म्हणाली ती?
त्या म्हणाल्या, सुधा तू माझ्याहून लहान आहेस. मी मानते आई-मुलाच्या नात्यापेक्षा कोणतेही नातं मोठं नाही.
परंतू पती म्हणजे, ज्याच्यावर आपण समाजालाच नव्हे तर हृदयाला साक्षी ठेवून प्रेम करतो. त्याच्या एका संकेतावर मी प्राणही देऊ शकते. परंतू त्यांना दु:खी करून, मी कुणाला सुखी करण्याची कल्पनाही करू शकत नाही. असं पतीला दु:खी करणं म्हणजे मोठं पाप. सुधा तू स्वत: विचार कर, तू ही एक पत्नी आहे. तू माझ्याप्रमाणे प्रेमविवाह केला नाहीस. तरीही तू तुझ्या पतीवर खूप प्रेम करते, हो...ना?
मला ही गोष्ट आवडली नाही, मी ताटकन् म्हणाले, सगळ्याच बायका आपल्या पतीवर प्रेम करतात. मीसुद्धा करते. मी अमितवर माझ्या प्राणापेक्षाही अधिक प्रेम करते. हे ऐकून त्या घाबरल्या नाहीत, चमकल्याही नाही.
मला प्रेमाने म्हणाल्या, सगळ्यांची गोष्ट मी सांगत नाही, तेवढा मला अधिकार नाही. पण मला माहीत आहे तू अमितवर आपल्या पतीवर खूप प्रेम करते म्हणूनच इथं आली आहे. तूच सांग बरं, तुला कुणी म्हणाले, तू अमितला सोडून दे. करण त्याची आई, कुटुंब या विवाहामुळे नाराज आहेत. तर काय...
यापुढचं मी एकूच शकले नाही. मी जोरात ओरडले, वहिनी, बास झालं...बंद करा तुमचं बोलणं , तरीही त्यांनी आपलं बोलणं पूर्ण केलंच, तर काय तू त्यांना सोडून देशील, सांग... तेव्हा मी चिडून म्हटलं, नाही वहिनी, मी अमितला कधीच नाही सोडणार. वाटलं तरी ही नाही सोडू शकणार... हे एकूण सुहानी वहिनी हसल्या आणि प्रेमाने म्हणल्या, सोड ह्या गोष्टी. प्रथमच तर तू आली आहेस. आणि ह्या काय गोष्टी आपण बोलत बसलो. आधी आत ये, चल. पण आई त्याचं हे बोलणं ऐकूण माझा अंतर्बाह्य थरकाप झाला. त्याचं रूप, बोलणं याने जशी मला मोहिनीच घातली, मी विचारात पडले. मी माझ्यात होते अन् नव्हतेही. माझ्याच विचारात मी तेथून झपाट्याने निघून आले. त्या मागनं हाका मारतच होत्या.
स्वप्नातून जागे झाल्याप्रमाणे आई म्हणाल्या, तर काय, तू निघून आलीस?
सुधा म्हणाली, हो, मी तिथं थांबूच शकले नाही जास्त.
गंभीर होत वेदनेच्या स्वरात आई म्हणाल्या, सुधा, पण तू तिथं जाऊन तर आली. अमितही जात असेल. तुम्ही तर कठोर आहात तरी जाऊन आलात. मी मात्र माया-ममतेत गुरफटलेली असूनही स्वत:च्या मुलाचं तोंड पाहणेही दुरापास्त झालंय? किती विपरीत गोष्ट आहे? त्यावर सुधा सफाई देत म्हणते, आई, आम्ही काय त्यांना भेटायला थोडंच गेलो होतो, आम्ही तर ...
तीला मध्येच थांबवत आई म्हणाल्या, भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्व असते. त्या आकर्षणापोटी का होईना तुम्ही एक-दुसर्या्कडे ओढले गेले. त्यात प्रेम असो की घृणा. पण खरी गोष्ट ही आहे की रक्त हे रक्ताकडे ओढ घेतेच. खरंच मीसुद्धा कठोर होऊन ह्या संस्कारांच्या गुलामीतून, जंजाळातून मुक्त होऊ शकले असते तर किती बरं झालं असतं. कुळ, धर्म आणि जातींच्या या भुतांनी मला त्रस्त केलं नसतं. मी माझ्या मुलापासून दूर झाले नसते.
