छंद प्रेमी...✍️ नरसिंग कदम...जिद्द म्हणजे यशाची गुरुकिल्ली: पंकजची प्रेरणादायी कहाणी"

छंद प्रेमी...✍️ नरसिंग कदम...जिद्द म्हणजे यशाची गुरुकिल्ली: पंकजची प्रेरणादायी कहाणी"

Author:
Price:

Read more

 छंद प्रेमी



अरे पंकज जरा आराम घे पाहू. सकाळपासून तुझे आपले चालूच. रविवारचा पूर्ण दिवस यातच घालवलास. जरा काही पोटाला खावं, थोडा आराम करावं. 'रिकाम्या पोटही डोकं चालत नसतं पंकज' पण काही काही नाही. 'अरे सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आरोग्य उठ बरं.'

आईचा ओरडा चालूच होता. पण माझं लक्ष मात्र पूर्ण त्या प्रयोगामध्येच गुंतलेलं. कधी एकदा डोकं लढवेल आणि माझ्या मनासारखा प्रयोग होईल असं वाटत होतं. माझ्या बाजूला सगळा पसारा पडलेला. माझं कशाकडेच लक्ष नव्हतं. फक्त एकच ध्येय,'आपला प्रयोग यशस्वी झाला पाहिजे.बस..'

               सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं की पिलं नव्हतं. त्यामुळे आईचा  ओरडा चालूच होता. आईचा माझ्यावर खूप जीव तसा बाबांचाही. पण बाबा जरा शांत स्वभावाचे. तेच उलट म्हणाले," अगं थांब जरा,त्याचा प्रयोग झाला की जेवेल, किती कांगावा करतेस ". 

तसं संध्या म्हणाली," अहो तुम्हाला माहिती नाही का? एकदा त्याने डोकं घातलं की त्याला जेवायचं भान सुद्धा राहत नाही ते. मागच्या महिन्यात असाच एक विज्ञानचा प्रयोग होता. तर त्याला जेवायला एक दीड वाजलेला".

 " हो, पण त्याने प्रयोग पूर्ण केलाच ना."

" हो केला. पण पोटाचेही पहावे म्हणते. " 

'शाळेत त्याचा पहिला नंबर आल्यानंतर तू किती आनंदी झाली होतीस. पंकज पेक्षा सुद्धा तुलाच जास्त आनंद झालेला.'

   " होणारच ना, एवढ्या विद्यार्थ्यात त्याचा पहिला नंबर येणे काही साधी गोष्ट होती का? "

 ' अगं जिद्द म्हणजे यशाची गुरुकिल्ली'उगाच नाहीत म्हणत.

 'पण मला काय वाटतं,त्यानं पोटाला पोटभर खावं. मग प्रयोग करत बसावं.बरं अभ्यासही तसाच मन लावून करावा की, अभ्यासात मात्र त्याचे तेवढं लक्ष लागत नाही.'

" अगं सगळे अभ्यासातच हुशार असतील असं नाही. कोणी कशात हुशार तर कोणी कशात. सगळ्यांमध्ये सारखे गुण नसतात पण प्रत्येकात काहीतरी खास टॅलेंट असतं बरं का?"

'तुमच्या असल्या बोलण्याने तर पोरगं बिघडत आहे. 'अति लाड पोरगं होतं द्वाड' हे लक्षात असू द्या म्हणजे झालं.

'हो ग बाई! कळले.'

" आई -बाबा तुम्ही वाद घालू नका. तुम्हाला वाटतं तसं काही होणार नाही. मी अभ्यासही चांगला करतो मला जेवढा झेपेल तेवढा करतोच आहे. 

       असं म्हणून पुन्हा मी प्रयोग करण्यात गुंग झालो. एकदा एखाद्या गोष्टीमध्ये डोकं घातलं की,ते मन लावून करायचे असा माझा स्वभाव.त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट चांगलीच जमायची.अभ्यासाचा मात्र थोडा कंटाळा.आई-बाबा म्हणतात त्यात काही खोटं नव्हतं.म्हणून, इतर कलांमध्ये माझं मन रमायचं.

