काकांचा दरारा, बागेला तजेला (surekha borhade)

काकांचा दरारा, बागेला तजेला (surekha borhade)

Author:
Price:

Read more


  सुट्टीमध्ये स्नेहाचे रत्नागिरीचे काका-काकू, बरोबरचे चुलत बहिण भावंडं आली आहेत. स्नेहाची आई काकांना म्हणाली, "  भाऊजी, आज स्नेहाचं कॉलनीतलं मित्रमंडळ आपल्याकडे येणार आहे. मला तर ऑफीसमध्ये आज महत्वाची मिटींग आहे. तुम्ही आज मुलांना वेळ द्याल?"
काका आनंदाने म्हणतात,"अरे वाह! वहिनी तुम्ही तर माझ्या आवडीचं काम सांगितलं. बच्चे कंपनीत खेळायला ,मस्ती करायला मला खूप आवडतं. यामुळे परत एकदा आपण बालपण अनुभवतो..हो की नाही."
     "खरंच हो! मी ही आज तुमच्या बच्चे कंपनीची मेंबर आहे, बरं का." काकू उत्स्फूर्तपणे म्हणाली.
हा संवाद ऐकून स्नेहा आणि तिची भावंडं उत्साहाने मित्रमंडळाच्या स्वागताला तयार झाली. हळूहळू दहा-बारा सोबती जमा झाले. काकांनी सर्वांची ओळखपरेड घेतली. किटू, प्रेरक, आस्था तर काकांच्या उंचपु-या ,धिप्पाड देहयष्टीने, करड्या आवाजाने जाम टरकले. पण हळूहळू काकांनी गंमतीचा, विनोदाचा पेटारा उघडला तशी मुलांची भिती पळून गेली. सर्वांनी काका काका करत त्यांच्याभोवती दिवसभर पिंगा घातला. गप्पा , गोष्टी ,खेळ, विनोद, गाणी, नाटुकली याबरोबरच काकूच्या खाद्यपदार्थांनी आजच्या दिवसाला रंगत आणली.
      दुपारचे चार वाजले. मुलांचा उत्साह काही कमी झाला नव्हता. काका ऑर्डरच्या सुरात म्हणाले,"अब चलो गार्डनमें". मुलं काकांमागे बंगल्याभोवतीच्या बागेत आली. काकांनी मुलांना बागेतील विविध झाडं, पानं, फुलं, फळांची ओळख करून दिली. औषधी वनस्पती मुलांना दाखवल्या. त्यांचे उपयोग सांगितले. काका म्हणाले, "आता पावसाळा सुरू होईल. तेव्हा आपण सर्वजण आज सर्व झाडांच्या बुंध्याशी छानसं आळं तयार करून त्यांना खतपाणी घालूया. वाळलेली पाने , गवत काढून बाग स्वच्छ करूया."
        प्रेरक आनंदाने पुढे होत म्हणाला, "हो तर, झाडं आपल्याला कितीतरी गोष्टी देतात. त्यांची आपण प्रेमाने निगा राखूया." सर्व मुलं आनंदाने बागेत काम करतात. हिरीरिने , आवडीने माती, पाणी चिखल यांच्या रंगात मुले रंगून गेली. या नजा-याकडे बघून काका काकू हरखून गेले.
                                                           
                                                      सौ. सुरेखा बोऱ्हाडे
                                                   (नाशिक)
                                                   मो-8788491617
---------------------------------------------------------------- ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.

                                              संचालक - कादवा शिवार
                                              प्रतीक विजयकुमार मिठे
                                              मो.9145099071
                                          #Team Kadva shivar 

0 coments