"आभाळओल" म्हणजे ललित लेखनाचा वस्तू पाठच....(aabhalol)

"आभाळओल" म्हणजे ललित लेखनाचा वस्तू पाठच....(aabhalol)

Author:
Price:

Read more

                               (ललितसंग्रह)
                       लेखक - विजयकुमार मिठे 
                        ...परीक्षण-संजय गोराडे...(sanjay gorade)

   जानेवारी २०११ साली प्रकाशित झालेला विजयकुमार मिठे (सर) लिखित ‘आभाळओल’ हा ललितसंग्रह योगायोगाने हाती पडला, हाती पडलेला हा ललितसंग्रह शहरातील माणसाला भाकरी आणि ठेचा खायला द्यावा तसं काहीसं माझ्या बाबतीत झालं, तरीपण चव घ्यायला काय हरकत आहे, म्हणून ‘तिच्या अंगणातला पांढरा चाफा’ हा पहिलाच ललितलेख वाचला, आणि अधाशासारखी सगळी भाकरी आणि ठेचा संपवून टाकावा तसं संपूर्ण ललितसंग्रह वाचून संपवला, व तृप्तीचा ढेकर दिला. आजवर मी गेल्या शतकातील नामवंत लेखकांचीच पुस्तकं केवळ वाचत होतो, त्यांच्यासारखं लिहिणारं आज कोणीही नसावं असा माझा समज होता. तो समज आभाळओलने वाचताना अक्षरशः फोल ठरवला होता. ‘तुझं आहे तुझंपाशी’ अशी काहीशी प्रचिती मला येणं स्वाभाविक होतं, याला कारणीभूत ललितसंग्रहातील प्रवाही लेखनशैली, जी गेल्या शतकातील नामवंत लेखकांच्या संस्कारात वाढलेली आहे, जी वाचकास कधी आपलंसं करते कळतही नाही, परकाया अनुभव यावा तसं लेखक वाचकास अलगद त्याच्या विश्वात घेऊन जातो, व कुठलाही आडपडदा न ठेवता जीवनाचा एकेक पट हळूवारपणे उलगडून दाखवतो.
‘माझी पहिली बायको’ या ललितलेखात लेखकाच्या ध्यानीमनी नसताना बालवयातील बेतलेला लग्नाचा एक मजेशीर प्रसंग, चेष्टेचेष्टेत दोन कोवळ्या जीवांचं  लग्न ठरवलं जातं, जे त्यांचे खेळण्याबागण्याचे दिवस असतात, पण रिसीला पेटलेली लेखकाची आई ना मांडव ना वाजंत्री ना भटजी ना वर्हाडी या सगळ्याला फाटा देत आपल्या मुलाचं लग्न एका परक्या जातीच्या मुलीशी लावून देते, ज्या वधुवरास ‘लग्न’ या शब्दाचा पुरेसा अर्थसुद्धा माहीत नसतो. असा रडून रडून बेहाल झालेला लहानगा नवरदेव आज लिहिताना आपल्या रडण्याला सनईचा सूर असं वर्णन करतो, तेव्हा लेखकाची आवस्था त्यावेळी पूर्ण लग्न सभारंभात कशी झाली असेल याचे चित्रण आपोआपच डोळ्यांपुढे साकारते. असा हा ललितलेख उत्तरार्धात धीरगंभीर होत समर्पणाची रास्त शिकवण देतो.   
असाच अनुभव प्रत्येक ललितलेख वाचताना नाही आला तर नवलच. लेखकाला शेतीमातीचा दांडगा अनुभव असल्याने त्यातील निरक्षणं ललितलेखात एखाद्या जवाहीराप्रमाणं मोठ्या कौशल्याने ठिकठिकाणी गुंफलेली दिसतात. जसं ‘सासरी निघालेल्या अमीनानं जाताना चाफ्याचं सर्वांग कुरवाळलं, त्याच्याही अंतरंगातल्या दुधाच्या घागरी उचंबळून फुलांच्या देठी साठल्या आणि आसवांची फुले अमीनाच्या अंगावर कोसळली.’ किंवा ‘पाठ फिरवून बसलेल्या माणसासारखा आभाळाकडं फुलांचे तोंड वर करून पाहत बसलेला अबोल चाफा.’ या ‘तिच्या अंगणातील पांढरा चाफा’ मधील काही ओळी, त्यात लेखक व त्याच्या प्रेमाचा साक्षीदार म्हणून घेतलेला पांढरा चाफा या दोघांचा संबध एकमेकांच्या भावभावनांशी खूपच कलात्मक पध्दतीने जोडला आहे, चाफ्यात असलेली विविध वैशिष्ट्य मानवी स्वभावाशी जुळवल्याने तोही सजीव असल्याचा भास वाचकास झाल्याशिवाय राहत नाही.
‘बलाकमाला उडता भासे’ या लेखात लेखकाला माणूस आणि बगळा याच्या राहणीमानात आणि स्वभावात विलक्षण साम्य दिसतं, बगळ्यापासून व बगळ्याची वृत्ती असलेल्या माणसांपासून माशांनी आणि सद्विचारी माणसांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. यात पाण्याचा लाटांचं प्रतिक लेखकाने खूप छान पध्दतीने योजलं आहे, ‘एखाद्या साधूनं ध्यानमग्न उभं राहावं तसा बगळा एक पाय दुमडून एका पायावर पाण्याच्या ठिकाणी डोळे मिटून उभा राहतो. बुवाबाजी करणार्या बाबाच्या पुढे भोळ्या भक्तांनी लोटांगण घ्यावं तशा पाण्याच्या लाटा त्याच्या पायाशी लोटांगण घेतात.’ हे फक्त शेतीमातीत हायत गेलेल्या लेखकालाच सुचू शकतं. पाण्याच्या लाटा ही साधीशी घटना आहे, परंतु त्या भोळ्या भक्ताप्रमाणं त्यांना भासतात. त्यांच्या या कल्पकतेला एक वाचक म्हणून माझा खरोखर मानाचा मुजरा आहे.
यात तेरा ललितलेख आहे, या ललितसंग्रहास ‘आभाळओल’ हे शीर्षक खूपच समर्पक वाटते. ते वाचकास चिंब भिजवत नक्की मंत्रमुग्ध करते. त्याची ओल कायम स्मरणात राहील अशीच आहे.

                                                        संजय डी. गोराडे
                                                         (कादंबरीलेखक)
                                                               नाशिक.
                                                       मो.8999910647
-------------------------------------------------------------------
                               ...सावधान...
सदर ब्लॉग वरील साहित्यात फेरफार करणे, कॉपी पेस्ट करून स्वतः च्या नावाने साहित्य पोस्ट करणे हा सायबर क्राईम कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. ब्लॉगवरील साहित्याचा अनुवाद करणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे ,नाट्यीकरण करणे अथवा कोणत्याही कारणास्तव आपणास हे साहित्य वापरावयाचे असल्यास लेखकाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे.

                                              संपादक - कादवा शिवार
                                            #Team kadvashivar

0 coments