              काय सांगू तुम्हाला, चित्र काढायला बसलो तर चित्र नंबर एक झालंच म्हणून समजा!रांगोळी काढली तर नंबर एक झालीच म्हणा,मेहंदी काढली ती पण नंबर एक, गणपती बसवताना सजावट करायला लागलो तर ती अशी करायचो की गल्लीतले सगळे आवर्जून पहायला यायचे.लक्ष्मीची सजावट तर बघण्यासाठी तोबा गर्दी. मग काय होतं अभ्यासात थोडा साधा असलो तर?मी मात्र समाधानी होतो. दुसरे मुलं अभ्यासातच, दुसरं काही त्यांना जमायचं नाही. सगळ्यांमध्ये सगळीच प्रतिभा नसते इतरांना माझ्यासारखं नाही जमत व मला इतरांसारखा. असा विचार करता करता प्रयोग करून पूर्ण झाला.मग मी आईला आवाज दिला.

      " आई, ये SS आई वाढ बरं जेवायला". 

"  हो तयारच आहे. ये ".

         आईने ताट वाढून प्रयोग बघायला आली. एवढ्या मेहनतीने प्रयोग केलेला,आईचा धक्का लागेल म्हणून मी ताट घेऊन आईच्या मागे मागेच गेलो. आई एकदम मोठ्याने म्हणाली,

 "किती छान".

 तेवढ्यात बाबाही आले. बाबांनी प्रयोग पाहिला आणि म्हणाले,

     "बघ, मी तुला म्हणालो होतो ना,थोडं थांब, त्याचा प्रयोग पूर्ण झाला की तो येईलच.किती छान प्रयोग केला त्यानं. खरंच 'जिद्द आणि मेहनत याचा संगम म्हणजे यश' आपल्या पंकज ने ते सर केले.

"उद्या त्याला शाळेत तुम्ही सोडा" संध्या म्हणाली 

 हो, बाबालाच मी नेतो. नाहीतर मेहनतीने केलेल्या प्रयोगाचे तीन तेरा होतील.

" हो बाबा,उद्या तुम्हीच सोडा  ".

      रात्री मला काही शांत झोप लागलीच नाही. कधी एकदा सकाळ होते.मी आंघोळ करून शाळेत जाईल. विज्ञान प्रदर्शनमध्ये माझा प्रयोग ठेवेल असं झालं होतं. जाग आली की मी घड्याळात किती वाजले पाहायचे. काय सांगू एक एक तासालाच मला जाग यायची.अखेर पाच वाजता उठलोच.तोंड धुतलं,आंघोळ केली,कपडे घालून तयार. आईला तर आश्चर्यच वाटले.

रोज सावकाश तयारी करणारा पंकज आज एवढ्या लवकर कसा तयार झाला?.

   "आई डब्बा भरला का?"

" हो, हे घे ".

 'बाबा,चला मला शाळेत सोडा.'

"अरे हो हो,चल,किती घाई".

 "आज की नाही एक पोरगं......"

" असं म्हणताच ....बाबा हे काय हो ".

" काही नाही.... काही नाही,चल ".

केलेल्या प्रयोगाला काही होऊ नये म्हणून मी खूप काळजी घेत होतो. गाडीत बसताना ही अगदी सावकाश बसलो. इतर वेळी उड्या मारत गाडीत बसणारा मी मोठ्या माणसासारखं सावकाश चढलो, शांत बसलो. ते पाहून बाबा म्हणाले, 

"अरे एवढा शांत का?'

आई तुला टाटा करते बघ तिकडं ". 

 माझे दोन्ही हात प्रयोग पकडण्यात गुंतल्यामुळे आज मी मानेनेच टाटा केला. आई बेस्ट ऑफ लक म्हणाली.मी थँक्यू म्हटले.आणि 

कधी एकदा शाळा येते असं झालं.