त्यानेच मला एकदा म्हटलं होतं, संस्कारांची गुलामी माणुसकीची सगळ्यात मोठी शत्रू आहे.
सुधा विचारते, काय मोठ्या भैयांनी स्वत: असं म्हटलं होतं?
आई भूतकाळात जात म्हणाल्या, त्याच्या लग्नाला मी विरोध केला. त्यावेळी मी त्याला समजावले. माझ्या प्रेमाची त्याला शपथ घातली. त्यावेळी तो म्हणाला, ‘ आई मुलाला जन्म देणं, त्याचं पालन करणं हे आई-बापाचे नैतिक कर्तव्य आहे. हे करून ते कुणावर उपकार करत नाहीत. फक्त राष्ट्राचं ऋण चुकतं करतात. यातच त्यांच समाधान आहे. यापेक्षा अधिक मोह धरणे पाप आहे.’ पण मी तरी काय करू, यापेक्षा मी अधिक अपेक्षा ठेवते हे खरंच आहे. मीच काय सगळ्याच आई-वडिलांची हीच अपेक्षा असते.
दोघी सासु-सुनांच्या या भावगर्भित गोष्टी चालल्या आहेत. आजूबाजूच्या जगाचा जणू त्यांना विसर पडला. गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने त्या या भाव समाधीतून जाग्या झाल्या. अमित गाडी लावून येतो. बागेतच आईजवळ बसत प्रेमाने विचारतो, काय गप्पा चालल्या सासु-सुनांच्या पती अमितकडे बघत सुधा त्याला चहा आणण्यासाठी जाते. आई घाईनेच म्हणतात, अमित, तू ऐकलं का अखिलेश खूप आजारी होता. अमित मख्खपणे म्हणतो, त्याला हायर लेव्हलचा स्वाईन फ्लू झाला होता. मरता-मरता वाचला दादा.
आई रागानेच, तरी तू मला सांगितले नाही. मी काय त्याची आई नाही?
अमित तितक्याच शांतपणे म्हणाला, सांगून तू काय केलं असतं, तू काय लगेचच त्याच्याकडे जाणार होतीस?. यावर आईची बोलतीच बंद झाली.
अमित पुढे म्हणतो, मला माहीत आहे, तू तिथे गेली नसतीस आणि जाऊनही काय झाले असते. जो पर्यंत तू परधर्मीय, खालच्या जातीतील वहिनीला घरी घेऊन येत नाही तोपर्यंत, तुझ्या या प्रेम आणि ममतेचा आणा-भाका, अर्जवं सारं काही व्यर्थ आहे. तू कठोर आहेस, आई तू कठोर आहेस. या वाग्बाणांनी आई घायाळ होतात. रडत-रडत थरथरत्या आवाजात म्हणतात, मी, मी कठोर आहे? अमित रागाने म्हणतो, तू कठोरचं नाही तर भित्रीसुद्धा आहे. ज्या संस्कारात, रिती-भातीत तू वाढली आहे ते ममतेपेक्षा तुला श्रेष्ठ वाटतात. पोटच्या मुलासाठीही ते तोडण्याची तुझ्यात हिम्मत नाही.
मुलाच्या ह्या शब्द्प्रहाराने आईंचे हृदय छिन्न-विछिन्न होते. चेहर्योवर भयंकर वेदना पिळवटते. हे बघून दारातच चहा घेऊन येणारी सुधा स्तब्ध उभी राहते. परंतू आईंच्या चेहर्यातकडे लक्ष जाताच नवर्यादला म्हणते, आईमध्ये ती हिम्मत नाही. पण तुमच्यात तर ती आहे. मग तुम्ही गेलाच असाल भैयांकडे?
अमित गोरा मोरा होत म्हणतो, मी का जाऊ त्याच्याकडे. माझे काही काम नाही. जाऊन तरी काय करू?