गाडी निघाली.विचारांमध्ये एवढा गुंग झालो की शाळा कधी आली कळलेच नाही. बाबा जेव्हा म्हणाले,

"पंकज उतर तुझी शाळा आली ".तेव्हा स्वप्नातून बाहेर आलो.सावकाश खाली उतरलो. निघाल्यावर बाबाही म्हणाले, 

'बेस्ट ऑफ लक.'

'थँक्यू' म्हणत थेट प्रदर्शन असलेल्या ठिकाणी गेलो.माझ्या अशा वागण्याला बघून बाबा हसत आहेत हे माझ्या लक्षात येत होतं. पण आज माझं पूर्ण लक्ष प्रयोगावरच होतं.

          प्रदर्शन भरलं. सरांनी कालच सगळ्यांना नंबर दिले होते. त्याप्रमाणे प्रयोग मांडले.भेदभाव होऊ नये,कोणता कोणाचा प्रयोग आहे ते कळू नये म्हणून असं केलं होतं.आम्ही आता प्रयोगा जवळ नव्हतो. परीक्षक आले. सर्व पाहून त्यांनी नंबर काढले दुसऱ्या दिवशी नाव जाहीर होणार होते.मला सारखं वाटत होतं.'आज नंबर काढायला काय झालं असेल बरं. 

आता उद्यापर्यंत वाट पहावी लागणार.' 'रात्र वैऱ्याची होती 'असं अनेकदा मी ऐकलं होतं,तशीच माझी रात्र ही वैऱ्याप्रमाणेच गेली.        


       शाळेत गेलो नंबर सांगणे चालू झाले.धडधड वाढली. सरही कसे त्यांनी उत्तेजनार्थ पासून सांगायला सुरुवात केली. मग तर आणखीनच धडधड व्हायला लागलं.पहिला नंबरचे नाव सरांनी पुकारलं, पंकज संध्या सत्यपाल काळे आणि मी जागेवरच उडी मारली.बाजूच्या मुलाला कडाडून मिठी मारली. माहितीही नव्हतं की तो आपला मित्र आहे का नाही. पण आनंदात त्याला कडाडून मिठी मारली. 

आता काय घरी रुबाबातच आलो.माझे चालणे पाहून आई-बाबांनी ओळखलं याचा पहिला नंबर आला असेल. आता चाल बदलली म्हणल्यावर वेगळं सांगण्याची गरज काय? मी जवळ पळतच गेलो.दोघांच्याही पाया पडलो.त्यांनी मला मिठीत घेतलं.तोंडावरून हात फिरवला. माझा पहिला नंबर आला म्हणून मी सांगितलं.दोघही आनंदी झाली. 

आई म्हणाली, " मी तुझ्या सारखे तुझ्या मागे राहते,अभ्यास कर,अभ्यास कर. पण तुझी आवड ज्यात आहे ते कर. 'आपल्या कामात प्रामाणिक राहा मग यश नक्कीच मिळेल.'

             मग काय, आता तर स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून मी सगळं लक्ष नवीन नवीन प्रयोगात घातलं. अन् कमी वयापासूनच नवीन नवीन प्रयोग करू लागलो.शाळेत, घरी,शेजारी सगळे मला आता वैज्ञानिक म्हणू लागले.पोरगं नाव करणार, एक ना एक दिवस मोठा वैज्ञानिक होणार म्हणू लागले. मलाही आतापासूनच आपण वैज्ञानिक झालो असं वाटू लागले. सरांनी म्हटलेले मला आठवले, 'खळाळता झरा वाहत राहतो,तेव्हा तो सुंदर असतो.आजूबाजूला हिरवळ असते, पशुपक्षी वावरतात.थांबले की त्याचे डबके बनते. नंतर त्याला दुर्गंधी येते. म्हणून मी थांबलो नाही, नवीन नवीन प्रयोग करतच राहिलो,करतच राहिलो.

 *डॉ.नरसिंग कदम ९४०४७३१०१०*

0 coments