सुधा उपहासाने अमितला म्हणते, खरंय, जाऊन तरी काय करणार. भावाच्या आजाराची अगदी मृत्युची बातमी ऐकली तरी तुमचे हृदय द्रवणार नाही. हे ऐकून अमित अवाकच राहतो. तो दोघींनाही समजावतो, अगं, तू जर अखिलेश भैयांना ओळखलं असतं तर अशी बोलली नसती. मलाच काय, मी नेलेल्या डॉक्टरची सावलीही त्याने नाकारली. फार मानी आहे तो. कुटुंबाने त्याच्यावर बहिष्कार टाकला. आता वहिनीशिवाय त्याला कुणीच जवळचे वाटत नाही. जाऊ दे सोड तो विषय. अमित घरामध्ये फ्रेश होण्यासाठी जातो. आईंशेजारी सुधा बसते. तेवढ्यात घरातील नोकर बाजारातून सामान घेऊन येतो. येताच तो घाईने सांगतो, आईसाहेब, आत्ताच दुकानात कळाले. अखिलेश भैया तर बरे झाले. पण त्यांची पत्नी म्हणजे सुहानी वहिनी खूप आजारी झाल्यात. सगळे तर म्हणतात त्यांच्या वाचण्याची शक्यताच नाही.
सुधा हे ऐकताच घाईने पतीला हाक मारून सुहानी वहिनीची बातमी सांगते. अमित म्हणतो, मला हे माहीत आहे. वहिनीने स्वत:चे प्राण धोक्यात घालून भैयाला वाचवले. परंतू आता वहिनीला वाचविण्यासाठी भैयाजवळ प्राणच उरला नाही.
आईंना रडूच कोसळते, म्हणजे अखिलेशची बायको खरंच मरेल?
अमित तू इथं काय करतो? तू लगेचच अखिलेशकडे जा . त्याला मदत करं.
अमित शांत स्वरात म्हणतो, त्याचा काही फायदा होणार नाही. भैयामध्ये एक दोष आहे. तो जे बोलतो तेच करतो. त्याच्याजवळ पैसे नाही पण त्यासाठी तो कुणापुढे हात पसरणार नाही. तो फौलादासारखा आहे. तो तुटेल पण वाकणार नाही.
सुधाला आता रडू फुटते, वहिनींना काही झालं तर काय होईल?
आई म्हणतात, तीला जर काही झालं; तर मला माहीत आहे, कदाचित अखिलेशसुद्धा... हो गं सुधा मी ओळखते अखिलेशला. तिला जर काही झालं तर तो जीवंतच नाही राहणार.
अमित आश्चर्याने म्हणतो, आई तुला इतकं समजतं, तरी...
आई निश्चयी स्वराने, हो रे, मला हे सारं समजतं. पण आता मला हा आडमुठेपणा बाजूला सारला पाहिजे. तो जरी हट्टी, कठोर असला तरी मी आई आहे रे! मला कठोर होऊन चालणार नाही. चल, मला आत्ताच त्याच्याकडे घेऊन चल... सुधा हे ऐकून आनंदित होते. अमित गंभीर होऊन म्हणतो, आई, चल म्हणतेयस, पण एका गोष्टीचा आधी विचार पक्का कर, तू जर त्या परजातीय, खालच्या कुळातील वहिनीला या घरी आणले नाही तर, जाऊन काही फायदा नाही. तेव्हा तुझा विचार पक्का कर.
आई घाईने आणि उत्साहाने म्हणतात, अमित अरे त्या दोघांना घरी आणायचे हे मी ठरवलेच आहे. म्हणून तर चल म्हणतेय. आईचे हे बोल ऐकून अमितमध्ये उत्साह भरतो, तो खुशीने सुधाला म्हणतो, सुधा तुही चल. मी गाडी काढतो. चला पटकन...
-सौ. सुरेखा बोर्हाडे ( गायखे )
(नाशिक) मो-9158774244
------------------------------------------------------------------
...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.
संचालक - कादवा शिवार
प्रतीक विजयकुमार मिठे
मो.9145099071
#Team Kadva shivar

0 coments